कोजागिरी……….. अनघा_किल्लेदार पुणे.
#कोजागिरी..
पाच महिन्यानंतर ती आज पहिल्यांदा घरी आली होती. तिच्या माहेरी.. गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या आणि सोबतीला तिचा नवरा. सगळेच अवघडलेले होते. तिच्या आणि तिच्या नव-याच्या चेह-यावरचा ताण लपत नव्हता. गेल्या कोजागिरी पौर्णिमाच्या कार्यक्रमात त्यांच्या प्रेमाची कुणकुण घरच्यांना लागली आणि सगळी समीकरणे बिनसत गेली. दोन्ही घरातल्या मोठ्यांकडून भाषा भिन्न, जात भिन्न, रितीभाती भिन्न असली काहीतरी कारणे समोर येऊ लागली. त्या दोघांना हे अनपेक्षित होते. तीन पिढ्यांचे शेजारी होते. त्या दोघांच्या जन्माआधीपासून दोन्ही घरात घरोबा होता. आमनेसामने रहाणारी दोन संपन्न कुटूंब अडीनडीला, आनंदात , दुःखात एकमेकांबरोबर कायम एकत्र असायची. एकत्र जेवणे, हिंडणे फिरणे चालू होते त्यामुळे विरोधाचे तसे तर्कशुद्ध कारण तरी काही दिसत नव्हते. मग नक्की कुठे चुकले? दोघांना वाटत राहिले. दोन्ही घरात वाद होऊ लागले. वातावरण बिघडले. दोघांना नाही नाही ते ऐकून घ्यावे लागले. तिचे लग्न लावून द्यावे असा सल्ला तिच्या आत्याने दिला. आत्याच्या बघण्यात एक स्थळ होते. ती घाबरली. घरच्यांना आपण विरोध केला तरी आता आपले कोणी ऐकणार नाही याची तिला जाणीव झाली. दोघांनी विचार केला पण कोडे सुटेना. दिवसेंदिवस अधिक जटिल होऊ लागले..गंमत झाली अशी की दोघांच्या भावंडांनी त्यांची बाजू घेतली आणि मोठ्यांच्या न कळत दोघांनी पळून जाऊन लग्न केले. लग्नाला साक्षीदार म्हणून चाळीस जण हजर होते. दोघांनी घरी कळवले. महिनाभर ते बाहेरच राहिले. मित्राच्या जुन्या फ्लॅटवर. दोघांच्या नोक-या चालू होत्या. महिनाभराने त्याचे आईवडील येऊन दोघांना घरी घेऊन आले. तिच्याकडचा विरोध मात्र तसाच होता अजूनही. आता तर समोर राहून घर दिसतंय, माणसे दिसतायत पण कोणी बोलेना म्हणून ती खंतावत रहायची. त्याला समजत होते पण तिच्या माहेरी कोणी दाद लागू देत नव्हते. तिच्या आजीला नातीला बघून आनंद व्हायचा पण मुलाची नि सुनेची समजूत कशी काढायची हा पेच होता. एके दिवशी तिच्या आजीने मुलाला विचारले, ” तुझा नक्की विरोध कशाला आहे? मुलाला? घराला की तुला न विचारता प्रेम केले आणि ते निभावले याला?” तिचे वडील निरुत्तर झाले. खूप विचार केला त्यांनी, नक्की काय आवडले नाही आपल्याला? लोकं चांगली आहेत, लेक खुशीत आहे , जोडी शोभून दिसते आहे, दोघे शिकलेली आहेत..मग? तिची आई पण विचारात बुडली..नात्यात जरी स्थळ शोधले असते तरी इतके चांगले सासर मुलीला मिळाले असते याची काय खात्री होती? मुलीच्या आनंदापेक्षा , सुरक्षिततेपेक्षा चारचौघात मिरवावे असे काय होते? तिच्या आईला आठवले, मुलीची शाळेची बस चुकली तर त्याच्या वडिलांनी तिला शाळेत नेऊन सोडले होते एकदा नाही अनेकदा.. त्याच्या आजारपणात तिची आई त्याच्या आईबरोबर सोबत म्हणून डाॅक्टरकडे रोज हेलपाटे घालत होती. ही माया , हे प्रेम, काळजी खोटे होते कि दिखाव्यापुरते? त्याची नोकरी नवी गाडी याचा तिच्याही घरी आनंद होताच की..मग काय चुकले? आजीच्या प्रश्नासमोर तिचे आईवडील अगदीच नामोहरम झाले. लेकीने आपल्याला विश्वासात घेऊन सांगितले नाही म्हणून आपण दुखावलो गेलो हे त्याना पटले पण ते मान्य करणे त्यांना जमत नव्हते. मुलाचा आणि सुनेचा विरोध मावळू लागलाय हे चाणाक्ष आजीने ओळखले आणि एक पाऊल पुढे टाकत तिने मुलाला नात आणि जावयाला त्यांच्या घरच्यांसह पुढाकार घेऊन बोलावायला सांगितले. ते सोयरे आहेत..आजी सांगत राहिली. वडीलांना सासरी आलेले पाहून मुलीला खूप बरे वाटले. आमंत्रण दिले गेले , स्वीकारले गेले..पण अवघडलेपण जात नव्हते.
शेवटी आज, कोजागिरीला दोन्ही कुटुंब एकत्र आली. मनातली कटुता कमी झाली , आहेर आशिर्वाद दिले घेतले. गप्पा रंगल्या. त्या दोघांना खूप मोठं कोडं सुटल्यासारखं झाले. आईने तिची निघताना ओटी भरली. तिची रितसर पाठवणी झाली. नवी नाती रूळायला थोडा वेळ लागणारच होता. ती रस्ता ओलांडून सासरी आली..तिला खूप प्रसन्न वाटत होते. त्यालाही खूप आनंद झाला होता. तिला असे आनंदात बघून त्याचा आनंद दुणावला. तिच्या याच प्रसन्नतेवर तो भाळला होता. गेले वर्षभर मात्र तिला सतत तणावात बघून तो ही हिरमुसला होता..आज तिला तो हळूच म्हणाला ,” कोजागिरीचा चंद्र फार सुंदर दिसतो म्हणतात..पण माझा चंद्र त्याहून शीतल आणि सुंदर आहे..”
—
#अनघा_किल्लेदार
पुणे.