मुलांना घडवतांना –मुलांचा आळस……..लेखिका- डॉ. विजया फडणीस
मुलांचा आळस………..
*एखाद्या व्यक्तीच्या अंगी अनेक गुण असूनही ती तिच्या क्षेत्रात किंवा एकूणच जीवनात अयशस्वी ठरत असेल तर अनेकदा त्यामागे आळस हा दुर्गुण लपलेला असतो. इतर सर्व गोष्टी आळसामुळे झाकोळल्या जातात. उत्तम आवाजाची देणगी लाभलेल्या अनेक व्यक्ती आपण बघतो. ‘तुम्ही इतकं चांगलं गाता, तर ही कला विकसित करावी असं नाही वाटलं तुम्हाला?’ या प्रश्नाला, ‘नाही बुवा! तो रियाज करणं, गळ्यावर मेहनत घेणं, त्यासाठी वेळ काढणं फार त्रासाचं वाटतं’ असं उत्तर मिळाले तर ती व्यक्ती आळशी आहे असे शंभर टक्के समजावे. सर्वच क्षेत्रांत हे दृश्य दिसते. अनेक गुणी विद्यार्थी, कलाकार, खेळाडू, लेखक, कवी, संशोधक, जे थोडी अधिक मेहनत घेतली असती तर चमकू शकले असते, आळसामुळे मागे पडलेले दिसतात. काहींना काही वर्षांनंतर आपल्या आळशीपणामुळे झालेल्या नुकसानीबद्दल किंवा मागे पडण्याबद्दल पश्चात्तापही होतो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.*
काही मुले मुळातच शहाणी, समजूतदार असतात. ती आळसाला जवळपास फटकूच देत नाहीत. आपल्याकडे लोळून अभ्यास करणाऱ्या मुलांचे प्रमाण बरेच दिसते. माझ्या ओळखीतल्या एका वडिलांनी मुलाला त्याची दहावीची पुस्तके वाचून दाखवण्यासाठी फेब्रुवारीत महिनाभराची रजा टाकली होती. तो लोळून नुसतीच श्रवणभक्ती करायचा. धन्य ते वडील अन् धन्य तो मुलगा.
विचार-भावना-कृती यांची एक साखळीच असते. जसे विचार असतील तशा भावना उत्पन्न होतात आणि जशा भावना असतील त्याप्रमाणे वर्तन घडते. आपल्या विचारांची जी चौकट बनते ती बहुतांशी आईवडील, भावंडे, घरातली इतर मंडळी, शेजारीपाजारी, शाळेतले शिक्षक, मित्र, समाजातून, पुस्तकातून मिळणारे अनुभव यातून बनत जाते. घरातले अनुभव तर खूपच महत्त्वाचे असतात. शर्टाची तुटलेली गुंडी तत्परतेने शिवणारी आई किंवा शिळे वर्तमानपत्र रोज सकाळी घडी करून ठरलेल्या जागेवर व्यवस्थित ठेवणारे बाबा बघून अशी कामे अशाच पद्धतीने, वेळेवारीच करायला हवीत हा संदेश मुलाच्या मनात ठसवला जातो. याउलट गुंडी तुटली तर पिन लावून काम निभावले जाऊ शकते, सवड मिळेल तेव्हा सावकाश गुंडी लावली तरी काही बिघडत नाही किंवा शिळ्या वर्तमानपत्रांचा दोन-तीन दिवसांचा गठ्ठा एकदम ठेवला तरी चालतो, अशा गोष्टीतून अव्यवस्थितपणा आणि दिरंगाईचा संदेश मुलापर्यंत पोचतो. हे अनुभव अनेकदा जसेच्या तसे उचलले जाऊन मुलांच्या जीवनशैलीचा भाग बनतात. अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. वाचनालयाची पुस्तके तारीख उलटल्यावर दंडासहित भरणे, किल्ल्या, महत्त्वाची कागदपत्रे हरवणे किंवा वीज, टेलिफोनची बिले घरातच इकडेतिकडे ठेवल्यामुळे न सापडणे, शेजाऱ्याची वस्तू वेळेवर परत न दिल्यामुळे संबंधात दुरावा येणे अशा गोष्टी दिरंगाई करण्याच्या प्रवृत्तीमुळे सततच घडत राहतात. हे सर्व खरे म्हणजे टाळता येणे शक्य असते. पण त्यासाठी शिस्तीचे, वेळेचे, नियोजनाचे बंधन, सवय स्वत:ला लावून घेणे आवश्यक असते. तेच नेमके माणसाला नको असते. कित्येक महाभाग बढतीच्या भानगडीत पडत नाहीत. कारण अभ्यास-परीक्षा-मुलाखत-जबाबदारी या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी जी शारीरिक आणि मानसिक शक्ती खर्च करावी लागते आणि ती करताना नजीकच्या सुखाचा जो त्याग करावा लागतो त्यासाठी यांच्या मनाची तयारीच नसते. एखादी गोष्ट न करण्यामागे किंवा पुढे ढकलत राहण्यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे त्या गोष्टीची तीव्र नावड असणे किंवा नेमके काय करायचे हेच माहीत नसणे. या गोष्टी बदलता येणे शक्य नसते.
एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास आवडत नाही आणि अमुक एक विषय किचकट वाटतो म्हणून अभ्यास ही एक कटकट, त्रासदायक गोष्ट वाटू लागते. जी गोष्ट आवडत नाही ती शक्यतोवर टाळण्याकडेच मन वेधले जाते. मनाविरुद्ध अभ्यासाला बसणे म्हणजे इतर अनेक आवडत्या गोष्टींना फाटा द्यावा लागतो. मित्र, क्रिकेट, टी.व्ही., झोप, सिनेमा, हॉटेलमध्ये किंवा फिरायला जाणे, कॉमिक्स, सिनेमाची मासिके वाचणे वगैरे गोष्टींचा अभ्यास नामक अप्रिय गोष्टीसाठी त्याग करण्याच्या कल्पनेने अस्वस्थ व्हायला होते आणि डोळे अभ्यासाच्या पुस्तकावर नुसते फिरत राहतात. चित्त म्हणजे मन केव्हाच क्रिकेटच्या मैदानावर पोचलेले असते. हे सर्व असहय़ होतेय आणि अभ्यासात आपले चित्त लागणे अशक्य आहे अशी भावना दृढ झाली की, अभ्यासाच्या बाबतीत दिरंगाई सुरू होते.
*आळसावर मात करणे आपल्याच हातात म्हणजे विचारात आहे. विधायक स्वरूपाचे विचार माणसाला आयुष्याचे प्रयोजन उपलब्ध करून देतात. जिच्याजवळ महत्त्वाकांक्षा आहे, डोळ्यांपुढे स्वत:च्या आवाक्यात असणारे ध्येय आहे, अशी व्यक्ती आळशी असूच शकत नाही. स्वत:जवळ असलेल्या लाखमोलाच्या धनाचा, ज्ञानेंद्रियांचा योग्य वापर करून ती स्वत:चा, तसेच इतरांचाही विकास घडवत राहते.*
लेखिका- डॉ. विजया फडणीस
पुस्तक: मुलांना घडवतांना
(विजया फडणीस यांचे *मुलांना घडवताना* हे बुक किंडल वर सुद्धा उपलब्ध आहे.)