अण्णा …. © दीपक तांबोळी 9503011250 (ही कथा माझ्या “अशी माणसं अशा गोष्टी “या पुस्तकातील आहे
अण्णा
-दीपक तांबोळी
लोकलने दादर स्टेशनवर मी उतरलो तेव्हा पाऊस सुरु होता.पावसाळ्याचेच दिवस ते.त्यामुळे माझ्यासोबत छत्री होतीच.एका हातात ब्रीफकेस आणि दुसऱ्या हाताने छत्री उघडून मी जिना चढलो.सकाळची अकरा साडेअकराची वेळ असल्याने दादर स्टेशनवर तुफान गर्दी होती.दादर ईस्टच्या बाजुला बस स्टँड असल्याने मी ईस्ट साईडला आलो.जीना उतरतांना लक्षात आलं की पावसामुळे आणि लोकांच्या पायाचा चिखल पायऱ्यांना लागल्यामुळे जिना फार निसरडा झालाय.दोनदा मी सटकता सटकता वाचलो पण पाचसहा पायऱ्या शिल्लक असतांना माझा पाय अखेर सटकलाच आणि मी पायरीवर आपटलो.पडतापडता मी जिन्याचा कठडा धरला त्यामुळे फार लागलं नाही पण माझा डावा पाय चांगलाच लचकला.पँटही मागच्या बाजूने खराब झाली असावी.कसाबसा उठून मी चालायला लागलो पण पाय चांगलाच दुखावला होता.लंगडतलंगडत मी स्टेशनबाहेर आलो.एकाला बसस्टँडबद्दल विचारलं.त्याने दहा मिनिटाच्या अंतरावर ते असल्याचं सांगितलं.दहा मिनिटांच्या अंतरासाठी रिक्षाला पैसे घालवणं बरं वाटेना म्हणून मी पायीच निघालो.पाय दुखत होताच.त्याची पर्वा न करता हळूहळू स्टँडवर आलो.चौकशी कक्षात अलिबागला जाणाऱ्या गाडीची वेळ विचारली.
“ती काय बाहेर उभी आहे.निघेलच पंधरावीस मिनिटात”त्यांनी सांगितलं.स्टँडवर पाण्याची डबकी साचली होती.ती चुकवत मी बसपर्यंत पोहोचलो.बस अर्धी भरली होती.एका सीटवर खिडकीजवळ बँग ठेवलेली मी पाहिली.त्याशेजारीच मी बसलो.थोड्या वेळाने कंडक्टरने जशी बेल मारली तसा एक चाळीस पंचेचाळीसच्या आसपासचा काळासावळा ग्रुहस्थ घाईघाईत माझ्याजवळ आला. मी त्याला आत जायला जागा करुन दिली.बस निघाली.पहिल्यांदाच अलिबागला जात असल्यामुळे मला तिथली माहिती घेणं आवश्यक होतं.१९८६चा तो काळ.मोबाईलचा त्यावेळी जन्मही नव्हता झाला.त्यामुळे गुगलवर सर्च करुन माहिती घेणं हा प्रकारच अस्तित्वात नव्हता.वाचलेल्या किंवा ऐकीव माहितीवरच अवलंबून रहावं लागायचं.मी शेजारच्या माणसाला विचारलं
” अलिबाग किती दुर आहे इथून?” त्याने माझ्याकडे दचकून पाहिलं.कदाचित मी त्याच्याशी बोलेन अशी त्याने अपेक्षा केली नसावी.मग तो हसून म्हणाला
” साँरी मै मराठी नही बोल सकता.आय कँन अंडरस्टँड बट कान्ट स्पीक.हिंदीमे बोलेगा तो चलेगा ?”
त्याच्या उच्चारावरुनच तो साऊथ इंडियन अण्णा आहे हे माझ्या लक्षात आलं.
“चलेगा ना.मै हिंदी बोलभी सकता हूँ और समझभी सकता हूँ”
“थँक्स.अलिबाग इधरसे हंड्रेड कीलोमीटरसे उपर होयेगा.इट विल टेक टू अँड हाफ अँन अवर्स.आप अलिबागमे किधर जायेगा?”
“मुझे आर.सी.एफ.जाना है.मेरा कल वहाँ इंटरव्ह्यू है”
“व्हेरी गुड.मै भी आर.सी.एफ.जायेगा.आय अँम वर्किंग देअर”
मला आनंद झाला.याच्याकडून हवी असलेली माहिती काढायला हरकत नव्हती.
“अच्छा अलिबाग बस स्टँडपर कोई हाँटेल या लाँज मिल जायेगा आज रात सोने के लिये?”
“येस.देअर आर सम हाँटेल्स बट मेरेको जादा जानकारी नही है”
मी चुप बसलो.म्हणजे आता स्वतः अलिबागला उतरल्यावर शोध घेणं आलं.
“आपके पैरमे कुछ प्राँब्लेम है क्या?मैने बस स्टँडवर देखा आप चल नही पा रहे थे”त्याने विचारलं
” हाँ दादर स्टेशनकी सिढियोपरसे मै फिसल गया था.पैरमे मोच आ गयी है.बहुत दर्द हो रहा है” बोलताबोलता मी पँट वर करुन पायाकडे पाहिलं.पाय चांगलाच सुजला होता.त्यानेही पायाकडे पाहिलं.पण तो काही बोलला नाही. गाडीच्या खिडकीतून आता कोकणातला निसर्ग खुप सुरेख दिसत होता.जागोजागी भात पेरणी झालेली दिसत होती.पाण्याने भरलेले चौकोन डोळ्यांना सुखावत होते.त्यासोबत खिडकीतून येणारी थंड हवा आल्हाददायक वाटत होती.पाय दुखत नसता तर मला या सुंदर निसर्गाचा जास्त आनंद घेता आला असता.
शेजारच्या माणसाने मग माझी थोडी चौकशी केली.माझा कोणत्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू आहे?आता सध्या काय करतोय?कुठे रहातो?घरी कोण कोण असतं?मी उत्तरं देत होतो पण मला रात्रीच्या निवासाची काळजी लागली होती.स्टँडजवळ चांगलं हाँटेल मिळेल का?फार महागडं तर नसेल?जेवायचं कसं करायचं?उद्याच्या इंटरव्ह्यू पर्यंत हा पाय ठिक होईल का?फ्रँक्चर तर नसेल?नाना प्रश्न मला सतावत होते त्यामुळे त्याच्या प्रश्नांना मी थोडा तुटकपणेच उत्तरं देत होतो.थोड्यावेळाने
खिडकीतून शहर आल्यासारखं दिसायला लागलं.मी त्याला विचारलं
“अलिबाग आ गया क्या?”
” अभी आयेगा.पहले आर.सी.एफ.आयेगा उसके बाद बस स्टँड आयेगा”
” बस स्टँडसे आर.सी.एफ.के लिये रिक्षा मिल जायेगी ना?कितना किराया होता है?”
तो हसला.
“हाँ मिल तो जायेगी.लेकीन आप बस स्टँड क्यूँ जा रहे है?आर.सी.एफ.के स्टाँप पर उतर जाईये.”
मी गोंधळलो.
” क्या आर.सी.एफ.मे रहने के लिये गेस्ट हाऊस है?”मी शंका येऊन विचारलं
तो अजूनच हसला
“नही नही ऐसा गेस्ट हाऊस नही है.आप मेरे घर पर चलो.वहाँपर ही रुक जाना”
आँफर चांगली होती.माझं सगळं टेंशन दूर करणारी होती पण अनोळखी माणसाकडे रहायला जाणं मला संकोचल्यासारखं वाटत होतं.त्याच्या कुटुंबातली माणसं कशी असतील?ती आपल्यासारख्या आगंतुक पाहुण्याशी व्यवस्थित वागतील की नाही ही शंका मनाला खाऊ लागली
“नही नही.आपकी फँमिलीको डिस्टर्ब करना अच्छा नही.मै स्टँडपरही कोई हाँटेल ढुंढ लुंगा.एक रात की तो बात है.”
” दँटस् व्हाँट आय अँम सेईंग.मेरा फँमिली केरलामे है.आय अँम स्टेईंग अलोन इन माय क्वार्टर. आपको रहनेमे कोई दिक्कत नही होगी.आपके पैरमे तकलीफ भी है.आप यही पर उतर जाओ.हाँटलमे रहनेकी जरुरत नही”
मी अवघडलो.काय उत्तर द्यावं ते मला कळेना.बसमध्ये भेटलेल्या एका अनोळखी माणसाकडे रात्रभर रहाण्यात मग तो एकटाच का असेना मला नक्कीच संकोच वाटणार होता.शिवाय दोघांच्या भाषा वेगळ्या.तो तोडक्या मोडक्या हिंदीत बोलणार नाहीतर मी तोडक्या मोडक्या इंग्रजीत. जमणं कठिणच.तेवढ्यात कंडक्टरने बेल मारली
“आर.सी.एफ.कुणी आहे का?उतरा लवकर”तो ओरडला.माझ्या शेजारच्या माणसाने त्याची बँग हातात घेतली आणि मला म्हणाला
“चलो चलो.सामान लेकर आओ मेरे साथ”
अवघडलेल्या अनिश्चित स्थितीत मी माझी बँग घेऊन त्याच्यासोबत खाली उतरलो.बस निघून गेली.स्टाँपवर दोनतीन रिक्षा उभ्या होत्या.त्याने एकाला पत्ता सांगितला आणि रिक्षात शिरला.माझ्याकडे नजर टाकून मला “आओ” म्हणाला.मी अनिच्छेनेच त्याच्या शेजारी जाऊन बसलो.रिक्षा आर.सी.एफ.काँलनीत फिरत फिरत एका तीन मजली अपार्टमेंट समोर येऊन उभी राहिली.खालच्या मजल्यावरच त्याचं क्वार्टर होतं.कुलुप उघडून आम्ही आत शिरलो.पंधरावीस दिवस घर बंद असावं.एक कुबट वास आत येत होता.
” मै बीस दिन छुट्टीपर था.मेरे ब्रदरके लडकीका शादी था.इसलिये घरमे थोडा कचरा हो गया है.आप बैठो मै रुम साफ कर देता.”
मी बसलो.त्याने कुंचा घेतला आणि घर झाडून काढलं.मग कपड्याने पुसून काढलं.घरात सामान काही जास्त दिसत नव्हतं.बाहेरच्या खोलीत एक टेबल.दोन खुर्च्या.बेडरुममध्ये एक पलंग.भिंतीवर एका अनोळखी दाक्षिणात्य देवाचा फोटो होता.किचनमध्ये थोडीफार भांडी,गँस बस.
“आप फ्रेश हो जाओ.फिर मै काँफी बनाता.साँरी मै चाय नही पिता इसलिये चाय का सामान नही है”
“कोई बात नही.मुझे काँफीभी पसंद है”
मी फ्रेश होऊन आलो.त्याने काँफीचा कप माझ्या हातात दिला.दाक्षिणात्य चवीची ती थोडिशी कडवट काँफी होती.पण या पावसाळी वातावरणात मस्त वाटत होती.
“खाना खाया था की नही आपने?”त्याने विचारलं आणि मला एकदम भुक लागल्याची जाणीव झाली
“नही.सुबह नाश्ता किया था.बादमे पैरमे मोच आगयी तो फिर हाँटेलमे गया नही” मी म्हणालो
“आय अँम साँरी मै मेसमे खाना खाता और अभी मेस बंद हुआ होगा.आपके खाने के लिये मेरे पास कुछ नही है.अभी रातकोही खाना मिलेगा”
“कोई बात नही.मुझे भुख नही है”मी माझी भुक लपवत म्हणालो
मग त्याने एकदम आठवल्यासारखी बँग उघडून बिस्किट पुडा काढला आणि मला दिला.
काँफीसोबत बिस्कीटं खाऊन मला जरा तरतरी आली.
“आप थोडा रेस्ट करो” तो म्हणाला
” नही.दिनमे मै सोता नही हूँ”
“ठिक है सोना नही थोडा रेस्ट करना.इव्हनिंगमे मै आपके लिये मेडिसीन लेके आऊंगा”
मग तो बेडरुममध्ये गेला आणि लगेच बाहेर आला
“आपका बेड तयार है.शामतक पैरको रेस्ट मिला तो फायदा हो जायेगा”
मी उठलो.आतमध्ये गेलो.पलंगावर एक छान स्वच्छ चादर टाकली होती.उशीचं कव्हरही बदललेलं दिसत होतं
“आप कहाँ सोयेंगे?आपभी तो केरलासे आये है”
“नो नो आय केम यस्टर्डे फ्राँम केरला.कुर्लामे मेरा रिलेटिव्ह है उनके यहाँ रातको स्टे किया.सुबह उनके यहाँ खाना खाके मै निकला था.आप रेस्ट करो मै अभी पेपर पढुंगा”
घरमालकाला खुर्चीवर बसवून मी पलंगावर झोपावं हे मला काही पटेना.पण मी काही बोलायच्या आत तो बाहेर चालला गेला.नाईलाजाने मी पलंगावर पडलो.पडल्याबरोबर सुखाची एक लहर माझ्या अंगातून दौडत गेली.याचा अर्थ दुखऱ्या पायामुळे मी नक्कीच थकलो होतो.थोड्याच वेळात मी झोपून गेलो.
जाग आली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते.घरात एकदम शांतता होती.दाराला लाँक लावून हा अण्णा कुठे निघून तर नाही गेला अशी शंका माझ्या मनात दाटून आली.मी ताडकन उठून बसलो.दुखरा पाय मी हळूच जमीनीवर टेकवला.पायाची सुज किंचीत कमी झाली होती पण पाय दुखतच होता.लंगडत लंगडत मी बाहेर आलो पहातो तर तो खुर्चीवर बसून पेंगत होता.घरमालकाला असं अडचणीत पाहून मला माझीच लाज वाटली.त्याला उठवून पलंगावर झोपायला सांगावं की असंच झोपू द्यावं या संभ्रमात मी असतांनाच त्याने डोळे उघडले.मला पाहून तो हसला
” साँरी आय वाँज जस्ट नँपिंग.आप बैठो मै काँफी बनाके लाता हूँ”
तो उठून किचनमध्ये गेला.मी बेसीनजवळ जाऊन तोंड धुतलं.त्याने दोन कप भरुन काँफी आणली.दुपारसारखीच थोडी कडवट चवीची काँफी होती.
“आपका नाम क्या है?”त्याने विचारलं
“दीपक.दीपक तांबोली.और आपका?”
त्याने बरंच मोठं नांव सांगितलं. मला ते लक्षात रहाणं शक्यच नव्हतं.त्याच्या ते लक्षात येऊन तो हसला
” यू कँन काँल मी गणेशन.धीस इज माय निक नेम”
“ओके.थँक्स”
मग त्याने स्वतःबद्दल थोडी माहिती दिली.त्याचा परीवार त्रिवेंद्रमच्या आसपास कुठे रहात होता.त्याला एक पंधरा वर्षाचा मुलगा आणि बारा वर्षाची मुलगी होती. बायको एका शाळेत शिक्षिका होती.आर.सी.एफ.(राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर) मध्ये त्याला आठ वर्षं झाली होती आणि तो सुपरव्हायजरच्या पोस्टवर होता.
गप्पा मारतामारता आठ कधी वाजले ते कळलं नाही. मग तो मला त्याच्या स्कुटरवर मेसमध्ये जेवायला घेऊन गेला.
” खानेके कुपनका कोई चार्ज होगा तो मै पैसे देता हूँ” मी त्याला म्हंटलं
“टुडे यु आर माय गेस्ट. कल दोपहरमेभी खानेके लिये आना पडेगा तब आप दे देना. ओके?”
मी काय बोलणार होतो?उद्या मात्र आपल्याबरोबर त्याच्याही जेवणाचे पैसे आपण द्यायचे हे मी ठरवलं.जेवायला बसत असतांना गणेशन अण्णाचे काही केरळी मित्र तिथे आले.त्याने माझी त्यांच्याशी ओळख करुन दिली.माझा पाय लचकल्याचंही त्याच्या मल्याळम भाषेत सांगितलं असावं कारण ते माझ्या पायाकडे बघू लागले.मग ते गणेशनशी काहीतरी बोलले.
” ये आपके पैर के लिये कुछ मेडिसीन देगा.वुई विल कलेक्ट इट फ्राँम हिज होम” त्याने माझ्याकडे बघत स्पष्टीकरण दिलं.मी त्याला थँक्स म्हंटलं.
जेवण झाल्यावर आम्ही त्याच्या मित्राकडे जाऊन चार गोळ्या आणि एक मलमाची ट्यूब घेऊन आलो.घरी आल्यावर गणेशन मला म्हणाला
“आप ये टँब्लेट ले लो.ये क्रिम कुछ काम का नही.मेरे पास केरलाका एक तेल है मै उससे आपके पैरका मसाज कर देता हूँ”
कल्पना चांगली होती पण एका वयस्कर अनोळखी माणसांकडून माझ्यासारख्या तरुण मुलाने मसाज करुन घेणं मला बरं वाटेना
“आप रहने दिजीये मै खुद मसाज कर लुंगा”
“अपने हाथ से मसाज प्राँपर नही होता.आप चेअरपर बैठो”
तो आतमध्ये गेला आणि तेलाची बाटली घेऊन आला.मी पँट काढून लुंगी नेसली.मला लुंगीत पाहून तो हसला.म्हणाला
“आप तो पुरा साऊथ इंडियन दिख रहा है ”
मीही हसलो.ही गोष्ट खरी होती की मी बऱ्याच जणांना साऊथ इंडियन वाटायचो.कदाचित माझा चेहरा मद्रासी अण्णासारखा दिसत असावा म्हणून तसं असेल.
मी खुर्चीवर बसलो तसा तो तेलाने माझ्या पायाला मसाज करु लागलो.त्या मसाजाने शरीरात सुखाची अनुभुती होत होती.त्याच्या हातात जादू असावी.माझ्या पायातल्या वेदना नाहिशा होत होत्या.अर्धा तास तो मसाज करत होता.त्या मसाजाने माझे डोळे आता मिटू लागले होते.
“अभी खडा होके देखो” तो म्हंटला तशी मला जाग आली.मी उठून उभा राहिलो.आश्चर्याची गोष्ट मला आता पाय टेकवता येत होता आणि पायातल्या वेदना नव्वद टक्के कमी झाल्या होत्या
“बहुत अच्छा लग रहा है”
मी म्हणालो तसा तो समाधानाने हसला
“जरुरत पडी तो कल सुबह और कर दुंगा.लेकीन जरुरत नही पडेगी” त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता.
” ये पेनकिलर लेलो तब तक मै सोनेकी तय्यारी करता”
त्याने हातात गोळी दिल्यावर मी किचनकडे आरामात चालत गेलो.माठातून पाणी घेऊन मी गोळी घेतली.बेडरुममध्ये आलो तर त्याने खाली सतरंजीवर चादर टाकून ठेवली होती.मी त्यावर झोपायला लागलो तर तो म्हणाला
“अरे इधर नही.आप काँटपे सो जाओ.मै निचे सोयेगा”
“नही नही आप उपर सोईये मै निचेही ठिक हूँ.घरमेभी मै निचेही सोता हूँ”
“नही नही आप पैर को जादा तकलीफ मत दो.आपको उपरही सोना है”
तो अधिकारवाणीने बोलला आणि सतरंजीवर झोपला देखील. नाईलाजाने मी पलंगावर झोपलो.त्याने उठून लाईट बंद केला.झोपताझोपता मला म्हणाला
“कल सुबह उठकर इंटरव्ह्यूकी तय्यारी कर लेना.इंटरव्ह्यू लेनेवाला बहुत स्ट्रिक्ट है और बहुत डिफिकल्ट सवाल पुछता है.ओके गुडनाईट”
पडल्यापडल्या मी विचार करु लागलो.हा माणूस इतका का छान वागतोय माझ्याशी?मी ना त्याच्या गावचा ना जातीचा.इतकी छान वागणूक भाऊ भावाला देत नाही. मी तर परका.अपरिचित.दुपारी बसमध्ये ओळख झाली ती इतक्या छान वागणुकीला पुरेशी असते?असं तर नाही की उद्या तो म्हणायचा “निकालो हजार रुपये.आपके खानेपिने,रहनेके और मसाजके पैसे”मग काय करायचं?आपल्याकडे तर फक्त पाचशे रुपये आहेत.एकदम आठवण झाली की काही विक्रुत माणसं गोडगोड बोलून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढतात.त्यांना नको ती कामं करायला लावतात.नाही केली की त्यांचा खुन करतात.असं तर नाही की याचे
गल्फ कंट्रीतल्या स्मगलरांशी काही संबंध असतील आणि त्यांच्या काही कामासाठी आपल्याला वापरुन घ्यायचं असेल म्हणून हा आपल्याशी इतका चांगला वागत असेल?
माणसाचं मन एकदा मोकाट सुटलं की काहिही विचार करत सुटतं.मग एखाद्याच्या खरोखरीच्या चांगल्या वागण्याचाही ते वाईट अर्थ काढतं.मघाशी मसाज होत असतांना मला येणारी झोप आता गायब झाली होती.बारा वाजले तरी मला झोप येईना. मध्येच उठून मी त्याच्याकडे पहायचो पण तो ढाराढूर झोपला होता.माझ्या मनातल्या वादळांशी त्याला काही देणघेणं नव्हतं.मला झोप लागली खरी पण ती गाढ नव्हती.रात्रीतून तीनचार वेळा मी उठलो होतो.
सकाळ झाली.मला जाग आली तेव्हा आपला बिस्तरा आवरुन तो कुठेतरी गेला होता.मी पलंगाच्या खाली उतरलो तर मला पायात अगदी थोड्याशा वेदना जाणवत होत्या.मी आरामात पायी चालू शकत होतो.मला खुप आनंद झाला. मी ब्रश वगैरे करुन फ्रेश होत नाही तर तो आला
” गुड माँर्निंग.हाऊ आर यु फिलिंग?हाऊ इज युवर लेग?”
“फाईन.९९% ठिक हो गया है”
” व्हेरी गुड!मसाजकी जरुरत है क्या?”
“नही कोई जरुरत नही”
त्याच्या हातातली पिशवी त्याने ओट्यावर ठेवली
” आप पहले चाय पियेगा की ब्रेकफास्ट करेगा?”
“नाश्ता?बाहर कोई हाँटेल है क्या?कि आपकी मेसमे मिलता है?”मी गोंधळून विचारलं
“नही.मेसमे सिर्फ खाना मिलता है.मै कल अपने दोस्तको बोला था.उसकी वाईफने इडली बनाके दिया है.गरमगरम है तो खा लेते है उसके बादमे मै चाय बनाता”
“आपके पास तो चाय का सामान नही है ना”
“वो भी उसके घरसे लेके आया.आपके साथ हम भी चाय पियेगा” तो हसत म्हणाला
त्याने पिशवीतला डबा काढून त्यातल्या इडल्या दोन डिशमध्ये काढल्या.सोबतच्या दोन डब्यातून सांबार आणि चटणी काढली.त्या मोठ्या स्पंजी इडल्या पाहून मला कडकडून भुक लागली.
इडल्या,सांबार आणि चटणीला अप्रतिम चव होती.आपण घरी अनेक वेळा इडल्या करतो पण यासारखी अप्रतिम चव त्यांना कधीच येत नाही याची माझ्या मनाने नोंद घेतली.बारा इडल्या होत्या चार इडल्या खाल्यावर माझं पोट भरलं.मी उठायला लागलो तसं तो म्हणाला
“आपके इंटरव्ह्यूको दो भी बज सकते है.बहुत कँडिडेट्स है.और दो इडली खा लो”
त्याच्या आग्रहामुळे मी उरलेल्या दोन इडल्या खाऊन टाकल्या.मजा आली.मग त्याने चहा केला.वेगळीच पण छान चव त्याला होती.
अंघोळीनंतर मी अभ्यासाला बसलो.बरोबर दहा वाजता तो मला आर.सी.एफ.मध्ये घेऊन गेला.जिथे इंटरव्ह्यू होणार होता ती जागा दाखवली.
” मै एक बजे आपको लंचके लिये लेने आयेगा.आपका इंटरव्ह्यू जल्दी खतम हुआ तो भी यहीपर बैठे रहना.मैने कुछ साब लोगोको आपका नाम बताया है.वो कोशीश करेगा आपको सिलेक्ट करनेकी.लेकीन आप इंटरव्ह्यू अच्छा देना.इट विल मेक मोअर इझी फाँर सिलेक्शन. ओके बेस्ट आँफ लक”
” थँक यू व्हेरी मच सर”
तो गेला.मी हाँलमध्ये नजर टाकली.बरेच उमेदवार आले होते.खुप जण पुस्तकं काढून अभ्यास करत होते.मीही पुस्तक काढून वाचायला लागलो.गणेशन अण्णाने मला आश्वस्त केलं होतं त्यामुळे मला माझी निवड नक्की होईल याची खात्री होती.
साडेबाराला माझा नंबर लागला.धडधडत्या मनाने मी आत गेलो.मला काहिच उत्तरं देता आली नाहीत तर अण्णापुढे माझी नाचक्की होणार होती.ते मला नको होतं.दुहेरी प्रेशर घेऊनच मी इंटरव्ह्यू घेणाऱ्यांच्या पँनलसमोर बसलो.नशिबाने मला बहुतेक प्रश्नांची उत्तरं देता आली.मी आनंदाने बाहेर आलो.
एक वाजता अण्णा आला
“हाऊ वाँज युवर इंटरव्ह्यू”
“इट वाँज व्हेरी फाईन”
“एक्सलंट!नाऊ वुई विल गो फाँर लंच”
बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या बजाज स्कुटरवरुन तो मला मेसमध्ये जेवायला घेऊन गेला.
“कल डिनर का पैसा आपने पे किया था.अभी लंच का पैसे मै दुंगा” मी खिशातलं पाकीट काढत म्हंटलं
” दे विल नाँट अँक्सेप्ट युवर मनी.दे विल डिडक्ट गेस्ट मिल चार्जेस फ्राँम माय सँलरी.सो किप युवर वाँलेट इन युवर पाँकेट ” तो हसत हसत म्हणाला.नाईलाजाने मी पाकिट खिशात ठेवून दिलं.ठिक आहे आर.सी.एफ.सोडतांना देऊन टाकू त्याचे पैसे. जेवण झाल्यानंतर त्याने मला त्याच्या घरी सोडलं.मी माझं सामान पँक करत असतांना तो म्हणाला
“इफ यु वाँट यू कँन स्टे हिअर फाँर मोअर डेज.मै आपकोअलिबाग फोर्ट और मुरुड जंजिरा घुमाने लेके जायेगा”
कल्पना चांगली होती पण माझी सुटी दोनच दिवसांची होती.उद्या मला ड्युटीवर जावं लागणार होतं.मी त्याला तसं सांगितलं .तो नाराज झाला.
“आपको यहाँ कोई तकलिफ तो नही हुआँ?इफ येस आय अँम व्हेरी साँरी फाँर दँट”
“तकलिफ किस चीजकी?उल्टा आपने मेरी जो सेवा की है वह आजकल कोई भाई भी नही करता.थँक यू व्हेरी मच फाँर दँट”
त्याचे डोळे थोडे भरुन आल्यासारखे वाटले
“मै यहाँ बहुत लोनली फिल करता.सब दोस्तोका फँमिली है.मेरा अकेलेका नही है.हाँलिडेके दिन तो बहुत बोरियत होती है.वाईफ उधर सर्व्हिस करता इसलिये उसको यहाँ ला भी नही सकता.कोई रिलेटिव्ह आता तो बहुत अच्छा लगता.आपके आनेसे मेरा दो दिन बहुत अच्छा गुजरा”
मला त्याची किंव आली.एकटेपणा किती कंटाळवाणा असतो याचा अनुभव मी मुलुंडला एका कंपनीत नोकरी करत असतांना घेतला होता.अर्थात गजबजलेल्या मुंबईतला एकटेपणा आणि शांत आर.सी.एफ.मधला एकटेपणा यांच्यात फरक असणारच.
” अच्छा आपको कितने पैसे देना है?”
“पैसे?वो किसलिये?”
“दो वक्त का खाना,चाय काँफी,नाश्ता इसका आपको पैसा देना पडा होगा”
तो पुढे आला मला जवळ घेऊन म्हणाला
“हमने पैसोके लिये थोडेही किया.फरगेट अबाऊट मनी.और कभी मुंबई आयेगा तो आर.सी.एफ.जरुर आना.इसको अपनाही घर समझना”
मलाही आता गहिवरुन आलं.मला त्याच्या
तल्या विशाल माणुसकीची कल्पना आली.
” जरुर आऊंगा.आपभी कभी फँमिलीको लेकर जलगांव आना.मै अपना अँड्रेस भेजता हूँ”
“येस शुअर”
” चलो चलते है” मी म्हणालो.तशी त्याने माझी ब्रीफकेस उचलली.स्कुटरवरुन त्याने मला बस स्टाँपला सोडलं.मी त्याचा निरोप घेणार एवढ्यात त्याने विचारलं
“आपका अंब्रेला किधर है?”
मी दचकलो.ब्रिफकेस उघडून पाहिलं.त्यात छत्री नव्हती म्हणजे त्याच्या घरातच मी विसरलो होतो
“ओके.नो प्राँब्लेम. यू स्टे हियर.मै लेके आता” स्कुटरला किक मारुन तो गेला देखील.दहाच मिनिटात तो छत्री घेऊन आला.बस आली
“ओके चलता हूँ.थँक्स फाँर एव्हरीथिंग”
“ओके.बेस्ट लक फाँर युवर फ्युचर इन आर.सी.एफ. वुई विल मीट अगेन”त्याने माझा हात हातात घेत म्हंटलं.
मी बसमध्ये बसलो.नशिबाने मला खिडकीतच जागा मिळाली.खिडकीतून मी त्याला हात केला.त्याचाही हात हलला.बस निघाली.बसमध्ये बसून मी विचार करत होतो.या जागी आपला मराठी माणूस असता तर त्याने माझ्यासाठी इतकं केलं असतं?मराठी माणसंही अगत्यशील असतात यात शंका नाही पण एका बसमध्ये भेटलेल्या अनोळखी तरुणाला घरी घेऊन जाऊन त्याची इतकी सेवा केली असती का याबद्दल मला शंकाच होती.
मी घरी आलो.दोनच दिवसांनी मला रेल्वेत निवड झाल्याचं पत्र मिळालं.रेल्वेचा पगार आर.सी.एफ.पेक्षा जास्त होता.शिवाय माझ्यासारख्या भटकंतीची आवड असलेल्या माणसाला पासची सुविधा मिळणार होती.अर्थातच आर.सी.एफ.मध्ये निवड झाली तरी मी जाणार नव्हतो.गणेशन अण्णाशी माझी भेट आता दुर्मिळच होती.मी त्याला थँक्स गिव्हिंगचं पत्र लिहिलं त्यात रेल्वेत निवड झाल्याचं आणि आर.सी.एफ.मध्ये निवड झाली तरी येणार नसल्याचं कळवलं.उलट टपाली त्याने माझं रेल्वेतल्या निवडीबद्दल अभिनंदन केलं.आर.सी.एफ.पेक्षा रेल्वेच चांगली राहिल अशी आशा व्यक्त केली होती.शेवटी लिहिलं होतं “इफ गाँड परमीटस् सी यू अगेन”
दुर्देवाने माझी आणि गणेशन अण्णाची पुन्हा कधीही भेट झाली नाही.पण एका चांगल्या माणसाची जी प्रतिमा त्याने माझ्या मनात निर्माण केली होती.ती मी कधीही विसरु शकलो नाही
© दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या “अशी माणसं अशा गोष्टी “या पुस्तकातील आहे.कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही. माझ्या पुस्तकांबद्दलच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा )