देश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

झिरो लाईट – छायाचित्रकार बोमन इराणींचा प्रेरणादायी प्रवास.

झिरो लाईट – छायाचित्रकार बोमन इराणींचा प्रेरणादायी प्रवास.

बोमन इराणी तुम्हाला आवडतो का?

मुन्नाभाई एम बी बी एस मधला डॉ. अस्थाना, थ्री इडियट्स मधला इंजिनीअरींग कॉलेजचा प्रिंसिपल, विरु सहस्त्रबुद्धे उर्फ व्हायरस, आणि अशाच अनेक विविधरंगी भुमिकांमुळे बोमन आज एक लोकप्रिय अभिनेता आहे.

पण बोमनचा एक विनोदी अभिनेता बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा होता का?

बोमनचा जन्म मुंबईतल्या एका पारशी घरात झाला. बोमन जन्मण्याच्या सहा महिने आधीच बोमनच्या वडीलांचे निधन झाले,

बोमनला तीन बहिणी होत्या, दोन मावश्या, आणि एक आत्या होती. सतत सर्व स्त्रियांच्या सहवासात राहील्यामुळे लहानग्या बोमनचाही स्वभाव काळजी करणारा आणि भित्रा झाला,

त्याला डिस्लेक्सिया नावाचा रोग होता. शाळेत, अभ्यासात बोमन अतिशय मंद होता, बोलताना तो तोतरे बोलायचा, त्यामुळे त्याचे मित्र त्याची मस्करी उडवायचे.

न्युनगंडामुळे बोमन इराणी स्वतःला अपयशी मानु लागला होता, त्याने स्वतःसाठी कसलीही मोठी स्वप्ने पाहिली नाहीत. त्याचे मित्र डॉक्टर, इंजिनीअर आणि सी.ए. झाले, मात्र बोमन कधीच काही मोठे मिळवण्यासाठी स्वतःला पात्र समजायचा नाही.

बोमनची आई कुटूंबाची उपजीविका चालवण्यासाठी फरसाण, फाफडा वगैरे तयार करुन पदार्थ विकायची. बोमनचे ग्रॅंट रोडवर फरसाण विक्री करायचे आठ बाय आठ फुटाचे एक छोटेशे टपरीवजा दुकान होते. वयाच्या बत्तीस तेहतीस वर्षांपर्यंत बोमन इराणी त्या दुकानातुन जेमतेम उत्पन्न कमवायचा.

त्याचे दुकान ज्या भागात होते तो ग्रँट रोडचा भाग हा मुंबईचा एक रेड लाईट एरीया आहे. सगळी रफ पब्लिक दुकानात यायची. ह्या सगळ्या परिस्थितीची बोमनला चीड आली.

बोमनने साईड बिजनेस म्हणुन फोटोग्राफी सुरु केली.

१९९०-९२ तो काळ असेल.

बोमन क्रिकेट, फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचे छान छान फोटो काढायचा, वीस-वीस रुपयांना ते फोटो त्या मुलांच्या आईवडीलांना विकायचा. अशा प्रकारे काही रुपये त्याने जमा केले,

लग्नानंतर सात वर्षांनी आपल्या बायको मुलांना घेऊन उटी फिरायला गेला. जमलेली बचत फार मोठी नव्हती, म्हणुन एक बजेटमधले हॉटेल त्याने बुक केले,

पण ते हॉटेल अतिशय निकृष्ट दर्जाचे निघाले. एखाद्या भुतबंगल्याप्रमाणे असलेल्या त्या हॉटेलात अत्यंत भीतीदायक वातावरण होते. हॉटेलच्या खोलीत फक्त एकच झिरोचा बल्ब होता.

बोमन म्हणतो, तो झिरो लाईट पाहुन मला स्वतःचीच, माझ्या गरिबीचीच जबरद्स्त चीड आली,

“आयुष्यात पुन्हा कधी अशी ‘झिरो लाईट मोमोंट’ येऊ नये म्हणुन मी संपुर्ण जीवनभर मी झोकुन देऊन मेहनत करेन असा मी चंग बांधला,”

पुढे ह्या झिरो लाईटने बोमनचे आयुष्यच बदलवुन टाकले.

बोमन इराणीला मुंबईत होणाऱ्या बॉक्सिंग ऑलिंपिकबद्द्ल माहिती मिळाली.

तो ऑलिंपिकच्या ऑफिसमध्ये गेला व त्याने बॉक्सिंगचे फोटो काढण्याची परवानगी मागितली. पण तिथल्या डायरेक्टरने ती धुडकावुन लावली. बोमनने अनेक अर्ज विनंत्या केल्या, आर्जवे केली, मी फुकटात काम करीन असे सांगितले तेव्हा तो खडुस डायरेक्टर थोडासा नरमला आणि सध्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा चालु आहेत, त्याचे फोटो काढुन आण, तुझ्यातली गुणवत्ता बघुन तुला काम देऊ असे सांगितले.

बोमन कंबर कसुन कामाला लागला. पुढचे सहा महिने बोमनने प्रचंड मेहनत घेतली. कसेही करुन त्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचेच ह्या एकाच विचाराने त्याला पुर्ण झपाटले होते. उठता-बसता, खाता पिता, त्याला फक्त आणि फक्त बॉक्सिंगचे फोटोच दिसायचे.

माझं काम आणखी उत्कृष्ट कसे होईल, हा एकच विचार त्याच्या डोक्यात असायचा.

तो कॅमेरा गळ्यात घेऊन आठ आठ – दहा दहा तास बॉक्सिंगच्या मॅचेस च्या ठिकाणी तळ ठोकुन बसायचा. त्यादरम्यान त्याने अप्रतिम फोटोग्राफ्स शुट केले. सगळे फोटोग्राफर फक्त व्यवसाय आणि कामाचा भाग म्हणुन फोटो काढायचे. बोमन मात्र पॅशनेट होता.

शेवटी जागतिक बॉक्सिंग ऑलिंपिकचा ऑफिशीयल फोटोग्राफर म्हणुन बोमनचीच निवड झाली.

अमेरीकेतल्या मॅनेजरची बोमनने अपॉईंटमेंट घेतली. त्याने बोमनला तीन फोटो काढायची ऑर्डर दिली.

एक, अमेरीकन बॉक्सर समोरच्या मुष्ठियोद्ध्याला एक जोरदार पंच मारेल तेव्हाचा, दुसरा, समोरचा बॉक्सर जमिनीवर पडलेला असताना, अमेरीकन बॉक्सर उन्मादाने उड्या मारतानाचा, आणि तिसरा, सामना जिंकल्यानंतर अमेरीकन बॉक्सरचा हात उंचवताना.

ह्या प्रत्येक फोटोबद्द्ल बोमनला तीनशे डॉलर्स मिळणार होते.

बोमन जोमाने कामाला लागला.

इथपर्यंत पोहोचण्यासाठी मागचे सहा-आठ महिने त्याने प्रचंड मेहनत केली होती, आता यश अगदी दृष्टीपथात होते.

त्याने रिंगच्या बाजुचा एक योग्य कोपरा निवडला.

सामना सुरु झाला, पण बोमनचे नशीब त्याच्यावर जणु रुसले होते.

बोमनचे ग्रह काही ठिक नव्हते की काय माहित, पण त्या दिवशी अमेरीकन बॉक्सर सपाटुन मार खात होता.

तीनपैकी एकाही फोटोची शक्यता दिसत नव्हती.

बोमनचे स्वप्न जमिनदोस्त होण्याच्या मार्गावर होते. त्याची मेहनत पाण्यात चाललेली त्याला दिसत होती. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाताना जे तीव्र दुःख होते, अगदी तसेच दुःख त्याच्या मनात साठुन आले होते.

त्याच्या डोळ्यात पाणी तरळले, उर भरुन आला.

एकेक ठोसा अमेरीकन बॉक्सर खात होता, पण त्याच्यापेक्षा कितीतरी मोठे दुःख बोमनला होत होते.

बोमनने स्वतःला समजावले, “मी आणखी मेहनत करीन, एके दिवशी नियतीला माझी नक्की दया येईल,”

आणि त्याची आर्त प्रार्थना ब्रम्हांडापर्यंत जाऊन पोहोचली.

चमत्कार घडावा असे काही रिंगमध्ये घडले. पंचेचाळीस मिनीटे मार खाणारा अमेरीकन बॉक्सर त्वेषाने उठला, त्याने समोरच्या बलाढ्य मुष्टियोद्धयाला एक जोरदार तडाखेबाज पंच मारला, बोमनने तो क्षण अचुक टिपला, समोरचा बॉक्सर खाली पडला, बोमनने दुसरा क्लिक केला, आणि अमेरीकन बॉक्सर विजेता झाला, बोमनने तिसरा क्लिक केला.

त्या बॉक्सरला झाला नसेल तितका आनंद बोमनला झाला.

त्याने तात्काळ धावत पळत स्कुटरवरुन आधी फोटो डेव्हलपिंगची लॅब गाठली, मग टेलिफोन ऑफीसला पोहोचला.

तिथुन त्याने अमेरीकेला फोटोज स्कॅन करुन पाठवले.

पण रात्रीचे दोन वाजले तरी फोटो अमेरीकेला पोहोचले नाहीत, असा फोन आला.

दुसऱ्या दिवशी बोमन पुन्हां टेलीफोन ऑफीसला पोहोचला. ती मशिन मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमासाठी पॅक करुन नेण्यात येणार आहे, असे त्याला सांगण्यात आले.

बोमन खवळला, त्याने तिथे प्रचंड आरडाओरडा केला, सरकारी यंत्रणेच्या अशा भोंगळ कारभारामुळे भारताचे नाक कापले जाईल, असे त्याने ऑफीसरला ठासुन सांगितले,

त्याच्या ह्या हृदयापासुन केलेल्या युक्तिवादाचा परिणाम झाला आणि पॅक केलेली मशिन उघडण्यात आली. फोटो अमेरीकेला पाठवले गेले.

बोमनला नऊशे डॉलर्सची रॉयल्टी मिळाली,

त्याला लगेच पुढची टुर्नामेंट कव्हर करण्यासाठी चेन्नईला पाठवण्यात आले. बोमन स्वखुशीने गेला, त्याने आपल्या लाघवी, विनोदी, निरागस स्वभावाने जिथे जाईल तिथे मित्र जोडले, लोकांना जिंकुन घेतले. त्याचा फोटो स्टुडीओ मुंबईत एक टॉपचा फोटो स्टुडीओ म्हणुन ओळखला जाऊ लागला.

एके दिवशी फोटोसेशन करण्यासाठी बोमनच्या स्टुडीओत सुप्रसिद्ध कोरीओग्राफर शामक दावर आला,

शामकने बोमनला नाटकात काम करशील कां? असे विचारले, व त्याची भेट प्रसिद्ध नाटककार अल्काझी पदमसी यांच्यासोबत करुन दिली.

बोमन साशंक होता. अल्काझींनी तर बोमनला पाहिल्याबरोबर नाकारले, पण शामक दावर आपल्या मागणीवर अडुन राहीला. बोमनला घ्या, नाहीतर मी नाटक सोडुन देईन अशी धमकीच त्याने दिली.

बोमनला आपल्या पहिल्या नाटकात एका वेश्येच्या दलालाचा एक छोटासा रोल मिळाला. बोमनने त्याचेही सोने केले, पुढची पाच सात वर्ष बोमनने नाटकाचे मैदान गाजवले, अनेक उत्तमोत्तम भुमिका केल्या.

एकदा त्याचे नाटक विधु विनोद चोप्राने पाहिले, आणि त्याला चित्रपटात काम करण्याविषयी विचारले. बोमन त्यासाठी तयार नव्हता. पण राजु हिराणी हा चोप्रांचा असिस्टंट बोमनच्या स्टुडीओत आला. पंधरा मिनीटांसाठी ठरलेली ही भेट पुढचे आठ तास कशी चालली, हे दोघांनाही कळले नाही.

बोमनने स्वतःला राजुच्या हातात स्वाधीन केले आणि मुन्नाभाई मधले मामु नावाचे पात्र अवतरले. ह्यावेळी बोमन पंचेचाळीस वर्षांचा होता. त्यासाठी बोमनला त्यावर्षीचे बेस्ट कॉमेडी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले.

पुढे काही वर्षांनी थ्री ईडीयट्स मध्ये बोमनने तोंडातल्या तोंडात बोलणाऱ्या व्हायरस उर्फ सहस्त्रबुद्धेची भुमिका केली. त्यासाठी त्याने आपली लहानपणीची तोतरे बोलण्याची खास लकब वापरली.

मित्रांनो,

एक मंदबुद्धी, तोतरा बोलणारा, दहा एक वर्ष वेटरची कामे करुन, वयाच्या तेहतीसाव्या वर्षी फरसाणची टपरी चालवणारा एक माणुस वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी चित्रपटात डेब्यु करतो काय, आणि साठाव्या वर्षापर्यंत ऐंशी हुन अधिक चित्रपट काय करतो?

सगळेच थक्क करुन टाकणारे आहे,

बोमन म्हणतो, उटीच्या हॉटेलात आलेल्या झिरो लाईट मोमेंटमुळेच माझ्या हृदयात आग लागली, आणि त्यामुळेच मी इथवर पोहचु शकलो आहे.

जेव्हा केव्हा आयुष्यात , व्यवसायात, कुटुंबात कसली संकटे येतील तेव्हा बोमन इराणीला आठवा. त्याच्या आयुष्यात आलेल्या संकटांना आठवा, त्याच्या झिरो लाईट फिलॉसॉफीला आठवा. संकटावर मात करण्याची कितीतरी पट जास्त उर्जा तुम्हाला मिळेल. किती ही संकटे आली तरी घाबरु नका, धैर्याने तोंड द्या….

नमोस्तुते !🙏🏼

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}