***कुंडली***………… श्रध्दा जहागिरदार
***कुंडली***
नेहमीसाठी मला पडलेले कोडे. खुप दिवसांपासून ‘कुंडली’ वर लिहायचे हे मनात होते.
* ‘मुलगा, मुलगी चांगली आहे. पण काय करावे ‘पत्रिका जुळत नाही. गोत्र एक आले, मुळ नक्षत्र आहे, नाड एक आली’. हे सर्व शब्द ‘पत्रिका ‘ या प्रकारात ऐकायला मिळतात.
* जर एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमण्यास जर पत्रिका आड येत असेल तर त्यांच्या आई -वडलांना काळजी असते. कंटाळून ‘पत्रिका’ पाहणेच नको असे त्यांना वाटाय लागते. त्यामुळे मला पण प्रश्न पडतो. काय आहे ही ‘कुंडली, पत्रिका’?
* मी त्यावर दोन्ही बाजूने बोलते. जन्म कुंडली ही ऋषी मुनींनी, आपण तयार केली आहे. मानवाने निर्माण केलेली रचना आहे. ज्याच्या आधारे आपण भविष्य काळातील घटना, भूतकाळातील घटना यांचा ‘कुंडली’ शी संबंध जोडतो. पृथ्वीवर असणारे ग्रह जे आपल्यापासून एवढे लांब आहेत त्याचा आपल्या जिवनावर प्रभाव पडत असेल?
* असे म्हणतात की जन्मानंतर पाचव्या दिवशी ‘सटवाई’ येऊन आपले भविष्य लिहून जाते. आपल्याला ते दिसते? ब्राम्हणाकडून आपली ‘पत्रिका ‘ तयार करतो त्यावेळी दोन्ही भविष्य सारखे असतात?’सटवाई ‘ लिहते हे काल्पनिक आहे. “माझ्या नशिबात जे असेल ते असेल, त्याचं प्रारब्धच होतं, आपण आपले नशीब बदलायचे” येथे जर तुमच्या नशिबात च ती गोष्ट होती, तर ती बदलणार कशी? येथे ‘पत्रिका ‘खरी की आपले प्रयत्न?
* प्रत्यक्ष जेंव्हा ईश्वर मानव रुप घेऊन पृथ्वीवर अवतरला, तेंव्हा त्याच्या आयुष्यात होणार्या चांगल्या, वाईट घटना, त्याचं मरण ‘तो ‘ टाळू शकला नाही. तर पुढच्या वर्षी तुमच्या आयुष्यात गंडांतर आहे, मोठे संकट येणार आहे,त्यासाठी एवढा जप करा, ही पुजा करा,नाहीतर नारायण नागबळी करा. असे विधी आपल्याला सांगितले जातात. हे ‘विश्व’ निर्माण करणारा मानवरुपात येतो त्यावेळी तो त्याच्या आयुष्यातील घटना बदलू शकत नाही. तर आपण कोण? आपल्या पत्रिकेत असे आहे ते कितपत खरे मानायचे. आयुष्यात होणार ते होणारच.
*जे ‘प्रेमविवाह’ , आंतरजातीय विवाह करतात त्यांच्या बाबतीत कुंडली हा मुद्दा कुठे जातो? का जेवढे प्रेमविवाह व्यवस्थित संसार करत आहेत त्यांच्या सगळ्यांच्या ‘पत्रिका ‘ जुळलेल्या असतात? त्यांची मने जोडणारा धागा व त्यांच्यातील प्रेम हिच त्यांच्यासाठी मोठी ‘पत्रिका ‘ असते.
* या जन्मी चांगले कार्य करा, मागच्या जन्माचे पाप असेल. चांगले आचरण ठेवले, कार्य चांगले केले तर पुढचा जन्म चांगला जाईल. अरे ह्या जन्माचं येथे कळत नाही. एकदा शरीर नष्ट झाल्यावर पुढच्या जन्मी जे काही घडेल ते आपल्याला कळणार आहे?. मग काय खरच आत्मा राहतो. त्याला मागचा पुढचा जन्म कळतो?. ‘ह्या विश्वाचे कोडेच अजुन उलगडले नाही तर भविष्य, पत्रिका, कुंडली हे कशावरून खरे?
* बरं एखाद वेळेस मुलाच्या, मुलीच्या पत्रिकेत असलेले दोष दुर्लक्षित करून जर त्यांचा विवाह केला ल दुर्दैवाने त्यांच्या आयुष्यात तशी गोष्ट(विवाहानंतर) जर घडली तर आपण येथे परत पत्रिके कडे जातो. “लग्न झाल्यावर पैशात लोळणार आहे ‘ही, हा ‘ वैवाहिक आयुष्य फार जोरात आहे. खरच त्यांच्या आयुष्यात तसे झाले तर नकळत आपण म्हणतो ‘गुरुजींनी आधीच सांगितले होते, तिच्या पत्रिकेत तसा योग होता’. खरच जर असे असेल तर पत्रिका पहायलाच पाहिजे खरे काय? कुंडली, पत्रिका, ज्योतिष हे खरे आहे का, थोतांड आहे सर्व?
* मला तरी न उलगडणारे कोडे आहे. विचार करत बसले तर त्या विचाराचा अंत कोठे आहे तेच कळत नाही.
*पृथ्वी, माणूस, ब्रम्हांड हे सर्व काय आहे, याचे उत्तर कोणाला मिळाले नाही तर कुंडली, पत्रिका, भविष्य हे सांगणारे आपण कोण? यंदा कर्तव्य आहे अशा मुलांच्या प्रत्येक पालकाला आज पडलेला हा प्रश्न आहे.
* एकच आहे तो म्हणजे ‘ईश्वर ‘ त्यावर श्रध्दा ठेवा, भक्ती करा, नामस्मरण करा. चांगले आचरण ठेवा, माणुसकी संभाळा ईश्वर आपल्याला संभाळेल. ईश्वराचे अस्तित्व तर नक्कीच आहे. त्याच्यावरील श्रध्दा ही आपल्याला जगायला, संकटाशी दोन हात करायला बळ देते…. _🙏
बाकी कुंडली, पत्रिका_ ह्याचे उत्तर बघू कुठे मिळते का?
श्रध्दा जहागिरदार