शारदीय नवरात्रोत्सव अष्टमी माता महागौरी लेखन : सौ. अनघा वैद्य

दिवस आठवा – अष्टमी माता महागौरी
नवरात्रीच्या आठव्या दिवसाला खूप महत्त्व आहे.या दिवशी कन्यापूजाही केली जाते. माता महागौरीचा रंग अतिशय गोरा आहे. तिला चार हात आहेत आणि आई बैलावर विराजमान आहे. मातेचा स्वभाव शांत आहे..
दुर्गा देवीचे आठवे स्वरुप महागौरीचे आहे. महागौरीला आदिशक्तीचेच एक रुप मानले जाते. पुराणातील काही उल्लेखांनुसार, आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी महागौरी देवी आहे. देवीच्या या स्वरुपाला अन्नपूर्णा, ऐश्वर्य प्रदायिनी, चैतन्यमयी असेही संबोधले जाते. चतुर्भुज महागौरीच्या एका हातात त्रिशूल, तर दुसऱ्या हातात डमरू आले. देवीचा तिसरा हात अभय मुद्रा तर चौथा हात वरदान मुद्रेत आहे.
देवी गौरवर्णी आहे. तिच्या गौर वर्णाची तुलना शंख, चंद्र आणि कुंद कळ्यांशी केली आहे. देवीचे वय आठ वर्षे आहे, असे मानले जाते. `अष्टवर्षा भवेद् गौरी’ असा तिचा एका स्तोत्रात उल्लेख केला आहे. देवीची कांतीच नाही, तर तिचे वस्त्र आणि अलंकारदेखील शुभ्र आहेत.
महागौरीने बैलाला आपले वाहन निवडले आहे. तिला चार हात असून, दोन हात अभय आणि आशीर्वाद देत आहेत, तर उर्वरित दोन हातात डमरू आणि त्रिशूल तिने धारण केले आहे.
महागौरी देवी गृहस्थाश्रमाची असून, गुलाबी रंग प्रेमाचे प्रतीक मानले गेले आहे.
पुराणातील एका कथेनुसार, वयाच्या आठव्या वर्षी देवीने महादेव शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. वयाच्या आठव्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रात महागौरी देवीचे पूजन आठव्या दिवशी केले जाते, अशी मान्यता आहे.
राक्षस दैत्य शुंभ-निशुंभचा वध करण्यासाठी महागौरीने कौशिकी स्वरुप धारण केले. ही देवीचीच एक लीला होती, अशी कथा पुराणात आढळते.
श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचि:महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा ।।
पार्वतीरूपात असताना देवीने भगवान शंकरांना पति रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. देवीने त्यावेळेस प्रतिज्ञा केली होती, `व्रियेऽहं वरदं शम्भुं नान्यं देवं महेश्वरात।’ गोस्वामी तुलसीदास यांनी देवीच्या तपश्चर्येचे वर्णन केले आहे,
जन्म कोटि लगि रगर हमारी,बरउँ संभु न त रहउँ कुआरी।।
या कठोर तपश्चर्येने देवीचे शरीर काळवंडून गेले होते. देवीच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन, संतुष्ट होऊन भगवान शंकरांनी आपल्या गंगाजलाने देवीला स्नान घातले, तेव्हा देवी लखाकत्या विजेसारखी तळपू लागली. तिचा वर्ण पालटून अधिकच गौर झाला, म्हणून ती महागौरी या नावाने ओळखली जाऊ लागली.
देवीची अमोघ शक्ती फलदायिनी आहे. देवीच्या उपासनेने भक्तांच्या मनातील किल्मिष दूर होते. आजवर कळत-नकळत झालेल्या पापांचे निराकरण होते. दैन्य-दु:खातून मुक्तता मिळते.
पुरणांमध्ये देवीच्या महतीवर प्रचुर आख्यान लिहिले गेले आहे. त्या कथांच्या वाचनामुळे भक्ताचे मन सात्विक आणि सत्कर्मासाठी प्रेरित होते. मनातील वाईट विचार, विकार दूर होतात. देवीच्या रूपाचा प्रभाव भक्तावर पडून, त्याचे चरित्र आणि चारित्र्यही निर्मळ बनते.
भक्ताच्या हातून चूक घडू नये, त्याला कलंक लागू नये, त्याच्या सत्कर्माचे तेज त्याच्या मुखावरून दिसावे, यासाठी देवी आपल्या भक्ताची काळजी घेते. त्याचप्रमाणे भक्तदेखील आईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोणतेही वाईट कर्म करण्यास धजावत नाही. महागौरीच्या उपासनेमुळे भक्तदेखील अंतर्बाह्य निर्मळ होतो.
आपण नेहमीच लक्ष्मी बरोबरच सरस्वती ची विद्येची पूजा करतो. महागौरी प्रमाणे भारतीय स्त्री ही पुराण काळापासून ते आत्ता आधुनिक युगात सुद्धा ज्ञान – बुद्धिमत्ता चे प्रतिनिधित्व करते. समाज जीवनात अनेक उदाहरणे तिने आपल्या ज्ञानाच्या जोरावर प्रस्थापित केली आहेत. मग ते तंत्रज्ञान क्षेत्र असो, R & D असो, सैन्यदलातील तंत्रज्ञ असोत, ISRO सारख्या नामांकित अवकाश संशोधन क्षेत्रातील असो, बँकिंग, रिटेल क्षेत्र असो की Healthcare मधील तंत्रज्ञ असोत. महिलांनी आपला ज्ञानाच्या जोरावर एक विशेष असा ठसा उमटवला आहे.
तसेच व्यवसायात सुद्धा उत्तुंग भरारी घेत आहेत. मग ते Manufacturing क्षेत्र असो, सेवा क्षेत्र असो की एखादा Startup किंवा एखादी उत्कृष्ट Business Idea असो. महिलांचा यशस्वी वावर सगळीकडे दिसतो.
नवनवीन संकल्पना आणून त्या प्रत्यक्षात उतरवण्यात पण त्या अग्रेसर आहेत.
प्रत्येक स्त्री मधील महागौरी – सरस्वतीला त्रिवार वंदन!
माता महागौरी बीज मंत्र – श्रीं क्लीं ह्रीं वरदायै नमः’
माता महागौरीचे भारतात एक मंदिर आहे.
महाराष्ट्रात पूर्व वसई येथे एव्हर शाईन सिटी येथे मंदिर आहे.
संकलन – सौ. अनघा वैद्य.

