मनोरंजन

।। गणपती बाप्पा मोरया ।। गणपती उत्सवात अजून एक उपक्रम १० दिवस १० गोष्टी ( लघुकथा , सुखान्ति कथा )

        ★★शमा★★    ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

★★शमा★★    ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

खिडकीतून गार वाऱ्याचा झोत आला आणि मी शहारलो. घड्याळात बघितलं. पहाटेचे साडेपाच झाले होते. पांघरूण वर ओढून परत झोपण्याचा प्रयत्न केला. पण झोप येईना. शेजारी बघितलं. शमा गाढ झोपली होती. तिला सुरू असलेल्या गोळ्या इतक्या स्ट्रॉंग होत्या की ती नऊ वाजेपर्यंत उठत नसे. झोपेत तिचा हात तिच्या कपाळावर आला होता. तो हळूच उचलून मी तिच्या छातीवर ठेवला. कधीकाळी कॉलेजची ब्युटीक्वीन असलेली शमा आज बघवत नव्हती. तिचे विरळ झालेले केस,काळवंडलेला चेहरा बघून माझ्या घशात आवंढा आला.
कॉफीचा मग घेऊन खिडकीजवळ बसलो. बाहेर झुंजूमुजु झालं होतं. पक्ष्यांची मधुर चिवचिव सुरू होती.अशाच एका रम्य पहाटे शमा आणि मी भेटलो होतो…….

पुण्यातील कसबा पेठेत एका मोठ्या वाड्यात आम्ही राहत होतो. बाबा सरकारी कारकून. पगार महिन्याला जेमतेम पुरायचा. आई खरं तर गरीब घरातूनच आलेली,पण तिला श्रीमंतीची आणि पैशाची प्रचंड हाव होती. बाबांनी नोकरी सोडून काहीतरी व्यवसाय करावा ह्यासाठी सतत त्यांच्या मागे लागायची. आणि बाबा नकार द्यायचे. सुरक्षित सरकारी नोकरी सोडून त्यांना पळत्याच्या मागे धावायचं नव्हतं. त्यावरून सतत दोघांचे वाद व्हायचे. मला समज आली तसा मी मित्रांबरोबर सतत बाहेरच असायचो. जेवण आणि झोप,ह्यापुरता माझा घराशी संबंध होता. आईबाबांच्या वादाला मी कंटाळलो होतो.
ग्रॅज्युएट झालो आणि ट्रॅव्हल कंपनीत काम करणाऱ्या माझ्या एका मित्राने मला ऑफर दिली. त्याच्या टूर्ससाठी त्याला एक ऑर्गनायझर हवा होता. मी तात्काळ होकार दिला. दुसरीकडे नोकरी बघण्यापेक्षा मला ही ऑफर स्वीकारावीशी वाटली. टूर्सच्या निमित्ताने मी सतत घराबाहेर राहायला लागलो. नवीन माणसं भेटत होती, ओळखी वाढत होत्या. अशाच कोकणच्या एका टूरमधे माझी शमाशी ओळख झाली होती….

गुहागरच्या समुद्रकिनारी पहाटे साडे पाचला मी फिरायला निघालो होतो. एक मुलगी वाळूवर मांडी घालून समुद्राकडे एकटक बघत बसली होती. टूरमधल्या प्रवाशांचे चेहरे ओळखीचे होतातच.ती शमा कान्हेरे होती. मी शमाजवळ गेलो, “तुमची हरकत नसेल तर इथे बसू का?”
शमाने चमकून वर बघितलं. मला बघून हसली.
“अहो विचारताय काय? मला पण गप्पा मारायला कंपनी मिळेल.”
“पण इतक्या पहाटे तुम्ही एकट्या इथे समुद्रकिनारी?” मी आश्चर्याने विचारलं.
” अशा शांत वेळी,समुद्राची गाज आणि त्यात पक्षांची किलबिल,मन प्रसन्न होतं. समुद्र डोळ्यात साठवावा असं वाटतं. आयुष्यात स्थित्यंतरे येतच असतात पण आपण असंच खळखळत राहायचं,हेच जणू तो शिकवतो.”
“भीती नाही वाटली एकटीला इतक्या पहाटे अंधारात यायची? कोकणातले रस्ते सामसूम असतात.”
“वाटली एका क्षणी,पण पावलं इकडे ओढ घेत होती.”
शमा वाळूवर रेघोट्या ओढत म्हणाली.
“आज टूरचा शेवटचा दिवस. संध्याकाळी पुण्यात सगळे आपापल्या घरी. ह्या व्यवसायामूळे खूप ओळखी होतात. काही माणसं मनात ठसली आहेत. त्यांच्याशी मी संपर्कात असतो. ह्या पाच दिवसात तुम्हाला पण जवळून बघितलं. निसर्गप्रेमी दिसताय.” मी तिचा सुरेख चेहरा निरखीत म्हणालो.
“हो,मला खूप आवडतं निसर्गाशी संवाद साधायला. पुन्हा तुमच्याबरोबर टूरवर जायला आवडेल. तुमची मॅनेजमेंट फारच छान आहे. माझा मोबाईल नंबर आहेच तुमच्याकडे.”
“शुअर! निघूया? वाटेत परशुराम करून मग पुण्याला परतायचं आहे. आठ वाजता तरी निघावं लागेल.”

पुण्यात परतल्यावर शमा कुठेतरी दिसावी,भेटावी असं सतत वाटायचं. मला तिचं निरागस रूप खूप आवडलं होतं. एक दिवस मीच तिला फोन करून विचारलं, “उद्या भेटता येईल तुम्हाला?”
“कधी,कुठे?” तिने अगदी सहज विचारलं, जणू काही ती माझ्या फोनची वाटच बघत होती.
“डेक्कन कॉर्नर, जागा मी कळवतो.”

शमाला भेटलो आणि खूप दिवसांची ओळख असल्यासारखं दोन तास बोललो. शमाचे वडील एक यशस्वी बिझिनेसमन होते.  होम डेकोरचा व्यवसाय होता. पुणे,मुंबई,दिल्ली चेन्नई ह्या ठिकाणी मोठ्या शोरूम्स होत्या. शमा एकुलती एक,लाडात वाढलेली. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेली पण अतिशय साधी होती. पहिल्याच भेटीत माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलली, “आयुष्य उपभोगायला पैसा हवाच पण त्याची हाव सुटली की माणूस भान विसरतो. पपांचं तसंच काहीसं झालंय. आता फक्त पैसा मिळवणे हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय झालंय. ममाला पण तेच आयुष्य आवडतं. पण मला असं वाटतं की ध्येय साध्य झाल्यावर कुठेतरी थांबावं. तो थांबा कुठे असावा हे आपणच ठरवायचं असतं.” शमा असं बोलली आणि मला वाटलं,ही मुलगी वेगळी आहे. विचारात,आचारात एक प्रगल्भता आहे.

शमाला काहीतरी कारण काढून मी भेटायला लागलो. मला तिच्याशी बोलताना एक प्रकारचं मनस्वास्थ मिळायचं. दिवाळीत उदयपूरच्या टूरवर येण्यासाठी मी शमाला आग्रह केला. तिची अनामिक ओढ वाटायला लागली होती. ती सतत माझ्यासमोर असावी असं वाटू लागलं.

उदयपूरला पॅलेसमधे शमा दिवाळीच्या पणत्या अनिमिष नेत्रांनी बघत होती. मी शमाजवळ गेलो आणि तिच्या हातात एक चिठ्ठी दिली. त्यात मी तिच्यावर असलेलं माझं प्रेम व्यक्त केलं होतं. एकच ओळ लिहिली होती…
‘ये शमा ऐसीही जलती रहे. परवाना उसके प्यार के लिये तरस रहा है’
“रूमवर गेल्यावर ही चिठ्ठी बघ.” मी तिच्या कानात पुटपुटलो आणि बाकीच्या टुरिस्टशी बोलायला गेलो.

रूमवर गेल्यावर शमाने ती चिठ्ठी वाचली आणि मला मेसेज केला. ‘अगर परवाना ना हो,तो शमा की खूबसुरती किस काम की’…

थोड्याच दिवसात लग्नबंधनात अडकलो. दोघेही प्रेमात आकंठ बुडालो होतो. माझ्या डोक्यात वेगळी टुरिस्ट कंपनी काढायचा विचार आला आणि शमाने पण मला साथ दिली. वर्षभरात मला चांगलाच रिस्पॉन्स मिळू लागला. मी एक मोठं भाड्याचं ऑफिस घेतलं. आनंदात भर म्हणजे शमाला बाळाची चाहूल लागली होती. सगळं छान चाललं होतं पण दैवं आड आलं. शमाचे अबॉर्शन झाले आणि आम्ही खचलो. एक दोन टूरबरोबर शमाला चेंज हवा म्हणून तिला मुद्दाम घेऊन गेलो.  मी माझ्या व्यवसायात इतका गुंतलो की मला शमाला वेळ देणं अवघड झालं. शमाला मी नोकरी करण्याचा आग्रह केला पण ती दुसऱ्यांदा गर्भवती होती. सगळी काळजी,सगळी पथ्य पाळूनही शमाचे परत अबॉर्शन झाले.

माझ्या कंपनीच्या परदेशी टूर्स वाढू लागल्या. मला व्यवसायात प्रचंड पैसा मिळू लागला आणि मला त्याची हाव सुटली. शमाच्या पपांसारखं मला यशस्वी व्हायचं होतं. मी एक आलिशान ऑफिस विकत घेतलं. शमाकडे माझं दुर्लक्ष होऊ लागलं. तिला माझ्याकडून कशाची अपेक्षा होती हे मी विसरून गेलो. तिला पैशाचं अप्रूप नव्हतं. माझा सहवास हवा होता. तिच्या ह्या मानसिक अवस्थेत तिला साथ द्यावी असं वाटत होतं. पण ती आईसारखी वाद घालणारी नव्हती. सतत सहन करत आली,मनात कुढत राहिली आणि तिला डिप्रेशनचा अटॅक आला. तासनतास कोणाशीही न बोलता खोलीत झोपून राहायची. मला खाडकन जाग आली पण उशीर झाला होता. डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली, पण शमामधे काही फरक पडत नव्हता….

पहाट संपून सुर्याची किरणे खिडकीतून आत यायला लागली. सगळं आठवलं आणि शमाच्या ह्या स्थितीला मीच जबाबदार आहे, ह्या भावनेने मला घेरलं.  जुने अल्बम चाळायला घेतले. त्यात उदयपुरला मी शमाला चिठ्ठी देताना,टूरमधल्या एका खट्याळ व्यक्तीने फोटो काढला होता. तो मला त्याने मोबाईलवर फॉरवर्ड केला होता. मी त्याची प्रिंट काढून तो अल्बममधे लावला होता. डोळ्यातला एक अश्रू त्यावर पडला. मी पान उलटले आणि एक कागद खाली पडला. शमाजवळ मी माझ्या भावना व्यक्त केलेला तो कागद होता. मला भरून आलं. शमाचा परवाना भरकटला होता. इतक्यात शमाची चुळबुळ ऐकू आली.  मी तो कागद घेतला आणि शमाजवळ आलो. तिचा हात हातात घेतला. तिने डोळे किलकिले करून बघितलं. मी तो कागद तिच्यापुढे धरला आणि म्हणालो, ” काही आठवतंय का शमा? इस शमा की खूबसुरती का, दिवाना हुआ था एक परवाना. वो दिवानगी फिर से चाहता हुं.”

शमाने माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात मला  चमक दिसली. माझा थांबा मला गवसला होता. आता फक्त शमाला जपायचं होतं, तिच्यासाठी जगायचं होतं…..

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}