पुस्तकी ज्ञान व अनुभवाचा समन्वय आवश्यक: … वासुदेव स. पटवर्धन, कोथरूड.
पुस्तकी ज्ञान व अनुभवाचा समन्वय आवश्यक:
शाळा कॉलेजमध्ये आपण खूपसे पुस्तके ज्ञान घेत असतो. बहुतेक पदव्युत्तर अभ्यासक्रमात देखील असेच पुस्तकी ज्ञान देण्यावर भर दिलेला दिसतो. परंतु हे ज्ञान व्यवहारात, व्यवसायात उपयोगात आणण्यासाठी आपल्याला अंगच्या हुशारीची जोड द्यावी लागते. अशी हुशारी कधी कधी उपजत असू शकते. पण तशी ती नसली, कमी असेल तर अनुभवातून आत्मसात करता येते, करावी लागते.
पुस्तकी शिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग व्यवसायात कसा करावा, यासाठी बहुतेक व्यावसायिक अभ्यासक्रमात पदवी मिळण्याआधी काही कालावधीची इंटर्नशिप पूर्ण करावी लागते. ह्या संकल्पनेचा उद्देश जरी चांगला असला तरी त्याकडे देखील परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीनेच पाहिले जाते. परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर देखील नोकरी, व्यवसायात लगेच यश मिळवता येत नाही, हे प्रकर्षाने जाणवते. त्यासाठी अनुभव घेणे नितांत आवश्यक असते. याचबरोबर अनुभवाला पुस्तकी ज्ञानाची जोड दिल्यास व्यवसायाची उन्नती नक्कीच करता येते.
वैद्यकीय क्षेत्रात पुस्तकी शिक्षणानंतर अनुभव घेणे अनिवार्य आहे. रूग्णाच्या आजाराचे प्राथमिक निदान करणे हे डॉक्टरांचे पहिले काम. रूग्णाची लक्षणे व त्याचे स्वतःचे म्हणणे यावरून ते करावे लागते. यासंदर्भात काही पुस्तकी ज्ञान डॉक्टरांना मिळालेले असते. पण या ठोकताळ्यावरून प्रत्यक्ष निदान होईल असे नाही. डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात, अगदी भूक लागल्यावर कधी डोके दुखते तर कधी ब्रेन ट्यूमरने. यावेळी डॉक्टरांचा अनुभव कामी आणावा लागतो.
उदाहरण म्हणून मला आलेला अनुभव सांगावासा वाटतो. एकदा महाबळेश्वरला गेलो असताना सकाळी निघायच्या आदल्या रात्री पासून पायाच्या अंगठ्या जवळ अचानक अत्यंत तीव्र वेदना सुरू झाल्या. सूज वगैरे काही दिसत नव्हती. कसाबसा दुसऱ्या दिवशी डोंबिवलीला घरी पोचलो. रविवार असल्याने नेहमीचे डॉक्टर उपलब्ध नव्हते. पण वेदना असह्य होत होत्या. शेजारच्या बिल्डिंग मधला एक मुलगा चांगल्या तर्हेने 𝙼𝙱𝙱𝚂 पास होऊन 𝙼𝙳 करत होता. त्याला बोलवल्यावर बिचारा लगेच आला. प्रथेप्रमाणे प्राथमिक माहिती घेऊन व दुखणारी जागा तपासून त्याने एक पेनकिलर दिली व दुसऱ्या दिवशी 𝚇-𝚛𝚊𝚢 काढून घ्यायचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी देखील वेदना थांबल्याच नाहीत. पण नेहमीचे डॉक्टर आल्याने त्यांना दाखवणे अगत्याचे वाटले. त्यांनी दुखरी जागा व असह्य होणाऱ्या वेदना पाहून लगेच निदान केले की याला गाऊट म्हणतात. रक्तातील 𝚞𝚛𝚒𝚌 𝚊𝚌𝚒𝚍 चे प्रमाण वाढले असता असे होते. 𝚄𝚛𝚒𝚌 𝚊𝚌𝚒𝚍 कमी होण्यासाठी गोळ्या दिल्यावर दोन दिवसात वेदना पूर्ण गायब. येथे डॉक्टरांच्या ज्ञानाविषयी शंका घेण्यापेक्षा त्यांचा तोकडा अनुभव अधोरेखित करण्याचा उद्देश आहे.
अनुभवातून येणारी हुशारी दैनंदिन व्यवहारात देखील कशी महत्वाची ठरू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे घरातील गृहिणी! कुठलेही व्यवस्थापनाचे पुस्तकी ज्ञान न घेता घरातील विविध डिपार्टमेंटचे नियोजन योग्य पद्धतीने करण्याचे कसब खरोखर कौतुकास्पद असते. टाईम मॅनेजमेंटचे धडे न गिरवता सर्वांच्या वेळा संभाळून प्रत्येकाला समाधान देण्याचे कौशल्य एक कर्तव्यदक्ष गृहिणीच करू शकते. हे कसब तिने अनुभवी आजी-आई यांच्या कडून घेतलेल्या “ऑन जॉब” शिक्षणाचा भाग असतो. पण आजकाल स्वयपाकघरात आलेल्या मिक्सर, प्रेशर कुकर, मायक्रोवेव्ह या सारख्या साधनांचा वापर तिला पुस्तकातून शिकावा लागतो. मूलभूत स्वयपाक आजी-आई कडून शिकल्यावर रेसिपी बुक वरून नवनवे पदार्थ बनवणे सोपे जाते. म्हणजे अनुभव आणि पुस्तकी ज्ञान यांची योग्य सांगडच! मध्यंतरी माझ्या वाचनात एक खूप छान पुस्तक आले, “स्वयंपाक घरातील विज्ञान”. जुन्या अनुभवसिद्ध पाककलेची वैज्ञानिक दृष्टिकोनातून उकल केली आहे त्यात. आजकालची, प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक पातळीवर कसून घ्यायच्या फॅशनला छान उत्तर आहे.
बरेच मोठमोठे उद्योग, व्यवसाय पिढ्यानपिढ्या एक कुटुंब चालवताना आपण पाहतो. कुटुंबातील व्यक्तींना अगदी लहानपणापासून व्यवसायातील बारकावे समजलेले असतात. त्यामुळे त्यांना व्यवसाय चालू ठेवण्यात फारशा अडचणी येत नाहीत. परंतु तरीही एका ठराविक वेळी अशा कुटुंबातील मुले व्यवसाय/व्यवस्थापना संबंधित आधुनिक ज्ञान मिळवण्यासाठी उत्सुक असतात, प्रयत्न करतात. ह्यामुळे पुस्तकी ज्ञानाचा अनुभवातून आलेल्या हुशारीशी समन्वय साधून व्यवसाय भरभराटीस नेता येतो.
प्रत्येक वेळी आपण स्वतः अनुभव घेणे शक्य होते असं नाही. काही वेळा काही कटू अनुभव स्वतः घेण्यापेक्षा दुसऱ्या कोणाच्या अनुभवातून शिकणे हितावह असते. “पुढच्यास ठेच, मागचा शहाणा”, अर्थात मागच्याने लक्षपूर्वक पाहणे आणि त्यानुसार शहाणपणाने वागणे आवश्यक आहे.
वासुदेव स. पटवर्धन, कोथरूड.