Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर
10 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग १० लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग १०
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
या काळात विनायकाच्या बालसुलभ मनाप्रमाणे त्याचा दैवी चमत्कारांवर चटकन विश्वास बसे. विनायकाने ध्यान लावून बसावे. तेव्हा त्यास देवीचे प्रत्यक्ष रूप दिसे. देवीचे आवाज ऐकू येत. अशा अनेक घटना घडत. एकदा असाच चमत्कार झाला, विनायकाच्या बहिणीचा कानातला एक दागिना विनायकाकडून हरवला. सर्वांनी अख्खं घर पालथ घातले तरी काही केल्या मिळेना. शेवटी विनायकाने वडिलांच्या भीतीने देवीपुढे दागिना सापडावा म्हणून प्रार्थना केली. तोच त्याच्या मिटल्या डोळ्यांना तो दागिना फडताळाखाली अंधारात पडलेला स्पष्ट दिसला. तिथे या पूर्वीच त्यांनी दहादा शोधला असता मिळाला नव्हता. पण नंतर मात्र हातास अचूकपणे तो जिथे दिसला होता तिथे सापडला. त्याच्या वडिलांना देखील खूप आश्चर्य वाटले. त्या बाल वयात विनायक यास दैवी चमत्कार समजे.
विनायकाची देवीविषयी भावना जितकी उत्कट होती, तितकीच किंवा कणभर जास्तच त्याची बुद्धी तर्कट होती. विनायकाच्या या भावनांचा पाणउतारा करण्यास त्याची बुद्धी सदैव तत्पर असे. त्यात काही घटना घडल्या आणि विनायकाच्या तर्कट बुद्धीला अधिक चेव आला.
एकदा विनायकाच्या वडिलांकडे त्यांचे नाशिकचे काही वकील मित्र येणार होते. वडिलांना ऋणाचा हप्ता भरण्यासाठी काही रोकड हवी होती. ती ते वकील मित्र आणून देणार होते. म्हणून ते दिवसभर त्यांची वाट पाहत राहिले. पण शेवटी ते कोणीच आले नाहीत. वडिलांची चाललेली तळमळ विनायकास काही बघवेना. त्यास फार वाईट वाटले. विनायकाने देव्हाऱ्यात जाऊन देवीपुढे धरणे धरले, जसे एखादी गोष्ट हवी असल्यास आईच्या मागे लहान बालक हट्ट करतो.
विनायकाच्या डोळ्यात पाणी आले. देवीची ओवीबद्ध शब्दात प्रार्थना केली. तो स्वतःच स्तोत्रे रचित रचित देवीस विनवणी करू लागला की, हे संकट टळू दे.
दोन दिवस उलटून गेले पण येणारी मंडळी काही आली नाहीत. विनायक देवीपुढे जाऊन त्राग्याने म्हणाला, “आई, ही वेळ जर सांभाळली नाहीस तर असे होईल की, ‘आजवर पुराणांती ऐकले पोवाडे नव्हे ते रोकडे.’ तरी काही चमत्कार होईना. विनायकांच्या वडिलांना त्याचा देवभोळा स्वभाव माहित असल्याने ते त्यास सांगत होते की, ‘असे देवास जाता येता सतत संकटात घालू नये.’ पण विनायक काही हट्ट सोडेना.
वडिलांनी स्वतः नाशिकस जाऊन जे लोक येणार होते, त्यांची भेट घेतली. पण पैसे द्यायचे नव्हते म्हणून जे येत नव्हते, ते तिथे गेल्यावर थोडीच पैसे देणार होते. वडील पैसे न मिळाल्याने तसेच परत आले.
विनायकाचे बाल मन या घटनेने दुखावले गेले, तो उदास झाला. त्याच्या मनात विचार येऊ लागले की, ‘आपला भाव इतर भक्तांहून वेगळा तर नाही ना? का इतर भक्तांनाही संकटाच्या वेळी देव असाच कधी कधी पावत नसे.’
यापूर्वी त्याच्या मनात कधी पोथीत लिहिले असते ते खरे की खोटे असा प्रश्न येत नसे. ते सत्यच असते हा त्याचा ठाम विश्वास होता. पण या सहज आनंदाच्या शुद्ध दुधात संशयाच्या मिठाचा खडा पडला होता. त्याची तर्कट बुद्धी त्याला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत होती. तरी विनायकाने भक्ती विजयादी ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचून काढले.
आता प्रथमच त्याने भक्ती आणि संशय या दोन्ही नजरेतून ग्रंथ वाचले आणि त्यास वाटू लागले की, ‘ज्या संकटी देव भक्तास पावला न पावलासा भासला, तेव्हढीच प्रकरणे पोथ्यांत रंगवून लिहिलेली असून त्याच भक्तास संकटात अनेक वेळेस तोच देव पावलाही नाही.’
तेरा चौदा वर्षांच्या विनायकाच्या तर्कट बुद्धीने आता आपले म्हणणे ठामपणे मांडण्यास सुरुवात केली. ती म्हणू लागली, ‘ज्ञानदेव समाधिस्थ झाले तेव्हा मुक्ताबाई फारच शोकाकुल झाल्या. देवाने ज्ञानदेवास पुन्हा सजीव केले नाही. तुकाराम महाराजांच्या धाव्यासरशी त्यांच्या कागदी वह्या ज्या देवाने तरल्या, त्याच तुकाराम महाराजांच्या शेवटी शेवटी लोहगावी झालेल्या कीर्तन प्रसंगी आग लागून माणसे जळाली; पण देवाने ती आग विझवली नाही.
एक गाव म्लेछांनी लुटले, त्यामुळे कळवळून माझ्यासारखाच तुकाराम महाराजही त्रागा करून बोलले की, “हरीचिया दासा परचक्राची भीती ही तो दुष्कीर्ती अपुलीची.” पण देवाने ते परचक्र देखोदेखी निर्दाळले नाही.
अशी एक एक उदाहरणे विनायकाची तर्कट बुद्धी त्यास देऊ लागली. ही तर्कट बुद्धी आपले म्हणणे पटवून देण्यासाठी हट्टासच पेटली होती.
अजून एक उदाहरण ती देत होती. त्या चोखामेळ्याचे, ‘त्यांना त्यांच्या सनातनी हरीपुजक धर्मबंधूंनी देवळात शिवलास म्हणून शिळेस बांधून मृत्युदंड दिला. तेव्हा जोखड धरून ज्या श्रीकृष्णाने त्यास वाचविले त्या चोखामेळ्याना पुढे प्रत्यक्ष हरीद्वेषी म्लेछांनी वेठीस धरून वेस बांधण्यास नेले असता वेस कोसळून ते अनेक दुबळ्यांसह चेंगरून मेले तेव्हा श्रीकृष्ण गोवर्धन करांगुलीवर धरण्याची शक्ती असूनही त्या वेशीस रोखून धरून भक्तास वाचविते झाले नाहीत.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

