शत्रुघ्न
श्रीरामाचा लहान भाऊ शत्रुघ्न वर एक लेख वाचण्यात आला तो तुम्ही पण वाचावा असं मला वाटते.
संपूर्ण रामायणात शत्रुघ्न हा कधीच जास्त वर्णीला गेला नाही, तो दुर्लक्षितच राहिला… बघूया या लेखात की शत्रुघ्न ने काय कर्म केलं आहे ते -👇
li.शत्रुघ्न.li
रामरक्षेत व एकंदरीत रामकथे मध्ये शत्रुघ्न चा उल्लेख फार कमी आहे.
शत्रुघ्ना च्या जीवनाचे चिंतन केले तर आपला अहंकार विसर्जित होईल.
जरा त्याच्या जीवनाकडे बघा. अनेकांना असे वाटते की, रामायणामधे शत्रुघ्ना ने नेमके काय केले. रामकथे मध्ये जसे रामासोबत लक्ष्मणाचे नाव चिकटले, तसे भरतासोबत शत्रुघ्नाचे नाव चिकटले असे नाही.
राम, लक्ष्मण, भरत यांच्यापाठोपाठ येणारे शेपटीसारखे नाव म्हणजे शत्रुघ्न नाही. रामकथेतही त्याचा फार जास्त उल्लेख नाही.
कधी कधी एखाद्या समारंभाचे फोटो बघताना माझ्या लक्षात येते की ज्याने काहीच कामे केली नाहीत असे अनेक चेहरे फोटोत आहेत. यांनी फक्त फोटोच्या वेळी उभे राहण्याचे काम केले. त्या वेळी माझे मन त्या लोकांचा शोध घेत असते, ज्यांना फोटो काढून घ्यायला सवड मिळाली नाही. ते फक्त कामच करीत राहिले.
म्हणून शत्रुघ्न च्या कार्याकडे आपले लक्ष थोडे वेधले पाहिजे. कल्पना करा की, दोघे भाऊ वनात आहेत. श्री भरत नंदिग्रामात आहेत. चौदा वर्षपर्यंत अयोध्येचे साम्राज्य सांभाळायचे आहे. ज्या साम्राज्याला राजा नाही असे राज्य सांभाळायचे आहे. तुम्ही राजनीतिशास्त्र कधी वाचले असेल. राजनीतिशास्त्रामधे राज्यावरचे सर्वात मोठे संकट अराजक हे आहे. म्हणून एखादा राजा मरण पावल्यावर त्याचा अग्निसंस्कार करण्यापूर्वी नवीन राजाचे नाव घोषित करावे लागते. राजनीतीप्रमाणे असा एकही दिवस नसावा, ज्या दिवशी राजा नाही. अयोध्येला चौदा वर्षे राजा नाही. पादुकांची सेवा करीत श्रीभरत नंदिग्रामात बसलेले आहेत. दोघे भाऊ वनात आहेत. वडील स्वर्गाला गेले. मग अयोध्येचे राज्य चौदा वर्षे कोणी सांभाळले? ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणची सेना अस्ताव्यस्त होते. काही लोक विद्रोह करतात. मंत्रिमंडळ, सेना, राज्याचा कोश हे सगळे सांभाळणे सामान्य गोष्ट नाही. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काय काय भयानक घटना घडल्या ते शिवचरित्रात वाचा. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळणे किती अवघड असते ते लक्षात येईल. शत्रुघ्नाला फक्त राज्य सांभाळायचे नव्हते. घरामध्ये असलेल्या सहा महिलांना सांभाळायचे आहे. प्रत्येकीची मनोवृत्ती भिन्न आहे. कौसल्यामाता रात्रंदिवस अश्रुपात करते आहे. कैकयीमाता अंत:करणातून दग्ध होती. तिला आता आपल्या कर्माचा पश्चात्ताप होतो आहे. ऊर्मिलेच्या नेत्रातील आसवांना खळ नाही. मांडवीचा पती भरत अयोध्येच्या जवळच नंदिग्रामात आहे. पण ती तिथे जाऊन पतीला भेटू शकत नाही. थोडा या परिस्थितीचा विचार करा. पण चौदा वर्षे इतक्या महिलांना सुखावत सांभाळणे ही सामान्य गोष्ट नाही. शत्रुघ्नाचे जीवन यातच अर्पित आहे. सगळे कर्तृत्व या धाकट्या भावाचे आहे. अयोध्येचे संपूर्ण राज्य आणि सेना त्याने चौदा वर्ष सांभाळली. आणि एवढे करूनही चौदा वर्षांनंतर रामचंद्र परत आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शत्रुघ्न सर्वांत पुढे नाही. पुढे गुरुदेव वसिष्ठ जातात. नंतर रामांच्या पादुका घेऊन भरत जातो. भगवान राम परत आल्यानंतर सारे जण राम-भरत-भेटीचे वर्णन करतात. पण शत्रुघ्नाचे वर्णन कोणी करत नाही. ही मंडळी फोटोकरता नाहीतच. पण ते फोटोत दिसत नाहीत, म्हणून त्यांनी काही काम केल नाही असे म्हणणे कृतघ्नपणा आहे. एखादे उत्तम देवालय उभे असते. लोक त्या देवालयाच्या शिखराकडे पाहतात. भिंतीकडे पाहतात. सुंदर कलाकुसर पाहतात. पण हे सगळे मंदिर पायातल्या ज्या दगडांवरती उभे असते त्या दगडांकडे कोणाचे लक्ष जात नाही. हे पायातले दगड जर विचार करतील की आपला फोटो कधीचं निघत नाही. फक्त मंदिराच्या कळसाचा निघतो, तेव्हा फोटोग्राफर आल्यावर आपण जमिनीतून बाहेर येऊ, तर ते मंदिर किती वेळ उभे राहील? इतके सुंदर मंदिर उभे आहे, कारण पायातले दगड स्वत:ला गाडून त्या ठिकाणी स्थिर आहेत.
म्हणून मला तर नेहमीच वाटते की पायामध्ये गाडल्या गेलेल्या पत्थरांचा प्रतिनिधी म्हणून देवाच्या मंदिरात प्रवेश करताना आपण पायरीला प्रणाम करतो. त्याप्रमाणे रामायणाच्या मंदिरात प्रवेश करताना पहिला प्रणाम या शत्रुघ्नाला करणे फार आवश्यक आहे. कारण त्या पायाखालच्या दगडावर अयोध्येचे दिव्य वैभव उभे राहिले. आपल्या व्रताचे पालन करताना १४ वर्षात सिंहासनावर बसण्याचा क्षुद्र विचार शत्रुघ्नाच्या मनाला कधीही शिवला नाही. वनात राहून वनवासाचे नियम पाळणे सोपे आहे. नंदिग्रामात राहूनसुद्धा ते नियम पाळणे सापेक्षतेने सोपे आहे. पण रात्रंदिवस राजधानीत राहून आणि रोजच्या रोज सगळ्या राज्यव्यवहाराचा परामर्श घेऊन पुन्हा अंत:करणाने संन्यासी राहणे हे फार कठीण आहे. आणि एवढे सगळे करून शत्रुघ्न कुठेही मीपणा मिरवत नाही.
जेव्हा आपल्याला अमुक गोष्ट मी केली असा अहंकार होईल तेव्हा शत्रुघ्नाचे स्मरण करा.
त्या पायाखालच्या दगडाला आठवा. म्हणजे आपली भारतीय संस्कृती कशी आत्मविलोपिनी आहे ते कळेल.🙏🚩
Received from What app post