मला आवडलेले पुस्तक..अष्टदीप…… श्री विश्वास देशपांडे ……… सौ.स्वाती वर्तक खार (प) मुंबई 52
मला आवडलेले पुस्तक..अष्टदीप..श्री विश्वास देशपांडे
———————————————————
फार वर्षांपूर्वी जेव्हा संगणकाचा वापर अतिशय सीमित होता . तेव्हा मी मुलाला सतत विचारीत बसे, काय करतोय , हे काय, याचा काय उपयोग ? हळूहळू ते सर्व तंत्र झिरपत झिरपत गेले , त्याने साऱ्याच आबालवृद्धांना सामावून घेतले .
प्रौढ, वृद्ध सारेच आपली कला, लेखन इतरांपर्यंत पोचवण्याची पराकाष्ठा करू लागलेत . व्हाट्सएप नावाचे खेळणे सगळ्यांच्या हातात आले. आणि एक सुंदर गोष्ट घडली. समविचारी, समवयस्क आपोआप त्यात जोडले गेले. कथा, कविता ,लेखांची देवाण घेवाण होऊ लागली , ओळख वाढली, भेटी झाल्या . मैत्र फुलले
हे सारे सांगण्याची गरज एवढीच की त्यातूनच श्री विश्वास देशपांडे सर यांची पुस्तके भेटीला आलीत. त्यांच्या अर्थपूर्ण कविता, लेख वाचणे, त्यांचे नाशिक एफ एम रेडिओ वर येणारे कार्यक्रम ऐकणे जीवनाला नवी दिशा देत. सुखावून जात. दर रोज उत्तमोत्तम लेख वाचायला मिळणे हे सदभाग्यच .
त्यांची अनेक पुस्तकं वाचलीत. रंगसोहळा, कवडसे सोनेरी अंतरीचे, महर्षी वाल्मिकी, आनंदाच्या गावा जावे, आकाश झुला वगैरे
आता नुकतेच अष्टदीप नावाचे पुस्तक वाचून भारावले .खरे तर आधी त्याचे मुखपृष्ठ बघून ,बालपणी वाचलेली महान लोगों के चरित्र …ही लहान लहान पुस्तकांची ” चरित्र माला ” आठविली. पण जसजसे पुस्तक वाचत गेले जाणवले हे निश्चितच वेगळे आहे.
.अष्ट म्हणजे आठ महान व्यक्ती ज्यांनी दिव्याप्रमाणे उजळून भारताला प्रकाशमान करीत , देशाचे नाव उज्ज्वल केले. त्या सर्वांना भारत रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .खरे तर ४८ भारत रत्नांमधून हेच त्यांनी का निवडले असावेत हा मला पडलेला पहिला प्रश्न . पण त्यांच्याच शब्दात सांगायचे तर..” या सगळ्यांना आपल्या आयुष्यात अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागला , पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली नैतिक मूल्ये ढळू दिली नाहीत किंवा ते निराश ही झाले नाहीत..” हे ही एक वैशिष्ट्यच.
आली जरी कष्टदशा अपार। न् टाकती धैर्य तथापि थोर ।।
केला जरी पोत बळेचि खाले । ज्वाला तरी ते वरती उफाळे ।।
असे वेचे, सुभाषित, ओव्या, श्लोक मध्ये मध्ये ते पेरतात आणि लेख वाचनीय , प्रशंसनीय होतात.
अर्थात इतर ही “भारत रत्न ” त्यांच्यासाठी आदर्शवत आहेत ,ते ही कष्टानेच वर आले आहेत, त्यांच्यावर ही लेखक लिहीणार असतीलच .ते त्यांचे स्वातंत्र्य आहे . एक निश्चित की लेखक स्वतः देशभक्तीचे बाळकडू घेतलेले आहेत.
त्यांची भाषा सरळ, सोपी ,वाचकाला आपलेसे करीत समजविणारी ,शिक्षकी पेशा ला साजेसी अशी वाटते . त्यामुळे वाचक गुंग होत एका हाती पुस्तक वाचन करतो .
हे पुस्तक म्हणजे जन्म तारीख, मृत्यू वगैरेची नोंद देणारे साधारण चरित्र लेखन किंवा निबंध नाही त्यात लेखकाने आपले विचार, त्या त्या व्यक्तींकडून वाचकाने काय घ्यावे , त्यांचे आदर्श कसे रुजवावे हे सहज सांगावे असे ओघवत्या शैलीत सुचविले आहे
त्यांची शब्द क्षमता, लेखणी सामर्थ्य बघून ते सिद्धहस्त लेखक आहेत , जाणवते. . हे त्यांनी या अष्ट रत्नांना अर्थपूर्ण विशेषण वापरून दिलेल्या शीर्षकावरूनच कळते.महर्षी धोंडो केशव कर्वे यांना ते निश्चयाचा महामेरू म्हणतात तर सर विश्वेश्वरय्या त्यांना द्रष्टा अभियंता दिसतात. तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, द्रष्टा उद्योगपती जे आर डी टाटा, निर्मळ चारित्र्याचे धनी लाल बहादूर शास्त्री, अजातशत्रू नेता अटल बिहारी वाजपेयी , आनंदघन लता मंगेशकर, आणि उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक डॉ अब्दुल कलाम .
आता यातले एक टाटा सोडले तर इतरांचे जीवन, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत, सामाजिक रोष, आर्थिक संकटे, सोसत पण तरीही दृढ पणे साऱ्याशी झुंज देत , काट्याकुट्या वर चालत राहिलेले दिसते .तरीही ते आदर्श कसे हे लेखक विशद करतात..” त्यांचे संस्कार इतके प्रभावी होते की त्यांनी आपले नैतिक अधिष्ठान, चारित्र्य कोणत्याही परिस्थितीत ढळू दिले नाही त्याचमुळे त्यांचे कार्य हे दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत ” .ते लिहीतात
थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा ।
आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा।। ”
किती खरे आहे हे.
विधवा स्त्रियांचे नरक झालेले जीवन , अनाथ आणि परित्यक्ता यांचे स्थान , स्त्री शिक्षण यासाठी महर्षी धोंडो केशव यांनी केलेले अपार परिश्रम आणि अमाप कार्य लेखकाने इतक्या प्रभावी पणे मांडले आहे की आपण अक्षरशः नतमस्तक होतो.
त्यांनी केलेले रक्ताचे पाणी, घरादारावर ,सुखावर ठेवलेले तुळशीपत्र याचे श्री विश्वासजींनी असे वर्णन केले आहे की मन भावनाविवश होते .
त्या मुलाला मामाकडे राहून शिक्षण पूर्ण करावे लागले पण बालपणीच जोग धबधबा बघताना ” केवढा हा शक्तीचा आणि पाण्याचा अपव्यय .या शक्तीचा काही उपयोग नाही का करता येणार, मी मोठा झाल्यावर काहीतरी नक्कीच करणार ” अशी खूणगाठ मनाशी बांधणारा व खरेच नंतर आपल्या कार्य कर्तृत्वाने ही किमया घडवून आणणारा मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. या द्रष्टा अभियंताची आदरपूर्वक दिलेली माहिती देताना ते सांगतात..तो अमेरिका दौऱ्यातील किस्सा, सर विश्वेश्वरय्या यांची शिस्त आणि वक्तशीरपणा, वेगवेगळ्या विषयांवर केलेले कार्य , त्यांचे वृंदावन गार्डन , म्हैसूर विद्यापीठ लघु उद्योग ,रेशीम उद्योग कृष्णराज धरण सारेच त्यांच्या कार्यकुशलतेची साक्ष देते .यांनी निर्माण केलेली
बांधकामे अजून दिमाखात उभी आहेत आणि ते सर्व बघून आपण अक्षरशः स्तिमित होतो.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी देखील लेखक अतिशय आदराने त्यांच्या एकेक कार्याचा आढावा घेत ५६५ संस्थानिक त्यांनी किती प्रयत्नपूर्वक ,आपल्या बुद्धिमत्तेने एका छत्राखाली आणले याचे विशद वर्णन करतात .प्रत्येक वेळेस त्यांना किती संकटांना सामोरे जावे लागले , कसा त्रास दिला त्यांना हे सविस्तर सांगतात. पण तरीही आपण किचकट इतिहास वाचत आहोत हे त्यांच्या भाषा शैली मुळे मुळीच जाणवत नाही हे लेखकाचे श्रेय आहे
जे आर डी टाटा यांचे वर्णन ते ओबडधोबड दगडातून सुंदर मूर्ती घडविणारा शिल्पकार , हिऱ्याला पैलू पाडणारा जवाहिऱ्या असे करतात.. अगदी पारशी जमातीच्या भारतात साखरेप्रमाणे विरघळून जाण्याच्या घटनेपासून ते टाटांचे खरे देश प्रेम व कार्य या साऱ्याच गोष्टींची इत्थंभूत माहिती मिळते .जे आर डीं चे चरित्र म्हणजे जणू रत्नांची खाणच ! असे लेखक म्हणतात.द्रष्टा उद्योगपती, सच्चा देशभक्त, गुणी माणसांची कदर,पारख असणारा ,नानाविध उद्योगांची टाटा समूहात भर घालणारा, आपल्या माणसांचे गुण हेरून त्यांचे व्यक्तिमत्व घडवणारा हा माणूस किती कुटुंबवत्सल आणि हळवा माणूस होता हे सगळं कळतं.
निर्मळ चारित्र्याचे धनी लाल बहादूर शास्त्री यांचे साधे राहून ही उच्च विचार करणारे जीवन नेमक्या शब्दात सांगतात.४२ ची चळवळ, त्यांनी भोगलेला तुरुंगवास, घरची अति साधी राहणी, चीनचा विश्वासघात, भारत नेपाळ संबंधात फूट, हजरातबल
प्रकरण, रेल्वे अपघात घटना असे अनेक प्रसंग सांगत त्यांनी शास्त्रीजींची दृढ निश्चयी स्वभावाची आणि किरकोळ शरीर यष्टी असली तरी हिमालयाहून उच्च कर्तृत्वाची ओळख करून दिली आहे .कार्यात झोकून देण्याची त्यांची सवय अतिशय कौतुकाने लेखकाने सादर केली आहे
अटल बिहारी वाजपेयी यांना तर ते अजातशत्रू म्हणून गौरवतात ते उचितच आहे . त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगताना, अटलजी काय म्हणतात..हे त्यांच्याच कवितेत उधृत केले आहे
यमुना तट ,टीले रेतीले
घास फूस का घर डांडेपर,
गोबर से लीपे आंगन में
तुलसी का बिरवा ,घंटी स्वर
माँ के मुँह में रामायण के दोहे- चौपाई रस घोले
त्यांचे ग्वाल्हेरचे शिक्षण ,नारायणराव तरटे यांचा अटलजींवर झालेला प्रभाव पासून ते त्यांच्या सम्पूर्ण कार्याचा आढावा घेत लेखक आपल्याला त्यांच्या घरी जाऊन दिलेल्या सर्वोच्च पुरस्कारापर्यन्त प्रवास घडवितात. तो सारा प्रवास त्यांच्याच शब्दात वाचणे योग्य.
लेखकाची बहुदा सर्वाधिक लाडकी , अर्थात भारतीयांना अभिमान आहे अशीच ती, या पुस्तकाचे मुख्य मौक्तिक , हारातील तनमणी अशी लता मंगेशकर. लेखक संगीताचे दर्दी आहेत ,प्रेमी आहेत त्यांनी जणू सिने संगीताचाच या अनुषंगाने आढावा घेतलाय असे दिसते.जशी भारत रत्न लता सर्व संगीत प्रेमींच्या हृदयात वसली आहे तसेच या पुस्तकात ही सर्वाधिक पाने तिच्याच नांवे गुणगुणत आहेत . तिच्या बालपणीच्या कष्टांपासून ते तिच्या प्रत्येक संगीतकारासह तिने गायलेल्या गाण्याचा अप्रतिम शब्दात रसग्रहण करतात. तुकाराम महाराजांचे भक्ती गीत
कमोदिनी काय काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगीतसे
तैसे तुज ठावे नाही तुझे नाम ,आम्हीच ते प्रेम सुख जाणो…
चा उल्लेख करीत ते लिहीतात ” लता नामक या स्वरकमला कडे रसिक श्रोते नामक भ्रमर आकर्षित होतात आणि त्यांना जी त्याची मोहिनी पडते ती कायमचीच”
लेखकाचे “आनंदघन ” नावाने रेडिओवर कार्यक्रम ही येतात ते अतिशय श्रवणीय असतात. त्यावरूनही त्यांचे लता प्रेम जाणवते.या स्वर सम्राज्ञीला शेवटी भा रा. तांबेच्या शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली देत ते निरोप घेतात.
शेवटी डॉ अब्दुल कलाम या द्रष्टा वैज्ञानिकाचे लेखक छान वर्णन करतात. त्यांचे कष्टमय बालपण ,त्यांनी निःस्वार्थी, प्रामाणिकपणे केलेली देशाची सेवा ,त्यांचे विद्यार्थी प्रेम , त्यांची रुद्र वीणा वाजविण्याची आवड.त्यांनी लिहिलेली पुस्तके,त्यांची विज्ञानावरील निष्ठा असून ही दररोज कुराण आणि भगवतगीतेचे पारायण करणे.आगळ्या वेगळ्या कार्यशैलीमुळे ते कसे लोकप्रिय राष्ट्रपती झाले हे सर्व लेखकाच्याच लेखणीतून बघावे.
हे पुस्तक प्रत्येक वाचकाला एक प्रेरणास्रोत ठरणारे आहे.या रत्नदीपांच्या लखलखीत प्रकाशाने त्यांचे जीवन नक्कीच उजळून निघेल हा माझा विश्वास आहे.
या पुस्तकाला नुकताच ” तितिक्षा इंटरनेशनल ” चा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे .
पुस्तक……अष्टदीप
लेखक…विश्वास देशपांडे, चाळीसगांव
प्रकाशक …..विश्वकर्मा पब्लिकेशन’ पुणे.
पृष्ठसंख्या …३००
किंमत……४२५ रुपये.
सौ.स्वाती वर्तक
खार (प)
मुंबई 52