ती🌹🌹🌹 ……….. @ राजश्री केळकर.
ती🌹🌹🌹
म्हणायला तशी शांत तर कधी बडबड घंटा.. सगळं काही तिच्या मूडवर अवलंबून. मध्यम उंची, साधारण तब्येत, रंग काळासावळा ,कपाळावर लालभडक टिकली, केसांचा कधी अंबाडा, तर कधी लांब सडक शेपटा…. काळ्याभोर डोळ्यात मंद हसरी झाक. बांगड्या भरलेले हात… ताठ मानेची स्वाभिमानी चाल. गोल साडी , हातामध्ये छोटीशी पिशवी,जाता-येता संसाराच्या चार गोष्टी त्या पिशवीत मावतील जेमतेम एवढीच.
अगबाई,” एखादी पर्स असू दे जवळ. नको गं बाई ,आपली साधी पिशवी बरी. पर्स घेऊन मिरवायला लागले तर लोक काय म्हणतील मला😃 मला काय बी ते जमायचं नाही . यावरून अनेकदा आमचे हास्यविनोद होतात. जाता येता सगळीकडे शोधक तरीही माफक नजर मारत चालणं. साधारण पस्तिशीची…
तिला सहज विचारलं तर लिहिता वाचता येतं म्हणाली. परिस्थितीमुळे शिकता आलं नाही… पण अतिशय हुशार. तिचं स्वतःचं पंचकोनी कुटुंब .साधारण मोलकरणींना असते तशी गुटखा तंबाखूची सवय मात्र अजिबात नाही. नाही म्हणायला घरी गेल्यावर मशेरी लावते, दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी असं सांगते. निर्मळ वागणं-बोलणं, काम ही निर्मळ…. कधीतरीच कामात छू मंतर करणारी ते ही बिनधास्त सांगून 😃😃
अंगावर साड्या पण हलक्या सुताच्या. “साडी नेसून काम कसं ग जमतं तुला “असं मी तिला नेहमी म्हणते? न जमायला काय झालं? आम्हाला नाही जमत बाई तुमचं ड्रेस गाऊन घालायला. साडी कशी एकदा करकचून नेसली की कामाला कंबर कसलीच म्हणा .
बरीच लांबून चालत येते माझ्याकडे गेली 13वर्षे तीच आहे. आता पहा ना 13 वर्ष म्हणजे माझ्या घरातील एक सदस्य आहे. माझ्या लहानसहान सुखदुःखाची वाटेकरी जणू…..
मी नवीन राहायला आले तेव्हा माझ्याकडे दोघी येत होत्या. पण नंतर वेळेचं गणित काही आमचं जमलं नाही.गौरी माझ्या जवळ राहणारी तिच्याकडे यायची. मी सहज गौरीला विचारून पाहिलं. येईल का ग माझ्याकडे? तिला विचारून सांगते.
तिनेही तिला विचारलं लगेचच तयार झाली विनाअट ….
तशी शांत पण तितकीच तिखट… रागीट तेजतर्रार …ती बोलायला लागली की आपण गप्प बसायचं मग आपसूकच सगळं निवळत. कधीही कसलीही अपेक्षा नाही….अगदी निर्मळ मनाची. कधीही कामात खाडा नाही. कटकट नाही .मात्र हक्काच्या सुट्ट्या ठरवून घेतलेल्या . सणावाराला कामाला खास करून नटून थटून येते. नवरात्रीचे नवरंग लेवून … पेपरात पाहिलेलं असतं की कोणत्या वारी कोणती साडी हे वर मला सांगणारी😊 नऊ दिवसांचा उपवास असूनही चेहऱ्यावर कधीही दमछाक नसलेली, हसतमुख अशी ….
छानशी साडी, रंगीत हातभर बांगड्या, मेंदी लावलेले लालभडक हात… पायात पैंजण… तिला पाहून माझंच मला काहीतरी चुकतंय असं वाटतं .नागपंचमी, संक्रांत म्हंटलं की ,”ताई तुम्ही नाही का मेंदी काढली, काढायची की त्या निमित्तानं तेवढच मनाला बरं वाटतं बघा. सणवार आहे असं वाटतं …काय ते सदानकदा अंगावर डगले चढवायचे.. साडी कशी भारदस्त शोभून दिसते तुमाला. मी उगाचच मनातल्या मनात ओशाळते… चार घरची काम करणारी असली तरी मुलांना कडक शिस्तीत वाढवलय. तिच्या बोलण्यावरून मला अनेकदा जाणवतं. मी इकडे आले की मुलांनी घरी काय कामं करायची ठरवून दिलेलं असत बघा. पोर आळीपाळीने सगळं करतात . मला कामाचा घरी गेल्यावर कसलाही शीण नाही. घरी लेक आहे. घरी गेल्यावर आयता गरम गरम चहा….आणि रात्रीचं जेवण बी तीच करते. जेवलं की गुरफटून झोपायचं ते सकाळीच पांघरुन काढायचं … यापलीकडे सुख ते कोणतं असं मीच माझ्या मनाला विचारते .कसल ही टेन्शन घेत नाही हे वर सांगणं.
नवरा काय करतो ,गवंडीकाम .”नाही म्हणायला थोडा दारू पितो, चालायचं दमतो ताई तो”,लई चांगला हाय… फक्त व्यसन सोडत नाही .बाकी लई माया करतो आमच्यावर .काय म्हणू मी तिला मी फक्त कधीकधी ऐकत राहते. तिच्या सहनशीलतेचं मनोमन कौतुक करते.
पोरांच्या शिक्षणावर मात्र तिचं बारीक लक्ष .मी पण अधूनमधून सांगते, मुलांना शिकव गं म्हणजे मग तु या चक्रात अडकणार नाहीस…. पण “जोपर्यंत हात पाय हलतात तोपर्यंत मी काम करणार, कुणावरही अवलंबून नको” हे तिचं तत्वज्ञान.अभिमानाने सांगते ,मोठा पोरगा आता कामाला लागलाय, बारक्याचा फारसं शिक्षणात लक्ष नाय .अजून लहान पोरा सारखाच वागतो , .”चालायचंच गं , लहान आहे तो.हे माझं सांगणं.
यंदाच्या वर्षी लेकीचं लग्न करणार हाय . चौदावी पर्यंत शिकली लेक माझी. आता बास ,आता तिला तिच्या नवऱ्याच्या घरी पाठवायचं. चांगलं स्थळ चालून आलय. पोरगा चांगला हाय .थाटामाटात करणार हाय लग्न. एकुलती एक हाय ना !! ..लग्नात मानपान रुखवत कशात बी कमी करणार नाय. हळूहळू चार दाग बी करून ठेवलेत. समदी तयारी अगोदरच केली आहे. कुणाचही कर्ज नको. उसनवारी नको थोडं थोडं साचून ठेवलय. अशा सगळ्या गप्पा गुजगोष्टी…. रोज नाहीत फक्त रविवारच्या होतात. कारण मला सुट्टी असते. एरवी ती आणि मी भेट नाही. तिची आणि माझी भेट फक्त रविवारी होते. रविवार म्हंटलं की आमचं घर बोलायला लागतं खळाळत हसायला लागतं.. कारण हसणं तिलाही आणि मलाही अगदी जवळच.
कामाचं अचूक व्यवस्थापन, लहान सहान गोष्टी मधील तिचा आनंद तोही निखळ, अत्यंत प्रामाणिक, पैशा परीस तुमच्या सारखी आजूबाजूची माणसं नेहमी जपते हे सांगणारी, बरोबरीनं सर्व नाती सांभाळणारी, गणगोतावर प्रेम करणारी, हिशोबात अतिशय अचूक, आहे त्या परिस्थितीत संसाराचा ताळमेळ घालणारी ,कधीतरी मलाही तत्वज्ञान शिकवणारी…. जेमतेम शिक्षण असूनही अनेक गोष्टी मी तिच्यात पहात असते. अशी ती म्हणजे हल्लीच्या जमान्यात जिच्या वरती बिनधास्तपणे सर्व घर टाकून जाऊ शकते अशी माझं सगळं घरकाम करणारी बाई कामिनी मला तिच्या वागण्यानं, बोलण्यानं अनेकदा अचंबित करते.आणि मी फक्त ऐकत रहाते.
@ राजश्री केळकर.
25 जुलै 2021.