मंथन (विचार)

सोहळा … मधुरंग मधुरा कुलकर्णी.

#सोहळा

शिकागो शहराच्या त्या इंडियन ग्रोसरीच्या दुकानात माधवीताई काही निवडक सामान घेत होत्या. गेल्या काही वर्षात अनेक वेळा आपल्या मुलीकडे काही महिन्यांसाठी राहायला यायच्या माधवीताई,त्यामुळं अमेरिका बरंच अंगवळणी पडलं होतं एव्हाना त्यांच्या.

यजमान लवकर गेले, मोठ्या मेधाचं लग्न झालं ती अमेरिकेत तिच्या नवऱ्यासोबत, अभिसोबत सेटल झाली. मेधा अभि आणि नातू श्लोक असं त्रिकोणी कुटुंब.
धाकटी मृदुला,तिचं लग्न होई पर्यंत तिची सोबत होती. ती सासरी गेल्यावर मात्र माधवी ताईंनी एकटं न राहता जमेल तसं दोघीकडं राहावं हा मुलींचा हट्ट. आता गेल्या काही महिन्यांपूर्वी त्या मेधाकडे आल्या होत्या आणि लॉक डाऊन असल्यामुळं अजूनच मुक्काम वाढला होता माधवी ताईंचा.

चालत जाण्याच्या अंतरावर असलेल्या त्या दुकानात एकट्या जात असत कधीकधी त्या.
त्या दिवशी देखील सामान घेताना एक मुलगी दिसली
तिची गडबडीत पर्स खाली पडली.
प्रेग्नन्ट होती ती मुलगी पोटामुळं पटकन वाकता देखील येत नव्हतं. माधवीताईंनी तिची पर्स उचलून दिली. तिने मास्क लावलेला त्यामुळं तिचा चेहरा दिसत नसला तरी डोळ्यातले कृतज्ञतेचे भाव समजले माधवी ताईंना आणि त्यांनी न्याहाळलं तिला. हलकीशी स्माईल दिली आणि निघून गेल्या.
जाताना मात्र त्यांना झालेला भास काही विसरू शकत नव्हत्या.

“मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात खरं पण आता मला भास देखील व्हायला लागेल कि काय?” असा विचार करत घरी पोहचल्या.

थोरली मुलगी मेधा घरीच होती. माधवी ताई आल्या आल्या तिने मस्त गरम कॉफीचा मग त्यांना दिला. त्यांनी स्टोअर झाला प्रकार मेधाला सांगितला.
म्हणाल्या ” मेधा मला ना आज त्या स्टोअर मध्ये एक मुलगी दिसली आणि आपली मृदू असल्याचा भास झाला गं, आपली मृदूपण आता अशीच दिसत असेल ना?” बोलता बोलता डोळे भरून आले यांचे. आज काल सारखेच भरून येत होते म्हणा.

मृदुला माधवी ताईंची धाकटी लेक, सातवा महिना चालू होता तिला. माधवी ताई मेधाकडे अमेरिकेत आल्या आणि इकडे मृदुलाने सगळ्यांना गुड न्युज दिली. पहिले काही महिने जरा धीराने घेतलं सगळ्यांनी. आज उद्या करत करत आज सात महिने झाले, खरं लॉक डाउन काही संपेना, विमान सेवा ठप्प, आणि विमान चालू झाली तरी यात माधवीताईंनी एकटीने प्रवास करणं ते ही या परिस्थितीत, सगळ्यांनाच थोडं जोखमीचं वाटत होतं.

एक एक महिना पुढं जाईल तसं माधवीताईंची घालमेल चांगलीच वाढली होती. मृदुलाचं पाहिलंच बाळन्तपण , सासू सासरे सुद्धा येऊ शकत नव्हते. तेही त्यांच्या मोठ्या मुलाकडे परदेशात अडकलेले. लेक जावई एकटं कसं करतील सगळं?
आईच्या काळजीला का काही सीमा असते. आणि त्यात लेकीचं बाळंतपण म्हणजे आईच्या जिव्हाळ्याचा विषय असतो अगदी. आपला सगळा अनुभव, सगळी माया या सगळ्याचा कस लावून “फिरुनी नवी जन्मेन मी म्हणत” आजी तयार असते बाळाच्या स्वागताला.
माधवी ताईंच्या बाबतीत हे सगळं सगळं कसं त्या मोबाईलच्या चौकटीत अडकून बसलं होतं. त्या चौकटीतून पाहायचं, त्यातूनच बोलायचं. कसं समाधान होईल त्या आईच. आवाज ऐकता येतो, पाहता येतं पण स्पर्श अजून पोहचवता येत नाही. अशी अस्वस्थ झाली होती. आपल्या हातचं छान खाऊ घालावं लेकीला, हवं नको पाहावं यातलं काही करता येतं नव्हतं मधवी ताईंना.
मेधाला देखील आपल्या धाकट्या बहिणीची काळजी होती. परिस्थितीने तिचेही हात बांधले गेले होते.

……..
“आज सातवा लागला ना गं मृदुला” माधवी ताई म्हणाल्या. त्या स्टोरमधली मुलगी तशी कुठे पहिल्या सारखी वाटली.आपल्याच कॉलनीत राहत असेल. मास्क असल्यामुळं ओळखलं नाही मी तिला.
कॉफीच्या घोटासोबत एक आवंढा गिळला माधवीताईंनी .

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाय मोकळे करायला बाहेर पडल्या माधवी ताई तेंव्हा ती मुलगी पुन्हा दिसली माधवी ताईंना. दोन घरं पलीकडे राहत होती, तिने हात केला माधवी ताईंना.
काही महिने आधीच ती राहायला आली होती तिकडे. घराच्या समोरच्या लॉन वर होती त्यामुळं मास्क नव्हता. दिलखुलास हसली ती.
माधवी ताईंनी देखील छान हात करून हाय केलं तिला.आणि बघता बघता ओळख झाली दोघींची.

सेजल पटेल. गुजराथी छोकरी एकदम मस्त मैत्रीण झाली एकाच महिन्यात माधवीताईंची.
मुलीच्या काळजीत व्याकुळ माधवीताई सेजलमध्ये मृदुला पहायच्या, समाधान मानायच्या आणि याच सगळ्या संकटामुळं सेजलच्या घरचे येऊ शकत नव्हते म्हणून सेजलला आधार वाटायचा माधवी ताईंचा.
हक्कच माणूस दूर असलं की, आपण समोर असेलल्या माणसात त्याच्या खाणाखुणा शोधतच राहतो असं झालेलं दोघींचं अगदी.

भरत आल्या दिवसाच्या सेजल मध्ये मृदू दिसायची माधवी ताईंना. असेल आणि मायेन विचारपूस करणाऱ्या माधवी ताईंमध्ये सेजल आपली आई शोधायची.
पण शेवटी कितीही नाही म्हणलं तरी दोघीनाही घरची आठवण यायचीच.

काही दिवसातच सेजल आणि तिचा नवरा हिमांशू पटेल दोघे अगदी घरचा भाग होऊन गेले माधवी ताईंच्या. मेधा तिचा नवरा अभि देखील अगदी आपुलकीनं चौकशी, मदत करायचे सेजल आणि तिच्या नवऱ्याला. ।मृदूची जशी काळजी घेतली असती तशीची माधवीताई सेजलची काळजी घेत होत्या.
पण इथे सेजलला आपली सोबत मिळतिये तशी मृदुलाला कोणीच नाही ही खंत वाटत होती माधवी ताईंना.
……
हिटरमुळं खिडकीच्या काचा धूसर झालेल्या तरी एकटक माधवीताई खिडीतून बाहेर पाहत होत्या. नववा महिना लागलेला मृदूला.
दिवसेंदिवस दुःखी होणाऱ्या आणि काळजी करत राहणाऱ्या आपल्या आईची अवस्था आता मेधालाही पाहवत नव्हती. तिने आईला मिठी मारली.
“होईल गं सगळं ठीक
आई आपण सेजलंच डोहाळे जेवण करूया आपल्या घरी छोटं?” मेधा म्हणाली.
अचानक मेधाला सुचलेल्या या कल्पनेच कौतुक वाटलं माधवी ताईंना. त्यांनीही होकार दिला..
सगळी छान तयारी केली. सेजलला तयात करण्याची जबाबदारी मेधाने घेतली आणि मस्त जेवण बनवायची माधवी ताईंनी.
सेजल देखील या प्रेमामुळेच अगदी भारावून गेली होती.

छान सजवलेलं घर माधवी ताईंनी. सोफ्याला फुलं लावून मस्त सेजलच्या बसायची व्यवस्था केली होती. थोडे पदार्थ मांडले होते टेबलवर. इतक्यात सेजल आली. सुंदर हिरवी साडी नेसली होती तिने , खास गुजराथी पद्धतीने. घरीच फुलांनी बनवलेला कंबरपट्टा घातला होता, हलकी मेहंदी काढली होती. चेहऱ्यावर होऊ घातलेल्या आईपणाचं तेज , काहीसा थकवा असे मिश्र भाव होते. थोडी पुढे येताच माधवी ताईंना वाकून नमस्कार करू लागली तशी माधवीताईंनी नाही म्हणत जवळ घेतलं तिला. सेजलची तर कौतुक आणि काळजी होतीच पण एक क्षण त्यांची मृदू आली त्याच्या डोळ्यासमोर अशीच नटलेली. कौतुकाने त्यांनी हात फिरवला सेजलच्या चेहऱ्यावरन.
सेजलला देखील तिच्या आईच्या आठवणींनी गलबलून आलं अगदी. दोघींनी एकमेकींना मिठी मारली.
काही भिजले क्षण ओसरले.

मग सेजलला सजवलेल्या सोफ्यावर बसवलं आणि तिच्या शेजारी माधवी ताईंना. आणि टीव्ही लावला मेधाच्या नवऱ्याने. लॅपटॉपला कनेक्ट वगैरे सगळी सोय आधीच करून ठेवली होती आणि समोर स्क्रीनवर माधवीताईंना दिसली मृदुला… विडिओ कॉल वरून.
छान नटलेली, हिरवी साडी घातलेली , छान डोहाळे जेवणाचे दागिजे ल्यालेली.
शेजारी बसले होते रंजन आणि शाम पारेख सेजलचे आईवडील.. त्यांनी सगळं छान अरेंज केलं होतं मृदुलासाठी, मराठमोळ्या पद्धतीने, मृदुलाच्या नवऱ्याची मदत घेऊन.
आपल्या आई बाबाना पाहून सेजल आणि लेकीला पाहून माधवीताई स्तब्ध झाल्या एक क्षण….

निस्वार्थीपणे एखाद्याला लावलेला जीव आणि माया कशी नव्या रूपात आपल्या वाट्याला येते याची प्रचिती अली होती दोघींना.
सेजलच्या तोंडी गेल्या काही महिन्यात सारखं माधवी ताईचं नाव होतं.

त्यांनी लावलेला जीव वेळोवेळी घेतलेली काळजी , छानछान बनवून खायला घातलेला खाऊ, आणि त्यांचा आपल्या लेकीत अडकेल जीव… सगळं सेजल आपल्या आईला सांगत होती. एका आईची तगमग सेजलच्या आईला रंजन बेन पारेखना समजली नसती तर नवलच. एकाच शहरात काही किलोमीटर आई विना अडलकीली पोर मृदू आणि दूर देशी अडकली आपली सेजल यात काही फरक वाटला नाही रंजन बेनला.
मग मृदुलासाठी, माधवीताईंच्या साठी आणि सेजलसाठी..
मेधा, अभि, सेजल आणि मृदुचा नवरा यांनी गुपचूप घडूवून आणला हा ऑनलाईन सोहळा.
आपल्यासारखीच एक आई मृदुलाच्या वाट्याला आल्यामुळं निश्चिंत वाटत होतं माधवी ताईंना.
….कारण पुढचं सगळं पार पडायला आता रंजनबेन मदत करणार होत्या मृदुलाला.

स्क्रीनच्या ऐल आणि पैल रंजन बेन मृदलाला ओवाळत होत्या आणि माधवी ताई सेजलला. दोघींच्या मनात आपल्या मुलीला ओवाळण्याची भावना होती. आणि मनात एकच भाव रेंगाळत होता…..

” लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू,
इथून दृष्ट काढते निमिष एक थांब तू, थांब तू,”

मधुरंग
मधुरा कुलकर्णी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}