Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

23 बखर सावरकरांची:पूर्वार्ध  ~भाग २३ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध  ~भाग २३
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
१२. प्लेगच्या दुसऱ्या फेऱ्यात सावरकर कुटुंबीय अडकले.
सन १८९९ साली प्लेगने पुन्हा हाहाकार माजवला. गेल्या वर्षीच्या प्लेगने घातलेला धुमाकूळ आणि इंग्रज सरकारची अरेरावी याच्या आठवणी अजून ताज्या असताना पुन्हा एकदा प्लेगने डोके वर काढले. तेव्हा तात्याराव आणि त्यांचे जेष्ठ बंधू नाशिकला तीळभांडेश्वराच्या गल्लीत वर्तकांच्या वाड्यात राहत होते. त्यांचे शेजारी असलेले दातार यांचे घरी पण प्लेगची लागण झाली. दातारांचे रामभाऊ हे तात्यारावांच्या जेष्ठ बंधूंच्या म्हणजेच बाबारावांच्या वर्गातले. रामभाऊंच्या वडिलांना प्लेग झाला होता, त्यात त्यांचे निधन आले. नाशिकला सर्वत्र प्लेगने थैमान घातले होते, आजूबाजूचे लोक प्लेगने पटापट मरू लागले होते. तेव्हा तात्यारावांच्या वडिलांनी त्या दोघांना नाशिकच्या शाळेतून काढून भगुरास परत घेऊन गेले.
एकेका गावातील प्लेग वाढीस लागत असल्याच्या बातम्या सतत येऊ लागल्या. लवकरच ज्या गावात तात्यारावांची बहिण दिली होती तिथे म्हणजे त्रंबकेश्वरलाही प्लेगने धुमाकूळ घातला. त्यामुळे वडिलांनी बाबारावांना त्रिंबकला पाठवले आणि तिला व तिच्या पतीस स्थानत्याग करून भगुरास बोलावून घ्यायचे ठरवले. बाबाराव लगेच त्यांना आणण्यास निघाले.
पण त्याच वेळी भगुरास देखील लोकांच्या मनात प्लेगची धास्ती होतीच. कारण जवळच असलेल्या नाशिकात प्लेगचा प्रचंड थैमान सुरु होता. नाशिकास येणारे जाणारे तेथील हकीकत सांगत होते. मागच्या प्लेगने पुण्या मुंबईस घातलेल्या धुमाकुळाच्या कथा केसरी वगैरे वर्तमानपत्रातून रकानेच्या रकाने भरून येत. ते सावरकरांच्या ओसरीवर ऐकायला जमणारा भागुरचा गावकरी आता प्लेग आपल्या जवळ आला या जाणीवेने अस्वस्थ होत होता.
इतक्यात श्रावण महिन्याच्या आसपास भगुरात उंदीर मरून पडू लागल्याच्या बातम्या लोक हळू आवाजात एकमेकांना सांगू लागले. प्लेग उंदरांपासून पसरत असे. मनुष्य स्वभावधर्माप्रमाणे अशुभ बातम्या कंठाशी येईपर्यंत खोट्या आहेत असे समजतो आणि शुभ बातम्याच खऱ्या आहेत हे समजून चालतो. त्यामुळे उंदीर मरून पडत असताना आपल्या घरी उंदीर मरत आहेत, असे कोणी मान्य करेना. मान्य केल्यास त्यानंतर होणारी ससेहोलपट लोकांस भयानक वाटे. तुमच्या घरात उंदीर मरत आहेत असे कोणी म्हंटल्यास ती व्यक्ती संतापून वाद घाले, पण मान्य करत नसे. उंदीर मेले आहेत हे कळताच सरकारी माणसे येऊन घर रिकामे करण्याचा हुकुम सोडीत. रानावनात बेघर होऊन लोकांना भटकावे लागे.
 घरातले समान धुण्याच्या नावाखाली घरात घुसलेले सरकारी लोक अख्खं घर धुवून नेत. उपयोगी वस्तू अक्षरशः लुटून नेत. त्यामुळे लोक लवकर कबूल होईनात. हे लोक इतरांचा आणि स्वतःचा देखील असा समज करून देत की मांजराने उंदीर मारले असतील. घरातील मनुष्यास प्लेगचा प्रादुर्भाव होऊन तो मरणासन्न होईपर्यंत प्लेग झालाय असे कोणी मान्यच करत नसत. त्यामुळे प्लेगचा फैलाव अधिक वेगाने होई. खर तर प्लेगपेक्षा नंतर होणाऱ्या सरकारी छळाला हे लोक अधिक घाबरत असत.
तात्यारावांच्या घरात देखील त्याच सुमारास दोन चार उंदीर मरून पडले. त्यांच्या वडिलांनी ते गुपचूप टाकून दिले. प्लेगचे नसतील नेहमी मरून पडतात तसे पडले असतील म्हणून घरातील सर्वांना हे बाहेर कुणास न सांगण्याबद्दल बजावले. तात्यारावांचे जिवलग मित्र राजा आणि परश्या यांच्या घरी देखील असेच उंदीर मरून पडले. त्यांनीही कोणास न सांगता त्यांची विल्हेवाट लावली. त्यानंतर अगदी दोनच दिवसात त्यांचा एक भाऊ तुकाराम, याला प्लेग झाला. त्याच्या अंगात देवाचे येई, त्यामुळे तोच ताप आहे, असे त्याने दिवसभर सगळ्यांना सांगितले. पण दुसऱ्या दिवशी पहाटे तो वारला. मग मात्र गावभर झाले. सर्वत्र धावाधाव झाली.
 लोकांना संकट डोळ्यासमोर दिसू लागले. सरकारी लोकांनी त्यांच्या घरावर मोहोर उठवली. आणि उरलेल्या पाच पंचवीस माणसांना घराबाहेर काढले. त्या सगळ्या माणसांना रडत ओरडत रानात जाऊन उघड्यावर राहायला भाग पडले.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य  (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.)  9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}