लग्नामध्ये मंगलाष्टक का म्हटल्या जातात माहिती आहे का….?
लग्नामध्ये मंगलाष्टक का म्हटल्या जातात माहिती आहे का….? वेळात वेळ काढून नक्की वाचा… 🙏
तुळशीचे लग्न लागले की लगीन सराई सुरू होते. लग्नात मंगलाष्टके म्हणण्याची प्रथा आहे. शेवटी मुहूर्त जवळ आला की ‘तदेव लग्नं’ सुरू होते. त्यावेळी सर्वांना कळते की मंगलाष्टके संपली. सर्वांचीच घाई सुरू होते.वधू – वर एकमेकाला पुष्पहार घालण्याच्या तयारीत स्वत:ला सावरतात. वाजंत्रीवाले वाजंत्री वाजविण्यासाठी तत्पर असतात. फोटोग्राफर वधू-वरांचे पुष्पहार घालतानाचे फोटो टिपण्यासाठी चांगली जागा पटकविण्याच्या घाईत असतात आणि पाहुणे मंडळी उरलेल्या अक्षता एका हातात घेऊन त्या वधूवरांवर टाकून जेवण्याच्या पंगतीत जागा मिळविण्यासाठी घाई गडबडीत असतात. मंगलाष्टके संपतात पण ती का म्हणतात ते माहीत नसते. मंगलाष्टके म्हणजे काय ते अगोदर आपण समजून घेऊया.
विवाहकार्यात आशीर्वादपर असे आठ श्लोक म्हटले जातात त्यांनाच ‘मंगलाष्टक’ असे म्हणतात. विवाहविधींमध्ये वाग्दान (वाड्.निश्चय), सीमांतपूजन, गौरीहर-पूजा, मधुपर्क,वधूवरांचे परस्परनिरीक्षण, कन्यादान, कंकणबंधन, अक्षतारोपण, विवाहहोम, सप्तपदी, ध्रुवदर्शन, ग्रहप्रवेशनीय होम, ऐरणीदान, वरात, गृहप्रवेश, आशीर्वाद इत्यादी विधी केले जातात.
या प्रमुख विधींखेरीज अक्षत, घाणा भरणे, साखरपुडा, उष्टीहळद, गडगनेर (केळवण), तेलसाडी-तेलफळ, रूखवत, आंबवण, सुनमुख, व्याहीभोजन, रासन्हाणे, विडे तोडणे, रंग खेळणे, झेंडा नाचवणे इत्यादी लौकिक विधीही केले जातात. परंतु, या सर्व विधींमध्ये वधूवरांचे परस्पर निरीक्षण या विधीमधील अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून वधुवरानी एकमेकाला पुष्पमाला घालण्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. विवाह समारंभास हजर राहताना या विधीच्यावेळी हजर राहणे याला विशेष महत्त्व दिले जाते.
मंगलाष्टकांचे महत्त्व
वराची मधुपर्क पूजा झाल्यावर त्याला मांडवात एका तांदुळाच्या पुंजीवर पूर्व दिशेकडे तोंड करून उभे करतात. त्याच्यासमोर पश्चिमेकडे तोंड करून वधूला उभी केली जाते. दोघांच्यामध्ये अंतरपाट धरतात आणि मग पुरोहित काही संस्कृत व प्राकृत श्लोक म्हणजे मंगलाष्टके म्हणतात. या श्लोकांच्या शेवटच्या चरणात शेवटी “कुर्यात् सदा मंगलम् , शुभमंगल सावधान!” असे म्हटले जाते. मंगलाष्टकांच्या शेवटी “तदेव लग्नं सुदिनं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव, लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ।। ” असे आशीर्वाद दिले जातात. वधू-वरामधील अंतरपाट दूर केला जातो आणि वधू-वर एकमेकाला पुष्पमाला घालतात. आप्तेष्ट-मित्रमंडळी वधुवराच्या मस्तकावर अक्षता टाकून टाळ्या वाजवून आनंद प्रकट करतात. वाजंत्रीवाले सनई- चौघडा वाजविण्यास सुरूवात करतात.
विद्वानांच्या मते लग्नात मंगलाष्टके म्हणण्याची पद्धत ही फारशी प्राचीन नाही. रुग्वेदीय ब्रह्मकर्मात वधू-वरांमध्ये अंतरपाट धरल्यावर ‘सत्येनोत्तभिता भूमि:’ हे विवाहसूक्त म्हणावे असे सांगण्यात आले आहे. मात्र, मागील अनेक वर्षे विवाह समयी मंगलाष्टके म्हणण्याचीच प्रथा पडली आहे आणि ती विशेष लोकप्रियही झाली आहे.
मंगलाष्टकांचे श्लोक हे शार्दुलविक्रीडित वृत्तात असतात. या वृत्तातील कोणताही ईश्वरस्तुतीपर श्लोक ‘मंगलाष्टक’ म्हणून चालतो. अलीकडे काही महिला मंगलाष्टकात वधू-वराची नावे घालून नवीन मंगलाष्टके तयार करून म्हणतात. काही वेळा तर मंगलाष्टके विविध मंगल-मधुर चालीत गोड आवाजात गायलीही जातात. तर काही ठिकाणी मंगलाष्टकांची सीडी किंवा रेकॉर्ड लावली जाते. त्यामुळे मंगलाष्टकाना विवाहसोहळ्यात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मंगलाष्टकांमधील वर्णन –
बहुतेक मंगलाष्टके ही वर्णनात्मक असून ती पारंपरिक पद्धतीने म्हटली जातात. तर काही मंगलाष्टके ही ईश्वराच्या स्तुतीपर असतात. मंगलाष्टकांची चाल अतिशय मधुर असते. त्यामुळे त्याठिकाणी पवित्र -मंगल वातावरण निर्माण होते. जैनांनी मंगल शब्दाच्या व्याख्या वेगळ्या प्रकारे केल्या आहेत. ‘मलं गालयतीती मड्.गलम् ‘ म्हणजे मलाला दूर करणारे ते मंगल होय. ‘मं पापं गालयतीती मड्.गलम् । ‘ मं म्हणजे पाप ! ते नष्ट करते ते मंगल होय. मंगलाची व्याख्या अशीही केलेली आहे –‘ ‘ विघ्नविनाशनानुकूलव्यापारविशिष्टत्वं मड्.गलम् ‘ म्हणजे विघ्नविनाशनाला अनुकूल ते मंगल होय ! कार्यसमाप्तीला प्रतिबंधक होणारे जे विशिष्ट पाप त्याचा विघात करते ते मंगल होय अशी मंगल शब्दाची व्याख्या शास्त्रकारानी केलेली आहे. विवाहानंतर वधूवरांचे जीवन मंगलमय होवो ही त्यामागे भावना असते. आता आपण मंगलाष्टकाची काही उदाहरणे पाहुया.
स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिं थेवरम् ।।
लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ।
ग्रामे रांजणनामके गणपती: कुर्यात् सदा मंगलम् ।।
—— या मंगलाष्टकामध्ये अष्टविनायकांची व त्या स्थळांची नावे गुंफलेली असून मंगल करण्याविषयी अष्टविनायकाला प्रार्थना केलेली आहे.
गंगा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता च या गण्डकी ।
पूर्णा: पूतजलै समुद्रसहिता: कुर्वन्तु वो मंगलम् ।।
——- या मंगलाष्टकामध्ये नद्यांची नावे गुंफण्यात आली असून समुद्रसहित पवित्र नद्यांना मंगल करण्याची प्रार्थना केलेली आहे. निसर्ग म्हणजेच ईश्वर ही त्यामागे भावना आहे.प्राचीनकालीही पर्यावरणाचे महत्व जाणले गेले होते.
लक्ष्मी: कौस्तुभपारिजातकसुरा धन्वतरिश्चंद्रमा ।
गाव: कामदुघा सुरेश्वरगजो रम्भादिदेवांगना: ।।
अश्व: सप्तमुखो विषं हरिधनु: शंखोऽमृतं चाम्बुधे: ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनी कुर्वन्तु वो मंगलम् ।।
——- समुद्र मंथनातून जी चौदा रत्ने बाहेर आली ती मंगल करो अशी प्रार्थना या मंगलाष्टकामध्ये करण्यात आलेली आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हा एक संस्कार मानला जातो. या संस्कारामुळे वधू आणि वर हे पुरोहित, आप्तेष्ट-मित्र आणि अग्नी यांच्या साक्षीने पति-पत्नी म्हणून संबद्ध होत असतात. धर्मसंपत्ती आणि प्रजासंपत्ती हे विवाहाचे प्रयोजन मानलेले आहे.
वधू- वर हे यापुढे पति-पत्नी या नात्याने वावरणार असतात. त्यांची जबाबदारी ही वाढलेली असते. गृहस्थाश्रमातील कर्तव्यांचे त्यांनी नेहमी सावध राहून चिंतन करावे हा त्यामागचा उद्देश असतो. म्हणूनच मंगलाष्टके ही विवाह समयी मंगल, पवित्र, निर्भय आणि आनंदमय वातावरण निर्माण करीत असतात. हिंदुस्थानची ही विवाह संस्काराची पद्धत सध्या जगात श्रेष्ठ मानली जाते,
टीप : लेखकाचे हक्क अबाधित राहतील 🙏 जे कोणी ह्या लेखाचे लेखक आहेत त्यांना धन्यवाद .. व्हाट्स अँप वर आलेल्या पोस्ट मध्ये कोणत्याही नावाचा उल्लेख नसल्याने आभार इथेच