मंथन (विचार)

दुःखावर गुणकारी औषध – छंद ……………..जयंत शंकर कुलकर्णी

दुःखावर गुणकारी औषध – छंद
—————————————

माणसं जेव्हा निवृत्त होतात तेव्हा निवृत्तीच्या वेळची अधिकाराची झूल अंगावरून बाजूला करत नाहीत. त्यांना असं वाटतं की तो अधिकार, त्यांना झेलणारे त्यांचे सहकारी मदतनीस, ते खुर्चीच वलय अजून तसंच आहे; किंवा तसेच राहायला हवे! ऑफिसातून “अलविदा” झालेली ही मंडळी मग घरच्यांवर रुबाब गाजवायचा प्रयत्न करतात. पण घरच्यांना यात काहीच स्वारस्य नसतं. घरी जो तो आपल्या व्यापात, व्यवसायात मश्गुल असतो. मग जिथे जातील तिथे हे लोक हा प्रयत्न चालू ठेवतात. अर्थातच पदरी निराशा येते. तुम्ही कुठेतरी अधिकारी होता यामुळे समोरच्या माणसाला काही फरक पडत नसतो आणि त्याला त्याच्याशी काही देणंघेणं नसतं! मग हा निवृत्त अधिकारी वरचेवर आपल्या नोकरीतील त्याच त्याच गोष्टी म्हणजे आपला ऑफिस मधील रुबाब, खालच्या लोकांकडून काम करून घेण्याची हातोटी वगैरे सांगून लोकांना हैराण करत असतो. हळूहळू लोक त्याला टाळायला लागतात. घरच्यांनी तर अगोदरच बाजूला केलेले असते. मग फ्रस्ट्रेशन! निवृत्ती बरोबर आपले अधिकार वलय हे संपुष्टात आलेले आहे हे समजून घेणे गरजेचे असते. ऑफिसच्या बाहेर तो स्वतः, शिपाई आणि क्लार्क एकाच पातळीवर आहेत हे समजून घेणे गरजेचे असते. तिघांचे स्टेटस एकच “निवृत्त” एवढेच असते! हे न समजून घेतल्यामुळे आणि इतर काही छंद आवड नसल्याने होणारी चिडचिड, त्रागा, लोकांच्यात न मिसळू शकणे, एकटेपण आणि त्यातून येणारे आजार, औषधे सगळं टाळण्यासाठी माणसाला छंद जोपासण्याची गरज आहे. लहानपणीपासून एखादा छंद असेल तर छानच. पण नसेल तर निवृत्तीनंतर आपल्या आयुष्यातील करायच्या राहिलेल्या गोष्टी शोधून त्या करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये संगीत, एखादे वाद्य वाजवणे, गाणं म्हणण्याचा प्रयत्न, खेळ, प्रवास, वाचन, लेखन, मित्र जमवणे आणि मैत्री जोपासणे. जे काही आयुष्यात आपल्याला करावसं वाटत होतं पण जमलं नाही ते करण्यासाठी हा निवृत्तीचा काळ तुम्हाला दिलेला आहे हे जर समजून घेतलं तर निवृत्ती खूप आनंदाची होते!

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार नैराश्य हा एक सर्वसामान्य मानसिक आजार आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ३.८% लोक संख्या नैराश्याने ग्रासलेली आहे. प्रौढ व्यक्तींपैकी पाच टक्के प्रौढ व्यक्तीनाही नैराश्याने ग्रासलेले आहे. तर ज्येष्ठांमध्ये नैराश्याचे प्रमाण ५.७ टक्के आहे. स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण जास्त दिसून येते. भारतात एकूण लोकसंख्येच्या ६.५ टक्के लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत.

नैराश्य म्हणजे नकारात्मकता. ही नकारात्मकता जीवनाविषयी घृणा निर्माण करते. जीवनाप्रती आसक्ती नष्ट करते. आपल्या कुटुंबातून मिळणारे प्रेम हे आपल्याला बाह्य जगातील प्रश्नांना तोंड देताना शक्ती देत असते. पण हे कळायला हवे. कुटुंबात तणाव असतील तर हे शक्य होत नाही. आई-वडिलांच्या सततच्या भांडणांमुळे घरातील मुल नैराश्याला बळी पडते. त्याच्या शिक्षणावर परिणाम होतो. जोडीदारांच्याही व्यावसायिक जीवनावर या तणावाचा परिणाम होतो.

हल्ली लग्न वेळेवर होत नाहीत. बर प्रेम विवाह असेल तर थोडे ठीक आहे. ते ही थोडेच बरं का! प्रेम विवाह किंवा अरेंज मॅरेज काहीही असो तडजोड करण्याची नवरा बायको दोघांचीही तयारी नसते. दोघेही उच्चशिक्षित, उत्तम पगार असणारे, उत्तम अधिकार असणारे! मग संसारात माघार कोणी घ्यायची? नमते कोणी घ्यायचे? असे इगोचे प्रश्न. अशातून मूल झालं तर त्याची फरपट! भांडणे नित्याचीच! सरते शेवटी घटस्फोट!

मुल नैराश्याला बळी पडण्याचं आणखी एक कारण म्हणजे स्पर्धा! माझ्या मुलाने अभ्यासात सर्वोत्तम असले पाहिजे. त्याने छंद जोपासला पाहिजे. तो खेळात उत्तम पाहिजे. त्याला संगीत कळलं पाहिजे. डिबेटमध्ये त्याचा नंबर आला पाहिजे. नाटकातून त्याने भाग घेतला पाहिजे. ही हाऊस पालकांना जास्त असते. दूरदर्शनवर होणारे लहान मुलांच्या स्पर्धेचे कार्यक्रम यासाठी त्यांना उद्युक्त करत असतात. मग आपल्या मुलाने त्यात भाग घेतला पाहिजे त्यातही “तो” सर्वोत्तम असला पाहिजे. स्पर्धा! स्पर्धा!! आणि स्पर्धा!!! प्रत्येक मुलाची बौद्धिक पातळी, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक अवस्था, सभोवतालचे वातावरण, घरची परिस्थिती वेगवेगळी असते. आवडीचे विषय वेगळे असतात. पण केवळ पालकांच्या हट्टा पायी मुलांना या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या करताना त्यांची कुत्तरओढ होते! हजारो मुले अशा स्पर्धेतून भाग घेतात. त्यातील १०-२० मुलांचेच फायनल सेलेक्शन होते. यातील पहिला येणारा एकच असतो! मग कल्पना करा की निराश, नाराज होणाऱ्या मुलांची संख्या किती असेल? बरं सगळीच मुले यातून सहज बाहेर पडत नाहीत. काहींना न्यूनगंड पछाडतो! खरंतर “अपयश ही यशाची पहिली पायरी”! पण इथे तर त्यादृष्टीने विचारच होताना दिसत नाही! ही स्पर्धा भयंकर आहे! तुलना करणारे जग आपल्याला वाकुल्या दाखवते. त्यामुळे लहान मुले अजाण वयात नैराश्याला बळी पडतात. स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती अर्थात “न्यूनगंड” व्यक्तीचे जीवन निरर्थक बनवतो. त्यामुळे ज्या गोष्टी आपण सहज करू शकतो त्या सुद्धा कठीण वाटायला लागतात!

आपण एखाद्याकडून फार अपेक्षा धरून बसतो आणि त्याची पूर्तता न झाल्यास दुःखी होतो. प्रेमातील अपेक्षाभंग हे आजच्या तरुण पिढीतील व्यसनाधीनता आणि नैराश्य यांचे प्रमुख कारण आहे. एकतर्फी प्रेम हे देखील नैराश्याला आणि अपेक्षा भंगाला जबाबदार असते! ज्या मुलीला माहितीच नाही की “क्ष” मुलगा तिच्यावर प्रेम करतो आहे, अशी मुलगी त्याला, त्याच्या प्रेमाला कसा प्रतिसाद देईल? यातून मग गुन्हे घडतात. प्रेम ओरबाडून घेण्याचा प्रयत्न होतो.

प्रिय व्यक्तीच्या मृत्यूने आलेले नैराश्य. हे कोणत्याही वयात येऊ शकते. पण वृद्धापकाळात याचे प्रमाण जास्त असते. जोडीदारांपैकी कोणाला तरी एकाला हे जग अगोदर सोडून जावे लागते. हा तर निसर्ग नियम आहे. मग मागे राहिलेल्याला एकटेपण असह्य होते. आयुष्याची ३०, ४०, ५० किंवा अधिक वर्षे एकत्र राहिलेले हे जोडीदार एकटे राहिल्यानंतर निराशेच्या गर्तेत सापडतात. त्यांना जगणे असह्य होते.

नैराश्यामुळे कामांमध्ये लक्ष लागत नाही. नाते टिकवण्याची चिंता. भविष्याची चिंता. झालेल्या चुकांमधील अपराधाची भावना. मनासारखे काही घडत नाही मग चिडचिड राग. झोप येत नाही. त्याचा शरीरावर दुष्परिणाम. सहा ते आठ तास झोप गरजेची आहे. कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. काही करण्याचा उत्साह राहत नाही. जीवनाविषयी निरर्थकतेची भावना. एकटेपणाची भावना. कामात लक्ष न लागणे. लक्षात न राहणे. निर्णय क्षमता कमी होणे. विनाकारण रडू येणे. शारीरिक व्याधीचे मूळ न गवसल्याने येणारी अस्वस्थता. नैराश्याला कारणीभूत ठरणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत.

जीवनशैलीत बदल करून नैराश्य दूर करता येते. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते! शरीर आणि मनाचा खूप घनिष्ट संबंध आहे. शारीरिक क्रिया मनावर परिणाम करतात. तर मानसिक क्रिया शरीरावर परिणाम करतात. सूर्योदयापूर्वी अर्धा पाऊण तास अगोदर उठावे. प्रातर्विधी आटोपून व्यायाम, योगासने, प्राणायाम, चालणे यापैकी काही करावे. कोवळ्या उन्हामुळे शरीरात ‘ड’ जीवनसत्व तयार होते. वृक्षांच्या सानिध्यात मुबलक ऑक्सिजन मिळतो. मन आनंदी राहते.

वाचनामुळे ज्ञानवर्धन, मनोरंजन, समस्यांचे समाधान होते. मनाला उभारी मिळते. वाचनामुळे जगाचा, समस्यांचा विसर पडतो. महान लोकांची चरित्रे वाचून त्यांनी समस्यांचा सामना कसा केला यातून मार्गदर्शन मिळते. समस्या सगळ्यांनाच असतात, जे समस्यांचा सामना करतात ते महान ठरतात! हे त्यातून मनावर बिंबवले जाते.

वयाला हरवायचे असेल तर छंद जिवंत ठेवले पाहिजेत. गायन, नृत्य, चित्रकला, वाचन, लेखन, खेळ, एखादे वाद्य वाजवणे, प्रवास आणि इतर अनेक छंद माणसाला नैराश्याच्या नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यात मदत करतात. प्रवासात माणसाच्या डोक्यात नवे विचार मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. सहलीत येणारे सुखद अनुभव आपल्याला नव्याने सुरुवात करण्यासाठी ऊर्जा देतात. प्रवासात नवीन मित्र मिळतात. नवीन नाती तयार होतात. सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला ही श्रेष्ठ कला आहे!

तुमच्या वयापेक्षा तुम्ही किती मित्र जोडले हे महत्त्वाचे. असे म्हणतात की ज्याला एकही मित्र नाही तो मानव नाही! जगात रक्ताच्या नात्यानंतर सगळ्यात जिव्हाळ्याचं नातं म्हणजे मैत्री. मन मोकळे करण्याची हक्काची जागा म्हणजे मैत्री. मित्रांशी सुखदुःखाचा नित्यसंवाद साधत रहा. एकमेकांसाठी जुने होऊनही जिथे बोलायची ओढ जराही कमी होत नाही, हे त्या नात्याचे यश असते!

औषधोपचार, मानसोपचार हे ही नैराश्यातून बाहेर येण्यासाठी उपयुक्त ठरतात. ते ही संबंधितांनी न लाजता करून घ्यावेत. आपण मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली म्हणजे आपल्याला “वेड” लागले आहे अशी टोकाची भूमिका घेऊ नये!

कुठला ना कुठला छंद हे दु:खावरचे फार गुणकारी औषध आहे हे मात्र विसरता कामा नये!
————————————*————
जयंत शंकर कुलकर्णी
दूरभाष : ९४२३५३४१५६
मधुकोष, सिंहगड रोड, धायरी फाटा,
पुणे – ४११०४१
————————————————#

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}