सुख उभे माझिया दारी …… ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सुख उभे माझिया दारी★★
बिल्डिंगच्या बाहेर स्कुटर काढताना शचीला दारात एक मेटाडोर दिसली. साधारण तिच्याच वयाचा एक उंच,स्मार्ट मुलगा उभा होता.
“ए हॅलो! माझी काही मदत हवी असेल तर..” शचीने त्या मुलाला विचारलं.
देवराजने वळून बघितलं. हेल्मेट घातलेली,स्कुटीवर बसलेली एक मुलगी त्याला विचारत होती. हेल्मेटमुळे चेहरा अस्पष्ट दिसला.
“नो थँक्स अ लॉट.” देवराजने सामान उतरवायला सुरवात केली.
“कितवा मजला?”
“पाचवा मजला.” देवराजने परत वळून सांगितलं.
“ओह! म्हणजे आमच्याच शेजारी. एका मजल्यावर चार फ्लॅट्स आहेत आणि आमच्या बाजूचाच भाड्याने द्यायचा होता. मी हे बारीक-सारीक सामान न्यायला मदत करू का?”
“नको, ती माणसं नेतील सगळं.”
“अहो,क्रोकरी असेल तर फुटू शकते.”
देवराज आता वैतागला. काय करावं ह्या मुलीचं. हिची बडबड संपतच नाही. “मॅम, मी करतो मॅनेज. तुम्ही बाहेर निघाला ना? तुमचा वेळ जाईल.”
“ए हॅलो,ते मॅम वगैरे नको हं! शची पेंडसे नाव आहे माझं! शची कोण होती,माहिती आहे ना? स्वर्गाचा राजा इंद्र,त्याची बायको शची! आणि मला भरपूर वेळ आहे हो! मी मैत्रीणीकडे गप्पा मारायला निघाले होते. तुमचं नाव?”
देवराज दोन मिनिटं शांत राहिला. इंद्राची बायको शची,असं ही आत्ताच म्हणाली आणि माझं नाव देवराज म्हणजे इंद्रच! काही क्षणाने तो बोलला,”माझं नाव राज प्रसाद नाईक. अजून काही माहिती हवी आहे?”
“छे हो! ती तुम्ही शेजारी आला की मिळेलच. आणि संध्याकाळच्या खाण्याची काळजी करू नका. मी डबा घेऊन येते. बाय.” शचीने स्टार्टर ऑन केलं आणि झरकन स्कुटर घेऊन गेली सुद्धा!
देवराज अवाक् होऊन बघत राहिला. काय मुलगी आहे! ओळख ना पाळख! तोंडाची टकळी थांबतच नव्हती. त्याने एक एक सामान मजुरांना लिफ्टने वर न्यायला सांगितलं.
संध्याकाळी बेल वाजली म्हणून देवराजने दार उघडलं. “हाय! मी शची,आपण सकाळी भेटलो होतो. तुम्हाला माझा चेहरा दिसला नसेल पण मी तुम्हाला बघितलं होतं.” शची आत आली आणि तिने टिफिन टेबलवर ठेवला. देवराजने तिच्याकडे बघितलं. निरागस सौंदर्य त्याच्यापुढे उभं होतं. गोरा, नितळ रंग, थोडंस अपरं नाक आणि गुलाबी ओठांवरचं गोड हसू!
“ए हॅलो! डब्यात पोळी-भाजी, मसालेभात आणि कैरीचं लोणचं दिलं आहे. व्यवस्थित जेवण करा. मसालेभात मी केलाय हं! कसा झाला ते उद्या सांगा.”
“तुम्ही कशाला तसदी घेतली? मी बाहेरून मागवलं असतं.” देवराज संकोचून म्हणाला.
“आमच्या घरी पद्धत आहे. नवीन भाडेकरू कोणी आले की त्या दिवशी डबा नेऊन द्यायचा. मी निघते. उद्या डबा घ्यायला येते. रिकामा!” शची खळखळून हसत म्हणाली आणि निघाली.
देवराजला गम्मत वाटली. ह्या मुलीला बोलायला आणि हसायला काही कारणच लागत नाही असं दिसतंय.
दुसऱ्या दिवशी देवराज डबा परत द्यायला निघणार,इतक्यात त्याला आठवलं की आई कुणाचाही डबा देताना कधीच रिकामा देत नाही,त्यात साखर तरी घालतेच. त्याने डब्यात साखर घातली आणि तो नेऊन द्यायला निघाला. बाकीच्या तीन फ्लॅटपैकी जिथे पेंडसे नाव दिसलं ती बेल त्याने वाजवली. साधारण पन्नाशीच्या आसपास असणाऱ्या एका स्त्रीने दार उघडलं.
“नमस्कार, मी राज नाईक. शेजारी राहायला आलो आहे. तुमचा डबा.” त्याने डबा पुढे केला.
“या आत या. शचीने मला तुमचं नावं सांगितलं. आवडली का भाजी,मसालेभात?”
“हो,फारच चविष्ट. पण तुम्ही उगाच त्रास घेतला.”
“त्रास कसला हो त्यात! आमच्या शचीचं ऐकावं लागतं. तिनेच हे ठरवलं आहे.”
“हो,काल त्या मला सांगत होत्या.”
“ए हॅलो! त्या वगैरे नको म्हणू हं! मला एकेरी हाक मारणार असशील तरच आपली मैत्री होईल.” शची खोलीतून बाहेर येत म्हणाली.
पांढराशुभ्र शर्ट,नेव्ही ब्लु जीन्स,एक छोटासा पोनी आणि मध्यम बांधा आणि तेच गोड हसू! देवराज शचीकडे बघत असताना ती जोरात हसली.
“ए हॅलो! असं काय बघतोस? काही ऍबनॉर्मल आहे का माझ्यात?”
देवराज एकदम कावराबावरा झाला. त्याची नजर खाली गेली. तो जायला निघाला इतक्यात शची म्हणाली,”चहा घेऊनच जा. बाय द वे, ही माझी आई, शरयू पेंडसे आणि माझ्या बाबांचे नाव श्रीधर पेंडसे. बाबा ऑफिसमधून आले की तुला भेटतीलच. मी चहा करून आणते.”
**
दुसऱ्या दिवशी देवराज ऑफिसमधून घरी आल्यावर, त्याला लिफ्टमध्ये एक व्यक्ती दिसली. देवराजने लिफ्टचे पाच नंबरचे बटन ऑन केले.
“तुम्हीच राज का?”
“हो,आपण?”
“मी शचीचा बाबा, श्रीधर पेंडसे. चला आमच्या घरी. मस्त चहा आणि गप्पांची मैफल करू.”
“काका नको,परत कधीतरी येईन.” “हे परत कधीतरी कधीच येत नसतं. चला,मस्त गरमागरम समोसे आणले आहेत. चहाबरोबर खाऊ.”
देवराजला जबरदस्तीने श्रीधरने घरी नेलं. “शरू,राज आला आहे. फक्कड चहा कर आणि त्याबरोबर हे समोसे!”
“आता दोन तास बघायला नको. श्रीधर,पण राजला बोलायला आवडतं का? तू आणि शची म्हणजे,समोरच्या माणसाला इच्छा नसेल तरी बोलायला लावता.”
“नाही काकू,तसं काही नाही.” देवराज हसत म्हणाला.
“राज,तुझ्या घरी कोण कोण असतं?” श्रीधरने विचारलं.
“मी आणि आई! आता आई एकटीच सोलापूरला असते. शाळेत मराठीची शिक्षिका आहे बाबा मी पाच वर्षांचा असताना अल्पशा आजाराने गेले. आईने माझ्यावर उत्तम संस्कार केले. बाबांची उणीव कधी भासू दिली नाही. तिचीही नोकरी असल्यामुळे ती इथे माझ्याबरोबर पुण्यात राहू शकत नाही. एक वर्ष मी बंगलोरला होतो. आता पुण्यात जॉब मिळाला आहे.”
“गुड, आमच्या घरी केव्हाही निःसंकोचपणे येत जा. आपलंच घर समज. शचीची ओळख झालीच असेल न?”
“ओळख? तिची बडबड ऐकून तो कंटाळला असेल.” शरयू चहाचे कप टेबलवर ठेवत म्हणाली.
“गेली कुठेय आत्ता?”
“मैत्रिणीच्या लग्नाचे संगीत. शची हवीच न सगळीकडे. तिचा उत्साह दांडगा असतो.”
“माझी मुलगी आहेच तशी. आनंद घेणारी आणि आनंद देणारी.”
देवराजने श्रीधरकडे बघितलं. मुलीचा अभिमान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.
देवराज फारसा बोलका नसला तरी शचीसमोर त्याला बोलावंच लागायचं. ती रोज संध्याकाळी देवराजशी गप्पा मारायला यायची. तिचं सतत येणं, तिचं भरभरून बोलणं,तिचं खळखळून हसणं, देवराजला हवंहवंसं वाटायला लागलं. त्याला शची आवडायला लागली होती. थोडा शचीच्या मनाचा अंदाज आला की तो तिच्याजवळ मन मोकळं करणार होता. नेहमीसारखी शची गप्पा मारायला आली. “ए हॅलो! राज…”
“एक मिनिट शची! प्रत्येक वाक्याच्या आधी ‘ए हॅलो’ म्हणायलाच हवं का?”
“अरे वो मेरी स्टाईल है! ती माझी ओळख आहे.” तिचं ते जीवघेणं हसणं आणि ते अपरं नाक बघून देवराज परत भाळला.
“राज,माझ्यासाठी आई-बाबा वरसंशोधन करताहेत.”
“म्हणजे तू अजून सिंगल आहेस?”
“ए हॅलो! तुला काय म्हणायचं आहे? मी अगदीच सिंगल आहे.”
“कसा हवा तुला नवरा?”
“मला श्रीमंत नवरा हवा आहे.मस्त मोठा फ्लॅट,दारात पॉश गाडी,भरपूर बँक बॅलन्स असलेला.”
“थोडक्यात तुला श्रीमंत पतीची राणी व्हायचं आहे. मग तो मुलगा कसाही असू दे!”
“ए हॅलो! चांगला मुलगा आणि त्याबरोबर हे पण सगळं मला हवं आहे.”
“तुझ्या मनासारखं होऊ दे!”
“राज, माझ्या लग्नात तू सतत मला माझ्याबरोबर हवास.”
“कशाला? पु लं चा नारायण करणार आहेस का तू मला?”
“जोक्स अपार्ट राज! तुझ्याइतका सच्चा मित्र माझा कुणीच नाहीय.”
शची आपल्याला फक्त मित्र मानते हे देवराजला कळलं आणि त्याची प्रीत अबोलच राहिली.
वधुवर सूचक मंडळातून शचीचे लग्न ठरले. मुलगा मुंबईचा होता. अगदी शचीला हवा तसाच! देवराजने लग्नात एखाद्या घरच्या व्यक्तीसारखी जबाबदारी घेतली. श्रीधर आणि शरयू तर त्याला मुलगाच मानायला लागले. लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. श्रीधरने सगळी हौस केली. मुंबईला निघताना शची देवराजजवळ आली.
रडत रडत त्याला म्हणाली, “आईबाबांकडे लक्ष ठेवशील. त्यांना तुझा आधार वाटतो.”
“ए हॅलो! आधी डोळे पूस. तू तुझ्या राजाला सुखी कर. आईबाबांची काळजी करू नको.मी आहे.”
राजचे ‘ए हॅलो’ ऐकून शची रडतानाच खुदकन हसली.
शचीचे लग्न होऊन महिना होऊन गेला होता. एक दिवस देवराज ऑफिसमधून आल्यावर श्रीधरकडे गप्पा करायला आला. दार शचीनेच उघडलं. तिला बघून देवराजला आश्चर्यच वाटलं. “काय ग गधडे, कधी आलीस? काही सांगितलं पण नाही येणार आहेस ते!”
“प्रत्येक गोष्ट तुला सांगायलाच हवी का?” इतकं बोलून शची आत निघून गेली.
ही अशी शची देवराज पहिल्यांदाच बघत होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं, चेहरा काळवंडून गेलेला.
“राज,अरे बस. शची आली आहे.”
” तिनेच तर दार उघडलं. काय झालं काका? एनी प्रॉब्लेम? शची अशी का दिसतेय?”
“काही बोलत नाहीय रे. आल्यापासून गप्पच आहे. जास्त विचारलं तर चिडते.”
“ओह! थोडा वेळ जाऊ दे. सांगेल ती.”
दुसऱ्याच दिवशी देवराजला शची परत मुंबईला गेल्याचं कळलं. त्याने मग फार खोदून विचारलं नाही,पण महिन्याभराने शची परत आली आणि ती देखील कायमची,सासर सोडून!
ह्या नाजूक प्रकरणात आपण फार विचारणं, देवराजला योग्य वाटलं नाही. पण एक दिवस रात्री अकरा वाजता तो झोपायच्या तयारीत असताना बेल वाजली. दार उघडलं तर श्रीधरकाका समोर! देवराजने त्यांना आत घेतलं आणि दार लावलं. दार लावल्याबरोबर श्रीधर रडायला लागले.
“राज, माझ्या मुलीची फसवणूक झाली आहे रे.”
” काका,मला समजेल असं सांगा प्लिज. काय झालं?”
“राज,शचीचा नवरा तिला वैवाहिक सुख द्यायला असमर्थ आहे.”
देवराज ते ऐकून चरकला. श्रीधरचे सांत्वन कसे करावे त्याला कळेना. तो फक्त त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिला. हे फारच धक्कादायक आणि अनपेक्षित होतं.
शचीने घराबाहेर पडणं बंद केलं होतं. अशा परिस्थितीत देवराजचं त्यांच्याकडे जाणं कमी झालं. गप्पा बंद झाल्या. घटस्फोटाची सगळी प्रक्रिया पार पडेपर्यंत जवळपास वर्ष गेलं. देवराज आणि श्रीधर, दोघेही बाहेर भेटत आणि बोलत. श्रीधरला हा धक्का पचवणं जड जात होतं.
“राज, माझ्या मुलीच्या संसाराचा ‘आरंभ’ होताहोता शेवटच झाला.”
देवराजने मनाशी काहीतरी ठरवलं आणि तो श्रीधरला म्हणाला, “काका,शचीच्या संसाराचा परत सुखारंभ होऊ शकतो.”
“अरे,तुला म्हणायचं तरी काय आहे?”
“मला शचीशी लग्न करायचं आहे.”
“वेडा आहेस का? तुझ्यासारखा इतका सालस,उपवर मुलगा आणि शचीसारख्या घटस्फोटितेशी लग्न?”
“काका,तुमचा होकार की नकार ते फक्त मला सांगा.”
“अरे,तुझ्या आईचा विचार केलास का? त्या माऊलीची काय चूक?”
“आईचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी जे काही करेन ते योग्यच असेल ही तिला खात्री असते.”
“राज,मला शचीशी बोलावं लागेल.”
“अर्थात काका,तिची इच्छा असेल तरच!”
दुसऱ्या दिवशी देवराज ऑफिसमधून आला, त्याने दार उघडलं आणि बंद करणार इतक्यात शची आत आली. तिने दार लावून घेतलं.
“का करतो आहेस माझ्यावर उपकार? मी तुझी एक चांगली मैत्रीण म्हणून? का शेजारधर्म? माझ्या आयुष्याचे यापुढे काय करायचे ते मी ठरवेन. तुझ्या उपकारांची मला गरज नाही.”
इतकं बोलून ती जायला वळली.
“शची थांब! झालं तुझं बोलून? आता मी काय सांगतो ते ऐक. तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा एक गोड,निरागस, बडबडी मुलगी एवढीच ओळख माझ्या मनात होती. पण तुझ्या सहवासात आलो. तुझं निर्मळ मन,माणसं जोडण्याची वृत्ती, दुसऱ्यांना मदत करण्याची तयारी,हे सगळं जवळून बघितलं आणि तू आवडायला लागलीस. तुझ्यात मी माझी प्रेयसी बघायला लागलो. पण आयुष्याच्या जोडीदाराच्या तुझ्या अपेक्षा ऐकून मी माझ्या भावना मनातच ठेवल्या. माझं प्रेम मी व्यक्त केलं नाही. मी तुझ्यावर कुठलेही उपकार करत नाहीय. फक्त तुला साद घालतोय. मला साद द्यायची की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे.”
शचीचे डोळे भरून वाहायला
लागले. ती तशीच मागे वळली आणि देवराजच्या कुशीत शिरून रडायला लागली.
“ही तुझी साद समजू का?” देवराजने विचारलं.
शचीने रडत रडत मानेने होकार दिला.
“ए हॅलो! इंद्राची बायको शची!”
शचीने प्रश्नार्थक नजरेने देवराजकडे बघितलं. “माझं नाव देवराज आहे.”
“काय?” शचीने आश्चर्याने विचारलं.
“हो, आता देवराज आणि शचीच्या संसाराचा गोड आरंभ होणार आहे.”
देवराजने शचीला जवळ घेतलं. त्याची प्रिया त्याच्या बाहुपाशात होती….
××समाप्त××
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे