वारी (कथा) ………. रामदास केदार
वारी (कथा)
रामदास केदार
9850367185
सुगीचे दिवस… शिवार सगळा पिकाने टरारुन आलेला… पाखरांची कणसांवरची दाणे टिपायला झुंबड उडालेली. गावतल्या बंडूला चक्कार जायदाद असल्याने पाखरं कितीही खाल्ली तरी काही कमी पडणार नाही.बंडू ला गावातील सगळी मंडळी सावकार… सावकार म्हणायची. गोठ्यात शेणं काढायला धुरपा तर शेतात काम करायला वेशीबाहेरचा गणपा होता. बंडूला गाव राजकारण करायला आवडायचं. एखाद्या घोट घेत चावडीत गप्पा मारत बसायचा. चावडीसमोरुन ये जा करणा-या बाया पोरीकडं बारीक डोळा करीत तिरप्या नजरेनी बघायचा. कधी कधी द्विअर्थी शब्द बोलत खदखदा हसायचा. असाच बसला असताना गणपा समोर आला.
‘ काय रं गणपा, गावात काय चाललंय?
‘काय नाय सावकार ‘.गणपा पुटपुटला.
गणपा
‘बोला सावकार’
‘तुला तर गावची खबर असतीया ‘
‘व्हय पाटील ‘
‘अरं मग सांग की, भितूस कशाला? ‘
‘ सावकार, गाव सगळा गेला कामावर , सुगीचं दिस हाय ‘
‘अर मग बग एखादी कोंबडी ‘
‘सरावन मयना हाय की सावकार ‘
‘ कोंबडी नाय कळाली तुला?इकडं ये कानात सांगतो.
बाबो…. सावकार किती अवघड काम हाय हे?
‘कायपण अवघड नाही गणपा’
दोघे गप्पा मारत मारत बंडू सोबत गणपा हातात ग्लास घेऊन तोंडाला लावतो. दारुच्या नशेत दोघेही स्वर्गातल्या इंद्रदेवासारख्या गप्पा मारु लागतात. दोघालाही दारु चढू लागली. बंडू अंग झुलवत गणपाला बोलू लागतो.
‘गणपा काम फत्ते झालं पाहिजे ‘
‘एकदम फत्तेच होणार सावकार, पर भीतीबी वाटतीया.’
‘ तुला घर पाहिजे का नाही? ‘
‘पाहिजे सावकार’
‘मग कर की एवढं काम ‘
‘कसली भीती’
‘परकण उघडं पडलं तर’?
‘म्या हाय की रं, गावचा सावकार कशाला म्हणत्यात मला ‘
गणपाला काही सुचना गेलं. सावकार आता दारु सोबत एखादी पारु बी मागतोय.नाही म्हणाव तरी त्रास. अन् हो म्हणलं तरी त्रास. गणपा विचारात पडला. ही पाटलं, सावकारं असाच गरिबाचा फायदा उचलतात हे कळू लागलं. बंडून गावात सगळ्यांना धान्य, पैसा देऊन गाव दबावाखाली ठेवलं होतं. बंडूच्या विरोधात आवाज उठवणं खूपच अवघड.
‘काय रं गणपा, कसला विचार करत बसलास’?
‘सावकार एक आईडीया हाय ‘
‘कसली ‘?
‘उद्या मालकीन वारीला निघाल्याय’
‘हो’
‘मग धुरपतालाही पाठवा की सोबत ‘
‘तीचा काय संबध’?
‘ती सोबत गेली की आपला मार्ग मोकळा’
‘असं कोड्यात नको बोलू गणपा’
हे बघा बंडू सावकार, धुरपता मालकीनबरा वारीला गेली की तीची पोरगी तुमच्या तावडीत मग काय…… दोघेही गप्पा नशेत मारु लागतात. चलतो म्हणत तेथून गणपा उठतो.
‘तेवढं काम झालं पाहिजे गणपा’
मान हालवत गणपा चावडीबाहेर पडतो.
दुसरा दिवस उजाडतो .वारीला निघायची लगभग सुरू होते. आपल्या सोबत आपला मालक यावा असं वाटतं पण आपल्या मालकीनाला वारीला येण्यास बंडू नकार देत असतो. इकडे गणपा धुरपताच्या घरी जातो.
धुरपता ?
कोण?
मी गणपा.
कसं काय येणं केलं की?
देवानं दिलं धाडून म्हणा.
आमच्याईकी कुठं देव लपला की?
‘सावकारानं पाठवलय’
हं, मग ते आमच्यासाठी देवचं हाय.’
सावकार देव हाय का काय हाय आता हिला कसं कळणार? असा प्रश्न गणपाच्या डोक्यात घोळू लागला.
‘गणपा सांग की’
‘सावकार म्हणत्यात मालकीन सोबत वारील धुरपताला पाठवावं म्हणून’
‘अगं बय्या, सावकार खराच देव माणूस हाय.पैशाच काय कराव? ‘
‘तेबी सावकार देणा-यात’
‘बरं झालं गणपा, जानकीचे दोन हाताचे चार हात होऊदे म्हणून नवस करीन म्या देवाकडे,’
‘हं तूला काय नवस बोलायचा ते बोलं.जानकीला उद्या कापूस वेचायला पाठवं.उद्या लय बायामाणसं येणार हायतं मालकाच्या शेतात. आता दिवाळी जवळ आली. चार दोन रुपये लागतीलचं की.?’बोलत बोलत गणपा घरी येतो. धुरपताला वारीला जायचा आनंद गगनात मावेनासा झाला. जानकीलाही आपली माय कधी नव्हे तर वारीला जात आहे. तिला आनंद झाला. जानकीला कापूस वेचायला जाण्यास सांगीतलं. जानकीने आईच्या आनंदापुढे नकार दिला नाही.
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे धुरपता आणि मालकीन वारीला निघाली. सांभाळून परत या अशी बंडूने आपल्या मालकीनीला आणि धुरपताला हाक मारली. माना हलवीत दोघीही घराबाहेर पडल्या. बंडूला आनंद झाला पण गणपाच्या मनात आपण चुकीचं काहीतरी करत आहे. असं सारखं वाटू लागलं.
जानकी बंडू सावकाराच्या शेताकडे कापूस वेचायला निघाली. जानकी नुकतीच वयात आलेली. मोहक चेहरा, दाळींबी ओठ, टपोरे मनाला भुरळ घालणारी डोळे,हसरा चेहरा, गालावर सहज खळी पडायची, लवचीक हरणीवानी कंबर, कानात बाभळीच्या गोंडस फुलांसारखी डोलणारी फुलं,ठूमकत चालणारी, सावळ्या रंगाची,गच्च् बांधाची नवतरुणी ही जानकी. शेताच्या पांदणं वाटेतून जाताना तीच्या पायातीलं पैजणांचा आवाज हिरव्या रानालाही भूरळ घालणारा. शेताच्या बांधावर आली. बंडू अगोदरच हे पाखरू आपणाला गिवणार म्हणून वाट बघतच बसला होता. बंडू सावकाराचं शेत जंगलात. जिकडे पाहावे तिकडे झाडी. झाडीत पाण्यापाऊसाचा आसरा मिळावा म्हणून खोप उभी केली होती. गणपा जाऊन बसला होता. जानकी आणि गणपाची नजरा नजर झाली.जानकी म्हणाली,
‘अजून बाया नाही आल्या’?
‘येतील आता’ गणपा म्हणाला.
कशाला बसून राहायचं म्हणून जानकी एकटीच कापूस वेचायला लागली. बाया केंव्हा येतील म्हणून गाव वाटेकडे टक लावून बघू लागली. दिवस हळू हळू वर चढू लागला.जानकीला तहान लागली. खोपीत पाहीलं पण घागर रिकामी होती. गणपाने जानकीची केविलवाणी अवस्था पाहून पाणी आनतो म्हणून निघून गेला. जानकी एकटीच कापूस कापूस वेचू लागली. डोक्याएवढा उंच कापासाचे झाड. तीला भीती वाटू लागली. आई वारीला गेली, पोहचली असणार? असाही आनंद चेह-यावर होता.
धुरपता देवाच्या दरबारात पोहचली होती. तीने दोन्ही हात देवापुढे जोडले. माझ्या जानकीला चांगलं घर मिळू दे, तीचे लवकर पिवळे हात होऊदे, अशी प्रार्थना करु लागली.
इतक्यात बैलगाडीचा आवाज जानकीच्या कानावर पडला. गाडी खोपीजवळ आली. जानकीने मान वर करून पाहिलं. पण गाडीतही बाया दिसल्या नाहीत. ती खोपीजवळ आली. बंडू गाडीचे बैलं सोडत होता. जानकी म्हणाली,
‘ बाया कुठपर्यत आल्यात? ‘
‘निघाल्या घरुन’
‘तहान लय लागली, पाणी आनायला गेला तो तिकडेच’
‘येईल येईल जरा सावलीत बस ‘ बंडू म्हणाला. जानकी खोपीजवळ आली. बंडूनं जानकीचं सगळं सौंदर्य डोळ्यात भरुन घेतलं.गणपा परत येनार नव्हता.जानकी वाट पाहून पाहून थकली. आभाळ चारही बाजूंनी काळाकुट्ट भरुन आले. थोड्याच वेळात विजेच्या कडकडाटासह मोठा पाऊस येणार होता. थंडगार वारा सुटला. झाडे हलू लागली. बंडूने खोपीचा रस्ता धरला. पाऊस जोराचा सुरू झाला. बंडूने डाव रचूनच गणपाला घरी पाठवलं होतं. आपण काही केलं तरी गावं काही करु शकत नाही, धुरपता तर लांबचीच गोष्ट हाय, जानकी खोपी जवळ येण्या आगोदरच ओलिचिंब झाली. खोपी समोर उभी राहिली. ओठावरुन पावसांचे थेंब खाली उतरु लागले. कपडे चिंब भिजून गेले. हिरव्या रानात जानकीचे तारुण्य पाहून बंडूने ‘खोपीत ये, अशी भीजू नको’अशी हाक मारली. पाऊस थांबता थांबेना. अंग चोरून घेत भीत भीत खोपीत गेली. आई….गं… आई….ह्यासाठीच तुझी वारी का गं …… सावकार…. नका सावकार…वेदनेसह वीजा कडकडतच राहिल्या.