मनोरंजन
अपुरा त्रिकोण ……………… प्रदीप केळुसकर
अपुरा त्रिकोण
प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९
‘‘आई, उद्या मी बेंगलोर ला निघतो.’’
आई आणि मी डायनिंग टेबलावर जेवायला बसलो असताना मी म्हणालो. आई आश्चर्यचकित झाली. ‘‘अरे काल तर आलास बेंगलोरहून, आठ दिवसांची रजा घेऊन आलास असे म्हणालास?’’ मी गप्प. हळूच म्हणालो, ‘‘कंपनीचे केबल आलीय. परवा जॉबवर यायला कळवले.’’ पण तुझी बँकेची कामे राहिली होती ना? ‘‘ ती उद्या पूरी होतील. उद्या रात्रौच्या प्लेनने निघणार.’’ आई हळूच पुटपुटली, आणि शुक्रवारचे मिताचे लग्न? मला एकदम ठसका बसला. आई म्हणाली, अरे ! हळू हळू. पाणी पी. कुणीतरी आठवण काढली.
आई आणि मी अन्न फक्त चिवडत होतो. दोघांचेही जेवणात लक्ष नव्हते. हसतमुख मिताचा चेहरा डोळ्यासमोर आला. मी हात धुवायला उठलोच. पाठोपाठ आईपण ताटे आवरत उठली. मी म्हणालो, बॅग भरतो उद्याची. दिवसभर खूप कामे आहेत.
मी माझ्या खोलीत आलो. पाठोपाठ आई पदराला हात पुसत आली. ‘‘मिता आलेली परवा. वल्लभला लग्नाचे कळले काय ? हे विचारत होती. तशी ती येत असते नेहमीच आली की, घराची सर्व आवराआवर करुन देते. मुन्नीची खोली स्वच्छ करते. तुझीही खोली ठिकठाक करते. मला स्वयंपाकात मदत करते. आता चालली लग्न करुन.’’ मी गप्प.
वल्लभ, मिताला तुझ्याबद्दल फार वाटायचं रे, मलाही वाटायचं मिता या घरची सून होईल. तशी बातमी तू किंवा मिता द्याल अशी वाट पाहत होते. पण शनिवारी मुन्नीचा फोन आला. ती म्हणाली, मिताचे लग्न ठरले. मिताने तिला पहिला फोन केला. शेवटी गेली दहा वर्षे त्यांची मैत्री. मुन्नी फोनवर म्हणाली, दादाने बहुतेक मिताला लग्नाचे विचारले नाही शेवटी. या दादाच्या मनातले काही कळत नाही. स्पष्ट काही बोलत नाही. माणूसघाना आहे नुसता.’’
मुन्नीला पण वाटत होते, तुझे आणि मिताचे लग्न होईल. तिला पण आश्चर्य वाटले. तुझ्या मनात मिताबद्दल होतं ना वल्लभ? तस मला तर वाटत होतं. मग का नाही विचारलस तिला? आईचे एकापाठोपाठ एक प्रश्न.
मी काहीही न बोलता बॅग भरायला सुरुवात केली. आईला काय उत्तर द्यावे कळेना. माझे चित्त कुठे ठिकाणावर होते? मिताच्या लग्नाची बातमी ऐकली आणि वाटले सार्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. चार वर्षात कंपनीत जीव तोडून मेहनत केली. गेली दोन वर्षे एक्सटर्नल एम.बी.ए. सुरु होतं. ते दोन महिन्यात संपेल की मग मी कंपनीचा असिस्टंट मॅनेजर होईन. आणि मिताला लग्नाचे विचारीन असे मनात मांडे घातलेला मी, मिताच्या लग्नाच्या बातमीने उध्दवस्त झालो. बॅगेत थोडे कपडे, लॅपटॉप टाकून मी बॅग बंद केली. लाईट बंद करुन बेडवर पडलो. डोळे मिटले तरी झोप कुठली यायला. डोळ्यासमोर १६ वर्षाची मिता दिसायला लागली. इंजिनिअरींग पहिल्या वर्षात अॅडमिशन मिळाली तो दिवस. व्हि.जे.टी.आय. सारख्या मुंबईतील प्रख्यात इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सहज अॅडमिशन मिळाली म्हणून आईबाबा खुश. मुंबईत जेमतेम दोन इंजिनीअरिंग कॉलेज. त्यात व्हि.जे.टी.आय. चे नाव मोठे. आमच्या कॉलनीत गेल्या कित्येक वर्षात व्हि.जे.टी.आय. मध्ये अॅडमिशन मिळाले नव्हते. पण यंदा मला अॅडमिशन मिळाली म्हणून कॉलनीतले सर्वजन माझ्याकडे कौतुकाने पाहत होते. सकाळपासून फुले आणि पेढे घेऊन लोक येत होते. आई आणि मी ते आनंदाने स्विकारत होतो. लोकं थोड कमी झाली, आई आणि मी माझी आवडती कडक कॉफी घ्यायला बसलो. एवढ्यात दरवाजावरची बेल वाजली. आई म्हणाली, मुन्नी आली बहुतेक जा दार उघड. मी उठून दार उघडले. बाहेर मुन्नी होती. ‘‘अरे दादा किती वेळ बेल वाजवतेय मी, ऐकायला येत नाही काय?’’ असे नेहमी प्रमाणे बडबडत मुन्नी आत येताना मागे वळून म्हणाली, ‘‘अग, ये ग, आत ये.’’ मी बाहेर पाहिलं. हातात वह्यापुस्तके घेऊन एक मुलगी उभी. मुन्नीच्याच वयाची. निमगोरी, लाजाळू. खाली मान घालून वह्यापुस्तके सावरत होतील. मुन्नीने हात धरुन तिला आत घेतले. आईला ओरडून म्हणाली, ‘‘आई ही बघ मिता, अगं ही शेजारच्या रामनगर मध्ये राहते. गेल्या आठवड्यात माझी ओळख झाली.’’ मुन्नी आणि तिची मैत्रिण माझ्या समोरच बसल्या. आईने कॉफिचे कप त्यांच्या हातात दिले. आई मुन्नीला आज कोण कोण माझे अभिनंदन करुन गेले ते सांगत सुटली. मुन्नी कॉफी घेता घेता आणि कौतुकाने माझ्याकडे पाहत होती. एवढ्यात मुन्नीच्या काहीतरी लक्षात आले. ती तिच्या मैत्रिणीला म्हणाली, मिता, तू काय आणलस दादाला? मिताने हळूच पर्समधून गुलाबकळी काढली आणि माझ्या हातात ठेवली. ‘‘अभिनंदन’’ म्हणाली. हे म्हणताना किती घाबरली होती, हे तिच्या चेहर्यावरुन आणि थरथरणार्या हातावरुन समजत होते. मिताला पहिल्यांदा बोलताना मी पाहिले ते असे. मग मिता मुन्नीबरोबर वारंवार घरी येत राहिली. दोन महिन्यानंतर आलेल्या माझ्या वाढदिवसाला आई, मुन्नी आणि मिता यांनी मोठा बार उडवून दिला. त्या दिवशी रोज आपल्या व्यवसायात अडकलेल्या वडिलांना सक्तीने घरी थांबविले. मी कॉलेजमधून आलो, तर माझी खोली फुलांनी सुशोभित केली होती. माझ्या टेबलावर ‘हॅपी बर्थ-डे’ चे ग्रीटींग चिकटवलेले होते. माझ्या शाळेतील, कॉलेजमधील वेगवेगळे फोटो भिंतीवर चिकटविलेले होते. खोलीत माझ्या प्रिय किशोरी ताईंची कॅसेट मंद आवाजात स्ाुरु होती आणि माझ्या आवडीचा गोड शिरा आणि कडक कॉफी तयार होती. मी आश्चर्यचकित झालो. एवढे वाढदिवस झाले माझे पण अशी वाढदिवसाची तयारी पाहिली नव्हती. मी आईला म्हणालो, अगं केवढं हे कौतुक माझे? एवढ्या वर्षात कधी नाही आणि आज? मुन्नी म्हणाली, अरे दादा – ही सगळी मिताने केलेली तयारी. तिनेच बाबांना घरी थांबायला लावले. आणि तुझ्या खोलीची सर्व तयारीपण तिचीच. तिने लवकर येऊन मला उठवले. आणि हे सर्व तुझे फोटो वगैरे मागून घेतले. नाहीतरी आपल्या घरात कुणाचे वाढदिवस असे साजरे करतो का आपण? आणि बाबा कधी दुकान सोडून वाढदिवसाला थांबतात का? मी मिताकडे पाहिले. ती हळूच हसली आणि मला प्रचंड आवडून गेली. कोजागिरी साजरी करायला जुहू बिचवर मी, मुन्नी आणि मिता गेलेलो तेव्हा मी आणि मिता जास्त जवळ आलो. मी घरी असलो आणि माझ्या खोलीत अभ्यास सुरु असला तर मुन्नी कधीकधी मोठ्याने बोलायची. मग मिता मुन्नीला ओरडायची, मुन्नी! दादांचा इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरु आहे, हळू बोल. मग मुन्नी तिच्यावर चिडायची. माहिती आहे गं, चार महिन्यापूर्वी या घरात यायला लागली आणि दादाच्या अभ्यासाची काळजी करायला लागली. या सर्व गोष्टी मी आणि मिता एकमेकांच्या जवळ यायला कारण होत होत्या. पण माझे मन म्हणत होते – प्रेम, लग्न हे नंतरचे आधी करिअर महत्त्वाचे. नुसते इंजिनिअरिंग नाही, पोस्ट ग्रॅज्युएशनपण करायचे. लहान वयात मोठ्या पदावर पोहोचायचे. त्याकरिता मनावर लगाम हवा. तेव्हा प्रेम वगैरे सर्व काही मनात.
इंजिनिअरिंग पूरे झाले आणि कॅम्पसमधून बेंगलोर मधील कंपनीत माझी निवड झाली. आमच्या घरातून मुंबईबाहेर कोणी राहिले नव्हते. त्यामुळे आईबाबा नर्व्हस झाले. पण माझा बेंगलोरला जायचा निर्णय पक्का होता. एकतर बेंगलोर आय.टी.चे मुख्य केंद्र होत होते. त्यामुळे बेंगलोरमध्ये एक से एक हुशार माणसे जमा झाली होती. दुसरं म्हणजे, बेंगलोरमध्ये पुढील शिक्षणासाठी चांगली सोय होती. आणि अतिशय महत्त्वाचे कारण – मुंबईच्या घामट हवेपेक्षा बेंगलोरची थंड हवा मला मानवणारी होती.
शेवटी बेंगलोरला जायचा दिवस उजाडला. माझी सायंकाळची ६ ची ट्रेन होती. सकाळपासून मिता आमच्याकडेच होती. आईला जेवणात मदत कर, माझी कपडे इस्त्री करुन दे, माझ्या बुटांना पॉलिस कर. मिता नुसती धावत होती. शेवटी दुपारी ४ वाजता मी, आई, मुन्नी आणि मिता टॅक्सी करुन निघालो. बाबा परस्पर सीएसटी स्टेशनवर येणार होते. मी एवढ्या लांब जाणार म्हणून आई फार नर्व्हस झाली होती. टॅक्सीत सर्वजन गप्प गप्प होते. टॅक्सी स्टेशनवर पोहोचली, मिताला माझ्या दोन्ही हॅण्डबॅग खांद्याला लावल्या. मी एक सुटकेस घेतली. मिताने आईला आणि मुन्नीला घ्यायला काहीच सामान ठेवले नाही. गाडी लागलेली होती. माझ्या आधी मिता गाडीत चढली आणि बर्थ नंबर शोधून माझे सामान बर्थवर लावलेसुध्दा. आई म्हणाली, ‘‘मुन्नी ती मिता किती चटपटीत बघ, नाहीतर तू.’’ मुन्नीला पण लटका राग आला. हो, हो, मिता चटपटीत आणि मी आळशी. बसवून ठेव मिताला मांडीवर. सर्वजन खूप हसलो.
गाडी सुटायची वेळ झाली आणि मी सोडून सर्वजन खोली उतरले. मला सर्वजन खिडकीतून हात दाखवत होते. मी पाहिलं, मिता रडवेली झाली होती. पर्समधील छोटा रुमाल हलवत होती परत डोळ्यांना लावत होती. मी मुन्नीला आणि मिताला म्हणालो, आईबाबांना सांभाळा गं. आणि गाडी सुटली. गाडी बरोबर मिता धावत धावत रुमाल दाखवत होती. गाडीचा स्पीड वाढला आणि प्लॅटफॉर्मवर आई, मुन्नी आणि मिता लांब लांब दिसायला लागली.
मी बेंगलोरला आलो. कंपनीने जागा दिली होती. कंपनीत जीव तोडून काम केले. पदोन्नती मिळत होती. मुंबईला सहा महिन्यानंतर जात होतो. दरम्याने मुन्नी आणि मिता ग्रॅज्युएट झाल्या. मुन्नीला संस्कृतमध्ये पी.एच्.डी. करायचे होते म्हणून तिने पूणे युनिव्हरसिटीमध्ये अॅडमिशन घेतले आणि ती पुण्याला गेली. मिता अभ्यासात यथातथाच होती. ग्रॅज्युएशननंतर तिने शिक्षण थांबविले आणि तिच्या आवडत्या कथक नृत्यामध्ये तिने जीव झोकून दिला. मी बेंगलोरमध्ये आणि मुन्नी पुण्याला. बाबा नेहमी प्रमाणे त्यांच्या व्यवसायात. आई घरी एकटी होत होती. पण मिता सकाळ संध्याकाळ घरी येऊन सर्वकाही पाहत होती. आईला घेऊन बाजारात जाणे, डॉक्टरकडे जाणे, बारीकसारीक सर्व गोष्टी मिताच पाहत होती. मिता आईजवळ येऊन जाऊन असते म्हणून मी आणि मुन्नी निर्धास्त होतो. मी मुंबईत आलो कि, मिता तिच्या क्लासची वेळ सोडून आमच्या घरी येत होती. माझ्या आवडीचे पदार्थ घरात शिजत होते. माझ्या खोलीत आवडती पुस्तके, कॅसेट ठेवली जात होती. पण मी मुंबईत जास्त काळ राहू शकत नव्हतो. आत फक्त एक वर्ष. एम.बी.ए. पुरे करावे आणि मिताला लग्नाचे विचारावे. मी तिचा होकार गृहित धरला होताच पण….
काल मी मुंबईत आलो, आणि आईने मिताच्या लग्नाची बातमी सांगितली आणि मी सटपटलो. आईने सांगितलेली हकिकत अशी, तिच्या मावशीने हे स्थळ आणले. मुलगा मावशीचा पुतण्या. गेली चार वर्षे ऑस्ट्रेलियात असतो. इंजिनिअर आणि देखणा. एकुलता एक मुलगा. नकार देण्यास काही कारणच नव्हते म्हणे.
संपूर्ण रात्रभर मिताला पहिल्यांदा पाहिले त्यापासून आतापर्यंतचा काळ चित्रपटासारखा समोर येत होता. या कुशीवरुन त्या कुशीवर होत रात्रभर जागा होतो. आयुष्याची जोडीदार म्हणून मिताशिवाय कुणाचा विचारच केला नव्हता. आता पुढे काय? ओळखीच्या अनेक मुली मिताच्या जागेवर उभ्या करुन पाहिल्या. पण छे. माझं मन समजणारी मिता म्हणजे मिताच. तिची जागा दुसरी कुणीच घेऊ शकत नाही.
पुरी रात्र न झोपता मी अंथरुणातून बाहेर पडलो. चहा घेताना आई माझ्याकडे पाहून म्हणाली, अरे वल्लभ चेहरा असा काय? डोळे किती लाल. रात्रभर झोपला नाहीस की काय? काल मिताच्या लग्नाची बातमी ऐकलीस तेव्हापासून तू बेचैन झालास. अरे गोष्टी वेळच्यावेळी कराव्यात रे. मग पश्चाताप करुन काय उपयोग? चहा घेऊन मी उठलो आणि बाहेर जायची आवराआवर करु लागलो. एवढ्यात बेल वाजली. आईने दरवाजा उघडला. अग मिता, ये ये आत. मुन्नीने बातमी कळविली. पण तू केव्हा सांगणार म्हणून वाट पाहत होते. बस, बस, वल्लभ आलाय काल. आठ दिवसांची रजा घेऊन आलो म्हणाला, पण काल रात्रौ म्हणाला, उद्या रात्रौ म्हणजे आजच्या रात्रीच्या विमानाने निघणार. इथे आल्यानंतर काहीतरी बिनसलं त्याच.’’ मी माझ्या खोलीतून आईचे बोलणे ऐकत होतो. ‘‘तुम्हाला आधी कळविले नाही. मुन्नीच्या आई राग मानू नका, सारे कसे अचानक झाले.’’ मिताचा रडवेला आवाज मला ऐकू आला. ‘‘मावशीने माझ्या आईला तिच्या पुतण्याबद्दल विचारले. तो ऑस्ट्रेलियाहून आलाय आणि लग्न करुनच जाणार म्हणाली, आईबाबा एवढे खूश झाले की मला हो नाही विचारण्याची संधी न देता सर्व काही ठरवून मोकळे. माझा काही निर्णय होत नव्हता तो पर्यंत लग्नाची तारीख, हॉल सर्वकाही ठरवून झाले.’’ आता मिताचे हुंदके मला स्पष्ट ऐकू येत होते. मला काय वाटले कोण जाणे. तिरमिरीत खाड्कन माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. बाहेर पडण्याच्या दरवाजाजवळच आई आणि मिता बोलत होत्या. रडवेली मिता मला पटकन सामोरी आली. तिच्याकडे दुर्लक्ष करुन मी आईला म्हणालो, आई मी बँकेत जातो. मी बाहेर पडणार एवढ्यात आई म्हणाली, अरे वल्लभ, मिता तिच्या लग्नाचे सांगायला आली रे.. मी चटकन मागे आलो आणि जळजळीत नजरेने तिच्याकडे पाहून ‘‘अभिनंदन’’ म्हणालो, आणि धाड्कन दरवाजा लावून बाहेर पडलो. बाहेर आलो. पोर्चमध्ये जाऊन किल्लीने गाडीचा दरवाजा उघडला. आत बसलो. गाडीचा दरवाजा, खिडक्या सर्व बंद केल्या आणि स्टिअरिंगवर डोके ठेवून ओक्साबोक्सी रडू लागलो.
– मिता –
धाड्कन दरवाजा बंद करुन वल्लभ बाहेर चालता झाला. मला माझे अश्रू आवरतच नव्हते. मुन्नीच्या आईने मला जवळ घेतले. योग्य वेळी मन मोकळं करावं गं मिता. एकदा वेळ सटकली की हळहळण्या शिवाय हातात काही राहत नाही. माझं रडू काही आवरत नव्हतं. शेवटी मुन्नीच्या आईला, येते म्हणून सटकले. आता कसला निर्णय घेण्याची क्षमता आहे का माझ्यात? बाबा कालपासून आमंत्रणे द्यायला नातेवाईकांकडे जाऊन आले सुध्दा. मनात असेल तर वल्लभने आणि वल्लभच्या आईने पुढाकार घ्यायला नको?
चार दिवसापूर्वी तिला पाहून गेलेला मावशीचा पुतण्या विनोद आठवला. खरच त्याच्यात काहीच दोष नव्हता. सुशिक्षित, उमदा, देखणा, स्थिरस्थावर सर्व काही उत्तम. पण वल्लभ….
कॉलेजच्या पहिल्या वर्षाला मुन्नीची ओळख झाली आणि तिच्या बडबड्या स्वभावामुळे ती मैत्रिणच झाली. एक दिवस ती फार आनंदात होती. म्हणाली, माझ्या दादाला व्हि.जे.टी.आय.मध्ये अॅडमिशन मिळाली. त्यांच्या एवढ्या मोठ्या कॉलनीत प्रथमच. तिच्या घरी फार आनंद होता म्हणे. मना म्हणाली तू चल आमच्या घरी. मी तिच्या घरी जायला निघाले. तिच्या दादाचे कसे अभिनंदन करावे? असा विचार करताना कॉलेजमधल्या आवारात पिवळ्या गुलाबावर कळी फुलली होती. कोणी पाहत नाही हे पाहून हळूच ती खुंटली आणि पर्समध्ये टाकली. मुन्नीच्या घरी गेलो. तर मुन्नीची आई आणि भाऊ खुर्चीवर बसून कॉफी पित होते. मुन्नीच्या भावाकडे मी पाहत राहिले. अनोळखी तरुण मुलाकडे सतत पाहू नये हे माहित असूनही त्याच्यावरुन नजर बाजूला करु नये असे वाटत होते. विलक्षण आकर्षण होते त्याच्यात. सरळ नाक, गोरा रंग, चेहर्यावर हुशारीची लकाकी आणि हसतमुख. मी पर्स उघडून गुलाबकळी बाहेर काढली आणि हळूच त्याच्या समोर धरली. त्याने माझ्याकडे पाहून स्मित केले आणि गुलाबकळी घेण्यासाठी हात पुढे केला. माझ्या बोटांना त्याच्या बोटांचा ओझरता स्पर्श झाला. त्याच्या बोटांचा स्पर्श होताच, सार शरीर थरारलं. पुरुषांचा स्पर्श घरीदारी होतच असतो. पण शरीरात अशी स्पंदने झाल्याचे कधी जाणवले नाही. मुन्नीच्या दादात काहीतरी विलक्षण जादू होती खरी.
आणि मग मी या घरी कधी मुन्नीसोबत कधी एकटी जातच राहीली. मुन्नीचा दादा नेहमी कॉलेजात किंवा घरी असेल तेव्हा त्याच्या खोलीत बंद दाराआड अभ्यास करत असायचा. मला आता पक्के माहित झाले होते, त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असेल तर तो घरी आहे, आणि त्याच्या खोलीचा दरवाजा उघडा असेल तर समाजव तो घरी नाही. मुन्नी खूपच लाडात वाढलेली. त्यामुळे तिचा घरात आरडाओरड चालायचा. मग मी तिला दटवायचे. दादाचा अभ्यास सुरु आहे ना, आवाज कमी कर. मुन्नीची आई गालातल्या गालात हसायची.
मुन्नीच्या घरचा वातावरण मला आवडायचं. सर्वजन प्रेमळ आणि एकमेकांची थट्टा म्ास्करी करत रहायचे. मुन्नीचे बाबा फक्त रविवारी घरी असायचे. पण घरी असले की, दोन्ही मुलांसमवेत गप्पा, आपल्या धंद्यातल्या गोष्टी, मुलांचा अभ्यास, नातेवाईकांकडे जाणे असा मस्त कार्यक्रम असायचा. मुन्नीची आई म्हणजे मुन्नीची मैत्रिणच. मुन्नी आणि मुन्नीचा दादा आपल्या आईला कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींच्या गंमतीजमती सांगायचे आणि एकदम मोकळं वातावरण ठेवायचे. उलट आमच्या घरी हिटलरशाही. बाबा रागीट आणि हेकेखोर. त्यांच्यापुढे कुणाचे काही चालायचे नाही. आमची आर्थिक स्थिती यथातथाच. बाबा एका केमिकल कंपनीत केमिस्ट म्हणून नोकरी करीत होते. ते एकटेच मिळवणारे आणि आम्ही चारजण खाणारे. माझी आईमात्र कमालीची सोशिक. संसार काटकसरीने करणारी. तिचे सर्वगुण माझ्यात आहेत असे सर्वांचे म्हणणे. पण बाबांसमोर बोलायला मला भिती वाटते. त्यांनी एकदा निर्णय घेतला म्हणजे घेतलाच. आई बिचारी भांडण नको म्हणून पडतं घ्यायची. आमच्या घरच्या या कोंदट वातावरणामुळे मी मुन्नीच्या घरी वारंवार जायला लागले आणि कळायच्या आधी मुन्नीच्या दादाच्या प्रेमात पडले. मुन्नीचा दादा इंजिनिअर झाला आणि बेंगलोरला निघाला पण. माझे काळीज कासावीस झाले. आता तो नेहमी नेहमी दिसणार नाही हे समजत होते. पण मला वाटत होते. तो मला आपल्या प्रेमाबद्दल बोलेल. अगदी ट्रेन सुटेपर्यंत मला आशा वाटत होती. त्याच्या डोळ्यात माझे प्रेम दिसत होते. मग ओठांवर का येत नव्हते?
मुन्नीचा दादा बेंगलोरला गेला आणि काही महिन्यात मुन्नी पुण्याला गेली. मी मुन्नीच्या घरी जातच राहिले. मुन्नीच्या दादाची खबरबात घेत राहिले. मला वाटायचे. मुन्नीची आईतरी मला विचारेल? ती पण गप्प होती. मी मुलगी, आपल्या संस्कृतीत मुली असे उघड उघड प्रेम दाखवतात का? केव्हा केव्हा वाटत असे, मी नोकरी करणारी नाही म्हणून मुन्नीचा दादा माझा विचार करत नाही की काय? हल्ली सर्वांना नोकरीवाली बायको हवी असते. मुन्नीचा दादा आपले प्रेम व्यक्त करील यासाठी जीव आसूसला होता. तीन महिन्यांपूर्वी मुन्नीची आई म्हणाली, अगं वल्लभ कंपनीत असिस्टंट मॅनेजर झाला. आता एक्सटर्नल एम.बी.ए. करतोय. तेव्हा मात्र मी मनात घाबरले. हा असाच शिकत राहणार असेल तर माझे काय?
आमच्या घरी गेली दोन वर्षे माझ्या लग्नाचा विचार सुरु होता. मी गप्पच होते. पण गेल्या आठवड्यात पुण्याच्या मावशीने तिच्या पुतण्याचे म्हणजेच विनोदचे स्थळ आणले. आणि सर्वजन हुरळून गेली. आईवडीलांचे म्हणणे सोन्यासारखा मुलगा आहे. असा नवरा मिळणे म्हणजे मिताचे भाग्य. माझ्या इतर मावश्या, मामा यांचे हेच म्हणणे. मी विनोदला कोणत्या तोंडाने नाही म्हणणार होते. वल्लभ कडून निश्चित काही कळत नव्हते, किंवा वल्लभची आई ठोस काही बोलत नव्हती. माझ ‘मौनम्’ हिच सम्मती समजून आईबाबा तयारीला लागले सुध्दा. मी मुन्नीला फोन करुन माझे लग्न ठरतयं हे कळविले. म्हटलं वल्लभकडून किंवा वल्लभच्या आईवडिलांकडून काही हालचाल होते का हे पहावे. दोन दिवस वाट पाहून काल शेवटी वल्लभच्या घरी गेली. आईना सर्वकसे गडबडीत ठरते हे सांगत होते. आता लग्न करुन पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियाला जावे लागणार हे सांगताना डोळ्यातून पाणी वाहू लागले. एवढ्यात खोलीचा दरवाजा उघडून वल्लभ बाहेर आला. एक क्षणभर त्याची आणि माझी नजरानजर झाली. रात्रभर झोप न झाल्याने ताठरलेल्या डोळ्यांनी त्याने माझ्याकडे पाहिले. माझ्याकडे दुर्लक्ष करुन आईना बँकेत जाऊन येतो असे म्हणून तो निघाला. आईने त्याला हाक मारुन, मिता लग्नाचे सांगायला आली रे वल्लभ असे म्हणाली. आणि बाहेर पडणारा वल्लभ मागे आला. आणि ‘‘ंअभिनंदन’’ असे म्हणून धाड्कन दरवाजा लावून बाहेर पडला.
– आई –
काल मिता आणि विनोद यांचे लग्न झाले. मुन्नी मैत्रिणीच्या लग्नासाठी मुद्दाम पुण्याहून आली. मी मुन्नीच्या बाबांना एक दिवस घरी थांबायला सांगितले. आणि आम्ही तिघेही लग्नाला गेलो. मुन्नी कार्यालयात गेली ती मिताच्या खोलीत तिची लग्नाची तयारी करायला. लग्नात मिताच्या शेजारी विनोदला पाहताना खूप त्रास होत होता. मुन्नीचे बाबापण गप्प गप्प होते. लग्नाच्या मंगलाष्टका सुरु झाल्या आणि मला वाटले या आनंदाप्रसंगी मला आता हुंदका येणार. कसे बसे रडू आवरले. मिता विनोदला भेटायला स्टेजवर गेलो. मला पाहताच मिता गळ्यात पडली. तिच्या डोळ्यातील दोन अश्रू माझ्या खांद्यावर पडले. आम्ही तिला अहेर केला आणि निघालोच. बाहेर पडून गाडी स्टार्ट करता करता हे म्हणाले, मला वाटलं होतं, वल्लभचं मिताशी लग्न होईल. हे असे कसे झाले ? मी म्हटले, वल्लभच्या मनात मिता होतीच. पण तो करियरच्या मागे लागला. मिताला तो गृहित धरुन बसला. आता दुखावलाय. मिताने तरी किती वाट पाहायची. प्रेमात पुरुषाने पुढाकार घ्यायला नको? तो तुमच्यावर गेलाय. मन मोकळ करावं माणसाने. नुसतं शिक्षण, शिक्षण… मिता किती दिवस वाट पाहिल याची?
मुन्नीचे बाबा शांतपणे गाडी चालवत होते, घरी येईपर्यंत कोण कोणाशी बोलले नाही. घरी आल्यावर कपडे बदलले. आणि बेडवर शांतपणे डोळे मिटून पडले. पहिल्यांदा मुन्नीसोबत आलेली १५-१६ वर्षाची मिता ते आज लग्नात शालू घातलेली मिता, मिताची अनेक रुपे डोळ्यासमोर आली. फार काहीतरी गमावलयं अशी हुरहूर मनाला लागून गेली. यात माझ्ो काही चुकले का? या दोन तरुण मुलांची मने ओळखून मी पुढाकार घ्यायला हवा होता का? का नाही मी वल्लभला मिताबद्दल विचारले आणि मिताला वल्लभबद्दल? आता पुढे वल्लभ काय करील? विसरेल का तो मिताला आणि मिता वल्लभला ?
होय, वल्लभ आणि मिताप्रमाणे माझेपण चुकलेच. आता ही हुरहूर आयुष्यभर मन पोखरणार. त्रिकोणाच्या दोन बाजू तयार होत्या तिसरी बाजू त्याला जोडण्याची गरज होती.
मी कुस बदलली आणि उशीत डोकं खूपसून रडू लागले.