*सोनचाफा*
नवीन नवरी कावेरी बाई व रघुनाथराव यांचा संसार सुखाचा चालला होता. दोन हजार चौ. फु. प्लॉट घेऊन कष्टाने त्यांनी तो बंगला बांधला होता.
कावेरीबाई माप ओलांडून आल्या त्यावेळीच रघुनाथरावांनी लोन काढून प्लॉट घेतला होता. कावेरी बाईंनी आधी एक ‘सोनचाफ्याचे’ सुंदरसे रोपटे बंगल्यामध्ये लावले. दोघांनी संसारामध्ये काटकसर करुन, पैशाचा योग्य विनीयोग करुन सुंदरसा दोन बेडरूम चा बंगला बांधला. बंगल्याला नाव पण ‘सोनचाफा’ असे दिले. चाफ्याप्रमाणे दोघांचा संसार सुखाचा चालला होता. त्या संसार वेलीवर दोन छानशी फुले उमलली.
अनिल व सुनील अशी त्यांची नावे ठेवण्यात आली.
घराचे लोन, मुलांची शिक्षणं यामुळे रघुनाथराव चिंतेत असत पण कावेरीबाईं त्यांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करत असत व संसाराचा रथ दोघे मिळून उत्तम रित्या चालवत होते. सोनचाफा आता फुलत चालला होता. सायंकाळी त्याचा सुगंध बंगल्यामध्ये दरवळत असे.
रोज सकाळी एक फुल तोडुन रघुनाथराव ते कावेरीबाईंच्या लांबसडक वेणीमध्ये माळत असत. माळताना कावेरी बाईंचे लाजणे व रघुनाथरावांचे प्रेमाने फुल माळणे हा क्षण एकदा सुनील ने मोबाईल मध्ये टिपला. तो फोटो एवढा छान निघाला की रघुनाथरावांनी त्याची छानशी फ्रेम करुन हॉलमध्ये कौतुकाने लावली होती.
रघुनाथराव व कावेरीबाईंच्या कष्टाचे चीज झाले. दोन्ही मुलांना भरमसाठ पगाराची नोकरी लागली. पण एकच खंत होती ही दोन्ही पाखरं त्यांच्या मायेपासून सातासमुद्रापार गेली. एवढा मोठा बंगला पण त्यामध्ये फक्त रघुनाथराव व कावेरीबाई, दोघांना घर खायला उठायचे पण एकमेकांच्या साथीने, प्रेमाने, आधाराने दोघे रहात होते.
सायंकाळी झोपाळ्यावर बसून कावेरीबाई सोनचाफ्याकडे कौतुकाने पहात होत्या. काळजीने त्यांनी रघुनाथरावांकडे पाहिले व म्हटले “अहो, रोज चाफा माझ्या केसांमध्ये माळता दिवसभर त्याचा सुगंध व तो लावताना मला मिळणारे तुमचे प्रेम सतत माझ्यासोबत राहू द्या. मरेपर्यंत तो प्रेमाचा सुगंध माझ्या आयुष्यात दरवळू द्या”
“अगं कावेरी आता आपणच दोघे एकमेकांच्या साथीला. आपली पाखरे दूर उडून गेली पण प्रेमाची नाळ कधी तुटते का? रोज दोघे पण व्हिडिओकॉल आठवणीने करतात. आपली तेथून काळजी घेतात. हा ‘सोनचाफा’ जसा बहरत गेला तसा आपला संसाराचा सोनचाफा बहरत गेला.
अनिल, सुनील ची लग्न झाली. दोन्ही सुना पण सुशील होत्या. त्यांचे संसार पण छान चालले होते. पण कसे असते ना आई – वडीलांची मुलांवरील माया, प्रेम कधीच आटत नाही पण मुले नंतर आपल्या विश्वामध्ये रमतात. आई- वडीलांवरील त्यांचा मायेचा पदर पातळ व्हायला लागतो. हल्ली दोघांचा महिन्यातून एखादा फोन यायचा. त्यामुळे कावेरीबाईं व रघुनाथ राव मुलांच्या प्रेमाला आसुसलेले होते. सतत त्यांचाच विचार कावेरीबाईं करत असत त्यामुळे त्या सदोदित दु:खी असत, आतल्या आत घुसमट होत असे. त्यातच त्यांना बिपी, शुगर या व्याधींनी जडले. आणि मुलांच्या वाटेकडे डोळे लावून त्यांचे निधन झाले. रघुनाथराव एकटे पडले. उरलेले आयुष्य एकट्याने कसे काढायचे हे मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्या डोळ्यासमोर.
एकदा अनिल चा फोन आला बाबांची विचारपुस करुन त्याने मुद्द्याला हात घातला. “बाबा तुम्ही आता तेथे एकटे राहून काय करणार त्यापेक्षा ईकडे माझ्याकडे या व इकडेच कायमचे वास्तव्य करा. आपण सर्व एकत्र राहू.” रघुनाथ रावांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आज अनिल चे एवढे प्रेम का उफाळून येत आहे. “बाबा आपण तो बंगला विकू. त्याची छान किंमत येईल तसेही मला बिझनेस साठी पैशांची गरज आहे. त्या पैशाचा चांगला विनियोग होईल.” ही मायेची गोम रघुनाथरावांना काट्या सारखी बोचली व त्यांचा एकदम कडेलोट झाला.
बंगला विकण्यासाठी अनिल रोज रघुनाथरावांशी बोलत असे. साहजिकच त्यामध्ये सुनीलचा पण समावेश होता. त्यांच्या रोजच्या बोलण्याने रघुनाथ राव वैतागून गेले होते.
झोपाळ्यावर बसत सोनचाफ्याकडे बघत रघुनाथराव मनाशी बोलत होते. “नाही कावेरी मी हा सोनचाफा सोडून जाणार नाही. ह्यामध्ये आपल्या प्रेमाचा सुगंध दरवळतो आहे. तू काळजी करु नकोस. तुला सोडून मी कुठेही जाणार नाही.”
घरामध्ये आले, हॉल मध्ये कावेरी बाईंचा मोठा फोटो लावला होता. त्याला रोज चाफ्याचा हार घालत असत. त्या फोटो कडे पाहून डोळ्यात अश्रू आले. मनाचा निश्चय कावेरीबाईंच्या फोटोमध्ये बघत सांगितला. कावेरी आपल्याकडे स्मित हास्य करुन बघते आहे असे त्यांना जाणवले.
दुसरे दिवशी अनिल चा फोन आला रघुनाथरावांनी निश्चय करुन, मनावर दगड ठेवून सांगितले “बाळा मी तिकडे रहायला येणार नाही, हा बंगला विकणार नाही. येथे माझ्या व कावेरीच्या संसाराचा सुगंध दरवळतोय.”
“मी हा बंगला “ब्राह्मण संस्थेला” दान करत आहे. व तेथेच एका रुम मध्ये माझे वास्तव्य असेल.” असे म्हणून त्यांनी फोन ठेवला.
दारामध्ये साज शृंगार केलेल्या, सोनचाफ्याचा गजरा माळलेल्या कावेरीबाईं त्यांच्याकडे बघून हसत होत्या.
– श्रद्धा जहागिरदार🙏