“विश्वास” …… *फाल्गुनी अजित नार्वेकर* *वेंगुर्ला, सिंधुदुर्ग*
“विश्वास”
दुपारचे साडे बारा वाजले होते, रणरणत्या उन्हातून दाखल्याच्या कामासाठी तहसिलदार ऑफिसमधे जाणं जीवावर येतं होतं. साहजिकचं आहे माणसं आहोत आपण. पण, खर तर आपणचं निसर्गाची वाट लावतोय आणि मग म्हणतो “कधी गरम होतं तर, कधी पाऊस पडतो” असो, मी बाहेर पडले. कार्यालयातली कामं म्हणजे डोक्याचं दही करुन टाकणारी, शेवटी कटकट करतं घरी आले एक वाजता. हुश्श!! खाली स्कुटर लावून सीटवर जरा बसले. एवढ्यात लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय असं वाटलं. हा कुठला मानवी आवाज नक्कीच नाही या शंकेने मी इथे तिथे पाहिलं तर, एका कुत्रीने पिल्लांना जन्म दिला होता. ती त्यांना चाटत होती, जवळ घेतं होती, त्यांच संरक्षण करत होती. “शेवटी आई ती आई असते मग ती कुठल्याही प्रजातीची असो” पिल्लांच्या रडण्याने तिला वेदना होतं असाव्यात ती कण्हणतं होती. मी वरती आले.
दुसरा दिवस उजाडला मी कॉलेजला जायला बाहेर पडले. सहज नजर तिच्याकडे आणि पिल्लांकडे गेली. पिल्ले थरथरत होती. त्यांच्या आईने पडलेली एक सुकी नारळाची झावळी जमेलं तशी सरकवतं आणली आणि एक एक पिल्लू त्यावर ठेवू लागली. कदाचित त्यांना थंडी वाजू नये, म्हणून तिची धडपड सुरु होती. कॉलेजमधून घरी येताना मनात आलं. “छोटासा बिस्कीटचा पुडा घेते, बघू खाल्ल तर खाईल” घरी पोचले, पिल्लांच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. मी एक बिस्कीट त्यांच्या आईजवळ टाकून पाहिलं प्रथम ती घाबरतं होती. मग जसा, विश्वास बसला तिने बिस्कीटं खाल्ल तसा मला आनंद झाला. धापा टाकतं घरात जाऊन माझ्या आईने मला काही प्रश्न करायच्या आत, बिस्कीटांचा चुरा करुन त्यात दुधं मिक्स करुन एका ताटलीत घालून खाली गेले. तिला बोलवू लागले पण, भितीपोटी ती स्वत: येईना शेवटी मी जमिनीवर ताट ठेवलं. आधी थोडसाच खाऊ ठेवला (तिने खाल्लं नाहीतर, माझी काही खरं नव्हतं) मी तिला दिसणारं नाही अश्या तऱ्हेने थोडीशी पाठी आले.
थोड्यावेळाने स्वत: ती आली माझ्याकडे पाहिलं. मी सहजचं म्हटलं, “दिलयं ते पटकन खा! पिल्लं रडतायेत तुझी..” आश्चर्य! माझी भाषा तिला कशी कळली देवचं जाणे ? ती भराभर दुध,बिस्कीटं फस्तं करु लागली. मी हिंमत करुन बाकीचा खाऊ ठेवायला पुढे सरसावले तशी ती पळायच्या तयारीतचं होती, “थांब गं, अजून आहे ते पण खा!” तशी ती थांबली. तिच्यासमोर खाऊ ठेवला. तिच्या डोक्यावरुन हातं फिरवू म्हटलं तरीही ती घाबरली नाही. कदाचितं तिचा माझ्यावर विश्वास बसला असावा. सगळं फस्त करुन ती पुन्हा पिल्लांकडे गेली. मी घरी आले थोडा वेळ गेल्यावर पिल्लांची रडगाणी बंद झाली. मला समाधान वाटलं प्राण्यांचा किती पटकनं विश्वास बसतो ना!, जाणवलं आतून. आपल्याकडे छप्पर आहे, त्रास होतं असेल तर बोलता येतं, एखादी स्त्री गर्भवती असेल तर, डॉक्टरांकडे हजार वेळा फेऱ्या असतात आपल्याकडे. थोडक्यात तश्या सोयीसुविधा आहेत. पण, त्या बिचाऱ्या मुक्या जनावरांच काय होतं असेलं? हा विचार करुन पण, मन हळवं होतं…
*फाल्गुनी अजित नार्वेकर*
*वेंगुर्ला, सिंधुदुर्ग*