मंथन (विचार)

तिची चाळीशी……………… @सौं. प्रज्ञा कुलकर्णी (राज्ञी),

तिची चाळीशी…..

स्त्री ने चाळीशी ओलांडली म्हणणं जितकं सोप्प असतं ना….
तितकं सोप्प नसतं….हो…ती जगणं…..!!

या वाटेवर येईपर्यंत किती बदल घडलेले असतात…बघा….
ना….!!

मऊशार तळहाताची जागा एव्हाना खरबडीत रेषांनी घेतलेली असते….!!

गुलाबी गुलाबी लांब नखांना
खूप ठिकाणी जिव्हाळी
लागलेली असते….
हार्मोनल चेंजेस घडत असतात शरीरात.
टपोर डोळ्याखाली काळी वर्तुळ दिसायला लागलेली असतात.
त्या वर्तुळात मनातील असंख्य चिंतानी घर केलेले असते…कपाळावर कधी न दिसणारी थोडी त्रासिक रेष डोकावत असते…!!

काय म्हणता…? कशाला करावी एवढी काळजी….?

एक सांगू…..स्त्री होणे म्हणजे सहज पापड भाजण्याएवढे सोप्पे नसतं बरं का?

तिला…..घरात लोणचं होऊन राहावं लागतं…ते जितकं मुरल्यावर खमंक लागतं ना….अगदी तसंच आयुष्य ती घरासाठी प्राणपणाने जगतं असते…!!

कधीकधी असह्य बोटांची पेरं दुखत असतात….मग दोन्ही हातात त्यांना घेऊन एकमेकांना करकचून दाबते…..तेव्हा एक दीर्घ श्वास निघतो…अन…ओहह.. शब्द आपसूक बाहेर पडतो….!!

तेव्हा कुठे बरे वाटायला लागते..
पण बोटांना बरे वाटते की…. ह्दयाला….ते समजत नाही हो मला…!!

कधीकधी काम करून थकलेल्या हातापायांवर लक्ष जातं…. तेव्हा
पाहते तर बापरे….किती काळवंडलेले असतात ती…!!

चोपडेचटक तळपाय भेगांच्या झालरीने कृश झालेले असतात….!!केसांचीही काही वेगळी तऱ्य्हा नसते….लांबसडक वेणीची शेपूट झालेली असते…गाई ची तरी बरी….अशी म्हणायची गत येते…..!! एकंदरीत काय…चाळीशीत आल्यावर घटकेत पायाशी तर घटकेत केसाशी….कुठे कुठे म्हणून सांगू….पण लक्ष जातं असतं.
अगदी बहिणाबाई चौधरी च्या मनं वढायं वढायं…सारखंच ….

बरं…हे सारं पाहून….आई गं….!!

असं म्हणताचं….

मग आईची आठवण येते..लहानपणी गोरीपानं दिसावी म्हणून वजरी घेऊन घासून घासून गोरं केलेलं होतं तिने….पण कसलं कायं….!! सगळं मुसळ केरातं…म्हणायची वेळ येते….!!

जेव्हा भेट झाली तेव्हा तिचं…वाक्य ठरलेलं….”आधी किती गोरी होती….!!आता किती सावळी झालीस….!!”

तिच्याही आईने असेच केले असणार का..तिलाही…..हा सहज प्रश्न मनात येऊन जातो….!!

बाई ची जातचं मुळी वेंधळी….असते..कधी….स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच कुठे असतो तिच्याकडे…..!!

गेले चाळीस वर्ष फक्त आणि फक्त…..माझे घर,माझी माणसं,माझा संसार….बस्सं …एवढंच काय ते जन्माला पुरून उरलं म्हणतात…. तशी अवस्था होऊन गेलेली असते….तिची…!!

बोटातल्या साखरपुड्याच्या अंगठीचेही काही वेगळे हाल नसतात….!! तिच्या गोलाई चाही अष्टकोन झालेला असतो….तरी का कोण जाणे….खुदकन हसू येतं गालातं….!! दोन्ही बोटांनी तिला हलकीशी फिरवून
तिला सरळ करतांना….त्या बदामातल्या ठशात….मी हरवून जाते काहीवेळ….!!

आठवत राहतात ते नवपरीनितेतले क्षण….
त्या काळात….दिवसभरात…कितीतरी वेळ….तिच्याशी लडीवाळ खेळलेली असते मी…..अय्या….म्हणून झालेले असतं…लाखोवेळं…..पण आता…!!

अय्या…अगं बाई….चा हक्क
अहो….ऐकता…का….!!
अरे पोरांनो….ने कधीचाच घेतलेला असतो….!!

एव्हाणा…..अय्या म्हणणं तर दुर्मिळच झालेलं असतं…..!!

पण एक सांगू…….?

स्त्री ने हा हक्क मनोमन स्विकारलेला…असतो….बरं…का…!!

जो पर्यंत बाई ची आई होत नाही तोपर्यंत तिची तिच असते..नंतर मात्र तिच्या भावनांना संसार असा काही वेढून घेतो की अर्ध्या वयात येईपर्यंत ती कुटूंबातील सर्वांची हक्काची मात्रा असते….तिच्या शिवाय घरातलं पानं देखील हलतं नसतं…..हे तिला तर माहिती असतंच पण घराच्या कोपरा अन कोपऱ्याला तिची सवय झालेली असते….!! ती ही….अगदी जिवाभावाची….!!

काय…म्हणता….?
मनातलं बोलतेय….?

नारी आहे ना..म्हणून ओळखले असेल कदाचित.

ना कधी म्हणू शकत नाही ती अरी( चक्र) म्हणजेच नारी….!!

सतत भोवऱ्यासारखी संसाराभोवती पिंगा घालत असते.

चाळीशीच्या उंबरठ्यावर आल्यावरचं का बरे….तिला स्वतःतली बाई आठवत असावी?

हे….सारे समजण्या उमजण्याच्या पलिकडले आहे हो…….!!

ती आरशा समोर जाऊन चेहरा न्याहाळण्याला उभी राहते…पण तरीही त्या क्षणी त्यालाच पुसत असते…कारण तिला तो अस्वच्छ झालेला बघवत नसतो…ना…म्हणून…!!

स्वतः च्या भावभावनांचा पिसारा ती तोवर लपवून ठेवते जोवर घराला घरपण येणार नाही…!!

असेच राहणार आहे जन्मोजन्मी स्त्री चे रूप.घराचे स्वरूप सुंदर करता करता…..आज मी, उद्या मुलगी,सूनं चाळिशीत आल्याशिवाय तिलाही कुठे कळणार आहे मीच माझ्या रूपाची राणी आहे ते….हो..ना…!!

धन्यवाद……!!

@सौं. प्रज्ञा कुलकर्णी (राज्ञी),

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}