मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

कँमलिन कंपास बाँक्स ………. रत्नाकर दिगंबर येनजी

कँमलिन कंपास बाँक्स

१९७१ साली मी ६ वी इयत्ता शिकत असताना एक दिवस आमच्या चित्रकलेचे गुरुजी वर्गात आले. आमच्या टाईम टेबल मध्ये ज्या दिवशी चित्रकला विषय असायचा त्या दिवशी मी सकाळी जाग आल्यापासून शाळेत चित्रकलेचा तास संपेपर्यंत मस्तपैकी टवटवीत असायचो . मला हा पिरिएड फार आवडायचा. ईतर विषय मला अजिबात आवडायचे नाहीत. गुरुजींनी विचारले शासनाच्या एलिमेंट्री ड्राँईंग च्या परीक्षेत ज्यांना बसायचे त्यांनी नावे द्यायची व नंतर त्या परीक्षेत बसण्यासाठी काय करावे लागेल ते मी नंतर सांगेन. माझ्याकडे वळुन मला सर्वांची नावे गोळा करायला सांगितली. मला ही जबाबदारी देण्याचे कारण म्हणजे ड्राँईग विषयात शाळेत मी एकमेव विद्यार्थी असा होतो की चित्रकला म्हणजे रत्नाकर असे समीकरण बनले होते. दररोजचे फळ्यावर सुरेख अक्षरात सुविचार लिहिणे. स्वातंत्र्य दिन , प्रजासत्ताक दिन , शिक्षक दिन , प्रयोग शाळेत फळ्यावर खडुने प्रयोग चित्र काढणे हे सगळे मीच करायचो.
दुसर्या दिवशी चित्रकलेच्या सरांनी मी गोळा केलेली नावे घेउन आमचे फाँर्म भरुन घेतले. सर म्हणाले शाळेला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा या एलिमेंट्री ड्राँईंग च्या परीक्षेच्या तयारीसाठी जादा वर्ग घेण्यात येतील .मी खुष झालो. त्यावेळी मला कोणी सांगितले असते कि तुला दिवसभर चित्रकलेच्या वर्गात बसायचे आहे तरी मी मी मजेत बसलो असतो. सरांनी आम्हाला काय काय
साहित्य लागेल त्याची यादीच दिली. यादि बघुन माझ्या पोटात खड्डाच पडला. कारण त्यात बरेच सामान होते. स्केच बुक ,कमीतकमी १२ रंगाचे पोस्टर कलर , वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश ,वेगवेगळ्या हार्ड व साँफ्ट शिशाच्या पेन्सिली (2H, 5H , 4B व 6B )व आणखी मुख्य म्हणज कँमलिन कंपनीची कंपास पेटी. हे सगळे जाउन घरी सांगायचे मला धाडस नव्हते कारण ह्या सगळ्या गोष्टीने आमचे घरचे बजेट कोलमडून पडणार होते. घरातल्या इतर सदस्यांनी मनातल्या मनात संसदेत वाजवतात तशी बाके वाजवली असती. आम्ही सहा भांवडे म्हणजे चार भाऊ व दोन बहिणी सगळीजण शिकणारी मुले . आई त्या काळातील vernacular 7th final exam passed. आमचे बाबा मुंबई BEST कंपनीत Letter Painter Artist. कमावणारे ते एकटेच . महिन्याची ७ तारखेला त्यांचा पगार व्हायचा. पगाराच्या दिवशी पगार कितीही कापून कमी आला तरी ते आमच्या आवडीचे खायला घाऊन यायचे .त्याकाळात आम्ही BEST Staff Colonyराहत असल्याने ७ तारीख म्हणजे आमच्या स्टाफ क्वार्टसमध्ये वेगळेच वातावरण असायचे. आम्ही संध्याकाळी मुले बिल्डिंगखाली खेळताना आपापले पालक घरी कधी येतात याकडे सगळ्यांचे लक्ष असायचे. ईतर दिवशी आईने कितीही हाका मारल्या तर आम्ही घरी पटकन जायचो नाही. बाबा आलेले दिसले की मी व माझा लहान भाऊ हातात जर आमच्या डावातील बँटिंग असली तरी ती सोडुन घरी पळायचो. घरी गेल्यावर आमच घर तेव्हा स्टाफक्वार्टसमध्ये वन रूम किचन होते त्या किचन मध्ये आई स्टोव्ह वर तवा ठेवून चपात्या करत बसलेली असायची व तो स्टोव्ह चा आवाज अजुनही विसरु शकत नाही.
आई समोर जाऊन बसल्यावर आई ओरडायची
“पयले हात पाय धुवान घेया मग खावक मिळताला” आम्ही मग गपचूप खेळुन खराब झालेले हातपाय बाथरूममध्ये पाणी भरलेल्या पिंपामधुन दोन तांबे पायावर कसेबसे टाकून टाँवेल ला ते पाय पुसुन ( टाँवेल खराब व्हायचा त्याचा ओरडा नंतर मिळायचा) पटकन तिच्यासमोर पुन्हा येऊन बसायचो .मग परत ओरडायची “देवाक पाया पडा? ” मग आम्ही दोघे आमच्या शेजारी राहत असणार्या प्रभुदेसाई काकीने शिकवलेले शुभं करोती कल्याण.. म्हणायचो. (ही पार्थना कालांतराने आमची आर्थिक परिस्थिती बिघडत गेली तशी आम्ही म्हणायचे बंद झालो.) पाया पडून झाल्यावर आई आम्हाला वडिलांनी आणलेले शांत पणे खायला द्यायची . तेव्हा त्या शांत चेहर्यामागे ती काय विचार करत असेल याचा विचार त्या वयात परिपक्वता नसल्यामुळे कधी मी केला नाही पण आज जेव्हा आपल्या खात्यात आँनलाईन भरमसाठ पगाराचा SMS मोबाईलवर येतो तेव्हा मला फक्त आई बाबाच आठवतात व डबडबल्या डोळ्यातुन मला तो कीती पगार आला ते बघण्याची ईच्छा नसते.
तर आपण कुठे होतो तर आता मला चित्रकलेच्या परिक्षेसाठी साहित्य हवे होते. त्यादिवशी जरा हवेत उडत पण दबकत घरी गेलो बाबांचा पगार होऊन दोन आठवडे झाले होते. मी दप्तर टाकून आईला सांगितले की परीक्षेसाठी एवढे सगळे सामान पाहीजे. आमची आई तिच्या काळातील व्हर्नाकुलर फायनल सातवी पास होती. तिचे वाचन भरपुर होते आजोबांनी ती सातवी पास झाल्यावर शाळेतुन काढुन तिला नववारी साडी नेसायला सांगितले व आजीच्या नेहमीच्या बाळंतपणामुळे तब्येत खराब झाल्याने कौठुबिक जबाबदारी आईवर टाकली. माझ्या आईचे जेव्हा लग्न झाले त्यानंतर आजीची सुध्दा माझ्या आई बरोबर दोन बाळंतपण झाली .त्या काळातील पुरुष राक्षस असावे असे मला वाटते . मी दिलेली साहित्याची लिस्ट आईने पाहिली व म्हणाली यातील बहुतेक सामान बाबांकडे आहे. फक्त तुला कंपास बाँक्स घ्यावा लागेल. तो आपण घेऊया. आमचे बाबा फार म्हणजे फार मोठे आर्टिस्ट होते. त्या काळात BEST स्टाफ क्वार्टसमध्ये रहायला चांगली ( Self contained) जागा म्हणुन त्यांनी मग दुसर्या नोकरीसाठी प्रयत्न केला नाही. पण नोकरीवरून घरी आले की Freelance Art work कामे करायचे मग ते कसलेही असो. मोठमोठे साईन बोर्ड स्वतः सुतारकाम करुन त्या बोर्डवर पेंटींग करुन स्केअर फुटाचा भाव लावुन पैसे कमावून संसाराला हातभार लावायचे. हल्ली आपण जाहिराती चे डिजिटल फ्लेक्स चे बँनर पहातो ते स्वतः हाताने पेंटींग करायचे. मुर्तीकाम , मोठमोठ्या दुकानावर असलेल्या नावाचे बोर्ड शिडीवर दिवसभर उन्हात उभे राहुन पेंटींग करायचे. रात्री उशिरापर्यंत ते घेतलेली कामे पुर्ण करुन दुसर्या दिवशी कामावर जायचे. प्रामाणिकपणा त्यांच्यात ठासुन भरलेला.
आई म्हणाली बाबांकडे चांगले ब्रश व रंग आहेत तेच वापर .रात्री बाबा आले की त्यांना मी कंपास बाँक्स बद्दल बोलते. अशा परिक्षा देणे शाळेत आणखी काहीतरी करणे यासाठी आई नेहमीच आम्हा मुलांना प्रोत्साहन द्यायची. ती स्वतः आमच्या शाळेतील महिला मंडळात जायची व तिकडे वेगवेगळ्या उपक्रमात भाग घ्यायची. तिने एकदा बाहुल्या बनवायचा व क्रेप पेपरची फुले बनवायचा चार दिवसाचा कोर्स केला व मस्त सुंदर बाहुल्या व फुले बनविली .जश्या हल्ली सुपर मार्केट मध्ये बार्बि डाँल व बाहेगावची फुले पहातो तशी. आमच्या शाळेत एकदा प्रदर्शनात मी बर्फाळ टुण्ड्रा प्रदेशातील त्यांचे राहयचे अर्ध गोलाकार लहान दरवाजा असलेल बर्फाचे घर म्हणजे ईग्लु व तिकडचा माणुस म्हणजे त्याला एक्स्किमो म्हणतात तो बनविला त्यात मला एक्स्किमो बनविण्यात आईची मला मोलाची मदत झाली व प्रदर्शनात पहिला न. मिळाला.
रात्री बाबा आल्यावर आईने बाबांना एलिमेंट्री डाँईंग च्या परिक्षे बद्दल सांगितल्यावर बाबा खुश झाले कारण त्यांनी स्वतः दोन्ही परिक्षा ( एलिमेंट्री व इंटरमिडिएट ) ‘A’ Grade ने पास झाले होते. त्यांनी मला ताबडतोब मला जर्मन मेड ब्रश व पोस्टर कलर दिले व उद्या चांगला कंपास बाँक्स घेऊन येतो असे सांगितले. आता हा कंपास बाँक्स ते कुठुन आणणार ते मला कल्पना होती. आमचे बाबा फ्रिलांन्स काम करायचे त्यात त्यांचा महत्वाचा क्लाईंन्ट म्हणजे आम्ही रहात असलेल्या सांताक्रूझला स्टेशन रोडला एका आनंद नावाच्या गुजराती माणसाचे ‘आनंद स्टोअर्स ‘ नावाचे मोठे दुकान होते .त्या दुकानात शाळेला लागणारी पुस्तके, सर्व प्रकारची स्टेशनरी व इतर नाँव्हेल्टी वस्तू विकायला ठेवलेल्या असायच्या. आमचे बाबा वर्षभर त्या दुकानासाठी लागणारे बँनर , पोस्टर वेगवेगळ्या सिझनच्या गरजे प्रमाणे काम करायचे. त्यावेळी मी सुद्धा बाबाना चित्र काढायला मदत करायचो. एकदा मी ईद्रजाल काँमिक्स चा फँण्टम ( वेताळ) चे पोस्टर काढले होते. सांताक्रूझ टी मार्ट च्या दुकानात चहाची वाखाखणी करणारा गुजराती व्यक्ती चे चित्र अजुनही तुम्ही तिकडे गेलात तर पहायला मिळेल.
ते वर्षभर केलेल्या कामातुन आम्हा सहा मुलांना लागणारी पुस्तके व साहित्याची सोय व्हायची . ह्या दुकानाचा फायदा आम्हा सर्व मुलांना सर्व शिक्षण पुर्ण होईपर्यंत झाला. आता तो देवदुतासारखा आनंद बहुतेक या जगात नसेल तेव्हाच तो वयस्कर होता. भावपूर्ण आदरांजली.
मला सांगितल्याप्रमाणे मला बाबांनी सुंदर पँकिंग असलेला कँम्लिन चा Geometry कंपास बाँक्स आणून दिला. तेव्हा आई म्हणाली ” तो बाँक्स देवा समोर ठेय व हळद कुंकू लाय” त्याकाळात आई घरात नवीन केरसुणी आणली तरी तिला हळद कुंकू लावायची . त्या काळात ती पध्दत होती .आताही जर थोड्या बायकांना लक्षात आले तर हळद कुंकू लावायला विसरत नाही. असो.
दैवी सोपस्कर झाल्या वर मी तो पँकिंग मधला बाँक्स हातात घेतला कसला आनंद झाला सांगु इयत्ता ६ वी मधला मी मुलगा मस्त ज्याची दोन तीन दिवस झोपेत स्वप्न पाहत होतो तो कंपास बाँक्स प्रत्यक्ष माझ्या हातात होता. त्या वयात चुबंन कसे घ्यायचे ते मला माहित नव्हते आता मला वाटते की थोडीफार माहिती असती तर मी कदाचित त्या कंपास बाँक्स चा मस्तपैकी मुका घेतला असता. मी ते पँकिंग काढुन बाँक्स उघडला. ती क्वालिटी बघुन हरखुन गेलो. आतमध्ये जे मला आजही आवडतो तो वर्तुळ काढण्यासाठी कंपास असतो तो होता त्याच्या बाजुला करकटक म्हणजे डिव्हायडर होता. जोडीला ३०॰-६०॰ व ४५॰ कोन असलेले सेट्स स्केअर ,६” लांबीची स्केल , खोड रबर व शार्पनर होता.
माझा मोठा भाऊ तेव्हा अकरावी टेक्नीकल शाळेत शिकत होता . त्यांना टेक्निकल शाळेत मशिन डाँईंग हा विषय होता. तो घरी डाँईंग बोर्ड वर छान छान डाँईंग काढायचा त्यात तो Orthographic View म्हणजे एखादी वस्तू असेल तर ती वरुन कशी दिसेल त्याचा Plan View जर समोरुन दिसल्यावर Front किंवा Elevation View व साईड ने पाहुन Side View Draw करायचा. हे Drawings काढताना त्या काढलेल्या आकुर्तीला मस्तपैकी मोजमापे ( Dimensions) द्यायचा. त्याला शाळेमध्ये अकरावी चे शेवटच्या वर्षी भरपुर डाँईंग शिट Submission करायचे असल्याने तो शाळेतुन आल्यावर डाँईंग शिट करायला बसायचा व मी तो कसे डाँईंग काढतो ते मी बघुन नंतर मी माझ्या डाँईंग स्केचबुकवर करत बसायचो. मित्रहो आपल्याला विश्वास बसणार नाही जो Orthographic Projection विषय इजिंनिअरिंगचा विषय इयत्ता ६ वी त मोठ्या भावाच्या तो घरात नसताना डाँईंग शिट पाहुन माझा फंडा क्लिअर झाला . मोठा भाऊ मला दोन View काढुन 3rd Missing View काढायला सांगायचा. कधी कधी तो मला मुद्दाम बुचकळ्यात टाकणारी फसवी कोडी घालायचा मला जमायचे नाही पण नंतर तो कसे फसवले ते दाखवायचा. ह्या सगळ्या गोष्टी मुळे माझी 3D Visualisation power जबरजस्त वाढली. ही सगळी माझ्या मोठ्या भावाची क्रुपा ती मी आजही विसरु शकत नाही. त्याने जे परिवारासाठी लहान वयात केलेले योगदान आम्ही भावंडे कधीच विसरु शकत नाही. तो लहानपणापासूनच धाडसी होता. आम्ही मुंबईत येण्यापूर्वी सगळे जण बाबांशिवाय गावी आरवलीला घरी राहत होतो . बाबांना स्टाफ क्वार्टसमध्ये जागा मिळाल्या वर आम्ही मुबंईत सांताक्रूझला राहायला आलो. तेव्हा हा मोठा भाऊ सातवीत होता . तेव्हा तो सकाळी उठुन वर्तमानपत्रे लोकांच्या घरी जाऊन टाकायचा त्याबद्दल त्याला दररोज पन्नास पैसे रोख मिळाल्यावर ते आठ आण्याचे नाणे तो आईला आणुन द्यायचा. मला हे टाईप करताना फार मन भरुन आले. मला जरा टाईपिंग थांबवले पाहिजे…..
मित्रहो मला माफ करा कंपास बाँक्स च्या आठवणी सांगताना ईतर आठवणी सुध्दा आमच्या बद्दल सांग म्हणून विनवणी करतात त्यांना मी कसे नाकारणार ? आतापर्यंत आयुष्यात त्यांच्या साथीने मार्गक्रमणा करत आलो ना?
जसा कंपास बाँक्स हातात आल्यावर मी माझ्याकडे असलेली नटराज पेन्सिलीला त्या नवीन बाँक्स मधील शार्पनरने मस्तपैकी शार्पनिंग केले व ती पेन्सिल बाँक्स मधील वर्तुळ काढणार्या कंपासमध्दे घालुन त्याचा थंम्ब स्क्रु व्हिल टाईट केले. आता मी वर्तुळ काढायला सज्ज झालो. माझ्या डाँईंग स्केचबुकवर मस्त पैकी छानपैकी वर्तुळ काढले. नंतर मी पुन्हा कंपासचा पाँईटरचे टोक वर्तुळाच्या व्यासावर ठेवुन पेन्सिलचे टोक वर्तुळाच्या सेंटर ठेवून मी त्या त्रिज्येएवढे सहा वेळा आर्क्स मारुन एक सहा पाकळी फुल केले. मी आईला दाखविले. आई ते फुल पाहुन खुष झाली. तिला जशी वाचनाची आवड होती तशीच शिवण व भरतकाम याचीही तिला आवड होती. ती लहाणपणी भरपुर भरतकाम करायची असे ते आम्हाला सांगायची. ते मी काढलेल कंपासचे फुल पाहुन ती मला उत्साहाने म्हणाली आता यात वेगवेगळे रंग भर म्हणजे छान दिसेल. मी तर तयारच होतो. ताबडतोब बाबांनी दिलेले ब्रश व रंग काढले. सुरवातीला ब्रशने पोस्टर कलरच्या बाँटलमधुन रंग घेतला .मला अंदाज नसल्याने जरा जास्तच रंग घेतला गेला. आईचे लक्ष होतेच ताबडतोब ती म्हणाली ” चित्राचा माप बघ व तेव्हढोच पुरवुन रंग घे .अजुन परिक्षेक वेळ आसा . तुका सारखे बाटले आणुन कोन दितलो?” नंतरच्या पाच पाकळ्या आईने सांगितल्या प्रमाणे जपुन रंगविल्या. आई खुष झाली म्हणाली “बाबांक दाखय” बाबांनी पाहिले व म्हणाले “ब्रश संमातर चालव .चित्र प्रिंट केल्यासारखे वाटले पाहिजे.” हे नंतर मी पुढे आयुष्यात कायमचे लक्षात ठेवले .लोक मला म्हणायचे तुझी चित्र छापिल वाटतात.
दुसर्या दिवशी मी चित्रकलेचा तास असल्यामुळे नवीन कंपास दप्तरात ठेवुन शाळेत उत्साहाने गेलो. बरोबरच्या मुलांना कंपासने वेगवेगळे आर्क मारुन Geometric construction करून भुमिती मधल्या गमती जमती दाखविल्या . मला पहिल्यापासूनच एक सवय होती की कुठलीहि नवीन ज्ञानात भर टाकणारी गोष्ठ कळली, ऐकली किंवा समजली की मला जवळच्या लोकांना सांगितल्या शिवाय चैन पडत नसे.
पुढे माझी एलिमेंट्री डाँईंग ची परिक्षा झाली ‘ बि ‘ ग्रेड मिळाली व पुढे पुढे मी हा कंपास पुर्ण शिक्षण होईपर्यंत वापरला. तो कंपास मला जीवलग मित्रासारखा होता. पुढे जेव्हा मी L&T लागलो तेव्हा मला Rotring कंपनीचा Made in Germany चा Compass set मिळाला त्या सेट मध्ये एक Beam Compass नावाचा प्रकार मिळाला त्याची मदत घेऊन मी डाँईंग बोर्ड वर १.५ Meter व्यासाचे वर्तुळ काढत असे. नंतर मी
डाँईंग बोर्ड वरून काँम्पुटर वर कसे डिझाईन करायला लागलो ते मी पुढल्या लेखात सांगेन …..

धन्यवाद
रत्नाकर दिगंबर येनजी
बांगुर नगर, गोरेगाव , मुबंई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}