हैदराबादची प्रसिद्ध कराची बेकरी..
श्री अजय कोटणीस यांनी गैरसमज दूर केला! :-
हैदराबादची प्रसिद्ध कराची बेकरी..
नोकरी निमित्त 45 वर्षांपूर्वी विदर्भातून मराठवाड्यात आलो. पुढे काही वर्षांनी स्टेट बँक ऑफ हैदराबाद या सरकारी बँकेमध्ये जॉब मिळाला. या बँकेचे हेड ऑफिस व ट्रेनिंग सेंटर तत्कालीन आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद इथे असल्याने विविध कारणांस्तव वारंवार हैदराबादला जाण्याचा योग यायचा. अशावेळी माझे बँकेतील सहकारी “हैदराबादहून येताना आमच्यासाठी आठवणीने ‘कराची बेकरीची बिस्किटे’ घेऊन ये..” अशी फर्माइश करायचे.
साहजिकच हैदराबाद मुक्कामाच्या शेवटच्या दिवशी कराची बेकरीत जाऊन बिस्किटे खरेदी करणे हा कार्यक्रम असायचा. बेगम बाजार भागातील मोअज्जम जाही (Moazzam Jahi) फ्रूट मार्केट जवळ ही बेकरी होती. सकाळी दहा वाजता बेकरी उघडायची. पण त्यापूर्वीच बेकरी बाहेर गिऱ्हाईकांची रांग लागलेली असायची.
या बेकारीची “फ्रूट बिस्किटे” ही अतिशय लोकप्रिय होती. फार जास्त गोड नसलेली, हलकीशी खारट चव असणारी स्वादिष्ट, कुरकुरीत, खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी ही बिस्कीटं कितीही खाल्ली तरी मन तृप्त होत नसे. बदाम, पिस्ता, काजू, किसमिस असा सुका मेवा असलेली या बेकरीची अन्य विविध बिस्किटे तर चवीला केवळ अप्रतिम अशी असत.
ही बेकरी खूप जुनी असल्याने आणि निजामाच्या राज्यात असल्याने, त्यातून बेकरीचे नाव “कराची बेकरी” असे असल्याने हीचा मालक कुणी मुस्लिम व्यक्ती असावा असाच बरेच दिवस समज होता. विशेषत: “कराची” ही पाकिस्तानच्या सिंध प्रांताची राजधानी असल्याने असं शत्रू राष्ट्रातील शहराचे नाव आपल्या बेकरीला देणारा हा नक्कीच पाकधार्जिणा पंचमस्तंभी असावा असा दूषित पूर्वग्रहही होता.
कराची बेकरीची वेगवेगळ्या चवीची सर्व बिस्किटे ही हाताने तयार केलेली (handmade) असतात. याशिवाय प्लम केक व दिलखुष नावाचा खास हैदराबादी बर्गर ही बेकरीची अन्य लोकप्रिय उत्पादने आहेत. विशेष म्हणजे ही सर्व बिस्किटे, केक, दिलखुश, दिलपसंद व बर्गर पूर्णपणे शाकाहारी (Veg.) असतात. यात अंड्याचा अजिबात वापर केलेला असतो. (Eggless).
सुरवातीला फक्त हैदराबाद, औरंगाबाद अशा मोजक्याच ठिकाणी मागणी असलेली ही बिस्किटे आपल्या आगळ्या वेगळ्या चवीमुळे झपाट्याने सर्वदूर प्रसिद्ध झाली. आज या बेकरीची आउटलेट्स दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई, पुणे अशा सर्व प्रमुख शहरात असून भारतातील प्रत्येक लहान मोठ्या शहरात ही बिस्किटे उपलब्ध आहेत. तसेच भारताच्या कानाकोपऱ्यात “ऑन लाईन” सुविधे द्वारे ही बिस्किटे मागविता येतात.
या कराची बेकरीची कहाणी भारताच्या विभाजना इतकीच पुराणी आहे. श्री खानचंद रामनानी या सिंधी हिंदू माणसाचा कराची येथे खानावळ व बेकरीचा व्यवसाय होता. 1947 भारताची फाळणी झाल्यावर कसाबसा आपला जीव वाचवून आपल्या चार मुलांसह श्री रामनानी भारतात आले. तब्बल सहा वर्षे भारतात वेगवेगळ्या गावी निर्वासित म्हणून भटकल्यावर 1953 साली त्यांनी हैदराबाद येथे स्थायिक होऊन तेथील प्रसिद्ध सीना बेकरी जवळच आपले बेकरी उत्पादने विक्रीचे दुकान उघडले. सुरवातीला काही वर्षे अन्य बेकरीची उत्पादने होलसेल मध्ये खरेदी करून त्यांची किरकोळ विक्री ते करीत असत.
1960 साली त्यांनी स्वतः बिस्किटांचे उत्पादन करण्यास सुरवात केली. “उस्मानिया बिस्कीट” या नावाने त्यांची ही फ्रूट बिस्किटे अल्पावधीतच हैदराबादेत प्रचंड लोकप्रिय झाली. त्यांची ही बिस्किटे संपूर्णतः हाताने तयार केली जात. मातृभूमी कराची शहराची आठवण म्हणून त्यांनी आपल्या बेकरीचे नाव “कराची बेकरी” असे ठेवले. जणू मागे सोडून यावे लागलेल्या प्राणप्रिय कराची शहराला त्यांनी वाहिलेली ही एक प्रकारची श्रद्धांजलीच होती.
हळूहळू फ्रूट बिस्किटे व उस्मानिया बिस्किटांचे बॉक्स खरेदी करण्यासाठी शेकडो लोक बेकरी बाहेर रांगा लावू लागले. यात स्थानिक नागरिक, पर्यटक, व्यापारी व अन्य प्रवासी असत. अविस्मरणीय स्वादाची ही बिस्किटे घरोघरी दैनंदिन उपभोगाची अनिवार्य वस्तू बनली.
एकीकडे कराची बिस्किटांची देशभर मागणी वाढत असतानाही या बेकरीने गुणवत्ता जपण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यामुळे व्यवसायाचा विस्तार करण्यास विलंब झाला. 2007 साली हैदराबादचा सर्वात श्रीमंत, महागडा व पॉश विभाग असलेल्या बंजारा हिल्स भागात त्यांनी आपले दुसरे आउटलेट उघडले. उस्मानिया बिस्कीट, फ्रूट बिस्कीट, ब्रेड, केक, कुकीज, दिलखुश, दिलपसंद याबरोबरच मिठाई व नमकिन यांचेही त्यांनी उत्पादन करण्यास सुरवात केली.
रामनानी समूहाने यानंतर देशभर कॅफे व रेस्टोरांची चेनच उघडली. आज कराची बेकरीची 13 व्यापक श्रेणी आणि 50 पेक्षाही अधिक उपश्रेणीमध्ये विविध स्वादाची उत्पादने आहेत. 70 व्या वर्षात पदार्पण केलेल्या या बेकरीची उत्पादने अमेरिका, कॅनडा, युके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, आखाती देश अशा 20 देशात निर्यात केली जातात. 1000 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या बेकरीत रोज 10 टन बिस्किटे तयार केली जातात. विशेष म्हणजे आजही ही बिस्किटे हातानेच तयार केली जातात. मशीनचा वापर फक्त पॅकिंग पुरताच केला जातो.
2019 साली पुलवामा हल्ल्यानंतर या बेकरीच्या पाकिस्तानी शहराच्या नावावरून विवाद उद्भवला होता. बेंगळुरू येथील कराची बेकरीवर हल्लाही करण्यात आला. त्यानंतर बेकरीने बरेच दिवस आपले “कराची” हे नाव झाकून ठेवले होते. हे केवळ एका शहराचे नाव असून पाकिस्तानशी याचा काहीही संबंध नाही, याची नागरिकांना कल्पना नव्हती. शेवटी बेकरी द्वारे एक प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले की ही बेकरी एका हिंदू परिवाराचे प्रतिष्ठान आहे, तेंव्हा कुठे हा विवाद शांत झाला.
आज खानचंद रामनानी यांचे पुत्र लेखराज व परिवाराचे अन्य सदस्य हा खानदानी व्यवसाय पुढे नेत आहेत.
कराची बेकरी हा केवळ एक ब्रँड नसून देशाच्या फाळणीच्या लाखो शरणार्थींच्या उद्यमशीलतेचे प्रतीक आहे, ज्यांना पाकिस्तानातील आपला समृध्द व्यवसाय सोडून निष्कांचन अवस्थेत भारतात यावे लागले, पण तरी देखील त्यांनी हिम्मत न हारता पुन्हा नवीन उद्योगाची येथे स्थापना केली व तो यशस्वी करून दाखविला.
यापुढे जेंव्हा जेंव्हा तुम्ही चहा बरोबर कराची बिस्कीट खाल तेंव्हा लक्षात असू द्या की हे फक्त बिस्कीट नसून इतिहासाचा एक तुकडा आहे.