जाणीव — अतुला प्रणव मेहेंदळे.
“जाणीव” 💚♥️💙
✍🏻 सौ. अतुला प्रणव मेहेंदळे.
मनोरमाबाई सगळं अगदी आठवणीने बॅगेत, बोचक्यात जमेल तसं भरत होत्या. डोळ्यातलं पाणी न दाखवता सगळं यंत्रवत करत होत्या. मनात विचार मात्र एकच. “श्रेयस इतका कसा बदलला? आता तो ही खरंतर बाप झालाय.
अवघा दोन वर्षांचा माझा ऋग्वेद! कित्ती लळा आहे त्याला आपला. त्याच्या बोबड्या बोलांमधून आजी ऐकायला किती आतुर झालो होतो आपण. आणि जेव्हा त्याने पहिल्यांदा “आजी” अशी हाक मारली तेव्हा अक्षरशः आभाळ ठेंगणं झालं होतं आपल्याला.
शर्वरीची, म्हणजे आपल्या सुनेची, कार्बन कॉपी आहे माझा ऋग्वेद.” त्याचा विचार करुन आत्ताही मनोरमाबाई मनोमन खुदकन हसल्या. “मातृमुखी सदा सुखी” असा आशीर्वाद देऊन त्या मोकळ्या ही झाल्या. आणि दुसऱ्याच क्षणी त्यांच्या मनात भीती दाटली. माझं असं काय चुकलं की श्रेयस ने मला चार दिवसांपूर्वी एका दमात जराही मागचा-पुढचा विचार न करता, जीव जरासाही न कचरता सांगून टाकलं की, “आई तू तुझं सगळं सामान बांध.
मी तुझी दुसरीकडे सोय केली आहे. आणि यापुढे तू तिथेच रहायचं आहेस. आणि हो अगदी सगळं सामान घे. इथे तुझी काही एक गोष्ट ठेवू नको. उगीच आम्हाला आवरायला कहार नको नंतर.” बापरे! केवढा मोठा धक्का बसलाय आपल्याला तेव्हापासून. सूनबाई पण मूग गिळून गप्प होत्या. तिला काय म्हणा.
आम्ही दोघे बोलत असताना ती कधीच मध्ये पडत नाही. एका अर्थी चांगलंच असतं ते. पण यावेळी तिचं शांत बसणं नको वाटत होतं. खरंतर शर्वरी अशी नाहीये. आमचं तसं चांगलं जमतंय. परवा जरा खटका उडाला खरा. पण असे खटके मधून मधून उडतातच आपल्यात.
आणि कुणाच्या घरी भांड्याला भांडं लागत नाही. त्यावरून इतका तुटकपणा कशासाठी. हे सगळे विचार करत असतानाच शर्वरी खोलीत आली. “आई, अहो अशा अंधारात काय बसला आहात? संध्याकाळ झाली. दिवा तरी लावायचात.” तिने दिवा लावला खरा. पण मनोरमाबाई आपल्याच विचारात दंग होत्या. तेव्हा शर्वरी आत आली. मनोरमाबाईंच्या समोर खुर्ची ओढून बसली.
“आई अहो काय झालं. तुमचं लक्ष नाहीये. दिवसभर काही खाल्लेलं सुद्धा दिसत नाहीये तुम्ही. आत्ता ऑफिसमधून आल्यावर पाहिलं तर सगळं जेवण तसंच ओट्यावर. आता हे पण मीच बघायचं का? तुम्हाला एवढं तरी स्वतःचं स्वतः वाढून घ्यायला हवं ना? परवा त्यावरूनच तर आपले वाद झाले ना? मला घरचं आणि बाहेरचं दोन्ही नाही हो जमत. माझ्यात धमक नाही म्हणालात तरी चालेल.
पण तेवढ्यासाठी आपण बाई ठेवू कामाला म्हणाले तर केवढा तो त्रागा केलात. त्यात मी काहीच बोलले नव्हते श्रेयसला.
पण तुम्हालाच काय वाटलं कोण जाणे तुम्ही रात्री त्याला सांगायला गेलात आणि मग त्याचा ही स्वतः वर ताबा राहिला नाही. तुम्ही तुमच्या मुलाला ओळखत नाही का? आता तो तुमचाच मुलगा मी काय सांगणार एका आईला तिच्याच मुलाबद्दल.” असं म्हणून ती मंद हसली. जाऊदे.
तुम्ही नका एवढं मनावर घेऊ. मी काही मनात ठेवलं नाहीये. तुम्हीही विसरा. आणि आता उद्या तुम्ही दुसरीकडे जाल ना तिथे छान हसत चला बघू. असं तोंड पाडून तिकडे गेलात तर आम्हाला अजिबात आवडणार नाही.” हे ऐकून मनोरमाबाईंना धक्काच बसला.
वृद्धाश्रमात सोडणार आहेत आपल्याला आणि हसत जा म्हणून कसं सांगू शकते ही. ही पण एक आईच आहे ना?” तरी त्यांनी आपल्या मनावर आणि मुख्यत्वे डोळ्यांवर ताबा ठेवला. आणि कुत्सित तोंड वाकडं करत देवघरात निघून गेल्या. शर्वरी ने श्रेयसला आल्यावर सगळा प्रकार सांगितला.” श्रेयस हे केलंच पाहिजे का? अरे मला त्यांचा त्रास नाही बघवत आहे रे.
किती त्रास द्यायचा त्यांना आपण.
आज दिवसभरात त्या जेवल्या पण नाहीयेत. तरी बरं ऋग्वेदला आपण बाहेर सांभाळायला ठेवतो नाहीतर कठीण झालं असतं अजून.” त्यावर श्रेयस अगदी शांतपणे म्हणाला,” मला माहिती आहे हे असंच होणार. पण मलाही याचा आनंद नाही होत आहे. जो जसा वागतो त्याला तसं फळ मिळतं. तिलाही कळुदे ती कशी वागली आहे ते. आणि आता फक्त उद्या सकाळपर्यंत थांब.
मग बघ सगळं ठीक होईल. मला एक सांग तुझी सगळी उद्याची तयारी झाली आहे ना? सुट्टी टाकली आहेस ना ऑफिसात दोन दिवसांची? मला आयत्या वेळी काही गोंधळ व्हायला नकोय. मी पण माझी सगळी कामं करून आलोय आजच. सकाळी लवकर उठून तयार व्हायला हवं. चल झोपुयात आता. ” मनोरमा बाईंना मात्र इथे डोळ्याला डोळा लागत नव्हता. सारखा जन्मापासूनचा श्रेयस त्यांना आठवत होता. गोरापान, हुशार, हट्टी पण तेवढाच खेळकर, हसरा, प्रचंड रागीट पण लगेच राग शांत होणारा. हे कित्येकदा म्हणायचे सुद्धा “मनोरमा, अग नंतर राग लवकर शांत होऊन काय उपयोग?
तोपर्यंत भात्यातून बाण सुटून समोरच्याच्या हृदयात खोलवर रुतून बसतो. या बाबतीत अगदी तुझ्यावर गेलाय. जरा मागचा पुढचा विचार करत नाही.” आज हे हवे होते. त्याचा राग कसा काढायचा ह्यांना चांगलं माहित होतं.
अगदीच काही नाही तर निदान अशा प्रसंगी तरी आम्ही दोघे एकत्र राहिलो असतो. त्याचं तरी काय चुकलं म्हणा कित्येक वर्षांपूर्वी मी जे केलं तेच तो करतोय. मनोरमाबाईंना त्यांच्या सासूबाईंची आज तीव्रतेने आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. आता उद्यापासून वेगळा प्रवास, वेगळं ठिकाण आणि सगळ्यात महत्वाचं वेगळी आपली नसलेली माणसं.” अश्या विचारातच सकाळी सकाळी त्यांचा डोळा लागला. आणि जाग आली तीच बाहेरच्या खुडबूडीने. त्यांना अगदी अपराध्यासारखं झालं. पटापट आवरून त्या बाहेर आल्या. समोर श्रेयस आणि शर्वरी कसलीतरी आवराआवर करत होते. आई बाहेर आलेली बघून लगेच तो पुढे झाला.
” चल आई झालीस तू तयार. निघुयात का?” असं विचारताच मनोरमाबाईंचा धीर सुटला आणि त्या अगदी लहान मुलासारख्या श्रेयसला बिलगून हमसून हमसून रडायला लागल्या. आता मात्र शर्वरी ने श्रेयस ला हलकेच फटका मारला आणि म्हणाली, ” श्रेयस पुरे आता. बास कर. मला नाही बघवत रे.” असं ती म्हणाल्यावर श्रेयस हसला. आणि मनोरमाबाईंना म्हणाला, ” आई ये इथे बस. शरू पाणी आण ग.” आणलेलं पाणी त्या गटागट प्यायल्या. त्यावर श्रेयस म्हणाला, ” आई हळू ग. किती ती घाई.
आणि तू अशी रडू नकोस. तुला काय वाटलं मी तुला वृद्धाश्रमात नेऊन सोडणार आहे? जसं तू त्याकाळी आजीला सोडलं होतं? आबांचा विरोध झुगारून त्या काळात सुद्धा तू हे केलं होतं. मी अवघा १० वर्षांचा होतो ग. मला खूप राग आलेला तुझा. त्याच रागात मी तू समोर नसताना आबांना म्हणालो होतो, “आई आजीसोबत असं का वागते? मी पण मोठा झालो की असाच वागणार तिच्याशी! मी पण तिला माझ्यापासून दूर सोडून येणार.
आई अगं त्या अजाणत्या वयात सुद्धा आबांनी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की काहीही झालं तरी तू आईला लांब करायचं नाही. ती कशीही वागली तरी आई शेवटी आईच असते. मी जे थांबवू शकलो नाही तुझ्या आईच्या आडमुठ्या स्वभावामुळे, ते तू कधीही होऊ देऊ नकोस. आणि तू ही करू नकोस.” लगेचच मनोरमाबाईंनी विचारलं, “अरे मग तू मला कुठे घेऊन जाणार आहेस? सामान बांधायला सांगितलंस ते?”
त्यावर मोठ्याने हसत कान पकडून श्रेयस म्हणाला, ” आई सॉरी! मी तुझी गम्मत केली थोडी. तुला मी कुठेही वेगळ्या जागी नेणार नाहीये. अग आपण आज “आपल्या” नवीन घरात जातोय. तुझ्या अगदी प्रेमाच्या वस्तू तू जपून ठेवल्या आहेत ना? म्हणून तुला म्हणालो तू तुझं सामान आवर.
बाकी सगळं आवरायला packers and movers येणारच आहेत १० वाजता. आई मीच काय पण शर्वरीसुद्धा तुला आमच्यापासून वेगळं करण्याचा कधीच विचार सुध्दा करणार नाही. तू आमचीच आहेस आणि आमचीच राहशील. फक्त तुला तुझ्या त्या वेळी केलेल्या चुकीची जाणीव मला करून द्यायची होती.
अगं वृद्धाश्रमात तुला पाठवून मला ऋग्वेदपुढे तुझा आदर्श नाही ठेवायचा आहे. तर एक उत्तम मुलगा होण्याचा माझा आदर्श निर्माण करून द्यायचा आहे.” हे ऐकून मनोरमाबाई खजिल झाल्या. त्यांनी हलकेच हसून डोळ्यांना पदर लावला. “बरोबर आहे तुझं श्रेयस. माझं चुकलं होतं. नव्हे, माझ्याकडून केवढी मोठी चूक झाली हे मला कळलं होतंच पण आज स्वतः प्रत्यय आल्यावर सासूबाईंनी काय सहन केलं असेल याची प्रकर्षाने जाणीव झाली मला. मला माफ कर तू ही! ”
असं म्हणत असतानाच ऋग्वेद डोळे चोळत आजीच्या पायाशी विळखा घालून आला, “आज्जीsss… उच्चून…..” त्याच्या निर्मळ स्पर्शाने त्यांचा जीव अगदी शांत झाला. शर्वरी आणि श्रेयससुद्धा आनंदाने हसले. मनोरमाबाईंनी मनोमन देवाचे शतशः आभार मानले आणि सासुबाईंची क्षमाही मागितली.
ll शुभं भवतु ll
अतुला प्रणव मेहेंदळे. ✍️
(कथा आवडल्यास नावासकट जरूर शेअर करा ही विनंती. फोटो गुगलवरून साभार 😊
छान आहे कथा!