Classified

ब्लँकेट © दीपक तांबोळी 9503011250

ब्लँकेट

-दीपक तांबोळी

“साहेब मी आलो दोन मिनिटात”करंगळी दाखवत माझा ड्रायव्हर, प्रकाश गाडीच्या बाहेर पडला.मी बाहेर पाहीलं.दिवस उजाडायला सुरुवात झाली होती.गाडी कितीही आरामदायी असली तरी नागपूर ते नाशिक प्रवास चांगलंच शरीर आंबवणारा होता.पाय मोकळे करण्यासाठी मी गाडीचं दार उघडून बाहेर आलो.बापरे!काय थंडी होती.मी कुडकुडू लागलो.मी लगेच गाडीतून स्वेटर काढून अंगावर चढवला. सहज माझी नजर रस्त्याच्या बाजूला उघड्यावर झोपलेल्या लोकांवर गेली.बिचारे!होते ते कपडे अंगावर लपेटून झोपले होते.एक बाई अंगाभोवती साडी लपेटून झोपली होती तर तिच्याच शेजारी एक पुरुष पोटाशी पाय घेऊन झोपला होता.दोघंही थंडीने कुडकुडत होते.मला दया आली.मी गाडीतली शाल काढून त्या पुरुषाच्या अंगावर टाकू लागलो.थंडीमुळे तो बहूतेक जागाच असावा.त्याने डोळे उघडले.” बाईच्या अंगावर टाका ” बाईकडे बोट दाखवून तो म्हणाला.मी बाईच्या अंगावर शाल टाकली.तीही बहुधा जागीच असावी.तिनं पटकन शाल तोंडापर्यंत ओढून घेतली.मी त्या माणसासाठी काही मिळतं का ते गाडीत पाहू लागलो.तेवढ्यात प्रकाश आला.” प्रकाश तुझ्याकडे शाल आहे का?”मी विचारलं
“हो आहे ना साहेब कशासाठी हवीये?”
“अरे त्या माणसासाठी हवीये.थंडीने कुडकडतोय बिचारा”मी समोरच्या माणसाकडे बोट दाखवत म्हणालो.
“जाऊ द्या ना साहेब!असे लाखो लोक रस्त्यावर थंडीत झोपतात.किती लोकांची तुम्ही काळजी घ्याल?”
“तू देतोहेस की नाही?”मी रागानेच त्याला विचारलं.”आणि तू काही काळजी करु नकोस.मी तुला नवी शाल घेऊन देईन “मी असं म्हंटल्यावर त्याने मुकाट्याने शाल काढून दिली.ती मी त्या माणसाच्या अंगावर टाकली आणि गाडीत जाऊन बसलो.

घरी येऊन मी पप्पांना हा किस्सा सांगितला.त्यांनी, मी दाखवलेल्या माणुसकीबद्दल माझी पाठ थोपटली.मग मी त्यांना म्हंटलं “पप्पा या कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपलेल्या लोकांना आपण ब्लँकेट्स द्यायची का?”
“हो चालेल ना!पण असे हजारो लोक रस्त्यावर झोपतात.आपण अशी किती ब्लँकेट्स वाटणार?”
” सुरुवातीला एक लाखात जितकी येतील तितकी वाटू.चांगला अनुभव आला तर पुढे संख्या वाढवू ”
“हरकत नाही.मी असं करतो.ज्या समाजसेवी संस्था असे उपक्रम राबवतात त्यांना तुझ्याकडे पाठवून देतो” पप्पा उत्तरले.
” हो चालेल.तेवढंच आपलं काम हलकं होईल ”

दुपारी आँफिसमध्ये दोन तीन जण माझ्याकडे आले.
” किती डोनेशन देणार आहात साहेब आमच्या संस्थेला?”त्यांनी विचारलं.
“डोनेशन नाही.सध्या तरी एक लाखात जितकी ब्लँकेट्स येतील ती घेऊन रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांना वाटायची आहेत”
मी असं म्हणाल्यावर त्यांचे डोळे चमकले.
“चालेल साहेब.पाचशे रुपयाचं एक अशी दोनशे ब्लँकेट्स येतील त्यात.तुम्ही चेक द्या.आम्ही करतो अँरेंज सगळं.तुम्ही स्वतः येणार का ब्लँकेटस् वाटायला?आपण फोटोग्राफरला बोलावून घेवू ”
” नाही. मला प्रसिद्धीची हाव नाही.गरिबांपर्यंत ती पोहोचणं महत्वाचं आहे.मला फक्त ब्लँकेट्स घेतल्याची पावती आणि एक ब्लँकेट क्वालिटी बघण्यासाठी पाठवून द्या”
“ओके साहेब”

दोन दिवसांनी संस्थेचे कार्यकर्ते रस्त्यावरच्या गरीबांवर ब्लँकेट्स पांघरतांनाचे फोटो सर्वच वर्तमानपत्रात झळकले.बातमीत माझ्या नावाचा उल्लेखही नव्हता.अर्थात मलाही प्रसिद्धीची हौस नव्हतीच.गरीबांपर्यंत ब्लँकेट्स पोहचली याचंच मला खुप समाधान वाटलं.

तीनचार दिवसांनी घरी परत येतांना शेजारच्या बंगल्याच्या सिक्युरिटी गार्डजवळ मी तसंच ब्लँकेट पाहीलं.कुतुहल म्हणून मी त्याला किंमत विचारली.
“दोनशे रुपये.चाळीवर एक जण विकायला आला होता.त्याच्याकडून घेतलं.पाचशे रुपये किंमत आहे त्याच्यावर. स्वस्तात मिळालं.छान आहे ना साहेब”
मला धक्का बसला.संस्थेच्या लोकांनी फुकटात मिळालेली ब्लँकेट्स स्वस्तात विकून टाकली होती असाच त्याचा अर्थ होता.मी ताबडतोब संस्थेच्या सचिवाला फोन करुन आँफिसमध्ये बोलावून घेतलं.मी विषय काढला तसा तो चपापला.मग म्हणाला.
“असं आहे साहेब.आपण ज्यांना गरीब म्हणून फुकटात ब्लँकेट्स देतो ते कमी किमतीत दुसऱ्यांना विकून टाकतात आणि आलेल्या पैशाची दारु पितात.कींव करण्याचे लायकीचे नसतात हे लोक ”
हा मला दुसरा धक्का होता.कोण खरं आहे आणि कोण खोटं हे मला कळेना.मी त्याला जायला सांगितलं. नंतर मला कळलं की संस्थेने फक्त शंभर ब्लँकेट्स खरेदी करुन त्यांचं वाटप केलं होतं.उरलेले पन्नास हजार त्यांनी अक्षरशः हडप केले होते.मला गरीबांविषयी वाटणाऱ्या कळवळ्याचा या लोकांनी गैरफायदा घेतला होता.मला खुप संताप आला.मी पप्पांना सर्व सांगितलं. पप्पा म्हंणाले “दुनिया ही अशीच आहे बेटा.समाजसेवेचा बाजार मांडलाय लोकांनी.आणि संस्थेचे लोक जे म्हणतात त्यातही तथ्य असू शकतं.तरीपण तू निराश होऊ नकोस.यातूनही काही मार्ग निघेल”

मग मी ठरवलं की दुसऱ्याच्या भरवशावर न रहाता आपण स्वतःच रात्री जाऊन ब्लँकेट्स वाटायची.
एका रात्री मी ब्लँकेट्स गाडीत टाकून निघालो.शहराच्या बाहेर एका मोकळ्या जागी उघड्यावर काही जण झोपले होते.एक तरुण तंबाखू चोळत बसला होता.मी त्याला जाऊन विचारलं
“कुणाला ब्लँकेट हवं आहे का?” त्याने माझ्याकडे रोखून पाहीलं आणि म्हणाला
” कशाला सवय लावता साहेब आम्हांला अशा गोष्टींची”
मी उडालोच.तो पुढे म्हणाला
” अहो आम्ही गरीब माणसं.थंडी,उन,पाऊस सगळ्यांना आम्ही पुरुन उरतो.बघा तुम्ही इतकं स्वेटर,जँकेट घालून आलात आणि मी बनियनवर बसलोय.अहो साहेब या शरीराचे जितके तुम्ही लाड कराल तितकं ते त्रास देतं.जितका तुम्ही त्याला त्रास द्याल तितकं ते व्यवस्थित रहातं. आमच्या गोधड्यांनीच आमचं काम भागतं साहेब,नको आम्हांला तुमची ब्लँकेट्स.”
” अहो तुमचं ठिक आहे.तुम्ही तरुण आहात.पण लहान मुलं,म्हातारे यांना नको का?त्यांना ही थंडी कशी सहन होणार?”मी प्रश्न केला.
“आमच्या मुलांची आणि म्हाताऱ्यांची आम्हालाही काळजी असते साहेब.त्यांची जबाबदारी आमच्यावरच असते ना”
माणूस वेगळा आणि प्रामाणिक वाटत होता.म्हणून मी त्याला संस्थेचा किस्सा सांगितला.तो म्हणाला
“साहेब तुम्हाला सांगू का आपल्या भारतात फुकट दिलेल्या गोष्टींची किंमत नसते लोकांना. तुम्ही संस्थेला फुकटचे एक लाख दिले.त्यांना त्याची किंमत वाटली नाही.त्यांनी घपला केला.ज्यांना ती ब्लँकेट्स मिळाली ते गरजू नव्हते.त्यांनीही ती विकून टाकली असतील कारण त्यांना ती फुकट मिळाली होती.त्यांना त्यांची किंमत काय असणार?मी मार्केट यार्डात हमाली करतो.त्यातून मिळालेल्या पैशातून जर मी एखादी वस्तू खरेदी केली तर मला तिची किंमत जास्त कळणार.कारण त्या पैशामागे मेहनत आहे.म्हणून म्हणतो कुणाला फुकट काही देऊ नका.एखाद्या वस्तूसाठी जेव्हा खिशातून पैसे जातात तेव्हाच लोकांना त्या वस्तूची किंमत कळते ”
मी अवाक झालो.माणसांच्या मानसशास्त्राची चांगलीच जाण त्याला दिसत होती.मला स्तब्ध झालेला पाहून तो म्हणाला.
“साहेब तुम्हाला द्यायचंच असेल तर ते एकदम गरजू आणि लाचार माणसांना द्या.आणि त्यांच्याकडून अगदी कमी का होईना,पैसे घ्या”
” पण मी अशी माणसं कशी ओळखणार?”मी म्हणालो.तो हसला.म्हणाला
” बरोबर ते तुमचं कामच नाही साहेब.अशी गरजू माणसं आम्हीच ओळखू शकतो.आपण असं करु,तुम्ही मला रोज फक्त दहा ब्लँकेट्स द्यायची.मी ती गरजू माणसांना देऊन त्यांच्याकडून मिळालेले पैसे तुम्हांला आणून देईन”
” तुम्ही मला फसवणार नाही कशावरुन?”
तो हसला.म्हणाला ” साहेब हाच तर प्राँब्लेम आहे आपल्या देशात.जनतेची करोडोंनी फसवणूक करणाऱ्या पांढऱ्या कपड्यातल्या काळ्या राजकारणी कावळ्यांवर तुम्ही विश्वास ठेवता.त्यांना पुन्हापुन्हा निवडून आणता.सुटाबुटातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवता,समाजसेवेच्या नावावर स्वतःचे खिसे भरणाऱ्या चमको समाजसेवकांवर विश्वास ठेवता आणि गरीबांवर विश्वास ठेवत नाही.घाबरु नका मी तसं काही करणार नाही”
तो जे म्हणत होता ते खरंच तर होतं.माणूस विश्वासू वाटत होता.आणि जरी त्याने फसवलं असतं तरी माझं फारसं नुकसान होणार नव्हतं.मी निर्णय घेतला.
” ठीक आहे.तुमचं नाव काय?”मी दहा ब्लँकेट्स त्याच्या स्वाधीन करत विचारलं.
“शंकर”

या गोष्टीला आता तीन वर्षे होऊन गेलीत.शंकर आता माझ्याच फँक्टरीत काम करतो.त्याच्यासारखा ईमानदार माणूस आजपर्यंत माझ्या पाहण्यात आलेला नाही.सामान्य माणसाचं मानसशास्त्र उत्तम समजणाऱ्या शंकरने फँक्टरीतल्या कामगारांच्या समस्या सोडवल्या आहेत.तोट्यात चालणारी फँक्टरी आता भरभराटीला आलीये.शंकरच्या मदतीने ब्लँकेट्सचं वाटपच नाही तर अन्नदान, वस्त्रदान असे अनेक समाजसेवेचे उपक्रम आम्ही राबवत आहोत.अनेक पुरस्कार आम्हाला मिळाले आहेत.पण आम्हाला त्याचं कौतुक नाही.तळागाळातील खऱ्याखुऱ्या गरजूंपर्यंत आम्ही पोहोचतोय याचंच आम्हांला समाधान वाटतंय.

© दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या “कथा माणुसकीच्या ” या पुस्तकातील आहे.कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही.माझ्या पुस्तकांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी क्रुपया वरील क्रमांकावर संपर्क करावा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}