मंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

गैरसमज ……….. दिलीप कजगांवकर, पुणे

गैरसमज
——-

समीर रिक्षा मिळण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा होता. समोरून येणाऱ्या साधारणतः सत्तरीच्या घरातल्या आजोबांना अचानक चक्कर आली. ते खाली कोसळणार, तेवढ्यात समीरने पटकन पुढे जाऊन त्यांना सावरले.

आजोबांना खूप घाम येत होता, छाती धडधडत होती. समीरने रिक्षा थांबवली आणि त्यांना जवळच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. आजोबांची एकंदर परिस्थिती पाहून रिक्षावाल्या काकांनी रिक्षा भाडे सुध्दा घेतले नाही. समीरने रिसेप्शनिस्टला काय झाले ते थोडक्यात सांगितले, आणि तो निघून गेला.

डॉक्टरांनी आजोबांना तपासले. केस खूप क्रिटिकल होती. आजोबा कोण कुठले काहीच माहीत नव्हते. डॉक्टरांना आजोबांच्या खिशात एक कागद आणि एक एन्व्हलप मिळाले. कागदावर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणून त्यांच्या मुलाचे नांव आणि फोन नंबर होता.

डॉक्टरांनी राज, म्हणजे आजोबांच्या अमेरिकेतील मुलाला फोन लावून त्यांच्या गंभीर परिस्थितीची माहिती दिली. डॉक्टर मला यायला जमणार नाही, परंतु तुम्ही बेस्ट ट्रीटमेंट द्या, जो काही खर्च होईल तो मी तुम्हाला पाठवीन.

हा सरकारी दवाखाना आहे त्यामुळे खर्च काहीच येणार नाही. तुमचे वडिल फक्त एक दोन दिवसांचे सोबती आहेत हे सांगितल्यावरही राजने यायला स्पष्ट नकार दिला. निर्लज्जपणाचा कळस पाहून डॅाक्टर आश्चर्यचकित झाले.

डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले परंतु ते आजोबांना वाचवू शकले नाहीत. पुढच्याच दिवशी आजोबा गेलेत. डॉक्टरांनी राजला परत एकदा फोन केला. डॉक्टर मी येऊ शकत नाही, तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या, त्यासाठी लागणारा खर्च मी तुम्हाला पाठवीन.

गरज नाही पैसे पाठवण्याची, तुमचे वडिल माझ्या वडिलांसारखे आहेत. मी करीन खर्च, डॉक्टर म्हणालेत.

डॉक्टर, मी आत येऊ का असे विचारत एका तरुणाने डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. मी समीर, काल मी एका आजोबांना हॉस्पिटल मध्ये आणले होते. त्यांची तब्येत कशी आहे? समीर विचारत होता. काल मला एका इंटरव्यूला जायचे होते म्हणून मी त्यांना येथे सोडले आणि घाईघाईत गेलो. खुप दिवसांपासून मी नोकरी शोधत होतो. काल मला आजेबांच्या आशीर्वादाने नोकरी मिळाली. आजोबांच्या औषधासाठी म्हणून मी दहा हजार रुपये द्यायला आलोय. मला त्यांना भेटता येईल का? समीरने विचारले.

डॉक्टरांनी त्याला आजोबांच्या मृत्यूबद्दल सांगताच समीरला रडु कोसळले. आजोबांचा मुलगा अंत्यसंस्कार करायला देखील यायला तयार नव्हता आणि एक अनोळखी मुलगा आजोबांना भेटायला आला होता तेही दहा हजार रुपये घेऊन आणि त्यांच्या जाण्याचे कळल्यावर ढसाढसा रडत होता. डॉक्टरांनी समीरचा पत्ता आणि फोन नंबर घेतला.

अचानक डॉक्टरांच्या लक्षात आले की आजोबांच्या खिशात एक अेन्व्हलप होते. डॉक्टरांनी ते उघडले. त्यामध्ये एक लॉटरीचे तिकीट होते. लॉटरीचा काल लागलेला निकाल आजच्या पेपर मध्ये आला होता.
डॉक्टरांनी मोठ्या कुतूहलाने निकाल बघितला आणि काय आश्चर्य! त्या तिकिटाला एक कोटी रुपयांचे बक्षीस लागले होते.

डॉक्टरांनी राजला परत एकदा फोन केला आणि एक कोटीच्या बक्षिसाबद्दल सांगितले. बक्षिसाच्या रकमेचे काय करायचे? डॉक्टरांनी विचारले. तुम्ही डेड बॉडी शीतगृहात ठेवा, मी येतो. पैशाचा मोह आवरला नसावा, राजने येण्याचे मान्य केले.

सांगितल्याप्रमाणे राज भारतात आला. डॉक्टरांना भेटला, डॉक्टरांनी काय घडले ते सर्व थोडक्यात सांगितले, समीरचे डिटेल्स दिलेत.

तुम्ही अंत्यसंस्कार करून या, त्यानंतर मी तुम्हाला लॉटरीचे तिकीट देईन, डॉक्टरांनी सांगितले. राज वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी डेड बॉडी घेऊन गेला.

पाच वाजलेत तरीही राज परत आला नाही म्हणून डॉक्टरांनी राजला फोन केला. राज, मी अजून एक तास हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्यानंतर मी घरी जाईन. मी हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्येच राहतो. आल्यावर रिसेप्शनमधुन मला फोन करा, मी तुम्हाला लॉटरीचे तिकीट देईन डॉक्टरांनी सांगितले.

आता तुम्ही कुठे आहात? डॉक्टरांनी विचारले. डॉक्टर, मी एअरपोर्टवर आहे. मला माफ करा मी तुम्हाला न भेटताच परत जायला निघालो.

राज, पण त्या लॉटरीच्या तिकिटाचे काय करायचे? तेवढ्यासाठीच तर तुम्ही भारतात आलात ना?

डॉक्टर मी तुमच्या रिसेप्शनिस्टकडे एक अॅाथॅारिटी लेटर दिले आहे. त्यामध्ये मी लिहिले आहे की बक्षिसाच्या रकमेतील एक लाख रुपये समीरला द्यावेत आणि उरलेले हॉस्पिटलला डोनेशन द्यावे.

राज, तुम्हाला पैसे नको होते तर तुम्ही इतक्या दूर का आलात? डॉक्टरांनी विचारले.

डॉक्टर, तुम्ही मला बाबा क्रिटिकल कंडिशनमध्ये आहेत असा फोन केला त्यावेळी माझ्या एकुलत्या एक मुलाला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते आणि त्याची कंडिशन सुध्दा खुप क्रिटिकल होती. मी आणि माझी पत्नी काही वर्षांपूर्वीच विभक्त झालो त्यामुळे मुलापाशी फक्त मीच होतो. मला तेथून निघता येत नव्हते.

बाबा गेल्याचे तुम्ही सांगितले, त्यावेळी माझ्या मुलाचे ऑपरेशन सुरू होते आणि म्हणूनच, मी येऊ शकत नाही, तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या असे मी सांगितले.

दोन तासांनी तुम्ही फोन केला, तोपर्यंत ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले होते आणि डॉक्टरांनी सांगितले की आता काळजी करण्यासारखे नाही. मी माझ्या एका मित्राला हॉस्पिटलमध्ये थांबविले आणि भारतात आलो. मित्राला तेथे किती वेळ थांबवणार, म्हणून मी घाई घाईतच अमेरिकेला परत जातोय.

तुम्ही केलेल्या मदतीबद्दल मी तुमचे मनस्वी आभार मानतो, असे “म्हणताना” राजला आणि ते “ऐकताना” डॉक्टरांना आश्रु आवरता आले नाहीत.

राजच्या वागण्याची डॅाक्टरांना आलेली चीड, क्षणात नाहीशी झाली आणि त्याच्याबद्दल करून घेतलेल्या गैरसमजाबद्दल डॉक्टरांना स्वतःचीच कीव आली.

डॉक्टर राजला धीर देत म्हणालेत, तुमचा मुलगा लवकर बरा होवो ही माझी परमेश्वरापाशी प्रार्थना.

– दिलीप कजगांवकर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}