मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

#उबदार_स्वेटर …………. ©अर्चना बोरावके”मनस्वी”

#उबदार_स्वेटर
©अर्चना बोरावके”मनस्वी”
वामनराव झोपाळ्यावर बसले होते…. समोर पेपर होता. दृष्टी पेपरवर होती पण मनात मात्र दुसरेच विचार सुरू होते. उन्हं कलली आणि थंड वारा अंगाला झोंबू लागला . ते उठून आत आले…. एखादी शाल अंगावर घ्यावी म्हणुन कपाट उघडले…. सगळ्यात खालच्या कप्प्यात ठेवलेले गरम कपडे अजून बाहेर आले नव्हते…. त्यांनी खाली वाकून एक शाल काढली…. आणि त्यात लपेटलेले स्वेटर त्यांना दिसले. अगदी नवं दिसत होतं ते स्वेटर! ते हातात घेताच त्यातून एक चिट्ठी पडली. त्यांनी आश्चर्याने चिट्ठी उघडली.
” काय कसं वाटलं माझं गिफ्ट? मला माहीत आहे तुम्हाला थंडी जराही सहन होत नाही…. थोडा गार वारा अंगाला लागला की येणारच शालीची आठवण! आता हे स्वेटर घालून बघा… अगदी उबदार आहे! ”
पुढचे त्यांना वाचताच येईना…. डोळे पाण्याने भरून गेले. स्वेटर हातात घेऊन ते पलंगावर जाऊन बसले. चार महिने झाले होते कुसुमताईंना जाऊन….. पण असा एकही दिवस नव्हता जो त्यांच्या आठवणीशिवाय गेला होता…. नव्हे दिवस त्यांच्या हातच्या चहाच्या आठवणीनेच सुरू व्हायचा आणि रात्री डोळे मिटायचे ते ही कुसुमताईंनी न चुकता दिलेल्या गोळ्यांच्या आठवणीने!
हे स्वेटर तिने कधी विणले? मला तर कधी दिसली नाही विणताना! त्यांनी पत्र पुढे वाचायला घेतले.
” मी स्वेटर कधी विणले, हा प्रश्न आला ना मनात? मला अ‍ॅटॅक आला आणि तुम्ही माझे सर्व कामच बंद करून टाकले…. दवाखान्यात होते तोपर्यंत ठीक होते…. पण घरी आल्यावरही तुम्ही मला कशाला हात लावू देत नसायचे…. मी कंटाळून जायची… मग ठरवलं तुमच्यासाठी स्वेटर विणावे…. मी नसताना माझी ही उबदार आठवण तुमच्याजवळ कायम राहील! सूनबाईला सांगून लोकर मागवली. मला माहित आहे तुम्हाला निळा रंग खूप आवडतो… म्हणुन निळाच रंग निवडला. आपण संसाराला सुरुवात केली तेव्हा आपल्या मनाचे धागे सरळ- समांतर होते…. एकमेकांना काय आवडते माहीत नव्हते…. स्वभाव माहीत नव्हते….. पण जसजशी वर्षे सरत गेली, मनाचे धागे असे जुळले की नात्यांची वीण घट्ट होत गेली…. या स्वेटरवर मी गुंफलेल्या निळ्या आणि लाल लोकरीच्या धाग्यांसारखी!… माझे जीवन तुमच्या भोवतीच गुंफलेले होत ना!.. तुम्ही मला नेहमी म्हणायचा,
‘ कुसुम, प्रत्येक गोष्ट तू माझ्या आनंदासाठी करते, पण स्वतःसाठीही काही करत जा… तुझेही वेगळे अस्तित्व आहे…. म्हणुनच मी संसार सांभाळून कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे क्लास घेत राहिले…. माझी ओळख जपली. तुमच्या आवडीच्या निळ्या रंगात माझ्या अस्तित्वाचा हा लाल रंग बघा कसा उठून आलाय!
आणि स्वेटरच्या बाहीवर पाहिलं का तुम्ही? बारीक फुलांची नक्षी आहे! आपण एकत्र फुलवलेल्या संसाराच्या बागेतली ही हसरी फुले!
जेव्हा मला जाणीव झाली की आता, आपला एकत्र प्रवास लवकरच संपणार आहे, तेव्हा अनेक आठवणी मनात येऊ लागल्या. स्वेटर विणताना सगळ्या सुखद आठवणी वाढत्या विणीप्रमाणे जोडून ठेवल्यात आणि जे दुःखाचे क्षण होते ते घटत्या विणीप्रमाणे स्मृतीतून काढून टाकण्याचा प्रयत्न केलाय. जीवनात अनेक चढ-उतार आले. कधी आयुष्य अगदी सुरळीत चालले होते सरळ टाक्यांसारखे….. तर कधी सगळंच उलटं होऊन बसायचं, या उलट्या टाक्यांसारखं. बर्‍याच वेळा पुढे जाऊन मागेही यावे लागलं. पण एक मात्र झालं या सरळ आणि उलट्या विणीमळे आपलं जीवन परिपूर्ण झालं…मनात चांगल्या वाईट घटनांचे ठसे उमटले स्वेटरवरच्या नक्षीप्रमाणे !
खूप आनंद दिलात तुम्ही मला! न मागताच सर्व दिले…. मी तुमची सेवा करायची तर तुम्हालाच माझी सेवा करावी लागली.
मला आठवतंय माझ्याशिवाय तुमचं आधी पानही हलत नव्हतं….. पण हळू हळू तुम्ही सर्व शिकलात….माझ्यावरच्या प्रेमाखातर ! माझ्या आजारपणात तुम्ही माझ्यासाठी आनंदाचा एकेक क्षण गोळा करून आणलात….माझ्याजवळ बसुन गप्पा मारता मारता आयुष्याचा प्रत्येक क्षण पुन्हा मनात जागवला…. तेव्हाच ठरवलं, मी बरोबर नसतानाही आपल्या सहवासाच्या आठवणी स्वेटरच्या रुपाने गुंफून तुमच्या हाती द्याव्यात….. आपले प्रेम, एकमेकांवरील विश्वास, सुखदुःखाचे क्षण…. या सर्व आठवणींचे धागे मी यात गुंफलेले आहेत… ही वीण इतकी घट्ट आहे की, सुटता सुटायची नाही……
आता एकटंच दुःख करत बसायचे नाही… या उबदार आठवणी अंगावर लपेटून पुढची वाटचाल करायची…..मी या स्वेटरच्या रुपाने तुमच्या अगदी जवळ आहे…. ”
वामनरावांनी डोळे पुसले… आपला सुरकुतलेला हात त्या स्वेटरच्या प्रत्येक धाग्यावरून फिरवला… त्या उबदार स्पर्शाने त्यांना उभारी आली आणि पुढच्या वाटचालीसाठी आठवणींची शिदोरी मिळाली !
©अर्चना बोरावके”मनस्वी”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}