आनंदाच्या व्याख्या ………जयंत विद्वांस
🔸आनंदाच्या व्याख्या.🔸
लहानपणी काही गोष्टी खरंतर इतक्या किरकोळ, निरुद्देशी, कुठलाही फायदा नसलेल्या असायच्या की आपण त्या का करायचो किंवा काही अजून का करतो याचं कोडं उलगडत नाही. आता हसू येईल पण लहान असताना त्या गोष्टी करायला, बघायला का आवडायच्या हे अजूनही न सुटलेलं कोडं आहे. रस्त्यावर लागणारी कल्हई आता नामशेष झाली. चाळीत रहात असताना तो सोहळा बघणं हे मोठं अप्रूप होतं. तांब्या पितळ्याची भांडी हल्ली शोपीस म्हणून जास्ती असतात आणि वापर कमी. त्यात आता त्याला प्लेटिंग करून मिळतं, कल्हई कोण लावणार. पण बालपणी कल्हईवाल्याच्या त्या खड्डा करण्यापासून सगळी भांडी बायका घेऊन जाईपर्यंतच्या प्रवासात मी सोबतीला हजर राहिलेलो आहे. नवसागराचा धूर, ब्युटीपार्लर मधून बाहेर आल्यावर तीच का ही असा प्रश्नं पडावा अस त्या कळकट्ट वस्तूंना कल्हई पसरताना येणारं ते लख्ख गोरेपण आणि गरम भांड्याचा पाण्यात येणारा तो चुर्र आवाज या गोष्टींमधे उकिडवं बसून बघण्यासारखं काय आहे खरंतर पण मी अनेकवेळा मी ते आनंदाने पाहिलंय. कित्त्येक वेळा सिनेमात तो दाट पांढरा धूर बघितला की मला तो नवसागराचा धूर वाटायचा.
आता बोहारणी येत नाहीत दारावर पण लहान असताना ती बार्टर सिस्टीम मी अगदी मन लावून पाहिली आहे. साड्या, कपडे किती द्यायचे आणि भांडी कुठली घ्यायची याची गणितं दोन्हीकडे ठरलेली असायची. ती बाई जुने कपडे घेऊन कशी काय नवीन भांडी देते याचं मला कायम कोडं पडायचं. घासाघीस व्हायची फार, मनाजोगता व्यवहार दोन्हीकडे झाला की मग घाम टिपला जायचा. पाणी पिऊन पुढच्या टायमाला लागणारं भांडं आणि त्याचा एक्स्चेंज रेट ठरायचा. मला जाम कुतूहल असायचं ती बाई एवढं लक्षात कसं ठेवत असेल याचं. नंतर कळत गेलं की पुढच्या वेळी मागचं फक्तं आठवल्यासारखं करायचं असतं आणि भाव कसे वाढलेत याची टेप वाजवायची असते. काही बायका खेळाडू राखून ठेवावेत तसे काही कपडे राखून ठेवून अगदी नाईलाज झाल्यासारखं दाखवत कपडे, साड्या बाहेर काढायच्या. स्किल असतं ते, ‘तुला म्हणून नवीन करकरीत साडी देतीये’ हे जे काय एक्सप्रेशन असतं ना त्याला तोड नाही तुम्हांला सांगतो. काहीवेळेस मात्रं मनाचा मोठेपणा दिसायचा. एकदा सगळी घासाघीस झाल्यावर ज्या बाईने भांडी घेतली तिच्याकडे लहान मूल होतं, त्याला त्या बोहारणीने एक स्टीलची मध्यम वाटी आणि एक चमचा असाच सप्रेम दिला. ‘लेकरू अजून दूध पितंय तर माझ्या वाटी चमच्याने पिऊ दे’, म्हणाली. अशावेळी श्रीमंत कोण हा प्रश्नं पडतो.
अजून एक निरुद्देशी काम म्हणजे गल्लीतल्या रस्त्याचे डांबरीकरण बघणे. आता ऍडव्हान्स्ड मशिनरी आल्या. तेंव्हा ते रोलर बरोबर चालायचं म्हणजे भारी वाटायचं. याचे ब्रेक समजा उतारावर लागेलच नाहीत तर? असलं अभद्र मला बालपणापासून डोक्यात यायचं. ते बोजड गमबूट, त्या काळपट झा-या, त्यातून पडणारा तो गरम काळा पाऊस, ती खर, खडी, मुकादमांच्या शिव्या, डांबराचा तो वास आणि रस्त्याला येणारं ते काळं कुळकुळीत पण तुकतुकीत सुंदर रुपडं बघायला भारी वाटायचं. नुकताच तयार झालेला डांबरी रोड मला कायम देखणा वाटत आलेला आहे. माया असल्यासारखा तो पायाला कसा दबदबीत लागतो. त्याच्यावर एकदा ते पांढरे, पिवळे पट्टे मापात ओढून झाले की अगदी चित्रं काढावं असा तो सुंदर दिसतो. उन्हाळ्यात रस्त्याची काम मुद्दाम करतात का? पावसाळ्यात नाही शक्यं पण थंडीत का करत नाहीत? त्या माणसांना जो उन्हाचा त्रास होतो तो तरी निदान कमी होईल. पण मार्च एंडच्या आत निधी संपवायचा (शब्दशः संपवायचा) असल्याने यांना जाग येत असावी. कुणाचा तरी त्रास कमी करण्याची आपली वृत्ती नाही, खरंतर यात काहीही जास्तीचे पैसे जाणार नाहीत.
चाळीत असताना अंगणं केलीयेत, ती मजा गेली. आता अंगण कुठे उरलंय. आहे तिथे फरश्या घालून सगळं कसं तुकतुकीत करून टाकलंय आपण. जेसीबीचं खोदकाम बघणे, स्लॅब पडताना, सुतारकाम चालू असताना बघणे हे ही त्या काळात आवडीचं होतं. फ्रेंच पॉलिश वस्तूवर लावण्याची क्रिया वेळखाऊ पण आकर्षक वाटत आलीये मला. ते मेण भरून झालं की फाऊंडेशन तयार होतं मग पंढरी जुकरनी वरचे थर चालू केल्यावर हिरोईन जशी सुंदर दिसायची तशी ती वस्तू ग्लॉसी होत जाते. काय एकसारखा हात चालतो त्या लोकांचा. आता टाईल्स आल्या पण तेंव्हा शहाबादीमधे ती दोरी आपटून बॉर्डर आखली जायची ते ही बघायला मजा यायची, एक रेष खूप फरक करून जायची. रंधा मारताना, पटाशीला धार लावताना त्या माणसांची एकतानता बघणीय असते. स्टोव्ह तर कधीच बाद झाले पण ते रिपेअरवाले काय करत असतील आता? बर्नर जाळणे, तो सांडशीत धरून आपटून आतलं काळं बाहेर काढून त्याला परत जागेवर लावून पंप मारून, रग्गड रॉकेल नासवून (बायकांचे चेहरे उतरायचे अगदी रॉकेल संपताना बघून), पिन मारल्यावर जो एक भक्कन आवाज येऊन तो स्टोव्ह पेटायचा ना त्याला तोड नव्हती. बायका सगळ्यात पहिलं काय करत असतील तर किल्ली सोडून रॉकेल वाचवायच्या.
वाळवणं तर कधीच संपली. अंगणात किलोमीटरभर अंतरात एकही गुर नसताना पण उगाच काठी घेऊन पापड्या, कीस, सांडगे याच्या वाळवणावर देखरेख करणं सुट्टीतलं आनंददायी काम होतं. कच्चे सांडगे खरंतर जास्ती छान लागतात. ऐनवेळी भाजी नसेल तर अशा करून ठेवलेल्या गोष्टी खूप कामाला यायच्या. तोंडी लावण्यावरसुद्धा जेवणं पार पडायची. वर्षभराच्या लोणच्यासाठी चिरली जाणारी कैरी, नंतर ती नाकात जाणारी मोहरी आणि अगदी दादरा बांधेपर्यंतची प्रोसेससुद्धा मला आवडत आली आहे. साबुदाण्याची ती मीठ घातलेली खीर छान लागायची आणि नंतर वरून वाळलेली पण खालून ओली असलेली कच्ची पापडी अजून जिभेवर चव राखून आहे. वाफेवरच्या तांदुळाच्या पापड्या वाळत घालताना सरळ नाही पडल्या नावाखाली तशाच गट्टम करता यायच्या. किती गोष्टी असतात छोट्या छोट्या यात लपलेल्या. प्लास्टिकवरून पापड्या, कीस सोडवताना एक आवाज येतो, तो आवाज ऐकण्यासाठी मी ते काम केलेलं आहे. सकाळी दुधाळ दिसणारी साबुदाण्याची पापडी वाळल्यावर सी थ्रू कशी काय होते असं वाटायचं. सकाळी लिबलिबीत असलेला बटाट्याचा कीस वाळल्यावर तर्कट, विक्षिप्त माणसासारखा एवढा का टोकदार होतो असं वाटायचं. ऊन तेच पण त्यात पोळल्यावर स्वभाव सारखे असतीलच असं नाही.
आता तुम्ही ते बबलपेपरचे टुचुक आवाज काढता, लहान असताना प्लास्टिक पिशवीत हवा भरून ती फोडणे, फाटलेल्या फुग्याच्या चिंगळ्या करून त्या दुस-याच्या अंगावर, डोक्यावर दाबून फोडणे, तळहाताला फेव्हिकॉल लावून नंतर ते काढत बसणे, मेणबत्तीने हातावर मेण सांडून बोटाचे ठसे कसे दिसतात ते बघणे, सायकलचं पंक्चर काढताना बघणे, कुणाकडे कार्य असेल तर मांडव टाकताना बघणे, उगाच गल्लीतली कुत्री हातात काठी घेऊन ती किंवा आम्ही दमेपर्यंत हुसकावणे, सायकलचे टायर किंवा लोखंडी तारेत अडकवलेली रिंग घेऊन फिरवत तासंतास भटकणे, पावसाळ्यात चिखलात सळई रोवत हिंडणे ही अनेक निरुद्देशी, बिनखर्चीक आनंद देणारी कामं केली याची अजिबात खंत वाटत नाही. यात आनंद वाटण्याचं कारण काय याचं कोड नक्कीच आहे. त्याने ज्ञानात काही भर नसेल पडली पण निरीक्षणशक्ती वाढली असावी, एकाजागी बसण्याची तपश्चर्या झाली असावी कळत नकळत, माहित नाही. पण या सगळ्यात माणूस घरकोंबडा नव्हता, घराच्या बाहेर असायचा, निसर्गाच्या जवळ असायचा, कुतूहल निर्माण व्हायचं कदाचित.
काळ बदलतच असतो. गतकाळात फार रमूही नये. प्रत्येक पिढीची बालपणं निराळी, आठवणी निराळ्या. पण आता माणूस पैशाच्या मागे फार आहे. घरकोंबडा होऊन साधनांनी मिळणारा आनंद जास्ती घेतो. इतकी व्यवधानं त्याने मागे लावून घेतलीयेत की त्याला आता असल्या फायदे नसलेल्या गोष्टींसाठी वेळ काढणं शक्यं नाही हा एक भाग आणि असं काही केलं तर लोक काय म्हणतील याचा गिल्ट हा दुसरा भाग. रस्त्याने जाताना बॉल टाकल्याची ऍक्टिंग करणं या वयात हास्यास्पद असेल पण लहानपणी तसं करताना कपिलनंतर आपणच असं वाटून जायचं. अजूनही मला वरच्या सगळ्या गोष्टींसाठी रस्त्यात थांबावंसं वाटतं पण शक्यं होत नाही. तरी अजून ड्रॉवर साफ करताना काढलेले पेपर बाsssरीक तुकडे करून फाडणे, कात्री घेऊन पेपर कापत नक्ष्या तयार करणे, आवरण्याचा नावाखाली टाकायच्या वस्तू ठरवणे या आनंददायी निरर्थक गोष्टी बाकी आहेतच.
आनंदाच्या व्याख्या बदलल्या याचं दुःखं अजिबात नाही पण छोट्या छोट्या निरर्थक गोष्टीतून पण तो मिळतो हे आपण विसरत चाललोय याचं दुःखं जास्ती आहे.
जयंत विद्वांस.