★★पगडी★★ ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★पगडी★★
पुण्याहून आलेलं, साठेकाकांचं पत्र मी वाचलं. अश्रूंनी पत्रातील अक्षरं धूसर व्हायला लागली. माझ्या हातातले पत्र घेत अवनीने विचारले, “प्रसाद,बघू काय लिहिलं आहे?” अवनीने पत्र वाचलं. मला पाठीवर थोपटत म्हणाली, “प्रसाद,हा दिवस कधीतरी येणारच होता. त्या वाड्याला शंभर वर्षे होऊन गेली. किती मोडकळीस आलाय. तो आता पाडणंच योग्य आहे,नाहीतर काहीतरी विपरीत घटना घडायची.”
“हो खरंय तुझं, पण आठवणी आहेत ना! त्या अशा सहजासहजी जाणार नाहीत. सगळेच भाडेकरू सोडून गेले आहेत. आता नवीन टोलेजंग इमारत उभी राहणार. पुढच्या महिन्यात वाडा जमीनदोस्त करताहेत. मी एक रात्र वाड्यात राहून येतो.”
“प्रसाद तिथे आता कोणीही राहत नाही.तू कोणाकडे राहणार?”
“वॉचमन ठेवलाय की आता! आम्ही राहायचो त्याच घरात एक रात्र झोपेन. त्या वाड्याची ऊब घेऊन परत येतो. त्या मातीचा सुगंध श्वासात भरून घेतो. ते चौकातील तुळशीवृंदावन डोळ्यात साठवतो. एक रात्र माझं बालपण मला अनुभवायचं आहे. एक चटई आणि एक चादर मला पुरेशी आहे. एका रात्रीचा तर प्रश्न आहे. आजच ऑफिस करून निघतो. वाशीहून पुण्याला अडीच तासात पोहोचतो. उद्या सकाळी पुण्याहून निघून सरळ ऑफिसमध्ये जाईन. आता तू मला अडवू नकोस.”
“ठीक आहे पण ड्रायव्हर घेऊन जा. तू गाडी चालवू नकोस.” अवनीला ठाऊक होतं,मी वाड्याच्या आठवणीत रमणार आणि अशा वेळेला मी गाडी चालवणं योग्य नव्हतं. पुण्याचा वाडा हा माझा वीक पॉंईट होता.
ऑफिस करून वाशीहून मी पुण्याला निघालो. मागच्या सीटवर मान टाकून डोळे मिटून बसलो डोळ्यासमोर पुण्यातील कसबा पेठमधला वाडा आला. प्रशस्त,दोन मजली, वरखाली मिळून दहा बिऱ्हाडं,मधे एक मोठा चौक. तिथेच मोठं तुळशी वृंदावन. तिथल्या मित्रांबरोबर वाड्यात खेळलेली लपाछपी, उन्हाळ्याच्या सुट्टीत,आईचं अंगणात टाकलेलं वाळवण आणि त्यावर पहारा देणारा मी, आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे प्रेमळ, त्या वाड्याचे मालक आणि मालकीण जोग काका आणि काकू! आणि तो वाडा, ज्याचं नाव होतं…’आपुलकी’.
वाड्यात मी आईचं बोट धरून पाऊल टाकलं आणि आनंदाने अंग शहारलं. मी जेमतेम चार वर्षांचा असेन. त्या बालवयात देखील मला प्रसन्न अनुभूती आली. बाबांची साताऱ्याहून पुण्यात बदली झाली. त्याकाळी पगार असा कितीसा असणार? पुण्यासारख्या शहरात राहून संसार नेटाने करायचा होता. जोग काकांच्या वाड्यात दोन खोल्या भाड्याने द्यायच्या आहेत,हे बाबांना कळलं आणि लागलीच आम्ही इथे राहायला आलो. जोग काका पुणे विद्यापीठात संस्कृत ह्या विषयाचे प्राध्यापक होते. त्यांचा संस्कृतचा गाढा अभ्यास होता. ते सुवर्ण पदकाचे मानकरी होते. गीता,उपनिषदे ह्यावर त्यांचा प्रचंड अभ्यास होता. अर्थात हे मला मोठे झाल्यावर कळले. वाड्यात आलो तेव्हा जोग काका म्हणजे फक्त लाड,कौतुक करणारे काका होते. साठेकाका आणि काकू आमचे सख्खे शेजारी होते.
आम्ही आलो त्याच दिवशी,जोग काकू घरी आल्या आणि आईला हक्काने सांगून गेल्या, “सामान पूर्ण लागेपर्यंत स्वयंपाक करायचा नाही. मी डबा पाठवत जाईन.” मी न्यू इंग्लिश स्कुल मध्ये प्रवेश घेतला. जोग काकूंचा मुलगा,सुहास पण त्याच शाळेत शिकत होता. मला एक वर्ष सिनिअर. वाड्यातल्या सगळ्या मुलांशी माझी छान गट्टी जमली पण सुहास आमच्यात फारसा मिसळत नसे. वाडा आपल्या मालकीचा आहे,ही भावना,इतक्या लहान वयात त्याच्या मनात रुजली होती. कधीकधी तर आमच्यावर कारण नसताना रुबाब करत असे. मी चिडायचो पण आई मला समजवायची.”सोडून दे प्रसाद,आपल्याला गरज आहे ना! इतक्या कमी भाड्यात दुसरीकडे जागा मिळणार आहे का? आणि जोग काका,काकू किती प्रेमळ आहेत,त्यांच्याकडे बघ.” मला माघार घ्यावी लागत असे.
सुहासच्या अशा स्वभावामुळे मी त्यांच्या घरी फारसा जात नव्हतो. मी आठवीत असताना एक दिवस सुहास घरी नसताना काकूंनी मला त्यांच्या घरी जेवायला बोलावलं. मी घरात शिरल्यावर काकूंनी मायेने जवळ घेतलं. “प्रसाद,आज श्रीखंड केलं आहे. तुला आवडतं मला ठाऊक आहे,म्हणून तुला आज जेवायला इकडेच ये म्हटलं. सुहास गेलाय दोन दिवस त्याच्या आत्याकडे. मला माहिती आहे,तुझं आणि त्याचं फारसं पटत नाही. मी तरी काय करू रे? तो आहेच असा विक्षिप्त! आपल्या आजोबांवर गेलाय. माझे सासरे असेच होते. आम्ही दोघेही त्याला सांगून थकलो पण त्याच्यात काही बदल होत नाही.”
काकूंनी मला आग्रह करून जेवू घातलं. डब्यात श्रीखंड घालून दिलं. मी घरी जायला निघणार इतक्यात काचेच्या कपाटात मला एक पगडी दिसली. मी कुतूहलाने काकूंना विचारलं, “काकू,ही पगडी कोणाची आहे?”
” संस्कृतचे पंडित म्हणून विद्यापीठाकडून ही काकांना मानाने मिळाली आहे. ही पगडी म्हणजे त्याचं सर्वस्व. रोज ती स्वच्छ करून कपाटात ठेवतात.” काकू हसत म्हणाल्या.
“काकांचं सर्वस्व असणारच काकू! त्यांना मिळालेला हा खूप मोठा सन्मान आहे.” माझ्या नकळत मी त्या पगडीला नमस्कार केला.
दिवस सरत होते. बाबांना आता पगार चांगला मिळत होता. मी बारावी झालो आणि बाबांनी वाडा सोडायचा निर्णय घेतला. इतकी वर्षे त्या वाड्यात राहून तो आपलाच वाटायला लागला होता. तिथून निघताना पाय जड झाले होते. आई आणि जोगकाकू एकमेकींच्या गळ्यात पडून रडल्या. जोग काकांना मी नमस्कार केला आणि काकूंना नमस्कार करायला वाकणार इतक्यात त्यांनी मला छातीशी घट्ट धरले आणि हमसून रडू लागल्या. “प्रसाद, येत जा रे अधूनमधून.” इतकंच बोलल्या आणि रडत आत निघून गेल्या. सुहास लांबून सगळं बघत होता पण काहीही बोलला नाही.
मी अधूनमधून काका,काकूंना भेटायला जातच होतो.
कालांतराने ते कमी होत गेलं. काका,काकूंशी फोनवर बोलणं व्हायचं. सुहास उच्चशिक्षणासाठी अमेरीकेला गेला हे त्यांच्याकडून कळलं. सुहासला त्या वाड्यात काहीही रस नव्हता. इतकी मोठी इस्टेट, पण तो अजिबात लक्ष घालत नव्हता. सुहासच्या ह्या वर्तनाने जोगकाका आजारी पडले. त्यातून ते उठलेच नाहीत आणि काकूंना एकटं मागे ठेवून हे जग सोडून गेले.
मी इंजिनिअर झालो. मला मुंबईत नोकरी मिळाली आणि आम्ही मुंबईत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. बाबांनी स्वेच्छेने निवृत्ती घेतली. मुंबईला जायच्या आधी मला जोगकाकूंना भेटायचं होतं पण कामाच्या गडबडीत मला जमलंच नाही. मी त्यांच्याशी फोनवर बोललो. “काकू,काळजी घ्या. काही गरज पडली तर निःसंकोचपणे मला फोन करा. मी तुमचा मुलगाच आहे ”
“सुखी रहा,खूप मोठा हो ” काकू इतकंच बोलल्या. माझ्या घशात आवंढा आला.
वर्षभरात मला साठेकाकांचा फोन आला,जोग काकू अनंतात विलीन झाल्या होत्या. शेवटच्या क्षणी सुहास त्यांच्याजवळ नव्हताच. आणि मी कामानिमित्त दौऱ्यावर होतो. ती हळहळ,रुखरुख मनात कायम घर करून बसली.
मुंबईत स्थायिक झाल्यावर माझ्याच ऑफिसमधली सहकारी अवनी लेले,हिच्याशी मी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आईबाबा आता वृद्धत्वामुळे थकले होते. मला जुळ्या मुली झाल्या. आयुष्य एका छान वळणावर आलं होतं.
साठेकाकांच्या पत्राने मी सुखद आठवणीत रमलो होतो.
“साहेब,कसबा पेठेत कुठे उतरायचं?” ड्रायव्हरच्या बोलण्याने मी डोळे उघडले. “आधी कसबा गणपतीचे दर्शन घेऊ,मग मी पत्ता सांगतो.”
गणपतीचे दर्शन घेऊन मी वाड्यात पाऊल ठेवलं. त्यावेळी प्रसन्न वाटलेला वाडा आज मला भकास वाटला. आधी जोग काकूंच्या दाराशी गेलो,बाहेरूनच नमस्कार केला. तुळस पूर्ण सुकली होती. वृंदावनाला नमस्कार केला आणि आमच्या घरात आलो. सगळीकडे,धूळ,जळमटे होती. वॉचमनला सांगून बाहेरची खोली थोडी स्वच्छ केली आणि जमिनीवर चटई टाकली. वाचत पडलो होतो, इतक्यात मला कोणीतरी हलवलं. मी बघितलं तर जोग काकू होत्या.
मी घाबरलो. “काकू,तुम्ही?”
“प्रसाद, आमच्या घराचे कुलूप फोड आणि ती पगडी तू घेऊन जा. आमचा दोघांचा त्यात जीव अडकला आहे रे. सुहासला अनेक वेळा सांगूनही त्याने ऐकले नाही. त्याला त्यात काही स्वारस्यच नव्हते. ह्यांच्या हुशारीचे, परिश्रमाचे ते प्रतिक आहे रे, ते असं धुळीत मिळायला नको. ऐकशील न माझं इतकं? मी हात जोडते.”
“अहो काकू,हे काय? हात कसले जोडताय. हक्काने सांगा. मी मुलगा आहे तुमचा!” मी हे बोललो पण काकू तिथे होत्याच कुठे? वाऱ्याची एक सळसळ आली. मला भीतीने दरदरून घाम फुटला. श्वास कोंडला आणि मी जोरात ओरडलो. मला जाग आली. म्हणजे ते स्वप्न होतं तर! वाचता वाचता मला झोप लागली होती आणि जोगकाकू स्वप्नात येऊन त्यांच्या मनातलं सांगून गेल्या होत्या. सकाळी उठून मी फ्रेश झालो आणि साठेकाकांची परवानगी घेऊन वॉचमनच्या मदतीने मी जोग काकूंच्या घराचं कुलूप फोडलं. आत आलो आणि काचेचं कपाट बघितलं. ती पगडी त्याच जागी,तशीच ठेवलेली होती. मी कपाट उघडलं. त्या पगडीवरची धूळ झटकली,ती डोळ्यांना आणि कपाळाला लावली आणि माझ्या बॅगमधे व्यवस्थित ठेवली.
वाड्यातून बाहेर पडताना एकवार सगळा वाडा डोळे भरून बघितला. त्या वाड्याचं अस्तित्व आता संपणार होतं. पण अस्तित्व आहे तोवर मी त्या वाड्याची,त्या वास्तूची एक रात्र चोरली होती. आणि ती रात्र मला माझ्या आयुष्याचा ठेवा देऊन गेली होती…..
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे