सुपारी……….. संग्रहक- भूषण जोशी BA ९८३४४२३५०७
सुपारी
आपल्या घरांत, रोजच्या जेवण्यात, परीसरात काही औषधी बनस्पती असतात. मात्र आपल्याला त्याची कल्पना नसते. कै. वैद्यतीर्थ अप्पाशास्त्री साठे यांच्या घरगुती औषधे या पुस्तकातील काही नेहमीच्या भाज्या, फळे, वनस्पती यांचे औषधी उपयोग शेअर करत आहे. हे पुस्तक १०० वर्षांपूर्वी म्हणजे १९२२ साली प्रथम प्रकाशित झाले आहे. ज्यांना त्रास आहेत त्यांनी वापर करून अनुभव जरूर कळवावेत. सुपारी ही तोंडाला जेवताना आलेला बुळबुळीतपणा घालवून तोंड स्वच्छ करण्यासाठी भोजनोत्तर सर्व लोक वापरतात. सुपारी बहुतेक नागवेलीच्या (विड्याचे पान) पानाबरोबर खाण्याची तर्हा (पध्दत) आहे आणि वैद्य-हकीम लोक सुपारीचा उपयोग वृष्य म्हणून करतात. ही दातात धरून चावली असता दात बळकट होतात. हिरड्या घट्ट होतात व याने तोंडास सुगंध येतो. फार घाम येणाऱ्या मनुष्याने फार घाम थांबविण्यासाठी सुपारी, विशेषतः चिकणी सुपारी खावी. शरीरास बळकटी येते. तोंडाची रुची वाढते व घाम कमी होतो असा अनुभव आहे. कच्ची सुपारी काढून ती सोलून चांगली शिजवली म्हणजे ती चिकणी सुपारी होते आणि चिकणी सुपारी परसाकडे साफ करणारी आहे. सुपारी कृमिघ्न म्हणजे जंत नाहीसे करणारी आहे. सुपारी ही सर्व प्रकारचे जंत म्हणजे दोऱ्यासारखे, लहान, वाटोळे, चपटे आणि मोठे असे सर्व जंत नाहीशी करणारी आहे, बारीक पूड करून ती अंदाजे १॥ ग्रॅम मुलास पाण्याबरोबर प्यावयास दिली तर जंत मरतात व पडतात. कारण सुपारी ही मोह आणणारी आहे. इंग्रजी सँन्टोनिन या पदार्थाने जंतास मोह येतो म्हणतात. पण सुपारीने जंतास खरोखरच मोह येतो व सुपारी ही मादक असल्याने जंत निघूनही जातात. उलटी थांबविण्यासाठी सुपारी घेतात. सुपारीची राख करून ती लिंबाच्या रसाबरोबर चाटण्यास द्यावी. याने उलटी थांबते तसेच तापातही लिंबाच्या रसाबरोबर सुपारीची पूड मिसळून सरबत प्याले असता ताप कमी होतो. मुतखड्याचे सुपारी हे विशेष औषध आहे. मुतखड्यात लघ्वीस अडले असता सुपारीची राख करून तिचा बस्तीवर लेप करतात व पोटातून चिकणी सुपारी देतात. चिकणी सुपारी रात्रीची भिजत घालून वाटून ती गिळण्यास देतात. वाटलेल्या सुपारीच्या गोळ्या अंदाजे अर्धा ग्रॅम अशा पाच-सहा खाऊन दरवेळी वरती ऊन पाणी प्यायले असता परसाकडचे होऊन लघ्वी ताबडतोब सुटते. लघ्वीला किंवा परसाकडे झाली नाही, तर पाच सहा मिनिटांनी घोटभर ऊन पाणी पीत जावे, म्हणजे याने परसाकडे साफ होऊन हटकून लघ्वी होते. सुपारी मदकारक आहे. तेव्हा थोडी खाल्ली असता झोप चांगली येते. जरा जास्त झाली तर लागते म्हणतात. म्हणजे भोवळ येते, चक्कर येते अशा वेळी थोडी साखर पाण्यात घालून प्यावे, बरे वाटते. सुपारी कंठशुद्धी करणारी आहे. कफाने गळा धरला असता थोडी चिकणी सुपारी चघळावी, कंठ ताबडतोब मोकळा होतो असा अनुभव आहे. आलेले तोंडही सुपारी खाल्याने बरे होते. सुपारी चावल्याने दात घट्ट होतात व दातांचे विकार होत नाहीत. सुपारीचा वरून होणारा उपयोग :- सुपारी जशी पोटात देतात तशी वरूनही लावण्याचा प्रघात आहे. अर्धशिशीवर अर्धी सुपारी उगाळून लेप करावा व जिकडे दुखते आहे तिकडे लावावे. अर्धशिशी दुखण्याचे थांबते. खरजेवर सुपारी जाळून जी राख राहते ती तिळाच्या तेलातून लावतात. खरूज बरी होते. नायट्यावर चिकणी सुपारी पाण्यात टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी ते शिळे पाणी नायट्यावर लावावे म्हणजे नायटे बरे होतात. नायट्यावर चिकणी सुपारी उगाळून लावतात. मुलास गालगुंड होते त्यावर चिकणी सुपारी, चिंचोका आणि गुग्गुळ ही पाण्यात उगाळून घट्ट होईपर्यंत ऊन करून गालगुंडावर लेप द्यावा. लेप वाळल्यावर तो पाण्याने धुवून काढावा व पुन्हा नवा लेप लावावा, याप्रमाणे गालगुंडावर दिवसातून तीनदा लेप करावा. तीन दिवसात गालगुंड पूर्ण बरे होते. संदर्भ: घरगुती औषधे लेखक: कै. वैद्यतीर्थ अप्पाशास्त्री साठे. संग्रहक- भूषण जोशी BA ९८३४४२३५०७