मनोरंजन

Story by © श्री. किरण बोरकर

रविवारची दुपार म्हणजे पोटाला तड लागेपर्यंत जेवायचे आणि ताणून द्यायची हा माझा रिवाज.आजचा रविवार ही काही वेगळा नव्हता.
पण खाली गोंगाट ऐकून मला जाग आली.चिडून बाहेर आलो तर खाली मुलांचा गोंगाट चालू होता. क्रिकेटची मॅच रंगात आली होती . सगळा संताप विसरून मी मॅच पाहत बसलो.तितक्यात खाली विक्रम दिसला. मुलांच्यात बसून तोही मॅच पाहत होता. मला पाहून हात हलविला आणि खेळणार का क्रिकेट असे खुणावून विचारले.
“अरे…..!!वेड लागले का ?? यावयात क्रिकेट ?? मी नाही म्हटले.
तसे त्याने अजय ,सदा याना बोलावले .आज काय झाले कुणास ठाऊक पण सगळे गोळा झाले.क्रिकेट खेळायला. मग माझाही नाईलाज झाला . विक्रमने मॅच ठरविली जुने विरुद्ध नवे.आता मलाही उत्साह आला.
नाहीतरी या वयात या गोष्टी योगायोगानेच घडून येतात.
सुरू झाली मॅच …..खेळ आता रंगात आला . आता आमची बॅटिंग सुरू झाली . विक्रम बॅटिंग करत होता. अचानक एक बॉल त्याने सुसाट मारला आणि तोडकर काकांच्या खिडकीची काच फोडून आत शिरला.लहानपणीच्या सवयीनुसार मी पळून घरात शिरलो . नेहमीप्रमाणे मैदान क्षणात साफ झाले .
काही वेळ शांतता ……आणि अचानक नेहमीप्रमाणे काकूंचा आवाज आला ,आणि नंतर त्यांच्या खास मालवणी भाषेतल्या शिव्या ..देवा …..आज कित्येक वर्षांनी ह्या शिव्या ऐकत होतो .पण आता विक्रमचाही आवाज ऐकू येऊ लागला .म्हणजे विक्रम ही आज भांडणाचा तयारीत आहे की काय ???? मी परत बाहेर येऊन पाहिले तर खरेच की विक्रम हातात बॅट घेऊन काकुसमोर उभा होता .
#कथाविश्व
“मेल्या ….घोड्यासारखो वाढलस तरी अजून अक्कल येऊंची नाय तुका ?? हातात बॅटी धरून कुठेपन बॉल मारतास ?? शिरा पडो तुझ्यावर ….!!अजून मेले छळूक बसलेत..?? ती तावातावाने भांडत होती.
सौ. माझ्याकडे चिडून पाहत होती . आता हीची सुरवात होणार हे नक्की.
तितक्यात विक्रम चिडून म्हणाला”ओ.. काकू.. ओरडू नका. भरून देऊ तुमची काच .एकच नाही तर पूर्ण खिडकीची बदलून देईन.उद्या माणूस येऊन बदलून देईल .घरी जा आता.”
तशी काकू थंड झाली.थोड्या वेळाने विक्रम घरी आला.
आल्या आल्या मी चिडलो “कशाला ह्या भानगडी ?? आता नको तो खर्च” ??
” राहूदे रे …विक्रम हसत म्हणाला.” अरे लहानपणी क्रिकेट खेळताना नेहमी तोडकर काकांच्या घराची काच फुटायची आणि काकूच्या शिव्या खायचो . पण काका कधीच काही बोलायचे नाहीत.कधीच नुकसान भरपाई मागितली नाही. नाही कधी घरी तक्रार केली . आज दोघेही म्हातारे झालेत . काकांच्या पेन्शन वर घर चालतेय . मुलगी लग्न होऊन गेलीय ती किती लक्ष देणार ??? गेले महिनाभर बघतोय.. काकांच्या किचनच्या खिडकीची काच फुटलीय . दोन दिवसात नवीन काच लावणारे काका महिनाभर काच न बदलत राहातायत ?? हे काही पटत नाही . बरे त्यांना पैसे द्यावे तर घेणार नाहीत . मोठा मानी मालवणी माणूस . शेवटी ही आयडिया सुचली . आपणच काच फोडायची . पोरांना क्रिकेट खेळायला बोलावले आणि काच फोडून टाकली . आता काका आणि काकू काहीच बोलणार नाहीत . या निमित्ताने संपूर्ण खिडकीला नवीन काच लावू…..दे टाळी ….असे बोलून विक्रम ने हात पुढे केला . मी नेहमीप्रमाणे हात जोडले . सौ. तोंडावर पदर घेऊन हसू लागली.
“खरेच विकी…. खूप छान दिवस होते ते आणि खूप चांगली माणसे भेटली आपल्याला.त्यांच्याच संस्कारामुळे आपण असा विचार करू शकतो”.असे बोलून त्याला मिठी मारली.

© श्री. किरण बोरकर
कथाविश्व – गोड कौटुंबिक कथांचे विश्व 🎉

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}