देश विदेशमंथन (विचार)

जेष्ठमध ……… संग्रहक- भूषण जोशी BA ९८३४४२३५०७

जेष्ठमध

आपल्या घरांत, रोजच्या जेवण्यात, परीसरात काही औषधी बनस्पती असतात. मात्र आपल्याला त्याची कल्पना नसते. कै. वैद्यतीर्थ अप्पाशास्त्री साठे यांच्या घरगुती औषधे या पुस्तकातील काही नेहमीच्या भाज्या, फळे, वनस्पती यांचे औषधी उपयोग शेअर करत आहे. हे पुस्तक १०० वर्षांपूर्वी म्हणजे १९२२ साली प्रथम प्रकाशित झाले आहे. ज्यांना त्रास आहेत त्यांनी वापर करून अनुभव जरूर कळवावेत.

जेष्ठमध

हे बल्य म्हणजे शक्ती देणारे आहे. कोणत्याही कारणाने आलेल्या अशक्ततेवर शक्ती येण्यास हे उत्तम औषध आहे. तूप, दूध, लोणी इत्यादी बलद म्हणजे बल देणाऱ्या औषधात आणि जेष्ठमधात मोठा फरक हा आहे की, दूध, तूप इत्यादी औषधांपासून शक्ती येते खरी, परंतु ती बलद औषधे मधुर असल्यामुळे कफ वाढतो. ज्येष्ठमध मधुर व बलद आहे. तरी कफ कमी करतो. जेष्ठमध चांगला कुटून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण तीन ग्रॅम मध व चार ग्रॅम तुपातून खावे. सकाळी व संध्याकाळी जेवणापूर्वी याचे सेवन करावे. असे सात दिवस घेताच शक्ती वाढू लागते.

ज्येष्ठमध थंड आहे. उष्णतेपासून तोंडास झरे पडले असता सहा ग्रॅम जेष्ठमध घेऊन त्यात पाच ग्रॅम खडीसाखर घालून अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा करावा. नंतर गाळून त्यात पाच ग्रॅम तूप घालून प्यावा. तसेच रात्री निजताना याची कांडी चार कंकोळाचे दाणे घेऊन दाढेत धरावी. असे करताच सात दिवसांत तोंडातील चट्टे बरे होतात.

याचा मोठा उपयोग म्हटला म्हणजे स्वर-आवाज साफ होण्यावर होय. याचे बारीक कुटून वस्त्रगाळ चूर्ण करून खलात टाकावे. नंतर त्याच्या चतुर्थांशा इतके काळ्यामिऱ्याचे वस्त्र गाळ चूर्ण घालून याच्या काड्यांनी ते घोटावे आणि त्याच्या मुगा एवढ्या गोळ्या कराव्या. ह्या गोळ्या निरंतर तोंडात ठेवाव्या. कसल्याही प्रकारचा बसलेला आवाज असला तरी तो सुधारतो असा अनुभव आहे.

रक्त पित्त मग ते कसलेही असो; तोंडातून पडणारे, घशात फोड येऊन, त्या फोडातून अगर खाकऱ्या बरोबर तोंडातून रक्त पडणारे, तसेच नाकातून घुणघुणा फुटून येणारे अधोगत रक्तपित्त असो, या सर्वांवर हे औषध आहे. जेष्ठमध पाच ग्रॅम, हिरडे दहा ग्रॅम, मनुका दहा ग्रॅम या २५ ग्रॅम औषधांचा अर्धा लिटर पाणी घालून अष्टमांश काढा करावा. खोकल्यातून रक्त पडत असेल तर त्यात चार ग्रॅम अडूळशाचा रस, चार ग्रॅम तूप, एक ग्रॅम मध घालून घ्यावा रक्तपित्त बंद होते.

खोकल्यावर विशेषतः क्षयाचे खोकल्यावर जेष्ठमध देण्याचा प्रघात आहे. याचे वस्त्रगाळ केलेले चूर्ण आणि त्या चुर्णाच्या निम्मे सितोपलादी चूर्ण त्यात घालून तुपातून आणि मधातून वारंवार चाटण्यास द्यावे, खोकला सुटतो व भरलेली छाती हलकी वाटते.

हा त्रिदोष शामक आहे. कसल्याही आणि कोणत्याही रोगांवर त्याचा उपयोग होतो. याचा काढा वरचेवर देत गेल्याने सर्व रोगात बरे वाटते. याचा त्रिदोष शामक गुण आहे म्हणून प्रत्येक काढ्यात हा वापरतात. १५ ग्रॅम जेष्ठमधाचा एक लिटर पाणी घेऊन अष्टमांश केलेला काढा कोणत्याही विकारात दिला असता तो विकार थांबतो. विशेषतः ज्वर म्हणजे ताप, तहान, खोकला, श्वास या विकारात त्याचा फार फायदा होतो. पुष्कळ ताप आला आहे, भयंकर तहान लागली आहे, वरचेवर उमासे म्हणजे कोरडी ओकारी येत आहे, अंगाचा दाह होत आहे, थोडा ठसका आहे अशा अवस्थेत हे सर्व विकार शांत करण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे याचा काढा दिला असता फायदा होतो व सर्व विकार नाहीसे होतात. हा विशेषतः रक्ती मुळव्याधीवर चालतो. याचे बारीक वस्त्रगाळ चुर्ण एक ग्रॅम गरम पाण्याबरोबर रोज रात्री घ्यावे, शौचास साफ होते. रक्त पडण्याचे थांबते व मूळव्याधीचा कोणताही त्रास होत नाही.

उन्हाळे म्हणजे मूत्रकृच्छ (उष्णवात) यावरही ज्येष्ठमध फार उपयोगी आहे. याचे बारीक वस्त्रगाळ केलेले चुर्ण एक ग्रॅम, एक कप दूध, दहा ग्रॅम खडीसाखर घालून घ्यावे. उन्हाळे थांबतात व लघ्वी साफ होते असा अनुभव आहे.

ज्येष्ठमधादी चूर्ण– रक्त शुद्ध करण्यासाठी हा देण्याचा प्रघात आहे. जेष्ठमधादी चूर्ण म्हणून आयुर्वेदात फारच प्रसिद्ध आहे ते असे: जेष्ठमधाचे बारीक वस्त्रगाळ केलेले चूर्ण एक भाग, बडीशेपेचे बारीक केलेले चूर्ण एक भाग, शुद्ध केलेला गंधक अर्धा भाग तुपात तळून वस्त्रगाळ केलेली सोनामुखी अर्धा भाग, खडीसाखर तीन भाग घेऊन एकत्र करावे. येणेप्रमाणे चूर्ण करून ठेवावे व रोज रात्री जेवण झाल्यावर एक तासाने निजतेवेळी ऊन पाण्याबरोबर एक ग्रॅम घ्यावे. हे सर्व व्याधी प्रतिबंधक आहे, असा अनुभव आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग होऊ देत नाही. हे चूर्ण उत्तम प्रकारे शौचास साफ करणारे असून प्रखर भूक लावणारे आहे. ह्याने तरतरी येते म्हणून हे सर्वांच्या नित्यसंग्रहात उपयोगी आहे.

ज्येष्ठमध प्रदरावर मोठे औषध आहे. याची कांडी दुधात अंदाजे तीन ग्रँम उगाळावी. त्यातच एक ग्रॅम दारूहळद व त्या गरगटात खडीसाखर घालून ते घ्यावे. असे नित्य सांज सकाळी घेत जावे. पाच-सहा दिवसांत गुण वाटू लागतो.

जेष्ठमधाचा वरूनही लावण्यास उपयोग होतो. कोणत्याही ठिकाणी सूज आली असता पाण्यात ज्येष्ठमध उगाळून त्याचा लेप ऊन करून लावावा, सूज बसते. कोणताही व्रण वाहत असेल तर ज्येष्ठमधाचे चूर्ण पाण्यात शिजवून त्यात तूप घालून पोटीसा सारखे करावे, गरम सहज होईल इतके व्रणावर बांधावे, व्रण शुद्ध होऊन भरून येतो असा अनुभव आहे. अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या बारीक पुळ्या ज्येष्ठमध तुपात उगाळून स्नानाचे अगोदर अंगास चोळून लावल्याने पुळ्या कमी होतात. डोळ्यात लाली पडली किंवा डोळे लाल झाले म्हणजे जेष्ठमध पाण्यात उगाळून डोळ्यात घालण्याचा, डोळ्याच्या आजूबाजूला लेप करण्याचा प्रघात आहे. याने लाली जाऊन डोळे चांगले होतात.

संदर्भ: घरगुती औषधे
लेखक: कै. वैद्यतीर्थ अप्पाशास्त्री साठे.

संग्रहक- भूषण जोशी BA
९८३४४२३५०७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}