अत्यंत आणि अतिशय गंभीर आहे #डोक्यातले_किडे 🐛🐛 ✍️©️ स्मिता दामले- कुलकर्णी
अत्यंत आणि अतिशय गंभीर आहे #डोक्यातले_किडे 🐛🐛
✍️©️ स्मिता दामले- कुलकर्णी
“डोक्यात किडा वळवळणे” हा वाक्प्रचार रुढार्थाने डोक्यात आलेल्या एखाद्या वेगळया विचाराच्या बाबतीत वापरतात हे माहीत होतं. हा वाक्प्रचार खरंच कोणाच्या डोक्यात किडा वळवळल्या नंतर रूढ झाला असे मला कोणी सांगितले असते तर मला ते अजिबात पटले नसते. पण स्वतः अनुभव घेतल्यानंतर मात्र हेच या वाक्प्रचाराचे उगमस्थान आहे याची मला खात्री पटली.
तर मंडळी….सात वर्षांपूर्वी …..माझ्या डोक्यात किडा वळवळतोय याचा साक्षात्कार डॉक्टरांना झाला. पण या आधी असं कोणाला कधी झालंय असं काही ऐकिवात नव्हतं. त्यामुळे हे कसं शक्य आहे अशीच पाहिली प्रतिक्रिया होती…. मात्र….त्यांनी त्या किड्याचा फोटोच दाखवल्यावर मलाही ते मान्य करावं लागलं. 😳😳🫣🫣😧😧🐛
तर झालं असं की 16 मार्च 2016 ला सकाळी मी ओट्याजवळ काहीतरी काम करत होते. डाव्या बाजूच्या सिंक मध्ये हात धुवायला जायचे म्हणून मी पाय पुढे टाकला. पण माझा उजवा पाय जमिनीवर टेकतच नव्हता. मी जितक्या जोरात जमिनीवर पाय टेकवायचा प्रयत्न करत होते तितका तो वर खेचला जात होता. असं का होतं आहे ते काही कळेना. माझ्या सासूबाई तिथेच होत्या. त्यांना मी माझा पाय खाली ओढून जमिनीवर दाबायला सांगितला. त्यांनी दाबून धरल्यावर पाय जमिनीवर टेकला. मग त्यांनी 1-2 मिनिटं पाय तसाच दाबून ठेवला. नंतर मी परत चालायचा प्रयत्न केला आणि मी व्यवस्थित चालू शकले. मला वाटलं की पायात वात आला असणार… तरीही 10 मिनिटं एका जागी बसून राहिले आणि मग काही प्रॉब्लेम वाटला नाही म्हणून उठून आवरून ऑफिसला गेले. त्या नंतर दिवसभरात आणि दुसऱ्या दिवशीही काहीच त्रास झाला नाही.
तिसऱ्या दिवशी (18 मार्चला) माझ्या ऑफिसची 2 दिवसांची ट्रीप होती. सकाळी आवरून माझ्या मुलीला घेऊन ऑफिसमध्ये आले आणि तिला घेऊन ट्रीपला गेले. तिकडे दोन दिवस मज्जा, मस्ती, धमाल करण्यात मी दोन दिवसांपूर्वी असं काही झालं होतं हे विसरून पण गेले.
19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आम्ही परत आलो. थकल्यामुळे रात्री 10 ला मी झोपायला गेले. अंथरुणावर पडल्यावर 5 मिनिटांनी परत पाय आपोआप खेचला जातोय असं वाटलं. वात परत आला वाटतं असं म्हणून मी उठले आणि पायाला थोडं खोबरेल तेल चोळून झोपून गेले.
सकाळी मात्र मला जाग आली ते भयानक भूकंप आणि इलेक्ट्रिक शॉक हे दोन्ही एकदम लागल्यासारखं वाटूनच……माझ्या शरीराची उजवी बाजू vibrate होऊन थडथड उडत्ये असं मला जाणवलं. इतक्यात उजवा पाय साधारण 45 अंशाच्या कोनात वर उचलला जाऊन गुढग्यापासून पुढे लाथा मारल्यासारखा आपोआप पुढे मागे होत होता. मी प्रचंड जोरात ओरडायला लागले. माझा आवाज ऐकुन शेजारी झोपलेले नवरा आणि मुलगी उठले आणि सासूबाई पण बाहेरून धावत आल्या. सासूबाई आणि नवरा दोघे मिळून माझा पाय पकडण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनी पाय पकडून खाली गादीवर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाय खाली ठेवलाच जात नव्हता. तितक्यात vibration ची एक तीव्र लहर माझ्या पायापासून डोक्यापर्यंत धडधडत गेली. डोक्यापर्यंत आल्यावर ती इतकी तीव्र झाली की माझं डोकं 360 अंशाच्या कोनात गर्रकन वळून परत सरळ झाल्यासारखं मला वाटलं. समोरून बघणाऱ्या माझ्या नवऱ्याला मात्र माझं डोकं वळलेलं काही दिसलं नव्हतं. सुमारे 2-3 मिनिटं असे हादरे जाणवल्यानंतर शरीर शांत झालं. या धक्क्यातून सावरायला मला अजुन 2-3 मिनिटं लागली. नक्की काय घडतंय ते मला कळत नव्हतं. मला झोपेत खूप स्वप्नं पडतात आणि झोपेत माझे बोलणे, ओरडणे सुद्धा चालू असायचे. त्यामुळे नवऱ्याला पहिल्यांदा असचं वाटलं की मला काहीतरी वाईट स्वप्न पडलं असणार आणि म्हणून मी ओरडायला लागले. पण माझ्या पायाच्या ज्या प्रकारे uncontrolled movements होत होत्या त्यावरून हे काहीतरी वेगळं आहे हे त्यालाही जाणवलं. मी तर त्याला ठामपणे सांगितलं हे काहीतरी भयंकर वेगळं आहे. त्यामुळे आम्ही लगेच हॉस्पिटल मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि पुढच्या 15 मिनिटांत निघालो. कार मधून जातांना रस्त्यात मला पुन्हा एकदा तसाच त्रास झाला. मात्र त्याची तीव्रता थोडी कमी होती.
हॉस्पिटलमध्ये इमर्जंन्सी विभागात पोचलो आणि तिथल्या डॉक्टरना मला नक्की काय झालं ते सांगितलं. त्या दिवशी रविवार असल्याने सीनिअर डॉक्टर भेटण्याची शक्यता जवळपास नव्हतीच. तिथल्या डॉक्टरांना मी सांगितलेल्या प्रकारचं फारसं गांभीर्य वाटलं नाही. ते म्हणू लागले की कॅल्शिअम कमी झाले असेल म्हणून त्रास झाला असेल. पण मला ते पटत नव्हतं. त्यांनी काही औषधोपचार न करता मला तसचं तिथे झोपवून ठेवलं. मी त्यांना परत एकदा सांगितलं की मला झालेला त्रास फार वेगळ्या प्रकारचा होता. पण ते काही लक्ष देत नव्हते…… आणि काही वेळाने मला पुन्हा एकदा तसाच त्रास झाला आणि माझ्या ओरडण्याने इमर्जंन्सी विभागातील सगळा स्टाफ माझ्या भोवती गोळा झाला. आत्ता त्यांना कळले की मला नक्की काय होत आहे. सुदैवाने त्याच वेळी एक M.D medicine डॉक्टर तिथे आले होते. त्यांनी मला तपासले आणि लगेच ब्रेन MRI करायला सांगितला. माझी रवानगी MRI विभागात झाली. आधी कधीही MRI केलेला नसल्याने हे काय प्रकरण आहे काही माहीत नव्हतं. त्यांनी मला कपडे बदलायला देऊन MRI मशीनच्या सरकत्या बेडवर झोपवले. MRI पूर्ण होईपर्यंत झोप आली तरी झोपायचे नाही आणि काही त्रास वाटला तर हातात एक बेलचे बटण दिले होते ते दाबण्याची सूचना दिली. आता पुढे ते नक्की काय करणार आहेत असा विचार करेपर्यंत त्यांनी माझ्या डोक्यावर काहीतरी हेल्मेट सारखा प्रकार घालून मला MRI मशीनच्या गुहेत सरकवले. पुढची 20-25 मिनिटं डोक्यावरच्या हेल्मेटवर वेगवेगळ्या प्रकारच्या हातोडीने कोणीतरी ठोकत आहेत असे आवाज येत होते. त्या आवाजात कोणी झोपेची गोळी देऊन झोपवलं असतं तरी झोप लागली नसती. आवाज थांबल्यावर 5 मिनिटांनी मला गुहेतून बाहेर काढण्यात आलं आणि परत इमर्जंन्सी विभागात पाठवण्यात आलं.
साधारण अर्ध्या एक तासाने MRI चा रिपोर्ट मिळेल असं कळलं. हा रिपोर्ट न्यूरो फिजिशियनला दाखवायला लागणार होता. रविवार असल्याने कोणी न्यूरो फिजिशियन हॉस्पिटल मध्ये असण्याची शक्यता नव्हती. पण माझ्या सुदैवाने न्यूरो फिजिशियनसुद्धा त्या दिवशी दुसऱ्या कुठल्यातरी पेशंटला बघायला आले होते. काही वेळाने ते मला चेक करायला आले आणि तोपर्यंत रिपोर्ट सुद्धा आला होता. रिपोर्ट बघून त्यांनी लगेच माझ्या नवऱ्याला सांगितलं की मला Neurocysticercosis झाला आहे. आता हे काय प्रकरण आहे? हा प्रश्न माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यांनी पुढे विचारलं की मी नॉन व्हेज खाते का??….मी पूर्ण शाकाहारी असल्याचे त्यांना सांगितले. पण त्यांनी असा प्रश्न का विचारला असेल हा विचार लगेच मनात आला. डॉक्टरांनी लगेच अगदी सोप्या भाषेत सांगायला सुरुवात केली. “आपल्या शरीरात tapeworm म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर विशिष्ट प्रकारचे कृमी जे pork किंवा beef किंवा कच्च्या भाज्या खाल्ल्यामुळे होतात त्यांच्या मुळे किंवा त्यांची अंडी पोटात जाऊन हे इन्फेक्शन होतं. बहुतांश वेळा हे इन्फेक्शन मेंदू मध्ये होतं कारण ही अंडी किंवा हे कृमी मेंदूपर्यंत पोहोचतात आणि तिथल्या पेशींमध्ये हे इन्फेक्शन झाल्यामुळे पेशींचं कार्य बिघडून seizures म्हणजेच झटके….( जसे मला आले तसे) येतात. या इन्फेक्शनमुळे डोकेदुखी किंवा स्मरणशक्ती खूप कमी होणे अशीही लक्षणे दिसतात. हे इन्फेक्शन इतरही अवयवात होण्याची शक्यता असते. आत्ता लगेच आपण इंजेक्शन आणि औषधे सुरू करू. आज ह्यांना आपण सेमी ICU मध्ये ठेवू म्हणजे ट्रीटमेंटला कसा रिस्पॉन्स मिळतो हे मॉनिटर करता येईल. आजच्या रिस्पॉन्स वर पुढे काय करायचं ते ठरवू. माझ्या अंदाजाप्रमाणे इंजेक्शन आणि गोळ्या घेतल्यावर हा त्रास कमी होऊन जाईल. 5% पेशंट्स मध्ये ऑपरेशन करण्याची गरज भासते. आत्ता तरी ऑपरेशनची गरज पडेल असं वाटत नाही. तरीही ट्रीटमेंटच्या रिस्पॉन्स वर पुढे काय करावं लागेल ते ठरेल. गोळ्या मात्र किमान दोन वर्ष तरी घ्याव्याच लागतील.”
प्रकरण तसं गंभीर होतं पण ट्रीटमेंट लगेच सुरू झाल्याने लवकर आटोक्यात येईल असं वाटू लागलं. ट्रीटमेंट म्हणजे जंतांच्या गोळ्या ज्या डॉक्टर सर्वसाधारणपणे सहा महिन्यांतून एकदा एक गोळी घ्यायला सांगतात. त्या गोळ्या रोज 2 अश्या 15 दिवस घ्यायच्या होत्या आणि झटके (seizures) थांबण्यासाठी सलाईन मधून तीन दिवस रोज 3 इंजेक्शन्स.
मला सेमी ICU मध्ये शिफ्ट करून वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय उपकरणांशी जोडून ठेवलं जेणेकरून heart rate, BP वगैरे सतत मोजले जाईल. उजव्या बाजूला झटके आल्याने पूर्ण उजवी बाजू दुखत होती. शिवाय जे इंजेक्शन दिले होते ते साधारण पाऊण तास चालू असायचे आणि ते शरीरात जाताना प्रचंड दुखायचे. मात्र त्या नंतर मला झटके आले नाहीत.
तीन दिवसांनी हॉस्पिटल मधून घरी सोडलं. इन्फेक्शन कमी होण्यास साधारण दीड ते दोन महिने लागतील असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे दोन महिन्यांनी परत एकदा MRI करून इन्फेक्शन किती कमी झालंय ते बघायचे होते. मधल्या काळात माझी उजवी बाजू काही प्रमाणात दुखत असे आणि झटके येतायत असे थोडे भासही होत होते.
दोन महिन्यांनंतरच्या MRI मध्ये इन्फेक्शन बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसले. पण झटक्यांसाठी दिलेली गोळी रोज सकाळ संध्याकाळ अशी पुढे दोन वर्ष घ्यावी लागली. शिवाय दोन वर्ष वाहन चालवण्यावर पूर्ण बंदी होती.
मला हा त्रास होण्यापूर्वी मला असा काही आजार असतो याची जराही माहिती नव्हती. मात्र मला झाल्यानंतर चार जणांकडून त्यांच्या नातेवाईकांचे वेगवेगळे अनुभव ऐकले. काही दिवसांपूर्वी तर अशी बातमी वाचली की ऑस्ट्रेलिया मध्ये एका बाईच्या मेंदूतून 3 इंच लांबीचा जीवंत कृमी बाहेर काढला. 😳😳
तर मंडळी…… यावरून तुम्हाला आता कळलेच असेल की डोक्यात किडे वळवळणे ही काही फार बरी गोष्ट नव्हे…..😃😃😃. मला कशामुळे झालं याचं कारण शोधतांना असं वाचनात आलं की कच्च्या भाज्या…..विशेषतः कोबी मध्ये सुद्धा असे किडे आढळतात आणि हे किडे व त्यांची अंडी ही इतकी लहान असतात की साध्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत. या घटनेच्या आधी जवळपास वर्षभर मी खूप सॅलाड (म्हणजे कच्च्या भाज्या) खात होते.
तेव्हा मंडळीं….यापासून वाचण्यासाठी स्वच्छता राखा….. कच्च्या भाज्या खातांना व्यवस्थित स्वच्छ करून खा आणि beef व pork ला तर लांबच ठेवा.
…….
तळटीप: माझं किड्यांचं प्रकरण ऐकून अनेकांनी कोबी खाणं सोडून दिलं…..😃😃