Classified

* जमाखर्च * नीला महाबळ गोडबोले

* जमाखर्च *

नीला महाबळ गोडबोले

वेदनाशामक गोळीचा असर उतरला तशी सकाळी लवकरच जाग आली.आन्हिके उरकण्यासाठी थोडी हालचाल झाली नि मोडलेला पाय पुन्हा जोराने ठणकू लागला. सकाळची पेनकिलर घेणं फार गरजेचं होतं.पण नाष्टा केल्याशिवाय ती वेदनाशामक गोळी खायला डॉक्टर नव-यानं मनाई केलेली होती.आणि ते अगदी खरंही होतं..माझ्यासारख्या पित्तप्रवृत्तीच्या बाईला कुठलीही गोळी पाहिली तरी मळमळणं,उलट्या होणं,जळजळणं असले प्रकार होतात..त्यामुळे मी शक्यतो औषधे टाळतेच..

पण यावेळी मात्रं औषध न घेणं ही अशक्य कोटीतली गोष्ट होती.

त्याचं झालं होतं असं की चार दिवसांपूर्वी मी साबणाच्या पाण्यावरून पाय घसरून पडले. घोट्याजवळचं हाड मोडलं.प्रचंड वेदना नि सूज यांनी ब्रह्मांडदर्शन घडवलं. प्लास्टर वगैरे सोपस्कार पार पडले. पण दुखणं काही माघार घ्यायला तयार होईना…कमी होणं दूरच पण दिवसांगणिक वाढूच लागलं. पेनकिलर्सपुढे शरणागती पत्करण्यावाचून उपायच राहिला नाही..

नेमका भाच्याचा म्हणजे नणदेच्या मुलाचा साखरपुडा येऊन ठेपलेला..
मलातर जाता येणं शक्यच नव्हतं.
” आम्ही दोघंही जात नाही “.. नव-यानं जाहीर केलं.

नणंदेकडचं शेवटचं कार्य .. कुणीच न जाणं मला बरं वाटेना.

“तुम्ही दोघं जा. पुण्याला तर जायचय.सकाळी जाऊन रात्रीपर्यंत परत या. ”

” आई,बाबांना जाऊदे .मी थांबते तुझ्याजवळ.तुला काही लागलं तर काय करशील? ” ..जात्याच प्रेमळ लेक मला मिठी मारत बोलली.

दादाच्या साखरपुड्यासाठी तिने केलेल्या लेहेंग्याची,चपलांची,दागिन्यांची खरेदी माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागली..

” कोणीही माझ्याजवळ थांबायची गरज नाहीये. एक दिवसाचा तर प्रश्न आहे..तशीही वंदना येतेच सकाळी कामाला.मी तिला लवकर बोलावेन. तुम्ही दोघेही साखरपुड्यासाठी पुण्याला जाणार आहात.”

माझ्या हुकुमापुढे दोघांचंही काही चाललं नाही.त्यामुळे आज पहाटे दोघेही पुण्याकडे रवाना झाले होते.

मी घरात एकटीच होते.

तशी वंदना साडेदहापर्यंत रोज घरकाम नि स्वयंपाकासाठी येतच असते. पण आज साडेनऊपर्यंतच येण्याबद्दल तिला काल बजावलेलं..

” नक्की येते दीदी साडेनऊपर्यंत ” तिच्या आश्वासनामुळे मी निर्धास्त!

वंदना … गेली चार-पाच वर्षं माझ्याकडे काम करते. सावळी,उंच,शेलाटी नि स्मार्ट..तिचा हसरा नि नम्र चेहरा आकर्षून घेणारा..चाळिशीला आलेली..काळ्या केसांतून डोकावणा-या रूपेरी तारा, भाजी निवडताना लागणारा चाळिशीचा चष्मा, अधूनमधून असहकार पुकारणारे गुडघे तिच्या चाळीशीची साक्ष देत असले तरी तिची लगबग, वेगवान हालचाली या तिच्या तारुण्याची साक्ष देणा-या!
काम करतानाची सतत बडबड, तिची साठलेली दु:ख माझ्यासमोर मोकळी करणं,घरातल्या गोष्टींचा पाढा वाचणं यांमुळे मीच नाहीतर माझी लेकही जाम वैतागायची..
पण तिचं आपलेपणानं काम करणं , खाडे न करणं यापुढे तिचे सगळे दोष मी माफ केले होते..

पण तिची एक गोष्ट मात्रं मला आजिबात आवडायची नाही..ती म्हणजे तिचं रोज उशीरा कामावर येणं..

” दीदी ,काय करू ..घरचं काम आवरतच नाही हो..
सास-यांचं सगळं मलाच करावं लागतं..घरचं काम,स्वयंपाक आणि तीन -तीन पोरीचं सगळं आवरायचं..सासू इकडची काडी तिकडं करत नाही..तरी पहाटे चारला उठते रोज! ”
तिची ही रोजची कॅसेट ऐकून माझे कान किटले होते..

म्हणून काल तिला दहादा आज लवकर येण्याबद्दल बजावलं होतं नि तिने कबूलही केलं होतं..

पायाचा ठणका वाढतच चालला होता. वंदना येऊन तिने नाष्टा दिल्याशिवाय गोळी घेता येत नव्हती…

एकदाचे साडेनऊ वाजले..
आता येईल..मग येईल करत घड्याळ पावणे दहाची वेळ दाखवू लागलं .पण या बाईसाहेबांचा पत्ताच नाही..

आता मात्रं फिरणा-या काट्यासोबत माझ्या रागाचा पाराही चढत चालला.
दहा वाजले तरी तिचा पत्ता नव्हता.

पायाच्या वेदनेपेक्षाही तिचं वेळेवर न येणं आता जास्त त्रास देऊ लागलं.

इतकी वर्षे मी हिचं रोज उशीरा येणं सहन केलं.हिच्या मुलींना एवढे कपडे दिले माझ्या लेकीचे.. अडीअडचणीला पैशाची मदत केली..
पण हिला मात्रं माझ्या गरजेच्यावेळी लवकर येता आले नाही.ही माणसं अशीच असतात..फक्त स्वत:चा स्वार्थ पाहणारी नि दुस-याचा उपयोग करून घेणारी! माझ्या मनात हिशेब सुरू झाला..

साडेदहा वाजले तसे तिला कामावरून काढून टाकण्याचा मी निश्चय करायला नि वंदना यायला एकच गाठ पडली.

नेहमीसारखी ” दीदी ” अशी हाक मारत पळत माझ्या खोलीत शिरली.

” वंदना, एक दिवस तुला लवकर बोलावलं तर यायला जमलं नाही नं? तुला मी इतके दिवस समजून घेतलं.तुला मात्रं एक दिवस मला समजून घेता आलं नाही. तू आजपासून नको येऊस कामावर..माझ्या जेवणाचं माझं मी बघून घेईन काय करायचं ते !! ” …. फुटणा-या लाह्यांसारखे शब्द माझ्या तोंडातून रागाने बाहेर पडत होते..

” सॉरी दीदी ” म्हणत ती माझ्या खोलीतून बाहेर पडली नि पाच मिनिटात एक प्लेट घेऊन पुन्हा माझ्याजवळ आली.

” दीदी, तुम्हाला मला कामावर ठेवायचं नसेल तर ठेऊ नका.पण हे एवढं खाऊन घ्या..गरम आहे तोपर्यंत ..तुम्हाला गोळी घ्यायची आहे …”

तिने प्लेट माझ्या हातात दिली.

त्यात गरम गरम मऊसूत वाफाळत्या इडल्या, हिरवीगार चटणी,वाफाळतं सांबार नि मला आवडणारा केळं घातलेला वाफाळता शिरा होता..

” अगं वंदना , हे कुठून आणलस सगळं ?”

” दीदी, तुम्ही गेले चार दिवस आजारपणामुळं काहीच खात नाहीय.म्हणून काल माझ्या घरी इडलीचं भिजत घातलं तुम्हाला इडली आवडते म्हणून ..थंडीमुळं पीठ लवकर फुगलं नाही आज. .म्हणून आज मला यायला उशीर झाला. दीदी, तुम्हाला आवडतो तसा शिरापण करून आणलाय. पोटभर खावा ,मला बरं वाटेल. ”

त्या भरलेल्या डिशकडे पहाताना माझे डोळे कधी भरले ते कळलच नाही…

त्या क्षणी ती मला हिमालयाइतकी उंच नि मी तिच्यापुढे टेकाडापेक्षाही खुजी वाटू लागले जमाखर्च मांडणारी…

आता माझ्या खात्यावर तिच्याकडून फक्त जमाच होती..खर्च शून्य होता…!!

नीला महाबळ गोडबोले

सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}