Classified

अंत_देवमाणसाचा ©️®️सौ.राजश्री कुलकर्णी /भावार्थी

#अंत_देवमाणसाचा

अशाच एका सांजवेळी
विषण्ण अवस्थेत तुळशी वृंदावनाजवळ बसले असताना मनात विचारांचे काहूर माजले होते. का आणि का ?? …असे घडूच कसे शकते ? मनातील विचारांना थोपवणे तसे कठीणच झाले होते . अचानक चाहूल लागली तर साक्षात समोर आजोबांची मूर्ती , आजोबा तुम्ही …..
नकळत तोंडातून आवाज
बाहेर पडला. बऱ्याच गप्पांची देवाणघेवाण झाली …..उठ राजा ! नाराज व्हायचे नाही …..
घडलेल्या घटना या विधिलिखितचं असतात त्या का आणि कशा घडल्या याचा विचार कधी करायचा नसतो . मनुष्य जन्माला येतो तेंव्हाच त्याचे……. विधिलिखित त्याच्या कपाळावर लिहिलेले असते आणि ते बदलणे आपल्या हातात नसते , तर आता या घडलेल्या घटनांवर जास्त विचार करू नकोस ! आनंदी रहा …..उठ ! आणि तुझा आवडता छंद जोपास !…
घे लेखणी हातात ! आणि उतरव मनातील विचार कागदावर ….एक मिनिटं
आजोबा …काय लिहू काहीच सुचत नाहीये ! शब्दच गोठून गेलेत माझे
…..काहीही लिही पण लिहीत राहा माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम असतील…! तथास्तु ! …होय आजोबा
माझ्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले …… नमस्कारासाठी खाली वाकले तर समोर कोणीच नाही !

माझ्या आवाजाने उदय बाहेर आले . तू आवाज दिलास का ? ….
काय सांगत होतीस ? मी चमकून त्याच्याकडे पाहिले …..आणि त्याला आत्ताची घटना सांगितली तसे त्याने मला घरात नेले पाणी प्यायला देऊन शांत केले ! डोक्यावरून आश्वासक हात फिरवला तसा माझ्या मनाचा बांध फुटला …अरे सांग ना ! तुला दिसले का आजोबा
…..त्याच्या कुशीत शिरून हुमसून रडू लागले ! खरंच
मनात आले …धरणाचा बांध फुटला तर बांधून पूर्ववत होईल पण मनातील बांधाला आवरायचे कसे ? आणि झालेली घटना पुन्हा आठवू लागले ….आमचे आजोबा
कै.श्री.व्यंकटेश कुलकर्णी
वय 88 यांच्या बाबतीत घडलेली …….

सुमारे अठ्ठावीस वर्षांपूर्वीची ही घटना ….
जानेवारी चा महिना आजोबांचे वर्षश्राद्धासाठी गावी माझ्या माहेरी गेलो होतो . सगळे दोन दिवसाचे विधी पार पडले
…..आम्ही घरातील नातेवाईक मंडळी कट्ट्यावर गप्पा मारत बसलो होतो . अचानक इन्स्पेक्टर सावंत यांचे आगमन झाले . ते आम्हा पूर्ण फॅमिलीच्या परिचयाचे होते . ते काय सांगतात म्हणून आम्ही सर्वजण भयभीत होऊन त्यांच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहू लागलो…

मिस्टर उदय मला वाटते आपण आता ही केस मागे घेऊया ! गेले वर्षभर आम्ही तपास केला , पण कोणताही संशय किंवा पुरावा आम्हाला सापडला नाही तुम्हीदेखील डिपार्टमेंटचे आहात आणि तुम्हाला यातील कच्चेदुवे माहीत असतीलच ! …..काय ते विचारविनिमय करून उद्या मला सांगा , आता या पुढे या केसचा तपास करणे अशक्यच आहे ….
इन्स्पेक्टर सावंत सर्वांशी बोलून अर्ध्या तासात ख्यालीखुशाली विचारून आले तसे पटकन निघूनही गेले आम्हा सर्वांना… विचारांच्या महासागरात डुबवून….झाले आम्हीही एक मताने निर्णय घेऊन तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला . काय घडले होते ? असे आजोबांच्या बाबतीत ?

जानेवारी महिना संक्रांत सणाची तयारी माहेरच्या घरी जोरात चालू होती . सोलापूर सारख्या शहरात काठ्यांची मिरवणूक , गड्ड्याची जत्रा धामधूम
जोरात असते ! भोगी , संक्रांत दोन दिवस सण अगदी उत्साहात पार पडले . दिनांक 16 ला करिदिन होता . आजोबा कटिंग ला जातो बोलले तसे माझ्या बाबांनी त्यांना
थोपवले . आज नका जाऊ ! उद्या जा पण काळाला कोण थोपवू शकणार . घरातील मंडळी आपापल्या कामाला गेली . आजोबा सकाळीच बाहेर पडले . त्यांना स्मृतिभ्रंश / विस्मरण चा त्रास होत होता . आत्तापर्यंत असेच दोनवेळा बाहेर पडल्यावर
घरचा रस्ता विसरले . काहीही सांगता येत नव्हते . सुदैवाने एक दोघांनी त्यांना ओळखले आणि घरी आणून सोडले.

त्या दिवशी ही तेच झाले नेहमीच्या सलून दुकानात त्यांना सोडून बाबा पुढे ऑफिस च्या कामाला गेले . दुकानदार ओळखीचाच असल्याने व घर जवळ असल्याने काळजीचे कसलेच कारण नव्हते . त्याने घरापर्यंत सोडतो सांगितल्याने घरचे ही निर्धास्त होते . वय झालेले त्यातून विस्मरणचा त्रास होत असल्याकारणाने त्यांना घरातील मंडळी एकटे कुठेही सोडत नसत ! कटिंग , दाढी आटपून दुकानातील मुलाने त्यांना चाळीच्या गेट जवळ आणून सोडले व तो परत गेला ….

त्या दिवशीची वेळ काळच तसा होता का ? .
आजोबा खूप श्रद्धाळू धार्मिक वृत्तीचे होते .पंढरपूर , तुळजापूर , श्रीशैल वाऱ्या चालत केल्या होत्या त्यांनी ! अयोध्या इथे तर राम मंदिर मोर्चा त हे एकटे वयस्कर गृहस्थ , सोलापुरातून सहभागी झालेले ! हातात सतत जपमाळ आणि तोंडाने श्रीरामाचा अखंड जप ….पूजाअर्चा सुद्धा ओला पंचा / धोतर नेसून करत …… मग करिदिन असताना सुद्धा ते कटिंग ला बाहेर कसे पडले …?

चाळीच्या गेट जवळ आल्यावर त्यांना काय आठवले कोणास ठाऊक
ते सरळ दुसऱ्या रस्त्याने चालत निघाले …अचानक पुन्हा घर आठवेना , रस्ता चुकला …..सरळ सरळ चालत राहिले . सकाळची वेळ असूनही त्यांना कसलीच भ्रांत नव्हती .काहीही कळण्यापलीकडे घडले होते….

इकडे घरी सगळ्यांनी शोधाशोध चालू केली होती . दोन दिवस अखंड शोध घेतला , तक्रार नोंदवली पण काहीही पत्ता लागत नव्हता . अगदी शवागरात आलेली प्रेते पाहण्यापासून सगळे प्रयत्न चालू होते . सतत मनातून देवाला आळवणे चालू होते….अखेर चार दिवसानंतर पुन्हा सिव्हील हॉस्पिटलमधून फोन आला . आजोबांच्या वर्णनानुसार ते प्रेत त्यांचेच असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती . आत्तापर्यंत फक्त सिरीयल , पिक्चरमध्येच असे प्रसंग पाहिले होते पण आपल्याच घरात अशी घटना घडावी यावर विश्वास बसत नव्हता .

बाबा , काका , आणि माझी भावंडे ….. हॉस्पिटलमध्ये गेले . त्यांनी ते प्रेत आजोबांचेच असल्याचे ओळखले पण
…..ठराविक शरीरावरील खुणांवरूनच …..आणि अर्धवट फाटलेले कपडे यावरून….प्रसंगाचे वर्णन करताना , लिहिताना अजून डोळ्यातील अश्रूंचा महापूर आम्ही थांबवू शकत नाही आज इतक्या वर्षा नंतरही !

त्या दिवशी आजोबा फिरत फिरत हायवेला चालत राहिले आणि त्यांना ट्रकने उडवले व प्रेत एका शेतात फेकून दिले . शेतातील मालक , वाटेकरी लोक सणवार झाल्यावर जेंव्हा शेतात आले . त्यावेळी अखंड कुत्री भुंकत होती .त्या लोकांना शंका आली म्हणून त्यांनी शेतात शोध घेतला . तर एके ठिकाणी चार पाच कुत्री… कावळ्यांना
सतत हुसकावून लावत होती . सर्वसाधारणपणे काही भक्ष्य मिळाले तरच एवढ्या मोठ्या प्रमाणात कावळे एका ठिकाणी गोळा होतात . अन्यथा नाही …..त्या लोकांना तिथले दृश्य पाहून अंगावर सर्रकन काटा आला . वर्णन करताना पण त्यांच्या डोळ्यात पाणी येत होते ……. कावळ्यांनी बॉडीवर टोचून टोचून मांस खाल्ले होते ….कुत्री लचकी तोडत होती . चेहरा तर पूर्णपणे विद्रुप झाला होता …..अर्थात ट्रकने उडवले किंवा काय याला पुरावा सापडला नाही पण पोलिसांनी ही शक्यता वर्तवली…..!
कोणी घटना बघितली हे सांगायला पण पुढे आले नाही …..कायद्याचे लचांड मागे लावून कोण घेणार ? ही देखील लोकांची मानसिकता असते ना !

आजोबांच्या कपाळावर लहानपणी पडल्यामुळे मोठे ठेंगूळ होते . आणि पोटाला हर्नियाचे ऑपरेशन ची खूण …..अर्धवट फाटलेल्या झब्ब्यातून जपाच्या माळेचे मणी….
वगैरे खुणांवरून ते प्रेत आजोबांचे असल्याचे निष्पन्न झाले.

घरात एकच कोलाहाल माजला ! एका देवमाणसाचा असा दुर्दैवी अंत होऊ शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता . होतेच ते देवमाणूस …..अतिशय , प्रामाणिक होते. आपल्या सर्व्हिस च्या कालावधीत ते तलाठी पदावर असताना त्यांच्या हातून दप्तर हरवले . तर त्यांनी त्वरित नोकरीचा राजीनामा दिला . अखंड शेतीविषयीचा ध्यास , शिक्षणाबद्दलची ओढ , कळकळ …नातवंडे शिकून मोठी व्हावीत म्हणून धडपड …..! शेताकडील मंद्रुप गावात तर त्यांना खूप मान ….
रावमामा म्हणून त्यांची ओळख होती . स्वतःच्या जीवनात त्यांना अनेक हाल – अपेष्टाना तोंड दयावे लागले ….तरीही त्यांनी आपल्या मुलांना , नातवंडांना अतिशय उत्तमरीत्या घडवले.

आम्हीतर शाळेतील प्रगतीपुस्तकावर त्यांचीच सही घेत …..एकदा माझे बाबा सहजच म्हणाले की दे मी सही करतो , तर मी पटकन बोलून गेले.
नाही आमचा अभ्यास आजोबा घेतात तर प्रगतीपुस्तकावर पालक म्हणून सही करण्याचा मान त्यांचाच ! बाबांचा चेहरा गोरामोरा झाला पण आजोबा गालातल्या गालात हसत होते . अर्थात आई – बाबा दोघेही सर्व्हिस करत असल्याने आम्हा नातवंडांना आजी – आजोबांनी च सांभाळले .
मग नातवंडे म्हणजे त्यांच्यासाठी दुधावरची साय असणारच ना !

अशा अनेक आठवणी
दाटून येत होत्या. संपूर्ण जीवनप्रवास उलगडणे शक्यच नाही . पण राहून राहून याचे आश्चर्य वाटते की जो देवमाणूस म्हणून समाजात ओळखला जातो , त्याची परीक्षा देवाने अशाप्रकारे घ्यावी !
केवढा हा दुर्विलास ! शेवटच्या क्षणी दोन थेंब पाणी पाजण्याचे पुण्य पण कुटुंबियांना मिळू नये !

का कोणास ठाऊक पण इतक्या वर्षानंतरही हा प्रसंग आम्ही विसरू शकत नाही …..कितीही ठरवले तरी ….ओठ थरथरतात …..डोळ्याच्या कोपऱ्यातून अश्रू ओघळत राहतातच !!😰

 

©️®️सौ.राजश्री कुलकर्णी /भावार्थी
पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}