देश विदेशमंथन (विचार)मनोरंजन

★★कृष्णा★★ ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

★★कृष्णा★★

मल्हार मॉलच्या बाहेर आला आणि अचानक पावसाचा जोर वाढला. सकाळपासून रिपरिप सुरूच होती. आज रविवारची सुट्टी म्हणून तो मॉलमध्ये खरेदी करायला आला होता. मल्हार पाऊस थांबण्याची वाट बघत तिथेच उभा होता,इतक्यात तिथे धावत एक तरुणी आली. तिने छत्री बंद केली आणि मल्हार तिच्याकडे बघत राहिला. सावळा रंग,टपोरे डोळे, धनुष्यासारखी रेखीव जीवणी, सरळ नाक आणि कुरळे केस! इतकं मोहक सौंदर्य त्याने आजवर बघितलं नव्हतं. तो परत चोरून तिच्याकडे बघायला लागला. तिच्या कुरळ्या केसांमधून टपकणारा पावसाचा थेंब तिच्या गोबऱ्या गालांवर अवखळपणे विसावत होता. त्या मुलीने छत्री जरा झटकली आणि ती मॉलच्या आत गेली. मल्हार वेडावल्यासारखा तिच्याकडे बघत होता. ती मुलगी दृष्टीआड झाल्यावर तो भानावर आला. पावसाचा जोर कमी झाला आणि मल्हार पार्किंगमध्ये गाडी काढायला गेला.

घरी आल्यावर देखील मल्हारच्या डोळ्यांपुढून ती मुलगी हटत नव्हती. आय टी कंपनीत काम करणाऱ्या मल्हारला सुंदर मुली नवीन नव्हत्या. त्याच्या अनेक कलीग्स अतिशय देखण्या,स्मार्ट होत्या. पण ते सौंदर्य बघून मन असं विचलित झालं नव्हतं. ह्या मुलीच्या गोडव्याने तो पुरता वेडावला होता. पण दोघांचेही काहीतरी लागेबांधे असावे. ती मुलगी मल्हारला परत एका ग्रीटिंग शॉपमध्ये भेटली. ग्रीटिंग बघण्यात दंग असलेल्या तिच्याकडे मल्हार अनिमिष नेत्रांनी बघत होता. तिने मल्हारकडे बघितल्यावर तो एकदम गोंधळला.
“मला तुमची थोडी मदत हवी आहे.”
मल्हारने पुढाकार घेत तिच्याशी संवाद सुरू केला.
“काय?” तिने प्रश्नार्थक नजरेने विचारलं.
तिचा मधाळ स्वर ऐकून मल्हार सुखावला.
“मला एका मुलीला प्रपोज करायचं आहे. कुठलं ग्रीटिंग घ्यावं कळत नाहीय. कॅन यु हेल्प मी प्लिज?”
“शुअर”. ती गोड हसली.
तिने ग्रीटिंग बघायला सुरवात केली आणि एक अतिशय सुंदर ग्रीटिंग निवडून मल्हारला दिलं. “मला हे आवडलं. तुम्हाला आवडतंय का बघा.” ती हसली आणि दुसऱ्या ग्रीटिंगच्या कोउंटरवर गेली. मल्हारने ते ग्रीटिंग उघडलं. त्यातला मजकूर वाचला…

तुला बघितलं,तुझा झालो
तू तर माझी हृदयसांगिनी
साथ तुझी सात जन्म हवी
वाट चालेन तुझ्या पावलांनी

मल्हार मनात हसला. त्याने ते ग्रीटिंग घेतलं आणि कोउंटरवर गेला.
बिल देऊन बाहेर पडला. ती मुलगी पैसे द्यायला कोउंटरवर आली तर तिच्या हातात ग्रीटिंग देत दुकानदार म्हणाला, “एका कस्टमरने हे ग्रीटिंग तुम्हाला द्यायला सांगितलं आहे. त्या मुलीने ते ग्रीटिंग बघितलं,तिला आश्चर्य वाटलं. हे ग्रीटिंग तर मी त्या मुलाला निवडून दिलं होतं. तिच्यासमोर तो देखणा मुलगा आला. तिने ग्रीटिंग उघडलं.

प्रिय….
तुझं नाव मला माहिती नाही. पहिल्यांदा तुला मॉलच्या बाहेर बघितलं. तेव्हाच तू आत हृदयात जाऊन बसली होतीस. तू मराठी आहेस का अन्य भाषिक आहेस,हे देखील ठाऊक नव्हतं. पण तू आज मराठीत बोललीस म्हणजे तू मराठी असावी,असं मी गृहीत धरतो. ‘लव्ह ऍट फर्स्ट साईट’ अशा गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नव्हता पण तुला बघितलं आणि ते खरं असावं असं वाटलं. तुझी सात जन्मांची सोबत असावी असं वाटायला लागलं आहे. तुला कदाचित हे सगळं फिल्मी वाटेल पण हे खरं आहे. माझा मोबाईल नंबर देतो आहे. तुझ्या फोनच्या प्रतिक्षेत..

मल्हार

तिने ते ग्रीटिंग बंद केलं. आजूबाजूला बघितलं. जणू काही तिची चोरी पकडली जाणार होती. तिने पैसे चुकते केले आणि घरी आली.

घरी आल्यावर ती सतत ते ग्रीटिंग उघडून वाचत होती. ‘मल्हार’… किती सुंदर नाव! इतका देखणा,गोरापान मुलगा माझ्या प्रेमात पडावा? तिच्या सावळ्या रंगामुळे तिला तीन चार स्थळांकडून नकार आला होता. मल्हारला सतत आठवत,ती मोहरून गेली. पण काहीच ओळख नसताना फोन तरी कसा करावा? दोन दिवसांनी तिने मल्हारला फोन केलाच!
“हॅलो मल्हार हिअर!”
पलीकडून पाच मिनिटं शांतता होती. शेवटी ती हळुवार आवाजात बोलली,
“कृष्णा! कृष्णा बोलतेय.”
“कृष्णा?”
“हो,ग्रीटिंगवाली.”
“ओह!किती गोड नाव. तुम्हाला साजेसं! काय म्हणतेय ग्रीटिंगवाली?” मल्हार हसत म्हणाला.
“भेटूया?”
“आत्ता सुद्धा भेटायला तयार आहे!” मल्हार तिची चेष्टा करत म्हणाला.

दुसऱ्याच दिवशी मल्हार आणि कृष्णा भेटले आणि पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांचे झाले. अगदी चट मंगनी पट ब्याह असेच झाले.

**

लक्ष्मीपूजनाची साखर देऊन कृष्णाने सगळ्या मोठ्या व्यक्तींना वाकून मनोभावे नमस्कार केला. दिवसभर त्या भरजरी साड्या, एवढे दागिने घालून कृष्णाला आता जड व्हायला लागलं. हेवी मेकअप मुळे घाम यायला लागला होता.कधी एकदा साडी बदलते असं तिला झालं. तिची ती अस्वस्थता सविताला जाणवली. तिने हळूच कृष्णाला बाजूला घेतलं आणि म्हणाली, “कृष्णा,अग एखादी हलकी साडी नेस हवं तर आणि थोडे दागिने पण आता काढून ठेवलेस तरी चालतील. तुम्हा मुलींना हल्ली कुठे सवय असते ग साडीची आणि इतक्या दागिन्यांची?”
“अहो आई,पण चालेल का बाबांना आणि आजींना?” कृष्णाने हळूच विचारलं.
“चालतं ग,फक्त शालू बदलून दुसरी नेस. जा,बदलून ये.”

कृष्णाला अगदी हुश्श झालं.ती पडत्या फळाची आज्ञा घेऊन तिच्या आणि मल्हारच्या खोलीकडे जायला निघाली. इतक्यात आजींच्या खोलीतून तिला बोलणं ऐकू आलं
“मल्हार पुढे अगदीच सामान्य वाटतेय.मल्हार केवढा गोरापान,देखणा आहार. ही सावळीच आहे.”

कृष्णाने ते ऐकलं आणि तिला एकदम रडावं असंच वाटलं.ती सटकन तिथून बाजूला झाली. खोलीत आल्यावर तिचे डोळे भरलेच.आज माहेर सोडून आलोय आणि आल्या आल्या हे असं ऐकावं लागलं. तिने डोळे पुसले,चेहरा स्वच्छ धुतला आणि थोडी पावडर,आणि कपाळावर चंद्रकोरीची टिकली लावली. इतक्यात मल्हार खोलीत आला.
“सुंदर,धिस इज माय कृष्णा! किती मेकअप करता ग तुम्ही मुली लग्नात! खरं रूप झाकल्या जातं सगळं. आता किती गोड दिसतेय. तुझ्या ह्या रुपावरच तर फिदा झालो होतो.” मल्हार तिच्याकडे बघत म्हणाला.

“मल्हार,तू मला कसं काय पसंत केलंस? मी इतकी सावळी आणि तू इतका गोरा, देखणा.”

“आता हे काय नवीन डोक्यात आलंय तुझ्या? लग्न ठरल्यावर इतक्या वेळा भेटलो तेव्हा नाही विचारलं?”
“आत्ता सहज मनात आलं. ” कृष्णा डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाली.
“एक राज की बात बताऊ? नवऱ्यापेक्षा बायको नेहमी डावीच असावी म्हणजे संशयाचे भूत डोक्यात शिरत नाही.”मल्हार तिला चिडवत म्हणाला.
“मल्हार” कृष्णाने त्याच्याकडे डोळे मोठे करून बघितलं.
“चेष्टा ग! तुझ्या ह्या सावळ्या तजेलदार रंगापुढे गोऱ्या मुली फिक्या पडतील. आणि तुझं नाव किती शोभतं तुला. कृष्णा; सच अ स्वीट नेम. आणि हे केसात पाणी कसलं?”मल्हार तिच्या जवळ येत म्हणाला.
“ते आत्ता फ्रेश होताना केसात पडलं असेल.” कृष्णाने ते पुसायला हात वर नेले.
“थांब कृष्णा!” मल्हारने ते पाण्याचे थेंब स्वतःच्या ओठांनी टिपले. कृष्णाचा चेहरा हातात घेतला.

कृष्णा लाजुन लगेच बाजूला झाली. ” मल्हार लवकर बाहेर ये. अजून पाहुणे आहेत हं घरात! ” कृष्णा हसत खोलीच्या बाहेर पळाली.मल्हारशी बोलल्यावर तिची कळी परत खुलली.

नव्या संसाराची गोडी दिवसेंदिवस वाढत होती.कृष्णा मल्हारच्या सहवासात खुश होती.मल्हार उत्तम गात होता.त्याचे वडील शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत असत.एक शास्त्रीय संगीतातील राग म्हणून त्यांनीच मल्हारचं नाव ठेवलं होतं.वेळ असेल तेव्हा मल्हार देखील त्यांना बैठकीत साथ देत असे.

लग्न ठरल्यावर मल्हारने कृष्णाला एकदा गाणं ऐकवलं आणि ती त्याच्या अजूनच प्रेमात पडली. मल्हारचा एक सांगीतिक गृप होता. काही जण तबला वाजवायचे,कोणी गिटार,कुणी बासरी. एक छान संगीत गृप जमला होता. त्यांच्या आनंदासाठी ते अधूनमधून भेटत आणि मैफिल करत असत.

**

ऑफिसला निघतानाच मल्हारला फोन आला.नंबर सेव्ह केलेला नव्हता.त्याने फोन रिसिव्ह केला. “हॅलो,मल्हार जोशी हिअर.”
“मला माहितीय रे तू कोण आहेस ते!, मी कोण ते ओळख.”पलीकडून एका स्त्रीचा आवाज आला.
मल्हारला आवाज ओळखता येईना.
“कसला तू मित्र रे? आणि काय तुझी मैत्री. मी निकी बोलतेय.”
“माय गॉड, निकी तू? आणि कुठून बोलते आहेस?”
मल्हार इतक्या जोरात ओरडला की कृष्णा त्याच्याकडे बघतच राहिली.

” परवाच भारतात परत आले आहे. तुझा नंबर सुवर्णाकडून घेतला.कधी भेटतोस? मला खूप घाई झालीय तुम्हा सर्वांना भेटायची.”
“आधी तू माझ्या घरी ये, मग आपण ठरवू.”मल्हार म्हणाला.

मल्हारच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.कृष्णाने विचारायच्या आधीच त्याने सांगितलं.
“कृष्णा,निकीचा फोन होता. निकिता माझी स्कुलमेट! अमेरिकेहून भारतात परत आली आहे. अतिशय सुंदर गाते. शाळेत गॅदरिंग मधे आमचे दोघांचे डुऐट असायचेच. किती वन्स मोर मिळायचे. नाऊ शी विल जॉईन अवर मुझिकल गृप. आता खरंच मजा येईल. मी तिला घरी बोलावलं आहे. ती कधी येणार ते तुला कळवतो. निघतो मी.” मल्हारने बॅग घेतली आणि ऑफिसला गेला.

कृष्णाच्या डोक्यात विचार सुरू झाले.कोण असेल ही निकिता? तिचा आवाज ऐकून मल्हार इतका उल्हसित झाला. तिने सविताला विचारलंच,
“आई,ही निकिता कोण हो?मल्हारला तिचा आत्ता फोन आला होता.”
“निकिताचा फोन? यु एस वरून आला होता का?”
सविताने विचारलं.
“नाही,ती भारतात आलीय.”
“ती पहिलीपासून बारावीपर्यंत मल्हारच्याच वर्गात होती.अतिशय सुंदर आवाज. मल्हार आणि ती,दोघेही दरवर्षी शाळेचं गॅदरिंग गाजवायचे.मला तर वाटायचं दोघे लग्न करतात की काय! इतके सतत एकत्र असायचे. पण तसं काही झालं नाही. बारावीनंतर ती इंजिनीरिंगला गेली,मग अमेरिकेत एम एस आणि मग तिथल्याच तिच्या एका कलीगशी लग्न केलं. तो मुंबईचा आहे.”
“मल्हारने तिला घरी बोलावलं आहे आई.”
“कधी येतेय?ती म्हणजे एक वादळ आहे.कधीही येऊन धडकेल.”सविता हसत म्हणाली.

दोन दिवसांनी एका रविवारी निकिता घरी आली. तिला बघुन कृष्णाचे डोळे विस्फारले. निकिता अतिशय देखणी होती. गोरापान केतकी वर्ण,उंच बांधा, सरळ मऊ लांब केस.ती कितीतरी वेळ तिच्याकडे बघतच बसली.

“हाय कृष्णा,मी निकिता.मी मल्हारची खूप जवळची मैत्रीण आहे. मल्हार बोललाच असेल न ग तुला.” निकिता म्हणाली.
कृष्णाच्या मनात आलं,हे मल्हारने कधीच मला सांगितलं नाही.” हो हो,सांगितलं की!” तिने वेळ मारून नेली.
“निकिता, तुझ्यात काही फरक नाही बघ.आता जेवूनच जा.आज काकांच्या पण क्लासला सुट्टी आहे.”
सविता म्हणाली.
“येस निकी,आता जेवूनच जा.”मल्हारने लगेच री ओढली.

टेबलवर जेवताना निकिताने कृष्णाला विचारलं,
“तु काय करतेस?कुठे जॉब करतेस?”
कृष्णा काही बोलायच्या आतच सविता म्हणाली,
“प्रत्येकीने नोकरी केलीच पाहिजे असं आहे का? ती घर उत्तम सांभाळते आहे. माझी जबाबदारी कमी झाली.”
“आणि तू गातेस की नाही कृष्णा? तुझा नवरा,तुझे सासरे इतके सुंदर गाणारे आहेत.” निकिताने विचारलं.
“ती गात नाही निकिता,पण तिने मल्हारचं आयुष्य सुरेल केलं आहे.” अश्विनने कृष्णाची बाजू घेतली.
सासू, सासरे दोघांनीही जे सांभाळून घेतलं त्यामुळे कृष्णाचं मन कृतज्ञतेने भरून आलं.

” निकिता, तू भारतात कायमची परत आलीस का? का परत जाणार आहेस?”अश्विनने विचारलं.
“काका,आता इथेच पुण्यातच सेटल होणार.माझ्या नवऱ्याला इथली एक चांगली ऑफर आली आहे .शिवाय सासू,सासरे इथेच असतात. आमचा प्रभात रोडला बंगला आहे.मी जॉब बघते आहे.”
“गुड,मेरा भारत महान. यु कॅरी ऑन. मला जरा एक फोन येणार आहेत.”अश्विन टेबलवरून उठले.

मल्हार तर जुन्या आठवणीत इतका रमला होता की त्याला कसलेच भान नव्हते.
“निकी,तू आमचा मुझिकल गृप जॉईन कर. मजा येईल परत डुएट गायला. काय धमाल केलीय ग तेव्हा!”
“मी उद्याच येते.सध्या जॉब मिळेपर्यंत मी मोकळीच आहे.लेट अस प्लॅन अ मैफिल.” निकिता म्हणाली.

निकिता आणि मल्हार आता गाण्याच्या निमित्ताने रोजच भेटू लागले.त्यांच्या गृपने एका इव्हेंटसाठी कार्यक्रम करायचं ठरवलं होतं.त्यामुळे त्याची प्रॅक्टिस रात्रीच होत असे. दिवसभर कुणाला वेळ मिळत नव्हता.
मल्हारचं कृष्णाशी वागणं अगदी नॉर्मल,नेहमीसारखं होतं पण निकिताला बघितल्यापासून कृष्णाला न्यूनगंडाने पछाडलं. मल्हारला निकिताशी लग्न करायचं होतं का?आपल्याशी केलेलं लग्न ही तडजोड तर नाही ना,असे विचार डोक्यात यायला लागले.

मैफिलीचा दिवस उजाडला.
कृष्णाला जायची इच्छाच होत नव्हती पण सविता,अश्विन देखील कार्यक्रमाला जाणार होते. त्यांनी आग्रह केल्यामुळे तिलाही जाणं भाग पडलं.

मैफिलीची सुरवातच निकिताच्या गाण्याने झाली. ‘तुज मागतो मी आता,मज द्यावे एकदंता’ ह्या गाण्याने सुरवात करून तिच्या आवाजाने तिने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले.

निकिता आणि मल्हार स्टेजवर डुएट गायला आले आणि कृष्णाला उगाचच धडधडायला लागलं.
” तेरे हुस्न की क्या तारीफ करू…”
हे द्वंद्वगीत दोघांनी गायलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. कृष्णाला आता दाटून आल्यासारखं झालं. ती ह्या सगळ्यात उपरी आहे असं वाटायला लागलं.
इतक्यात मल्हारने अनाउन्स केलं, “आता मी जे गाणं म्हणणार आहे ते माझी प्रिय पत्नी कृष्णा हिच्यासाठी आहे. कृष्णा, हे गाणं खास तुझ्यासाठी!”

कृष्णाने चमकून मल्हारकडे बघितलं. तिला हे सगळं अनपेक्षित होतं. मल्हारने डोळे मिटून स्वर धरला आणि रफीचे गाणे गायला सुरवात केली..

‘कही एक मासुम,नाजूकसी लडकी..
बहोत खूबसुरत मगर सावली सी..’

ते गाणं ऐकून कृष्णाचे डोळे आता भरून यायला लागले. तिने मल्हारकडे बघितलं. त्याच्या डोळ्यातली प्रीत तिला बरंच काही सांगून गेली,आणि कृष्णा तशीच लाजली..जशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लाजली होती….

××समाप्त××

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}