देश विदेशवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

प्रवास वर्णन दि. 28/2/2024 अंदमानची भेट लेखक: श्री. म्हाळसाकांत देशपांडे.

प्रवास वर्णन
दि. 28/2/2024

अंदमानची भेट

मला आठवतं, मी अगदी लहान असल्यापासून जेव्हा जेव्हा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास वाचनात आला, तेव्हा तेव्हा एक नाव सतत सतत समोर येत असे, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. असं वाटत होतं की भारतमातेच्या स्वतंत्रतेचा इतिहास हा “सावरकर” या नावाभोवती घुटमळतो आहे. ब्रिटिशांनी आणि देशद्रोही डाव्या इतिहासकारांनी अगदी ठरवून ठरवून मिटवू म्हणून प्राणांतिक प्रयत्न करूनही ज्यांच्या पाऊलखुणा कधीही पुसल्या जाऊ शकल्या नाहीत, त्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ज्या अंदमानात मरणप्राय अश्या “काळया पाण्याची शिक्षा” भोगण्यास पाठवले होते, त्या अंदमानात भेट देण्याची तीव्र इच्छा त्यामुळेच तेव्हापासूनच मनात घर करून होती.

“शब्दामृत” या सावरकर प्रेमी संस्थेकडून दिनांक 28 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान अंदमान भेटी ची माहिती मिळताच जवळच्या मित्रांना संपर्क करून “सस्नेह” (म्हणजे आम्हा सर्व मित्रांनी एकत्र) सहल आरक्षित केली.
स्वातंत्र्यसूर्य सावरकर यांच्या असीम कष्टप्रद प्रखर देशभक्तीने सुसंस्कारित आणि प्रत्यक्ष सावरकरांच्या अधिवासाने पावन झालेलं सेल्युलर जेल हे कोणत्याही तीर्थक्षेत्रापेक्षा कमी मानता येणार नाही. याआधी जे मित्र अंदमानला जाऊन आले होते त्यांचे वर्णन ऐकूनच अंगावर शहारे येत असत. आता तर प्रत्यक्ष जायचं आहे.
पाहता पाहता तो प्रस्थानाचा मुहूर्त आला. फार फार वर्षांपासून असलेली मनातील तीव्र उत्कंठा आता शिगेला पोचत चालली होती. पुणे ते बेंगलुरु आणि बेंगलुरू ते पोर्ट ब्लेअर येथील “वीर सावरकर विमानतळ” असा विमान प्रवास ठरलेला होता.

दिनांक 28 फेब्रुवारी 2024

सकाळी सव्वा पाच वाजता पुणे विमानतळावर पोहोचलो. काही वेळातच पुण्याहून येणारी सर्व मित्रमंडळी भेटली. मनात एक प्रकारची अधीरतेची भावना घेऊन आम्ही विमानात आसनस्थ झालो. बरोब्बर सव्वा सात वाजता आमच्या पुष्पक विमानाने गगनभरारी घेतली. साडेआठ वाजता बंगलोरला पोहोचलो. पोर्ट ब्लेअर ला जाणारे विमान साडेअकरा वाजता होते. एव्हाना झालेल्या काहीशा धावपळीमुळे चैतन्य काढ्याची म्हणजे अमृततुल्य चहाची तलफ जागृत झाली, आणि आम्ही आमचा मोर्चा विमानतळावरील छोट्याश्या चहा स्टॉलकडे वळवला. परंतु, एका लहान कपभर चहाची किंमत ऐकूनच आमचा त्रिफळा उडाला. या त्रेधा तिरपिटीमुळे आणखी धावचित होण्याआधी आम्ही आमच्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलो. बरोब्बर साडेअकरा वाजता आम्ही आमच्या वायूयानात विराजमान झालो आणि वीर सावरकर विमानतळाच्या दिशेने उड्डाण केले. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आमचे पुष्पक विमान वीर सावरकर विमानतळावर दाखल झाले.
आपले सामान घेऊन विमानतळाबाहेर येताच समोर भव्य अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे दर्शन झाले. आम्ही धावतच त्या पुतळ्याजवळ गेलो आणि नतमस्तक होऊन या स्वातंत्र्यसूर्याला नमन केलं. अवघा देह पुलकित झाला होता. थोड्याच वेळात “शब्दामृत” चे शिलेदार श्री. तृषांत पाते आमच्या स्वागतास हजर झाले. आमच्या ३५ जणांच्या या चमूला “अंदमान टिळक ग्रुप” असे नामाभिधान बहाल केले गेले. पुढे काही क्षणातच आमच्या सेवेला एक सुंदर वातानुकूलित स्वयंचलित रथ (म्हणजे आपली लक्झरी बस हो..!!) हजर झाला, आणि अस्मादिकांस घेऊन हॉटेल ईस्टर्न गेटच्या दिशेने सुसाट निघाला. मधल्या वेळेत “श्री. तृषांत” ते “अरे तृषांत” इतका पल्ला आमच्या संभाषणाने गाठला होता. हॉटेलला पोचताच तृषांत ने सूचना केली की सर्वांनी आपापल्या निवासात सामान ठेवून फ्रेश होऊन लगेचच यावे, जेवण तयार आहे. परंतु, आमच्यातील महिला वर्गाने आग्रह केला की आम्हाला अगोदर चैतन्य काढा हवाय, नंतरच जेवण त्याप्रमाणे लगेचच चहाची ऑर्डर गेली. त्यादरम्यान, आम्ही आम्हाला दिलेल्या निवासात पोहोचलो. अतिशय सुंदर वातानुकूलित, आरामदायक डबल बेडचा निवास पाहून प्रवासाने दमलेला मनमोर चांगलाच सुखावला. झटपट फ्रेश होऊन उत्साहात चैतन्य काढ्यास सामोरे गेलो. परंतु हाय रे दैव…!! पुणे सोडल्यानंतर ते पुन्हा पुण्यास येईपर्यंत आमच्या वाट्याला “दुग्धशर्करा” योग नाही, हे निदर्शनास आले. म्हणजे, अंदमानात दुधाची वानवा. त्यामुळे चहातून दूध उणे..!!! वास्तविक, चहाच काय पण दुधाचा कोणताही पदार्थ dairy whitener वापरून करावा लागतो. त्यात आम्ही साखर वर्ज्य केलेली…!! म्हणून हा दुग्धशर्करा योग पुन्हा जमून येण्यास आता “पुण्यमार्ग” धरण्यावाचून गत्यंतर नव्हते…!!! असो…
आता आजच्या दिवशीची दुसरी परीक्षा म्हणजे जेवण. कारण, आज संकष्टी चतुर्थीचा उपास… त्यात या प्रवासामुळे अगदीच कडकडीत उपास घडलेला. प्रवासाने आलेला शीण तर होताच. त्यामुळे, तडक निवासात पोहोचलो आणि बरोबर आणलेले उपवासाचे पदार्थ केवळ उपवासाची आचारसंहिता म्हणून “उदरं भरणम्” म्हणत आत ढकलून अलगद निद्रेच्या स्वाधीन झालो.

सायंकाळी पाच वाजता पुन्हा त्याच वातानुकूलित रथातून आम्ही हॉटेल कॅसल ला रवाना झालो. तेथील सभागृहात पोंचताच आम्ही आश्चर्यचकित झालो. कारण, आम्ही फक्त 35 जणांचा ग्रुप असेल असे समजत होतो, पण तिथे प्रत्यक्षात 155 हुन अधिक लोक उपस्थित होते आणि त्यांनी आमच्या आधी उपस्थिती लावली होती. मग आम्हीसुद्धा यथोचित जागा पाहून स्थानापन्न झालो. इतकी गर्दी पाहून आता ‘इतक्या गर्दीत आपल्याला काय ऐकायला येणार ‘ असा एक विचार मनात चमकून गेला. पण, एका विलक्षण अनुभवाचे साक्षीदार आम्ही होणार होतो, याची पुसटशीसुद्धा कल्पना आम्हाला नव्हती. इथे जे आम्ही ऐकणार होतो, ते आयुष्यभर विसरता येण्यासारखे खचितच नव्हते. थोड्याच वेळात “शब्दामृत”चे सरसेनापती, महान सावरकरभक्त, प्रचंड व्यासंगी आणि उत्कृष्ट वक्ता श्री पार्थ बावस्कर आणि स्वरबहार मुग्धा वैशंपायन यांचे आगमन झाले. प्रास्ताविकानंतर श्री पार्थ बावस्कर यांचे सावरकरांना मूर्तीमंत साकार करणारे व सर्वांना मंत्रमुग्ध करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवनामृत स्तोत्रच त्यांच्या मुखातून प्रस्फुटीत होत होते. सुमारे दोन तास अखंड नीरव शांततेत हा वाग्यज्ञ सुरू होता, त्या दैदिप्यमान होमकुंडात ओजस्वी शब्दसमिधा अर्पण होत होत्या आणि त्यातून निघालेल्या विचारमंथन रुपी अमृताने आम्ही चिंब न्हाऊन निघालो होतो.
अश्या या विलक्षण भारावलेल्या अवस्थेत, आम्ही संपूर्ण सावरकरमय होऊन गेलो होतो. पार्थच्या या सम्मोहनास्रात बद्ध असतानाच, मुग्धा नावाच्या स्वरसम्मोहिनीने तिच्या कर्णमधूर भावोत्कट स्वराभिषेकाने आमच्या अंतर्मनाला पुन्हा तृप्त केले. “शब्दामृत” चे आभार मानावेत तितके थोडे. आतापर्यंत घेतलेले सर्व कष्ट सार्थकी लागले असल्याची खात्री पटली. पहिला दिवस असा संस्मरणीय ठरला, आणि या वास्तव्यात पुढे येणाऱ्या विलक्षण समाधानाची नांदी देऊन गेला.

दि. 29/2/2024.

लेखक: श्री. म्हाळसाकांत देशपांडे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}