Classified
32 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ३२ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ३२
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
पण तो काळ असा होता की, लोक चापेकर प्रकरणाच्या भयंकर धक्क्याने हादरले होते. त्यांची मने शेकडो जणास पोळवीलेल्या त्याच गुप्त कटाच्या विस्तवात आपला हात घालण्यास तोवर धजत नव्हती. इतकेच नव्हे तर तसे व्यर्थ साहस करू देण्यास ते तात्यारावांनाही ममत्वाने पण कसून विरोध करीत होते. असे असले तरी म्हसकर आणि पागे यांना असे काही तरी केलेच पाहिजे अशी टोचणी सारखी लागलेली असेच.
तात्यारावांच्या प्रयत्नांना काही दिवसातच यश आल. म्हसकर आणि पागे अशा प्रकारचे गुप्त मंडळ सुरु करण्यास तयार झाले. या तिघांनी देशस्वातंत्र्यार्थ शपथ घ्यावी असे ठरविले. पण हे मान्य करताना म्हसकर आणि पागे यांनी तात्यारावांना एक अट घातली, ती म्हणजे, ‘काळ’ या वर्तमानपत्राच्या परांजपे यांचा अभिप्राय घेतल्याशिवाय या गुप्त मंडळात आणखी कोणासही सामील करून घेऊ नये. इतकेच काय पण त्यांच्या संमतीशिवाय कोणतेही क्रांतीकार्य हाती घेऊ नये. काळकर्त्यांच्या सांगण्याप्रमाणे हे गुप्त मंडळ चालेले अशा अटीवरच म्हसकर आणि पागे त्यात पाऊल टाकावयास तयार झाले.
काळकर्ते हे त्याकाळी आपल्या वर्तमानपत्रातून उघडपणे चापेकर बंधूंना हौतात्म्ये म्हणत असल्याने, ते अशा सशस्त्र क्रांतिकारी गुप्त संघटनेच्या बाजूने उभे राहतील असा या तिघांना विश्वास होता. वास्तविक या तिघांची काळकर्त्यांशी तोपर्यंत भेट सुद्धा झालेली नव्हती. फक्त म्हसकर यांचा अधून मधून पत्रव्यवहार होत असे. तरी ‘काळ’मध्ये येणारे लेख आणि त्यातील भाषा वाचून काळकर्त्यांना आपण आपल्या चळवळीचे पुढारी करावे असे तिघांच्या मनात होते. ज्यांना वेडेपीर म्हणून नावे ठेवली जात त्या क्रांतीकारकांना काळकर्ते म्हणत की, अशा ‘वेड्यापिरांच्या’ हातूनच क्रांतीच्या काळात खरी शहाणपणाची कृत्ये घडतात. तशी चेतना आणि आग तरुणांच्या मनात निर्माण करण्याचा ‘काळ’चा रोख असे. इंग्रज सरकारचा रोष पत्करून देखील ‘काळ’मध्ये क्रांतीकारकांची वाखाणणी छापून येत असे.
तात्यारावांना माहित होते की, दोन सरकारी नोकर आणि एक सोळा वर्षांचा मुलगा हिंदुस्थानचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबणार होते, म्हणजे मार्ग किती खडतर असेल आणि किती कार्य उभे करावे लागेल. पण तात्यारावांच्या मनात आपण हे कार्य उभारू याबद्दल पूर्ण खात्री होती, तसा त्यांना विश्वास होता. आणि हे त्यांना प्रत्येक सुज्ञ आणि जिवंत माणसाचे अपरिहार्य कर्तव्य असले पाहिजे, असे वाटत होते. लोकमान्य टिळक जरी या तिघांना आपले नेते वाटत असले तरी त्यांना ही सशस्त्र क्रांतीची कल्पना किती रुचेल याची शाश्वती नव्हती. शिवाय ते नुकतेच तुरुंगातून सुटून आल्याने त्यांच्यावर हा भार टाकणे यांना योग्य वाटले नाही. त्यामुळे आधी काही कार्य उभारू आणि मग लोकमान्य टिळकांना भेटू असे चर्चेअंती तिघांनी ठरवले.
आणि जरी कोणी पुढारी मिळाले नाहीत, अगदी इतर अनेक परोपदेश पंडितांप्रमाणे काळकर्ते देखील लिहिण्यापुरते क्रांती लेखक असते पण प्रत्यक्ष क्रांतिकारक होण्याचे किंवा तशांशी दुरून गुप्त संबंधही ठेवण्याचे त्यांनी नाकारले असते तर? तात्यारावांचे विचार अगदी स्पष्ट होते, ‘याल तर तुमच्या सोबत, न याल तर तुमच्या शिवाय’ गुप्त संस्था स्थापून सशस्त्र क्रांतीचा मार्ग ते अवलंबणारच होते.
तात्याराव याबाबत म्हणाले, “माझ्या देशास स्वतंत्र करण्याची प्रतिज्ञा जी मी चापेकर रानड्यांच्या राखेला स्मरून देवीपुढे, काळपत्र हाती पडण्यापूर्वी घेतली तिला दिवसेंदिवस अधिकच प्रज्वलित करण्याचे जे कार्य ‘काळ’ करीत आहे तितके जरी त्यांचे सहाय्य झाले तरी आभारच! अधिक झाले तर त्यांच्यासह न झाले तर त्यांना सोडून ती प्रतिज्ञा, ते वर्तन, मी तरी आजन्म, आमरण आचरणार!”
शपथेवेळी तात्याराव असे म्हणाले होते, आणि हे ऐकताच म्हसकर अधिकच प्रभावित झालेले होते. ते तात्यारावांचे अतिशय कौतुक करत पण मनातून अत्यंत भीत म्हणूनच काळकर्त्यांच्या परवानगीची आडकाठी म्हसकर यांनी मुद्दाम घालून ठेवली होती. जेणे करून तात्याराव अकालीच काही धाडसी कृत्य करून सर्वांना गोत्यात आणणार नाहीत. त्या बैठकीत असे ही ठरवण्यात आले की, काळकर्त्यांच्या संमतीपर्यंत ही गोष्ट कुठेही सांगायची नाही. अगदी तात्यारावांच्या बंधूंना देखील ही गोष्ट कळू द्यायची नाही. बाबारावांचा मित्रपरिवार मोठा असल्याने ही गोष्ट फुटू शकते असे म्हसकर आणि पागेना वाटत होते.
या गुप्त मंडळ स्थापण्यासाठी चाललेल्या बैठकीत आणखीन एक गोष्ट ठरवण्यात आली, ती म्हणजे या गुप्त संस्थेचा प्रचार करण्यासाठी एक उघड अशी संस्था स्थापन करून त्यात तरुणांना एकत्र आणावे. त्या संस्थेने विविध कार्यक्रम आयोजित करावेत. नाशिकमध्ये सुरु असलेल्या सार्वजनिक चळवळींना आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या आपल्या हाती घ्याव्यात. वक्तृत्व सभा वगैरे कार्यक्रम आयोजित करावेत. या उघड संस्थेत जे तरुण येतील त्यातील जे अत्यंत विश्वासू ठरतील त्यांना पारखून मग गुप्त मंडळात सामील करून घ्यावेत.
नोव्हेंबर १८९९ च्या शेवटी या तिघांचे हे गुप्त मंडळ स्थापन झाले. त्याचे नाव ‘राष्ट्रभक्त समूह’ असे ठेवण्यात आले. खर तर तात्यारावांची या मंडळाचे उद्देश स्पष्ट होतील असे नाव ठेवावे अशी इच्छा होती. पण म्हसकरांच्या म्हणण्याप्रमाणे हे नाव ठेवण्यात आले. अशाप्रकारे तिघांचे एक गुप्त क्रांतिकारी मंडळ स्थापन करण्यात आले. त्याचे नामकरण देखील करण्यात आले.
आता या मंडळाची चर्चा करायची असल्यास त्याचे एक सांकेतिक नाव हवे म्हणून धार्मिक वळणाचे पण जास्त प्रचलित नसलेले असे एखादे नाव ठेवायचे ठरले. या सांकेतिक नावानेच या मंडळाचा उल्लेख लेखी व तोंडी करायचा, म्हणजे गुप्त मंडळाची कुणाला खबर लागणार नाही. हे नाव ठरवण्यात आले, ‘रामहरी’. पत्रात वगैरे याच नावाचा वापर करायचा असे ठरवण्यात आले. आज “रामहरी” भेटला; आज “रामहरी” असे म्हणाला; अमुक दिवशी “रामहरी” येणार; “रामहरी” अमक्या ठिकाणी भेटेल म्हणजे ‘गुप्त संस्थेची बैठक आज झाली; अमुक ठरले; अमक्या ठिकाणी गुप्त संस्थेची बैठक आहे.’ अशाप्रकारे सांकेतिक भाषा वापरण्याचे ठरवण्यात आले.
–*–
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता

