मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

सुख -दीपक तांबोळी 9503011250

सुख

-दीपक तांबोळी

कसल्याशा आवाजाने मला जाग आली.खिडकीच्या काचेतून मी बाहेर पाहिलं तर चाळीसगांवची पाटी दिसली.ती पहाताच मी ताडकन उठून बाहेर आलो.स्टेशन मध्ये बरेच बदल झालेले दिसले.इकडे तिकडे पहात असतांना माझी नजर एका ग्रुहस्थांकडे गेली.ते माझ्याकडेच बघत होते.मी त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या बाईशी ते काहीतरी बोलले.ती बाईही आता माझ्याकडे बघू लागली.मलाही ते ग्रुहस्थ थोडेसे ओळखीचे वाटले.पण क्लिक होईना.मी त्यांच्यावरची माझी नजर काढली आणि प्लँटफाँर्मवरच्या गर्दीकडे बघू लागलो.एवढ्यात माझ्या खांद्याला हाताचा स्पर्श झाला.मी चमकून वळून पाहिलं तर तेच ग्रुहस्थ जवळ उभे होते.
” तू अवि ना रे?मधूचा मुलगा?”त्यांनी विचारलं.मी चमकलो.
“हो.तुम्ही?”मी आश्चर्याने विचारलं
” अरे मला ओळखलं नाही?मी प्रभू. तुझ्या वडिलांचा मित्र.तुझा प्रभुकाका” ते आनंदाने म्हणाले. माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.त्यांचा चेहरा ओळखीचा का वाटत होता हे आता लक्षात आलं.
“हो बरोबर”मीही आनंदाने ओरडलो आणि त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकलो तसं त्यांनी मला वरचेवर उचलून मला मिठी मारली.त्यांचा हात बराच वेळ माझ्या पाठीवर फिरत राहिला.त्या स्पर्शाने मला माझ्या वडिलांची आठवण झाली.
“कुठं निघालास?”त्यांनी विचारलं
” दिल्लीला चाललोय कंपनीच्या कामानिमित्त.तुम्ही?”
” आम्ही मुंबईहून येतोय.सुजाताकडे गेलो होतो.तिच्या घराच्या वास्तूशांतीसाठी.बरं चल आता घरी.खुप वर्षांनी भेटतोय.निवांत गप्पा मारु”
“नाही आता शक्य नाही.नंतर येईन केव्हातरी”
” अरे मग परततांना उतर इथे” काकू म्हणाल्या.
हां हे जमण्यासारखं होतं पण माझं थेट पुण्याचं रिझर्वेशन होतं.मी विचार करु लागलो.
” अरे ये रे.काढ सवड थोडीशी. आजचं काम उद्या केलं तर कंपनी काही बुडणार नाही तुझी”काका आग्रह करत म्हणाले. तेवढ्यात गाडीने शिटी मारली.
” बरं बघतो.तुमचा मोबाईल नंबर द्या.मी कळवतो तुम्हांला” त्यांनी घाईघाईने नंबर दिला.
“नक्की ये अवि.तुझ्याशी खुप बोलायचंय.अरे खुप घडामोडी झाल्यात आयुष्यात”
” बापरे! काही वाईट तर नाही ना झालं?”
तेवढ्यात गाडी सुरु झाली.मी गाडीत चढून दरवाजात उभा राहिलो
“नाही रे! तू ये मग बोलू आपण”
” बरं चालेल” मी निरोपाचा हात हलवला त्याबरोबर त्यांचेही हात हलले.मी माझ्या सीटवर येऊन बसलो तेव्हा का कुणास ठाऊक माझे डोळे भरुन आले होते.खुप दिवसांनी असा कुणी प्रेमाने पाठीवर हात फिरवला म्हणून असं असेल कदाचित.

प्रभुकाका आणि माझे वडील नगरपालिकेत एकाच विभागात कारकून होते.जुन्या चाळीसगांवातल्या एका चाळीत आमची घरंही एकमेकांना लागून असलेली.प्रभुकाका माझ्या वडीलांपेक्षा दहा वर्षांनी लहान असले तरी दोघांचं एकमेकांवर सख्ख्या भावांपेक्षा जास्त प्रेम होतं.आमची घरं वेगळी असली तरी परीवार एकच होता.मोबाईल, कंप्यूटर, इंटरनेट अस्तित्वात नसलेले ते दिवस खुप आनंदाचे होते.तुटपुंज्या पगारात दोन्ही घरं व्यवस्थित चालायची.असा एकही दिवस जात नसेल ज्यादिवशी एकमेकांकडच्या भाज्यांचं आदानप्रदान झालं नसेल.आम्ही मुलं तर कधीही शेजारी जाऊन जेवत असू.ब्लँक अँड व्हाईट टिव्ही आणि फक्त दुरदर्शनचा तो जमाना. त्यामुळे आम्ही मुलं गल्लीतच दंगामस्ती करत असू.गरीबी होती पण खुप आनंदाचे आणि सुखाचे दिवस होते ते.मी दहावीत असतांना कसलातरी आजार होऊन माझे वडील वारले.आई अशिक्षित.नगरपालिका तिला सफाई कामगार म्हणून वडिलांच्या जागेवर घ्यायला तयार होती.पण पुण्यातल्या माझ्या मामाला ते काही आवडलं नाही.तो आम्हांला घेऊन पुण्याला गेला.आईला थोडं शिवणकाम येत होतं.त्याच्या जोरावर तिने आम्हांला वाढवलं,शिकवलं,मोठं केलं.चाळीसगांवशी तेव्हापासून जो संबंध तुटला तो जवळजवळ कायमचाच.आज प्रभुकाका भेटले आणि मनातला तो हळवा कोपरा परत एकदा जिवंत झाला.परत येतांना उतरावं का चाळीसगांवला याचा मी विचार करु लागलो.खरं तर नेहमी विमानाने जाणारा मी पण यावेळी दिल्लीहून परततांना तीन चार ठिकाणी काम असल्यामुळे ट्रेनचं रिझर्वेशन केलेलं.परतीचं माझं थेट पुण्याचं रिझर्वेशन होतं.पण प्रभुकाका भेटले आणि माझ्या मनाची दोलायमान स्थिती झाली.अखेरीस मी ठरवलं परततांना चाळीसगांवला उतरायचं.माझं बालपण जिथे गेलं तो भाग बघण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात दाटून आली.प्रभुकाकांच्या जीवनात काय घडामोडी घडल्या तेही मला जाणून घ्यायचं होतं.

परततांना मी चाळीसगांवला उतरलो.फोन केल्यामुळे मधुकाकांचा मुलगा केतन मला घ्यायला आला होता.त्याच्या बाईकवर बसून आम्ही निघालो.जुन्या घराकडे न वळता त्याने बाईक हिरापूर रोडला वळवली तसं मी विचारलं
” अरे इकडे कुठे?आपलं घर तर त्या चाळीत आहे ना?”
” नाही दादा.ती चाळ तर कधीच पडली.तिथे आता शाँपिंग काँप्लेक्स उभं राहिलंय.इकडे आपण स्वतःचं घर बांधलंय” त्याच्या आवाजातला अभिमान मला जाणवला.
त्याने बाईक थांबवली.समोर एक रो हाऊसिंगमधलं बैठं घर होतं.प्रभुकाका दारातच उभे होते.
” ये ये.तू आलास.खुप बरं वाटलं बघ” आनंदाने त्यांनी मला मिठी मारली.” अगदी मधूसारखा दिसतोस रे .त्या दिवशी स्टेशनवर तुला पाहिल्यावर अगदी मधूच असल्याचा भास झाला बघ”
” हो ना.मलाही तसंच वाटलं “काकू बाहेर येत म्हणाल्या.
आत शिरल्यावर काका म्हणाले
” तू फ्रेश हो.चहा घे.मग तुला घर दाखवतो”
केतनच्या आवाजात जाणवलेला अभिमान काकांच्याही स्वरात मला जाणवला.
फ्रेश होऊन चहा घेतल्यावर काका मला घर दाखवायला निघाले.साधंच घर.एका पाठोपाठ तीन छोट्या खोल्या.मागच्या बेडरुमच्या बाहेर लोखंडी जिना.वरच्या रुमकडे जाणारा.
” केतनचं लग्न करायचंय बाबा या वर्षी.त्याच्यासाठी मुद्दाम बांधून घेतली ही रुम.सुनेने म्हणायला नको,आम्हांला प्रायव्हसी नाही म्हणून ” काका जोरात हसले.खाली आल्यावर काकांनी मला विचारलं
” काय कसं वाटलं घर?” त्यांच्या या विचारण्यात आयुष्यात आपण काहीतर करुन दाखवलं ही भावना होती.
” छान आहे “मी म्हणालो.पण हे म्हणतांना मला माझा चार कोटीचा आलिशान बंगला आठवला.
” माझा रिटायरमेंटचा पैसा आला.काही केतनने कर्ज घेतलं.त्यात बांधून टाकलं हे घर.पोराने म्हणायला नको माझ्यासाठी काही केलं नाही म्हणून” काका बोलत होते.मुलाबद्दल, मुलगी सुजाताबद्दल,जावयाबद्दल,नातीबद्दल,जावयाने घेतलेल्या नवीन फ्लँटबद्दल भरभरून सांगत होते.त्यात प्रेम होतं,अभिमान होता,आपलेपणा होता.’ माझ्यासारखा सुखी मीच ‘ ही भावना होती.
ते ऐकतांना माझ्या डोळ्यासमोर माझी पाचशे कोटीचा टर्नओव्हर असलेली कंपनी उभी राहिली.माझ्या त्या आलिशान गाड्या,ते परदेश दौरे,उच्चभ्रू लोकांमधलं बसणं उठणं आठवलं.एवढं सगळं असूनही मी सुखी होतो?काकांसारखा समाधानी होतो?
” घे. पोहे घे” काकूंच्या बोलण्याने माझी तंद्री भंगली.मी पोह्याची डिश हातात घेतली.पोह्यांकडे पाहूनच माझी भुक चाळवली.चमच्याने मी घास घेतला.व्वा काय अप्रतिम चव होती !अगदी माझ्या आईच्या हातच्या पोह्यांची.
” व्वा खुप छान झालेत पोहे ” मी म्हणालो तशा काकू हसल्या.
” ही तुझ्या आईची क्रुपा.मी लग्न होऊन आले तेव्हा मला साधे पोहेसुध्दा करता येत नव्हते.त्यांनीच मला शिकवले.नंतर स्वयंपाकही त्यांनीच शिकवला”
मला माझ्या आईचा अभिमान वाटला.खरंच ती अन्नपूर्णा होती.दुर्दैवाने माझ्या लग्नाअगोदरच ती गेली.नाहीतर माझ्या बायकोला- अश्वीनीलाही तिने असाच स्वयंपाक करायला शिकवलं असतं.स्वयंपाकावरुन मला आठवलं.गेल्या कित्येक वर्षात अश्विनीने स्वयंपाक केला नव्हता.यात तीचा दोष नव्हता.कंपनीची जबाबदारी तिने माझ्याइतकीच उचलली होती.किंबहुना ती नसती तर आमच्या कंपनीने थोड्या कालावधीत इतकी प्रगती केलीच नसती.पण एखाद्या निवांत सकाळी बायकोच्या हातचे पोहे खाण्याच्या सुखाला मी नक्कीच पारखा झालो होतो.
काका काहितरी बोलणार होते असं मला वाटलं.प्रश्नांचा ओघ आता माझ्याकडे वळणार होता.त्याआधीच मी त्यांना विचारलं.
“काका त्यादिवशी तुम्ही म्हणत होतात की तुमच्या आयुष्यात खुप काही घडामोडी घडल्या म्हणून.म्हणजे नेमकं काय घडलं?”
” घडामोडी म्हणजे हेच रे!सुजाताचं लग्न झालं.मग केतनला एम.एस.ई.बी.त नोकरी लागली.त्यानंतर मी रिटायर झालो.इथे प्लाँट घेऊन ठेवला होता.घर बांधायचं होतं.योगायोगाने केतनला सरकारी नोकरी लागल्यामुळे कर्ज पटकन मिळालं.घर बांधून झालं.मग केतनने मला स्कुटी घेऊन दिली.आख्खं आयुष्य आपलं सायकल चालवण्यात गेलं.आता उतार वयात का होईना पोराने सुख दिलं.मग केतनने स्वतःसाठीही बाईक घेतली.सुजाताला मुलगी झाली.तिच्या नवऱ्याने आता कल्याणला फ्लँट घेतलाय.खुप समाधान वाटतंय रे.आयुष्य सार्थकी लागलं बघ”
खरं होतं.एका मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात अजून कोणत्या वेगळ्या घडामोडी घडणार होत्या?काका आनंदी,समाधानी होते हे काय कमी होतं?
” अरे अवि केव्हापासून मीच बोलतोय.तुही काहीतरी सांग.सध्या काय करतोस पुण्यात?”
क्षणभर मी विचारात पडलो.मी जर काकांना सांगितलं असतं की मी एका कंपनीचा मालक आहे.तुमची पाच घरं मावून जातील एवढा मोठा माझा बंगला आहे.तीन आलिशान चारचाकी गाड्या आहेत.अर्ध्यापेक्षा जास्त जग मी फिरुन आलो आहे तर त्यांना स्वतःबद्दल वाटणारा अभिमान चक्काचूर होऊन जाणार होता.माझ्या प्रगतीपुढे त्यांची प्रगती तशी शुन्यच होती.पण हे कळल्यावर त्यांचं समाधान नाहिसं होणार होतं.मनात न्युनगंड निर्माण होणार होता.मला ते नको होतं.
” मी एका प्लास्टिक कंपनीत सुपरव्हायझर आहे ” मी ठोकून दिलं.
” किती पगार आहे?” काकांनी मध्यमवर्गीयांचा आवडता प्रश्न विचारला.
” पंचवीस हजार ”
केतन आणि काकांनी एकदमच एकमेकांकडे पाहिलं.दोघांच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा त्यांना आनंद झाल्याचं दाखवत होती.
” कमी आहे रे पगार ! इतक्या कमी पगारात पुण्यासारख्या ठिकाणी भागतं तुझं?आमच्या केतनला पस्तीस हजार पगार आहे पण आम्हांला तो कमीच वाटतो “काकू म्हणाल्या.त्यांनाही झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
” अगं आई प्रायव्हेट जाँबमध्ये असेच असतात पगार.शिवाय पिळून घेतात ते वेगळंच.दादा वहिनी पण नोकरी करतात का?”केतनने विचारलं
” नाही.ती घरीच लहान मुलांच्या ट्युशन्स घेते.तिलाही चारपाच हजार मिळतात.त्यात भागतं कसंतरी ”
मग काकांनी वडिलांच्या आठवणी सांगायला सुरुवात केली.काकू स्वयंपाकाच्या तयारीसाठी आत निघून गेल्या.केतन भाजी आणायला गेला.

दुपारी आम्ही खाली पाटावर जेवायला बसलो.कितीतरी वर्षांनी मी असा खाली बसलो होतो.लहानपणी आम्ही असेच स्वयंपाकघरात खाली जेवायला बसायचो.आई आम्हांला गरमगरम पोळ्या करुन वाढायची.कधीतरी घरी कढवलेलं तुप त्या पोळ्यांना लागायचं तेव्हा तर स्वर्गसुख मिळाल्याचा आम्हांला आनंद व्हायचा.आज गावराणी तुपाचे डबे घरात पडलेले असतात.पोळ्यावाली पोळ्यांना कधीतरी तुप लावते पण ती मजा काही आता येत नाही.
” कर सुरुवात जेवायला” काका म्हणाले तसं माझं लक्ष ताटाकडे गेलं.साधाच बेत होता.बटाट्याची भाजी,वरणभात, अळूच्या वड्या,शिरा पण ते ताट पाहून मला प्रचंड भुक लागल्याची जाणीव झाली.भारतातलंच काय जगातलं प्रत्येक प्रकारचं जेवण मी खाऊन पाहिलेलं.ज्या ज्या देशात गेलो तिथले सगळे प्रसिद्ध प्रकार चाखलेले.मग हे साधे पदार्थ पाहून मला इतकी भुक का लागावी?मी जेवू लागलो आणि आज मला माझी आईच मला वाढतेय असं वाटू लागलं.माझी बायको अश्विनीही गरीब घरातून आलेली.गेल्या सात आठ वर्षात तिने स्वयंपाक केला नसला तरी त्याअगोदर ती बऱ्यापैकी स्वयंपाक करायची.मी आईच्या स्वयंपाकाची आठवण काढली की म्हणायची “पुरुष जगभर फिरले तरी आईच्या हातचा स्वयंपाक ते विसरु शकत नाही” ते खरं होतं हे आज मला पटत होतं.नेहमी वजन वाढेल या काळजीने कमी जेवणारा मी आज मनसोक्त जेवलो.घरातल्या महागड्या डायनिंग टेबलवरही मी कधी इतका जेवलो नसेन.
जेवणानंतर काकांनी बनवलेलं पान खाता खाता मी त्यांना विचारलं
“काका लहानपणी माझे दोन जीवलग मित्र होते बघा. बबल्या आणि अज्या.कुठं आहेत सध्या ते?”
“इथेच आहेत.दोघांनी आय.टी.आय.केलं.बबल्याने गँरेज टाकलं.अज्याने इलेक्ट्रिकचं दुकान. बरं चाललंय दोघांचं.दोघांनाही एक मुलगा,एक मुलगी आहे”
” मला भेटायचंय हो त्यांना”
“अरे मग जा ना संध्याकाळी. केतन घेऊन जाईल तुला”

संध्याकाळी बबल्याकडे जाण्याअगोदर केतनने मला चाळीसगांवातून फिरवून आणलं.मला हे चाळीसगांव अजिबात आवडलं नाही.मुळची ओळख पुसून ते भारतातल्या कुठल्याही शहरासारखं गजबजलेलं दिसत होतं.तीच ती गर्दी,रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भेळेच्या,चायनिजच्या गाड्या,जागोजागी पडलेला कचरा आणि पचापचा थुंकणारी माणसं.काय नवीन होतं आता या शहरात?
बबल्याकडे गेलो तर तो गँरेज बंद करायच्या तयारीत होता.पहिल्यांदा मी त्याला ओळखलंच नाही. चांगला जाड झाला होता शिवाय थोडं टक्कलही पडलेलं होतं.चेतनने ओळख करुन दिल्यावर त्याने “अरे अव्या तू?”म्हणत मला जोरदार मिठी मारली.
” का रे अव्या पुण्याला गेलास आणि मित्रांना विसरला ”
” नाही रे तसं नाही”
“तसंच आहे.बरं जाऊ दे.सध्या काय करतो आहेस?”
” एका कंपनीत सुपरव्हायझर आहे.बरं अगोदर मला अज्याबद्दल सांग.मला त्यालाही भेटायचंय रे”
” संध्याकाळी तो दुकानात बिझी असतो.चल आपणच जाऊ त्याच्याकडे”
त्याने गँरेज बंद केलं.पाचच मिनिटात आम्ही अज्याकडे पोहचलो
” अज्या बघ कोण आलंय?”
अज्याने मला ओळखलं नाही. अर्थात मलाही तो ओळखू आला नाही.
” अरे अव्या आहे तो.आपला शाळेतला जिगरी दोस्त” बबल्याने असं म्हणताच अज्या दुकानाबाहेर आला आणि त्याने मला मिठी मारली.
“किती वर्षांनी भेटतोस रे!काय करतोस सध्या पुण्यात?”
मी सांगितलं
“वाटत नाही रे तू सुपरवायझर असशील असं.एखाद्या कंपनीचा मालक किंवा जनरल मँनेजर असशील असं वाटतंय.तुझे कपडे,हा चष्मा.हा चष्माच तुझा आठदहा हजाराचा असेल नाही का?”
मी चपापलो.मग हसत म्हणालो ” नाही रे.अरे शंभर रुपयाचा आहे फक्त. मुंबईला गेलो होतो तेव्हा फुटपाथवरुन घेतला होता”
दोघंही हसले.
” बरं आता घरी चल.रात्रीचं जेवण माझ्याचकडे करायचंय तुला”अज्या म्हणाला तसा बबल्या म्हणाला
” नाही हं अज्या.तो अगोदर माझ्याकडे आला.तेव्हा मी त्याला घेऊन जाणार”
ते ऐकून केतन मध्येच म्हणाला
” असं करा ना अजय दादा.आज बबलूदादाकडे होऊन जाऊ द्या.तुम्ही उद्या दुपारी बोलवा.अविनाश दादा उद्याही आहेत इथे”
अजयचं समाधान झालेल दिसलं.म्हणाला
” चालेल.पण आता तुला चहासाठी घरी यावंच लागेल”
” चालेल ” मी म्हणालो तसं अज्याने दुकानाबाहेर येऊन दुकान बंद केलं.
” अरे आताशी साडेसात होताहेत.तू तर नऊ वाजता बंद करतोस ना?”बबल्याने आश्चर्यचकीत होऊन विचारलं.
“अरे भाई आज इतने सालो बाद अपना दोस्त आया है.साथमें बैठेंगे,सुखदुखकी बाते करेंगे.धंदा क्या है,होता रहेगा” माझ्या गळ्यात हात टाकत अज्या म्हणाला.मला हा आपलेपणा खुप आवडून गेला.
आम्ही चौघंही भडगांव रोडवरच्या अज्याच्या घरी पोहचलो.प्रभुकाकांसारखंच वन रुम किचनचं साधं घर.पण स्वच्छ आणि नीटनेटकं दिसत होतं.प्रसन्न वाटत होतं.
अज्याच्या बायकोने आमचं स्वागत केलं.
” छान आहे रे तुझं घर” मी म्हणालो तसे अज्या आणि त्याची बायको समाधानाने हसले.
” तुही घेतलं असशील ना पुण्यात घर?” बबल्याने विचारलं.
” नाही रे.पुण्यात फार महागडी घरं आहेत.साधा टूबीएचके फ्लँट घ्यायचा तर पन्नास आणि साठ लाख मोजावे लागतात.हे एवढं घर तर सत्तर ते पंच्याहत्तर लाखापर्यंत जातं ”
अज्या आणि बबल्याने एकमेकांकडे पाहिलं.दोघांच्या चेहऱ्यावरची समाधानाची स्मितरेषा दोघांना आनंद झाल्याचं दाखवत होती.मोठ्या शहरातल्या आपल्या मित्रापेक्षा आपली चांगली प्रगती आहे याचा तो आनंद होता
” ही माझी मुलगी दिप्ती.सध्या बारावीला आहे.खुप छान गाणं म्हणते.गणेशोत्सवात झालेल्या गायन स्पर्धेत तिला बक्षीस मिळालंय.आणि हा मुलगा,सौरभ.नववीत आहे.हाही चित्रं खुप छान काढतो” अज्याच्या बोलण्यातून मुलांबद्दलचा अभिमान भरभरुन वहात होता.
” अरे वा!खुप छान.दिप्ती गाणं म्हण ना एखादं” मी फर्माईश केली.दिप्तीने तिच्या आईकडे पाहिलं
” म्हण बेटा “तिच्या आईने म्हंटल्यावर दिप्तीने गाणं म्हणायला सुरुवात केली.बरा आवाज होता.मला एकदम माझ्या मुलीची-राहीची आठवण आली.टिव्हीवरच्या गाण्यांचे अनेक रिअँलिटी शोज जिंकणारी राही आज तरुणांची आयडाँल होती.संपूर्ण भारतभर तिचे कार्यक्रम होत होते.सांगितलं असतं तर दिप्तीनेही तिला ओळखलं असतं.पण ज्या उत्साहाने ती गाणं म्हणत होती तो उत्साह राहिला असता?कदाचित नंतर तिने कधीही माझ्यासमोर गाणं म्हंटलं नसतं.
“वा खुप छान” बबल्या टाळ्या वाजवू लागला तसं मीही भानावर येऊन टाळ्या वाजवल्या.
” खरंच खुप छान झालं गाणं “मी म्हंटल्यावर दिप्तीसोबत तिच्या आईवडिलांचेही चेहरे आनंदाने फुलून गेले.

चहा पिऊन झाल्यावर आम्ही बबल्याच्या घरी गेलो.त्याचंही घर असंच साधं तीन रुमचं होतं पण ते दाखवतांना बबल्याचा उत्साह भरभरुन वहात होता.बबल्याचा मोठा मुलगा काँलेजच्या बास्केटबॉल संघात होता.त्याचं कौतुक सुरु होतं.मला माझ्या मुलाची अथर्वची आठवण आली.रायफल शुटींगचा तो आंतरराष्ट्रीय खेळाडू होता.स्पर्धांमध्ये त्याला अनेक मेडल्स मिळाली होती.राही आणि त्याच्या ट्राँफीजनी घरातली कपाटं भरली होती.पण हे सांगून बबल्याला त्याच्या मुलाबद्दल वाटणारा अभिमान मला कमी करायचा नव्हता.
बबल्याच्या बायकोने जेवण तयार असल्याचं सांगितलं. किचनमध्येच आम्ही सतरंजीवर बसलो.जेवायला खास खान्देशी मेनू होता.वांग्याचं भरीत,शेवभाजी, पुरी,कोशिंबीर आणि जिलेबी. पाहूनच कडकडून भुक लागली.
” बबल्या भरीतासोबत भाकरी असती तर मजा आली असती रे” मी सहज म्हणालो तशी बबल्याची बायको म्हणाली
” अरे रामा,भाऊजी आम्हांला वाटलं तुम्हांला भाकरी आवडत नसणार म्हणून पुऱ्या केल्या.तुम्ही पुरी खायला सुरुवात करा.मी आता भाकरी करते ”
“अहो नाही.राहू द्या.मी सहज म्हणालो”
” अरे असू दे अव्या.आता दोन मिनिटात होतील भाकरी ”
मी नाही नाही म्हणत असतांना बबल्याच्या बायकोने
भाकरी केली.आमची स्वयंपाकीणबाई देखील कधीतरी भाकरी करायची.पण या भाकरीची सर तिला नव्हती.जेवणावर आडवा हात मारतांना मी अज्याला म्हणालो
“अज्या अरे मला पाटणादेवीच्या दर्शनाला जायचंय रे.सध्या तिथे पाऊस पडून गेल्यामुळे खुप छान वाटत असेल नाही?”
” तू उद्या माझ्याकडे जेवायचं कबुल केलं आहेस”
” हो रे पण बऱ्याच वर्षांत तिथं गेलो नाहिये. वर पितळखोऱ्यालाही जावंसं वाटतंय.कसं करायचं?”
” काही प्राँब्लेम नाही ” बबल्या म्हणाला ” आपण सकाळी सहालाच बाईकने निघू.देवीचं दर्शन घेऊन पितळखोऱ्याला जाऊ.दुपारी एक दिडच्या सुमारास परत येऊ आणि अज्याकडे जेवायला जाऊ”
” येस!छान आयडिया आहे.चल मीपण येतो.तसं आम्ही बऱ्याचदा जातो पण मित्रांसोबत जाण्यात वेगळीच मजा असते”अज्या म्हणाला
“अरे पण तुझं दुकान?आणि बबल्याचं गँरेज?”
” बंद.उद्या गँरेज बंद.काय अज्या तुझं काय मत आहे?”बबल्या म्हणाला
” माझंही दुकान बंद,कलका दिन अव्याके नाम”
” बापरे.तुमचं खुप नुकसान तर होणार नाही ना?”
” होऊ दे रे.अरे लोग दोस्तोके लिये जान कुर्बान करते है.आम्ही तुझ्यासाठी एक दिन कुर्बान करु शकत नाही का?”
अज्या म्हणाला तसं मला गहिवरून आलं.खरंच पुण्याला जाऊन मी अशा जीवाभावाच्या मित्रांना मुकलो होतो.
वहिनीने ताटात भाकरी वाढली तसं मी म्हणालो
” वहिनी तुप आहे का गावराणी?”
” हो आहे ना!देऊ का?”
“आता काय तू शेवभाजीत तुप घेणार आहेस की काय?”अज्या हसून म्हणाला तसा बबल्याही हसला.वहिनीने तुपाचा डबा दिल्यावर मी त्यातलं तुप कळण्याच्या भाकरीला लावून खाऊ लागलो.व्वा काय छान चव होती!
” बबल्या लहानपणी आपण अशीच तुप लावलेली भाकरी डब्यात घेऊन जायचो बघ”
” हो खरंय.पण आमच्याकडे त्याचं काही अप्रुप नाही ”
“आमच्याकडे भाकरी हा प्रकार दुर्मिळच. मी सोडून घरात कुणालाच भाकरी आवडत नाही त्यामुळे मी बऱ्याच वर्षांत अशी भाकरी खाल्ली नाहिये.साँरी हं वहिनी तुम्हांला त्रास दिला”
” अहो त्यात कसला त्रास?उलट तुम्ही मोठ्या शहरातली माणसं अशी खाली बसून भाजीभाकरी खातात त्याचंच आम्हांला कौतूक वाटतं ”
माझी खरी श्रीमंती पाहिली तर यांना काय वाटेल याचा मी विचार करु लागलो.
भरगच्च जेवण करुन मी आणि केतन काकांकडे परतलो.गेल्या तीन तासांपासून सायलेंट मोडवरचा मोबाईल मी आँन केला.४२ मिसकाँल होते.त्यातले अकरा अश्वीनीचेच होते.मी अश्वीनीला काँल केला.
” अहो संध्याकाळपासून तुम्हांला फोन लावतेय.तुम्ही उचलत का नाही?कुठे आहात तुम्ही सध्या?उद्या सकाळी पोहचताय ना पुण्यात?”तिची त्रासलेल्या स्वरातली प्रश्नांची सरबत्ती ऐकून मी एक मोठा श्वास घेतला.
” अगं मित्रांबरोबर खुप आनंदात दिवस गेला माझा. कटकट नको म्हणून मोबाईल सायलेंटवर ठेवला होता.मी उद्या काही येत नाहिये.उद्या आम्ही मित्र पाटणादेवीला जातोय.मी परवा सकाळी पोहचतो पुण्यात”
” कमाल करता.उद्या तुमच्या चार महत्वाच्या मिटिंग्स आहेत.कितीतरी अपाँईंटमेंट आहेत.तुमची सेक्रेटरीही तुम्हांला फोन करुन वैतागलीये.तिला एकदा सांगून द्या काय करायचं ते”
“अश्विनी प्लीज उद्याचं सांभाळून घे ना.उद्या बघ माझ्यासाठी माझे मित्र त्यांचा व्यवसाय बंद ठेवणार आहेत ”
“अहो त्यामुळे त्यांचं काही शेकड्यांचं नुकसान होईल.इथे आपले लाखोंचे व्यवहार ठप्प होतील.अपाँईंटमेंट कँन्सल केल्याने कितीतरी क्लायंट नाराज होतील ते वेगळंच” ती रागात म्हणाली.
” होऊ दे अश्विनी. माणसाने दोन दिवस सुखाने घालवायचेच नाही का?किती वर्षांनी मित्रांना भेटलोय.उद्याचा दिवस प्लीज मला डिस्टर्ब नको करुस.परवापासून आहेच मग ती बिझनेसची काळजी ”
तिने रागाने फोन कट केला.आज पहिल्यांदाच मला वाटलं बंद करुन टाकावी ती कंपनी.अज्या,बबल्यासारखं बिनधास्त आयुष्य जगावं.मनात येईल तेव्हा धंदा बंद,चालू करायचा.

दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही बाईकवर पाटणादेवीकडे निघालो.मी नाही म्हणत असतांनाही काकूंनी सकाळी उठून थालिपीठं करुन दिली होती.पाटणादेवीचं दर्शन घेऊन खुप समाधान वाटलं.लहानपणी आम्ही मुलं सायकलने १८ किमी.वरच्या चाळीसगांवहून इथे यायचो.खुप धमाल करायचो.वर डोंगर चढून पितळखोऱ्याला जायचो.खरंच खुप छान दिवस होते ते.
दर्शन झाल्यावर एका झाडाखाली आम्ही नाश्त्याला बसलो.बबल्याने पुरीभाजी आणली होती तर अज्याने ठेचाभाकरी. सकाळी उठून न्याहारी तयार करुन देणाऱ्या त्यांच्या बायकांचं मला खुप कौतुक वाटलं.खुप वर्षानंतर अशा निसर्गरम्य वातावरणात असा आवडता नाश्ता करण्यात खुप मजा आली.नाश्ता झाल्यावर आम्ही महादेव मंदीरात गेलो.नंतर आम्ही बाईकनेच पितळखोऱ्याला गेलो.डोंगर चढून जाण्यात जी मजा असते ती वेळेअभावी घेता आली नाही तरी पुढच्या वर्षी सहकुटुंब येऊन या डोंगरावर ट्रेकिंग करायचा मी निश्चय केला.
दुपारी दिड वाजता आम्ही अज्याकडे जेवायला पोहचलो.
फ्लाँवर वाटाण्याची भाजी,कढी,मसालेभात, बटाटेवडे, गुलाबजाम असा फक्कड बेत होता.मी आडवा हात मारुन जेवलो.
निघतांना मी अज्या आणि बबल्याला सहकुटुंब दिवाळीत पुण्याला यायचं निमंत्रण दिलं.सगळ्यांना खुप आनंद झालेला दिसला
” अरे पण तुझ्या छोट्याश्या घरात एवढे सगळे अँडजस्ट होतील का?” बबल्याने शंका काढली
” अरे बबल्या दिलमें जगह रही तो कही भी जगह हो जाती है”
अजाच्या या डायलाँगवर आम्ही सगळेच हसलो.

संध्याकाळी मला स्टेशनवर सोडायला बबल्या,अज्या,त्यांची मुलं,केतन ,प्रभुकाका आले होते.मी परत एकदा सर्वांना पुण्याला यायचं निमंत्रण दिलं.मी नाही म्हणत असतांनाही काकूंनी पोळीभाजीचा डबा करुन दिला होता.
गाडी आली.मी सगळ्यांना मिठ्या मारुन निरोप घेतला.गाडी निघाली.निरोपाचे हात बराच वेळ हलत होते.मी माझ्या जागेवर येऊन बसलो.दोन दिवसातल्या घटना आठवून माझे डोळे भरुन आले.खुप प्रेम दिलं होतं या लोकांनी. मध्यमवर्गीयांचं आयुष्य खरंच किती सुखी,समाधानी असतं हे पाहून मला त्यांचा हेवा वाटू लागला होता.

घरी आलो आणि कंपनीच्या कामांमुळे तीनचार दिवस माझं अश्विनी आणि मुलांसोबत बोलणंसुध्दा झालं नाही. त्यात आफ्रिकेत आम्ही नवीन कंपनी सुरु करणार होतो त्याबद्दल सारख्या मिटिंग्स सुरु होत्या.पाचव्या दिवशी रात्री मी अश्विनीला माझ्या चाळीसगांव भेटीबद्दल बोललो.ते सगळं ऐकून तीसुध्दा हळवी झाली.
” खरंच हो,मलासुद्धा माझे लहानपणीचे दिवस आठवतात. गरीबी होती पण खुप मजा होती.आपसांत खुप प्रेम होतं.आपणच बघाना,तुम्ही नोकरी करत असतांना आपण छोट्याशा घरात रहायचो.आपण आणि आपली दोन छोटी मुलं.काटकसरीत दिवस काढायचो पण किती सुखी होतो ना आपण?सुटी च्या दिवशी आपण मुलांना घेऊन बागेत जायचो.निवांत बसून त्यांचं खेळणं बघायचो.नंतर त्या गाडीवरची भेळ आणि कुल्फी खायचो.किती मजा यायची ना?
आज आपल्याकडे इतका पैसा आहे पण दोन वेळचं सुखाचं जेवण आपण करु शकत नाही.गेल्या कित्येक दिवसात आपण बागेत निवांत बसलेलो नाही किंवा एखादा पिक्चरही बघितलेला नाही”
” हो ना!आणि बघ दिवसेंदिवस आपण जास्तच अडकत चाललोय.एकीकडे हे ऐश्वर्य, हा मिळणारा मानसन्मान,समाजातलं आपलं प्रतिष्ठेचं स्थान सोडवत नाही तर दुसरीकडे साधारण माणसाची सुखं आपण गमवत चाललोय.बघ ना आपल्या या प्रशस्त आलिशान बेडरुममध्ये मला व्यवस्थित झोप येत नाही आणि प्रभुकाकांच्या त्या छोट्याशा बेडरुममध्ये मी ढाराढूर झोपलो होतो.मग सुख कशाला म्हणायचं?”
“आपल्यासारखीच आपली मुलं झालीयेत.यशाच्या मागे धावतांना त्यांची दमछाक होतेय.खरंच गरज आहे का इतक्या अँक्टिव्हिटीज करायची?मान्य आहे मला की त्यांचं नाव होतंय,सगळीकडे कौतुक होतंय.पण खरंच त्याची गरज आहे?त्यांची धावपळ बघितली की त्यांची किंव येते.वाटतं गरीबीतही आपलं बालपण किती सुखाचं होतं!हे असं यशासाठी उर फाटेस्तोवर धावणं नव्हतं तेव्हा.छोटीछोटी स्वप्नं होती.ती पुर्ण नाही झाली तरी दुःख नव्हतं.”
मी मग अश्विनीला प्रभुकाका,अज्या, बबल्याच्या कुटुंबांना दिवाळीच्या सुटीत पुण्याला यायचं निमंत्रण दिल्याचं सांगितलं.
” पण तुम्ही तर भाड्याच्या फ्लँटमध्ये रहात असल्याचं त्यांना सांगितलं. हा बंगला पाहून तुम्ही खोटं बोललात असं ते म्हणणार नाहित?बंगला,गाड्या बघून त्यांची काय प्रतिक्रिया होईल?”
” हो गं.मलाही ती काळजी वाटतेय.पण बघू त्यांना समजावता येईल”
” बघा हं,आपल्या या ऐश्वर्यामुळे जसे आपले नातेवाईक आपल्याला दुरावलेत तसं त्यांच्या बाबतीत व्हायला नको”
” मला वाटतं तसं काही होणार नाही,कारण ते काही आपले नातेवाईक नाहीत”
अश्विनीने खांदे उडवले.

दिवाळी आटोपली.भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी प्रभुकाकांचा आणि बबल्याचा फोन आला.महाराष्ट्र एक्स्प्रेसने सगळे निघाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचारलाच मी माझ्या तीन आलिशान गाड्या घेऊन पुणे स्टेशनवर पोहचलो.
” आता इतक्या सकाळी रिक्षा फार भाडं घेत असतील नाही?”काकांनी काळजीने विचारलं
” मी गाड्या आणल्यात.रिक्षाची गरज नाही ” मी प्रभुकाकांची बँग हातात घेऊन म्हणालो.स्टेशनच्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांचे ड्रायव्हर लगबगीने पुढे आले .त्यांनी सगळ्यांच्या हातातलं सामान घेऊन डिक्कीत ठेवलं.अज्या आणि बबल्याच्या कुटुंबांना गाडीत बसायला सांगून मी तिसऱ्या गाडीत काकांसोबत बसलो.
” या इतक्या छान गाड्या तुझ्या कंपनीच्या आहेत का?”काकांनी विचारलं.मला काय उत्तर द्यावं कळेना.
” हो काका,कंपनीच्या म्हणजे आपल्याच आहेत”
“बरी कंपनी तुला गाड्या वापरायला देते रे!”काकू म्हणाल्या.
” हो.घरी चला सगळं सांगतो” मी वेळ मारुन नेली
बंगल्यासमोर गाड्या उभ्या राहील्या.बंगल्याकडे नजर टाकून काकांनी विचारलं
” आता हा बंगलाही कंपनीचाच का?”
” नाही हा आपलाच बंगला आहे.”
” अरे पण तू तर म्हणत होतास तू छोट्याशा फ्लँटमध्ये रहातो म्हणून?”काकांनी गोंधळत विचारलं
” आत चला.सांगतो सगळं”
अश्विनी बाहेरच उभी होती.ती पुढे आली.तिने सगळ्यांचं स्वागत केलं.घरात शिरल्यावर सगळेजण आश्चर्यचकित होऊन सगळीकडे बघत होते.इतकं सुंदर घर कधी पाहिलं नाही असेच भाव सगळ्यांच्या डोळ्यात होते.
” अव्या हे घर तुझं आहे?”बबल्याने विचारलं
” हो बबल्या”
“काय लाँटरीबिटरी लागली की काय लेका तुला?छोट्या फ्लँटमधून एकदम एवढ्या पाँश बंगल्यात?”अज्याने हसत विचारलं
” मला वाटतं,तुम्ही आता आराम करावा.गाडीत तुमची झोप काही व्यवस्थित झाली नसेल.सकाळी आठ वाजता आपण नाश्त्याला भेटू तेव्हा मी सगळी कहाणी सांगेन.चालेल?”
” ठिक आहे.सकाळी सांग”बबल्या म्हणाला
मी माझ्या ५ गेस्टरुमपैकी चार त्यांना झोपायला दिल्या.
” आयला एखाद्या फाईव्ह स्टार हाँटेलच्या रुमसारखी रुम आहे रे ही” अज्या मला म्हणाला.त्याची बायको आणि मुलगी फारच खुश दिसत होत्या.मी फक्त हसलो
“झोप आता.सकाळी बोलू आपण”

सकाळी डायनिंग टेबलवर आम्ही नाश्त्यासाठी जमलो.पोहे,उपमा,ब्रेडबटर,फळांचे ज्युस,चहा,काँफी असा भरगच्च नाश्ता होता.मी पाहिलं सगळ्यांच्या चेहऱ्यावर संकोचल्याचे भाव होते.कदाचित अशा शानदार डायनिंग टेबलवर बसून नाश्ता/जेवण करण्याची त्यांना सवय नसावी.
अश्विनीने सगळ्यांच्या डिश भरुन प्रत्येकासमोर ठेवल्या आणि म्हणाली
” जे हवं ते विनासंकोच घ्या बरं का!”
“काकू तुमच्यासारखे छान पोहे आम्हांला जमत नाही बरं का!” मी वातावरण सैल करायचा प्रयत्न केला.काकू हलकंसं हसल्या
“नाही. हेही पोहे चांगलेच झाले आहेत” पोह्यांचा घास घेत त्या म्हणाल्या.परत एकदा शांतता पसरली.सगळे अवघडून खात होते.मी काही बोलणार एवढ्यात बबल्या म्हणाला
” तू ते सांगणार होतास ना!एवढी तुझी प्रगती कशी झाली त्याबद्दल?”
” हो सांगतो” मी सुरुवात केली ” काका तुम्हांला माहितच आहे की बाबा वारल्यानंतर आमचा मामा आम्हांला पुण्याला घेऊन आला”
“हो.मला चांगलंच आठवतंय.पुढे काय झालं?”
” मामा आम्हांला घेऊन आला खरा पण मामीला ते काही आवडलं नाही. तिचंही बरोबरच होतं.आधीच मामाची चार पोरं त्यात आमच्या चार जणांची भर पडलेली.दोन खोल्यांचं छोटंसं घर.त्यात आम्ही दहा जण कसेबसे रहात होतो.एका कंपनीत कामगार असलेल्या मामाच्या तुटपुंज्या उत्पन्नात आमचं जीवन सुरु झालं.खाण्यात वाटेकरी झाल्यामुळे मामी आम्हांला घालूनपाडून बोलायची एकही संधी सोडत नव्हती.आईला ते सहन होईना.मग आईने त्याच भागात मामाला वेगळी खोली पहायला सांगितली आणि आम्ही त्या जुनाट खोलीत शिफ्ट झालो.आईला शिवणकाम येत होतं.घरात एक जुनी शिलाई मशीन अगोदरपासूनच होती.आईने कपडे शिवायला सुरुवात केली.बहिण तिला मदत करु लागली.माझा मोठा भाऊ जो बारावी पास होता त्याने एका कंपनीत नोकरी धरली.आईला मी इंजीनियर व्हावं असं वाटत होतं म्हणून तिने मला कुठे बाहेर काम करु न देता इलेक्ट्रिकल इंजीनियरींगच्या डिप्लोमाला अँडमिशन घ्यायला लावली.भावाच्या पगारामुळे आणि आईच्या शिवणकामामुळे आमचं बरं चालायला लागलं.मी डिप्लोमा पास झालो आणि एका प्लास्टिक कंपनीत कामाला लागलो.मग आम्ही ती जुनीपुराणी रुम सोडून एक वन बी एचकेचा फ्लँट भाड्याने घेतला.भावाचं आणि बहिणीचं लग्न झालं आणि आई आम्हांला सोडून गेली.दोन वर्षांनी माझंही लग्न झालं.ते वन बीएचके घर आम्हांला अपुरं पडू लागलं.तेव्हा भावाने आम्हांला वेगळं घर बघायला सांगितलं.त्यामागे वहिनीची फुस होती हे सांगायची गरज नाही.खरं तर मला मिळणारा पगार आमच्या स्वतंत्र संसाराला फारच अपुरा होता.पण माझ्या बायकोने मला धीर दिला.आम्ही एका दोन रुमच्या फ्लँटमध्ये शिफ्ट झालो.तुम्हांला माहित नसेल पण औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात आमची पुर्वापार चालत आलेली शेती होती.ती दोन वेगवेगळ्या ठिकाणी होती.माझ्या भावाने सिल्लोड गावाजवळची कोरडवाहू शेती माझ्या नावाने करुन विहिर असलेली शेती स्वतःकडे ठेवली होती.त्याच्या हिश्शाची शेती विकून त्याने तळेगांवला एक छोटा फ्लँट खरेदी केला.त्याने मलाही माझ्या हिश्शाची शेती विकण्याचा सल्ला दिला.मी चौकशी केली तेव्हा कुणीच तिला घ्यायला तयार होईना.जे तयार होते अगदी मातीमोल भावाने ती मागत होते.मी शेवटी ती न विकण्याचा निर्णय घेतला”
सगळ्यांचा नाश्ता संपला म्हणून अश्विनी चहा आणण्यासाठी उठली.
” दिवस उलटत होते.मला दोन मुलं झाली.राही आणि अथर्व.माझं प्रमोशन झालं.मी सुपरवायझरचा प्राँडक्शन मँनेजर झालो.सगळं सुरळीत सुरु आहे असं वाटत असतांनाच गडबड सुरु झाली. आमचे मालक वारले.कंपनीचा कारभार त्यांच्या दोन मुलांच्या हातात गेला.पण निर्णय घेण्यावरुन दोघा भावात भांडणं सुरु झाली. त्याचा परीणाम प्राँडक्शनवर झाला.कंपनीची शेअर व्हँल्यू आणि बाजारातली पत घसरली.दोन्ही भावांचं मार्केटिंगचं ज्ञान शुन्य होतं.आँर्डर्स मिळवण्यासाठी ते प्रयत्नच करत नव्हते.दिलेल्या आँर्डर्सही पुर्ण होईना म्हणून डिस्ट्रिब्युटर्सनी कंपनीचा माल घेणंच बंद केलं.आधीच प्राँडक्शन कमी झालं होतं.जे होत होतं ते विकल्या जात नव्हतं.कंपनीच्या आवारात मालाचे ढिग पडून राहू लागले.पैसा अडकून पडल्यामुळे कंपनीने कामगारांचे पगार द्यायला टाळाटाळ करायला सुरुवात केली.कामगारांनी संप पुकारला. कंपनी बंद पडली.मीही बेकार झालो.इतरत्र नोकरी शोधू लागलो पण कंपन्यांना आता ग्रँज्युएट इंजीनियर्स विनासायास मिळत होते .माझ्यासारख्या डिप्लोमा इंजीनियरला सगळीकडून नकार येत होता.परीस्थिती गंभीर होती.मार्ग सुचत नव्हता.कधीकधी आत्महत्येचे विचार मनात यायचे.त्याकाळात अश्विनीने मला खुप साथ दिली.ती मला धीर द्यायची.तिने स्वतः घरात लहान मुलांच्या ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली.तिला मिळणारे दोनतीन हजार आणि सेव्हिंग् मधल्या पैशावर आमचं कसंबसं सुरु होतं.ते वर्ष आम्ही भयंकर अडचणीत काढलं.कुठे जाँब मिळत नाही म्हणून मी एल.आय.सी.एजंट झालो.काही मित्रांच्या आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या पाँलिसीज काढल्या.तुम्हांला सांगतो माझ्या भावाबहिणीने मला त्यातही मदत केली नाही. एल.आय.सी.मुळे एक झालं.मी मार्केटिंग शिकलो”
सगळ्यांचा चहा संपत आला होता.अज्या आणि बबल्याच्या मुलांना माझा इतिहास ऐकणं कंटाळवाणं वाटलं असावं म्हणून ते उठून गेले.
“एक दिवस कंपनीच्या दोन्ही मालकांनी कंपनी विकायला काढल्याचं मला कळलं.पण ती बंद पडलेली तोट्यातली कंपनी कुणीच घ्यायला तयार नव्हतं.मी अश्विनीला ती बातमी सांगितली तेव्हा ती मला म्हणाली.
“ती कंपनी आपणच विकत घेतली तर?”
ती काय म्हणाली हे सुरुवातीला माझ्या डोक्यात शिरलं नाही. ते शिरलं तेव्हा मी जोरजोरात हसायला लागलो.पण ती हसली नाही.म्हणाली “तुम्ही त्या कंपनीत सात वर्ष काढली आहेत.तुम्हांला प्राँडक्शनबद्दल सगळं माहित आहे.तुम्ही ती कंपनी आरामात चालवू शकता”
“हो ते ठिक आहे.अगं पण एक कोटी कुठून आणायचे?शिवाय कंपनी चालवायला दहा पंधरा लाख लागतील ते वेगळेच”
” तुमची गावाकडची शेती विकून टाका.अशीही ती पडून आहे.बघा तीची किंमत काय येते ते.मग आपण ठरवू”
मी गांवी गेलो.एजंटला भेटून चौकशी केली.एका काँलेजसाठी ती जमीन पाहिजेच होती.त्या जमीनीचे मला ८० लाख मिळू शकत होते.ते ऐकून मला हुरुप आला.बाकीचे वीस लाख कसे जमवायचे हा प्रश्न होता.तेव्हा अश्विनी म्हणाली.”आमची शेती आणि वारसाहक्काने आलेलं घर माझ्या भावांनी विकलं तेव्हा मला एक रुपयाही दिला नव्हता.त्यांना माझ्या हक्काचे पैसे मागते.तुम्हीही तुमच्या भावाबहिणीला,नातेवाईकांना विचारुन पहा.काही माझे दागदागिने विकून आपण पैसा जमा करु”
माझ्या भावाबहिणी किंवा नातेवाईकांनी मदत केली तर नाहिच उलट मला शहाणपणाच्या गोष्टी शिकवल्या.”कशाला या भानगडीत पडतोस.तुला धंदा जमणार नाही. मराठी माणस़ धंदा करु शकत नाही. बघ पस्तावशील.भिकेला लागशील”असं म्हणून त्यांनी माझं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला.अश्विनीच्याही भावांनी तिला हिश्शाचे पैसे द्यायला खुप खळखळ केली.पण तिने कोर्टात जायची धमकी दिल्यावर पंचवीस लाख काढून दिले.शेवटी सगळं समीकरण जुळून आलं आणि आम्ही ती कंपनी विकत घेतली.जुने सुपरव्हायझर्स ,कामगारांना मी परत बोलावलं.मला फक्त सहा महिने द्या.त्यानंतर तुमचे पगार नियमित सुरु होतील तोपर्यंत मला सहकार्य करा असं त्यांना
कळकळीचं आवाहन केलं.कंपनी सुरु असतांना माझे सगळ्यांशी खुप चांगले संबंध होते त्याचा मला फायदा झाला.प्राँडक्शन सुरु झालं पण फक्त प्राँडक्शन होऊन उपयोग नसतो.मालाचा सेल होणंही गरजेचं असतं.मी सगळ्या डिस्ट्रिब्युटर्सना फोन केले.भरघोस डिस्काऊंट आँफर केले.आँर्डर्स मिळू लागल्या.मी आणि अश्विनी जीवाचं रान करु लागलो.अनेक रात्री आम्ही झोपेविना घालवल्या.मी कंपनीचा मालक आहे हे विसरुन गेलो होतो.कामगार,सुपरव्हायझर,एच.आर.,क्लार्क,शिपाई मीच होतो.सहा महिन्यांनी आम्हांला फायदा दिसू लागला.हळूहळू आमची स्थिती सुधारु लागली.आमची शेअर व्हँल्यू वाढली.नंतरच्या दहा वर्षात आम्ही मार्केटमध्ये टाँपला पोहोचलो.अगोदर गुजरातमध्ये नंतर कर्नाटकमध्येही आम्ही फँक्टरी सुरु केली.आता साऊथ आफ्रिकेतही आम्ही फँक्टरी सुरु करताहोत”
मी थांबलो.मला वाटलं सगळेजण आता माझं आणि अश्विनीचं कौतुक करतील.पण तसं काही झालं नाही. सगळे शांतपणे बसून होते पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थपणा जाणवत होता.
“तर अशी आहे तुझी कहाणी ” काका मध्येच म्हणाले ” पण आम्हांला हे तू चाळीसगांवला आला होतास तेव्हा सांगितलं असतं तरी चाललं असतं”
“कसं आहे काका,माझी अशी प्रगती झाली ही माझ्या भावाबहिणीला ,नातेवाईकांना आवडलं नाही. त्यांनी माझ्याशी संबंध तोडल्यात जमा आहेत.’तू काय बुवा मोठा माणूस,आम्ही गरीब लोकं.तुझ्याशी आमची काय बरोबरी होणार?’असं ते मला वारंवार हिणवत असतात.मी एखाद्या सणाला,कार्यक्रमाला बोलावलं तर येत नाहीत. मानपानावरुन रुसुन बसतात.स्वतःहून कधीही फोन करत नाहीत.मी,अश्विनीने केला तर तुटक बोलतात.त्यांच्याकडे काही कार्यक्रम असला तर मला बोलवत नाहीत.जणू मी कुणी परका माणूस आहे अशी मला वागणूक देतात.मला,अश्विनीला माणसं जोडायला खुप आवडतात.देशविदेशात आमचा भरपूर मित्रपरिवार आहे.त्यादिवशी तुमची भेट झाली तेव्हा मला खुप आनंद झाला.तुमच्याशी,अज्या,बबल्या या बालमित्रांशी पुन्हा संबंध जुळवायला मी खुप उत्सुक होतो.पण माझ्याबद्दल खरं सांगितलं तर माझ्या नातेवाईकांप्रमाणे तुमच्यातही न्युनगंड निर्माण होऊन तुम्हीही आमच्याशी संबंध तोडून टाकाल अशी मला भिती वाटली म्हणून मी तुम्हांला खोटंच सांगितलं.काका,अज्या,बबल्या आम्ही सध्या उच्चभ्रू वर्गात मोडत असलो तरी आम्ही अजुनही साधी माणसं आहोत.आम्ही गरीबीचे दिवस विसरलेलो नाही”
क्षणभर शांतता पसरली.कुणीच काही बोललं नाही.अचानक बबल्याची बायको म्हणाली.
“आपण केव्हा निघायचंय.सिंहगड वगैरे बघायला?”
” दहासाडेदहाला निघूया” मी तिच्या चेहऱ्यावरचा कंटाळवाणा भाव ओळखून म्हणालो.” “अश्विनीवहिनी येताहेत की नाही “अज्याच्या बायकोने विचारलं
” नाही वहिनी.मी तुमच्यासोबत येतोय म्हंटल्यावर तिला कंपनीत जावं लागेल.खुप काम आहेत आज कंपनीत”
” हा बंगला कितीचा आहे रे तुझा?”अचानक काकूंनी नको तो प्रश्न केला.
“चार कोटींचा” मी उत्तर दिल्यावर सगळ्यांच्या तोंडून ‘बापरे” असा शब्द निघाला.ते काही म्हणायच्या आतच मी म्हणालो
“बरं चला.तयारीला लागा.खुप फिरायचंय आपल्याला आज”
“तुझी मुलं नाही दिसत रे” अज्याने विचारलं
” अरे मुलगी एका गाण्याच्या रिअँलिटी शोसाठी दिल्लीला गेलीये आणि मुलगा रायफल शुटिंगच्या काँपिटिशनसाठी गोव्याला गेलाय”
” काका शोकेसमध्ये एवढ्या ट्राँफिज कुणाच्या आहेत?आणि तिथंलाच राही पटवर्धनचा फोटो कसा काय तुमच्याकडे?”अज्याच्या मुलीने विचारलं
“बेटा राही पटवर्धन माझीच मुलगी आहे”
“काय्यsss राही तुमची मुलगी आहे?बापरे काका मी राहीची डाय हार्ड फँन आहे.तीची भेट झाली असती किती मजा आली असती!”मी समाधानाने हसलो.

दोन गाड्यांनी आम्ही खुप फिरलो.दुपारी एका महागड्या हाँटेलमध्ये त्यांना जेवू घातलं.रात्री घरीही छान मेनू होता.
दुसऱ्या दिवशी मी त्यांना लोणावळा,खंडाळा,ओझरच्या गणपतीला घेऊन गेलो.संध्याकाळी पुण्यातल्या एका मोठ्या माँलमध्ये घेऊन गेलो.ते म्हणतील ते सगळे पदार्थ खाऊ घातले.
तिसऱ्या दिवशी त्यांना फँक्टरीत घेऊन गेलो.आमच्या स्टाफने चेअरमनचे मित्र म्हणून त्यांची खुप चांगली खातरदारी केली.वेळोवेळी त्यांना कोल्ड्रिंक्स, चहा,काँफी,स्नँक्स दिल्या जात होते.फँक्टरी दाखवून झाल्यावर फँक्टरीच्याच कँन्टीनमध्ये त्यांना जेवण दिलं.यावेळी अश्विनीही आमच्यासोबत होती.दुपारी त्यांना तुळसीबागेत खरेदीकरता पाठवून दिलं.
रात्री घरीच जेवण झाल्यावर मी सगळ्यांना कपडे,गिफ्ट्स दिल्या.सगळे खुश दिसत होते.रात्री अकरा वाजता मी आणि अश्विनी दोघंही त्यांना स्टेशनवर सोडायला गेलो.हातात हात घेऊन,मिठ्या मारुन निरोप घेतले गेले.काका,अज्या,बबल्या तिघांनी मला कुटूंबासहीत चाळीसगांवला यायचं आमंत्रण दिलं.पण का कुणास ठाऊक त्या आमंत्रणात उत्कटता जाणवली नाही.

ते गेल्यानंतर मी त्यांच्या फोनची सारखी वाट बघत होतो.पण एक आठवडा झाला,दोन आठवडे झाले त्यांचा फोन आला नाही.शेवटी न रहावून मीच प्रभुकाकांना फोन केला.बऱ्याच वेळाने त्यांनी तो उचलला
” काय काका कसं चाललंय?मला वाटलं तुम्ही चाळीसगांवला गेल्यावर फोन कराल”
“अरे बाबा तू मोठा माणूस आम्ही छोटी माणसं.तू एवढा व्याप उभा केलाय त्यात तुला डिस्टर्ब कशाला करायचं म्हणून फोन केला नाही”
काकांच्या बोलण्यातला कुत्सितपणा माझ्या लक्षात आला.मी थोडंफार इकडचंतिकडचं बोलून फोन ठेवून दिला.मी बबल्याला फोन लावला पण तो एंगेज लागल्यामुळे मी अज्याला फोन केला.
” नमस्ते शेठजी.इस गरीबको कैसे फोन किया?”त्याने त्याच्या स्टाईलमध्ये सुरुवात केली
” काय अज्या अरे पोहचल्यावर एखादा फोन तर करायचास”
” भाई आप बडी बडी फँक्टरीवाले बडे लोग.हमारे जैसे लोगोको आप झाडू मारनेके लिये रख सकते है।आपको फोन करनेकी हमारे जैसोकी क्या औकात?”
“बस कर अज्या.नको डायलॉग मारुस.अरे माझ्याकडे कसं वाटलं तुम्हांला?काही कमतरता तर नाही ना जाणवली?”
“अरे तुम्ही करोडपती लोकं.तुमच्याकडे कशाची कमतरता?त्यात तुमचा तो फाईव्ह स्टार बंगला,फाँरेनच्या गाड्या.आम्ही काय त्याच्यात उणीव काढणार?”
मला अज्याचं बोलणं खटकलं.जे माझे भाऊबहिण,नातेवाईक करत होते तेच ही मंडळी करत होती.आम्ही त्यांच्यासाठी तीनचार दिवस जे केलं होतं त्याबद्दल कौतुकाचे दोन शब्द बोलायचे सोडून आमच्या श्रीमंतीचा उपहासच ही मंडळी करत होती.थोडं बोलून मी फोन कट केला.मग बबल्याला फोन लावला.
” काय यार बबल्या, मी तुमच्या फोनची वाट बघतोय”
” कसंय अविनाशराव आम्ही तुम्हांला तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये फोन करावा आणि तुम्ही म्हणायचं मी बिझी आहे नंतर फोन कर.त्यापेक्षा म्हंटलं तुझाच फोन येऊ द्यावा.आम्ही काय रिकामटेकडीच माणसं!भरपूर वेळ आहे आमच्याकडे”
हा मला मारलेला टोमणा आहे हे माझ्या लक्षात आलं.मी त्याकडे दुर्लक्ष केलं
” वहिनी,मुलं काय म्हणतात,त्यांना आवडलं की नाही आमच्याकडे?”
“आवडलं ना!पण खरं सांगू का अविनाशराव.मित्र परीस्थितीने बरोबरीचे असले की मोकळेपणा वाटतो.तुमच्या घरी आम्हांला फार अवघडल्यासारखं होत होतं.झोपडीतल्या माणसाला महालात गेल्यावर तसं वाटणारच”
” पण मी आणि अश्विनी कधीही तुमच्याशी वाईट तर वागलो नाही”
” नाही. तसं म्हणणं नाही माझं” तो अडखळला.काही तरी त्याला सांगायचं होतं पण सांगता येत नव्हतं.मग म्हणाला ” वहिनी आमच्यासोबत फिरायला आल्या असत्या तर बरं वाटलं असतं आमच्या बायकांना”
” ते शक्य नव्हतं.तिला घेतलं असतं तर मला तुमच्यासोबत येता आलं नसतं”
” मोठ्या माणसांचा हाच प्राँब्लेम असतो पैसा भरपूर असतो पण फँमिलीचं सुख नसतं ”
बबल्याचं बोलणं मला खुप लागलं.मग आमचं संभाषणच तुटलं.थोडं बोलून मी फोन ठेवून दिला.शेवटी जे व्हायला नको तेच झालं.मित्रांशी संबंध आता तुटल्यासारखेच झाले.नव्हे त्यांच्या बोलण्यातून ते तेच सुचवत होते.माझ्या श्रीमंतीचा त्यांना मत्सर वाटत होता की न्युनगंड हेच मला कळेनासं झालं.मी हताश झालो.त्यांच्यासाठी तीनचार दिवस एवढं करुनही त्यांनी त्याची किंमत शुन्य केली होती.
अश्विनीला मी हा प्रकार सांगितला. ती हसून म्हणाली
” हे असं होणार याबद्दल मला कल्पना होतीच.तुम्हांला आठवतं मागे माझ्या मेत्रीणी आल्या होत्या.चांगल्या आठवडाभर होत्या.काय नाही केलं मी त्यांच्यासाठी.कंपनीची कामं तुमच्यावर टाकून मी त्यांच्यासाठी राबले.इथून गेल्यानंतर त्यांनी त्याची जाण ठेवली तरी का?उलट मला घमंडी,गर्विष्ठ अशा उपमा त्यांनी दिल्या.अहो साध्या माझ्या वाढदिवसाला मला त्या शुभेच्छाही देत नाहीत.माणसाचं वागणं असंच असतं.साहजिकच आहे तुम्हांलाही वाईट वाटत असेल.पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका.”

पण माझ्या मनातून तो विषय गेला नाही.माझं मन आता कामात लागेनासं झालं.मी नोकरी करत असतांनाच्या सुखद आठवणी मला सतावू लागल्या.माझ्या भावाबहिणींशी,नातेवाईकांशी त्यावेळी माझे खुप चांगले संबंध होते.एकमेकांकडे जाणंयेणं होतं,सुखदुःखाच्या गप्पा मारणं होतं.आमची मुलं सुट्ट्यात एकमेकांकडे जायची.कधीकधी आम्ही सर्वजण एकत्र टूरला जायचो.खुप धमाल करायचो.पैसा येऊ लागला,माझी प्रगती होत गेली आणि सर्व आप्तेष्ट दुर होत गेले.खरं म्हणजे मी आणि अश्विनी दोघंही होतो तसेच होतो.एवढंच होतं की आम्हांला कुणासाठी वेळ नव्हता आणि त्याचाच या मंडळींनी इश्यू करुन घेतला होता.
एक दिवस मी अश्विनीला म्हणालो
” अश्विनी आज आपण खुप चांगल्या स्थितीत आहोत.आपल्या तीन पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती आपल्याकडे आहे.मुलं आता मोठी झालीहेत.त्यांना काय करीयर करायचं ते करु दे.आपण आता थोडं थांबूया.किती दिवस आपण धावत रहायचं?कंपनी राहिली तर आपण कधीही रिटायर होऊ शकत नाही.आपली मुलं आता मोठी आहेत.दोघांनाही कंपनीच्या कामात जराही रस नाही.त्यांनी कंपनी सांभाळायला नकार दिला तर आपल्याला ती विकावी लागणार हे निश्चित. मग आपल्या म्हातारपणी विकण्यापेक्षा आताच विकून टाकली तर आपल्या आयुष्याची राहिलेली वर्ष आपण सुखात घालवू शकतो.काय वाटतं तुला?”
ती थोडावेळ शांत बसली मग म्हणाली
” तुमच्यासारखंच मलाही सध्या हेच वाटू लागलंय.घर आणि कंपनी दोन्हींकडे लक्ष देतादेता मीही थकलेय आता.आफ्रिकेत फँक्टरी सुरु करुन व्याप वाढवण्याला मी तुम्हांला विरोधच केला होता.पण कंपनी विकणं इतकं सोपं नाहिये.त्यातून अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.शिवाय कंपनी विकल्यानंतर आपण काय फक्त बसून रहाणार.काहीतरी व्यवसाय तर करावाच लागणार ना?”
” मी विचार करुन ठेवलाय.आपण जमीन घेऊन एक मोठं लाँन्स बनवू आणि ते लग्न कार्यासाठी भाड्याने देत रहायचं.यात काही मेहनत नाही. सिझनमध्येच आपल्याला त्रास होणार इतरवेळी आपण मस्त एंजाँय करायचं.खुप फिरायचं,फाँरेन टुरला जायचं”
अश्विनीला ती कल्पना पसंत पडली.अगोदर गुजरात आणि कर्नाटक मधल्या फँक्टरीज विकून मग शेवटी पुण्यातली फँक्टरी विकायचं ठरलं.

मी कंपनी विकून टाकणार ही बातमी वाऱ्यासारखी कंपनीत पसरली.आमच्या कंपनीत युनियन नव्हतीच.कामगारांनाही कधी तिची गरज भासली नव्हती.पण काही कामगारांचे प्रतिनिधी आम्ही नेमले होते ते मला येऊन भेटले.”कंपनी विकूच नये.कंपनीला काही आर्थिक नुकसान झालं असल्यास आम्ही कमी पगारातही काम करायला तयार आहोत.इतकं चांगलं खेळीमेळीचं वातावरण दुसरीकडे कुठेही नाही.नवीन मँनेजमेंट कामगारांना कशी वागवते सांगता येत नाही” अशा अनेक गोष्टी सांगून त्यांनी माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला.मी त्यांना सांगितलं की कंपनी अशाच व्यक्तीला विकेन की जी त्यांची व्यवस्थित काळजी घेईल.पण त्यांचं समाधान झालं नाही.हळूहळू ही बातमी सगळीकडे पसरली.या बातमीचा परीणाम होऊन कंपनीची शेअर व्हँल्यूही कमी झाली. माझे व्यावसायिक मित्र,डिस्ट्रिब्युटर्स,स्टाँकिस्ट मला येऊन भेटू लागले.सध्या कंपनीचा ब्रँड खुप जोरात आहे आणि ग्राहक आपल्याच कंपनीच्या ब्रँडला पहिली पसंती देतात असं सांगून त्यांनीही माझं मन वळवण्याचा खुप प्रयत्न करुन पाहिला पण मी माझ्या निश्चयावर ठाम होतो.ब्रिटनच्या एका कंपनीने आमच्या फँक्टरीज विकत घेण्याची तयारी दाखवली.मग त्यांचे काही प्रतिनिधी भारतात येऊन आमच्याशी बोलणी करुन गेले.सौदा पक्का झाला.तीनही फँक्टरीजचे आम्हांला अडिच अब्ज रुपये मिळणार होते.एवढ्या रकमेत आमचं संपुर्ण आयुष्य सुखात जाणार होतं.मी आमच्या वकिलांना कायदेशीर कागदपत्र तयार करायला सांगितली.

एक दिवस आँफिसमध्ये मी निवांत बसलो असतांना रिसेप्शनिस्टने मनोहरकाका अरोरा मला भेटायला आल्याचं सांगितलं.अरोरा एका केमिकल कंपनीचे मालकही होते आणि पुणे इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्षही होते.माझ्या फँक्टरीजची बरीच सरकारी कामं त्यांच्या ओळखीमुळे पार पडली होती.
ते केबिनमध्ये आले तसं मी पुढे जाऊन त्यांना नमस्कार केला.त्यांना हाताला धरुन मी खुर्चीपर्यंत घेऊन आलो.दोन महिन्यापुर्वीच त्यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला होता.
” कसं काय येणं केलंत काका?” ते मला नेहमी अविनाश पुत्तर म्हणत म्हणून मीही त्यांना काका म्हणत असे ” सगळं ठिक आहे ना?”
” माझं सगळं ठिक आहे.पोरं सगळं सांभाळतात त्यामुळे मी आरामात असतो ” पंजाबी असुनही काका मराठी छान बोलायचे “आपण फक्त लक्ष ठेवायचं पोरांकडे.ते करतात ते बरोबर आहे की नाही बारीक निरीक्षण करत रहायचं”
मी हसलो.तसं ते गंभीर होऊन म्हणाले
” पुत्तर ये मै क्या सुन रहा हूँ तुम कंपनी बेच रहे हो”
“हो काका”
” का बरं?कंपनी तर चांगली प्राँफिटमध्ये चालू आहे असं मी ऐकलं.तुम्ही तर आफ्रिकेतही फँक्टरी घेणार होते”
” हो काका.तुम्ही ऐकलं ते बरोबरच आहे.तसं सगळं व्यवस्थित आहे पण माझंच मन सध्या लागत नाहिये असं वाटतंय सगळं सोडून द्यावं आणि साधं आयुष्य जगावं”
“पण असं वाटायला झालं तरी काय?थोडं पर्सनल विचारतो.राग मानू नको”
“काय आहे काका,कंपनी वाढली,पैसा भरपूर यायला लागला,ऐश्वर्य वाढलंय पण माणसं दुरावलीत.माझे नातेवाईक, मित्र यांना माझा मत्सर वाटतो.शिवाय मुलं आता मोठी झाली आहेत त्यांनाही माझ्या कंपनीत,या बिझिनेसमध्ये काहिही इंटरेस्ट नाही.त्यामुळे मलाही वाटू लागलंय की एवढं करुन जर सुख नसेल मिळत तर नको हे सगळं.विकून टाकावं आणि साधंसुधं आयुष्य जगावं
“तुमच्या मराठी माणसांची सुखाची कल्पना काय आहे ते मला चांगलं माहितेय.दहा ते सहा ड्युटी.संध्याकाळी चहा पित टिव्ही पहाणं आणि रविवारी फँमिलीला घेऊन पिक्चरला आणि हाँटेलात जाणं.बरोबर ना?फार मोठ्या जबाबदाऱ्या,रिस्क तुम्हांला घ्यायला आवडत नाही. म्हणूनच औद्योगिक क्षेत्रामध्ये मराठी माणसं मालक म्हणून फार कमी दिसतात.जेव्हा तू फँक्टरी विकत घेतलीस तेव्हाच आम्हांला आश्चर्य वाटलं होतं.नंतर तू ती जास्तीत जास्त दोनतीन वर्ष चालवशील असं वाटलं होतं.पण गेली दहा वर्षापासून तू ती उत्तमरीत्या चालवतोय,विशेष म्हणजे प्राँफिटमध्ये चालवतोय याचं आम्हांला खुप कौतुक वाटत होतं.अख्ख्या इंडस्ट्रीयल एरीयात तुझी कंपनी नावाजलेली.तुझ्या कंपनीतला सफाई कामगारसुध्दा अभिमानाने तुझ्या कंपनीच नांव घेतो.पण अखेर तुही सामान्य मराठी माणसासारखाच निघालास ”
“पण काका माणसाला वैयक्तीक आयुष्य असतं की नाही?माणसाने रात्रंदिवस काय फक्त कंपनीसाठीच झटत रहावं?”
“अरे पुत्तर तुला माहित नसेल मी तीनदा दिवाळखोर झालोय.जहर खायला माझ्याकडे पैसे नव्हते इतकी वाईट परिस्थिती माझ्यावर आलीये.आणि याला कारणीभूत होते माझे सख्खे भाऊ.काम करना नही लेकीन ऐश दुनियाभरकी.शेवटी एकेका भावाला हाकलून दिलं तेव्हा कुठे सुरळीत झालं.तू म्हणतो ना भाऊबहिण, नातेवाईक दुरावलेत.कमीतकमी तुझ्या कंपनीत ते नाहीत हेच बरंय.आणि हि गोष्ट लक्षात घे की पर्वताच्या शिखरावर फक्त एकच जण राहू शकतो.बाकीचे तू इतक्या वर गेलास म्हणून तुझा तिरस्कार करतील तुला खाली खेचायचा प्रयत्न करतील.ते जमलं नाही तर तुला ते एकटं सोडतील,तुझी बदनामी करतील की तू मोठा झालास म्हणून घमंडी झालाय.तुला हरतऱ्हेने त्रास द्यायचा प्रयत्न करतील.ही तर जगरहाटी आहे यार.तुला काय वाटतं तू कंपनी विकल्यावर ते तुला जवळ करतील?ते म्हणतील कंपनी लाँसमध्ये गेली म्हणून हा आता आपल्याला जवळ करतोय.ते तुझ्यापासून लांबलांब पळतील.मी या सगळ्याचा अनुभव घेतलाय म्हणून तुला सांगतोय”
” ते ठिक आहे काका पण मी माझ्या मित्रांना पाहिलं ते कमी पैशातच सुखी आहेत मग मीच का एवढी धावाधाव करायची.कशासाठी हा पैसा कमवायचा?”
“बेटा ये साधूसंतोकी बाते मुझे मत बताना.अरे तुझ्यासारखा विचार जर टाटा,बिर्ला,अंबानी यांनी केला तर त्यांच्याकडे काम करणारे हजारो कर्मचारी आज रस्त्यावर येतील.कितीजणांची घरं बरबाद होतील.आज तू कंपनी विकली तर येणारं मँनेजमेंट अनेक जणांच्या नोकऱ्या खाऊन टाकेल.त्याचा तू विचार केलास कधी?नाऊ यू आर ए फादर आँफ द फँमिलीज आँफ युवर एम्प्लॉईज.आपल्या मुलांची उपासमार झालेली तुला चालेल?स्वतःच्या सुखाचा विचार सोड.दुसऱ्यांना तू सुखी केलंय त्यांना सुखीच राहू दे”
ते उठले.मी त्यांना सोडायला केबीनच्या बाहेर आलो.परत केबीनमध्ये जाणार तेवढ्यात सेक्रेटरी म्हणाली
“सर आपल्या कंपनीतले हँडिकँप एम्प्लॉईज तुम्हांला भेटायचं म्हणताहेत”
काकांनी तासभर बसून मला संभ्रमावस्थेत टाकलं होतं आता मला कुणालाच भेटायची इच्छा नव्हती.
“आता नको.मी दोनतीन दिवसांनी भेटेन त्यांना”
“सर ते सकाळपासून येऊन बसलेत पण तुम्ही आज दिवसभर बिझी होतात म्हणून त्यांना थांबवून ठेवलंय”
माझ्या कपाळावर आठ्या उमटल्या.मी विचारात पडलो.मग मी निर्णय घेतला.
“कुठं बसलेत ते?”
” वेटिंग रुममध्ये ”
“ठिक आहे मीच भेटतो त्यांना”
मी वेटिंग रुममध्ये आलो.पाहतो तर चारपाच अपंग कर्मचारी त्यांच्या बायका आणि मुलांसह आले होते
“नमस्कार दादा”
“नमस्कार.आज तुमच्या ड्युटीज नाहियेत का?”
” आज तुम्हांला भेटायला सुटी टाकलीये दादा”
“बरं बोला ”
एक वयस्कर कामगार कुबड्या टेकत माझ्याजवळ आला.हा मधुकर होता
” दादा पाच वर्षापुर्वी मला कुणी नोकरी देत नव्हतं.मी आत्महत्या करायला गेलतो तवा तुम्हीच मला वाचवलं इथे नोकरी दिली.मी रस्त्यावरचा माणूस माझ्या नव्या घरात रहायला गेलो ते तुमच्यामुळे. पण दादा आता तुम्ही कंपनी विकायला काढली.नवीन मालक मला कामावर ठेवणार नाही दादा.म्हणजे मी परत रस्त्यावरच येणार ना दादा”मधुच्या डोळ्यात अश्रू होते.भावनाविवश झाल्यामुळे त्याचे हातपाय लटलट कापत होते.
“असं काही नाही मधू.तुझं काम चांगलं आहे तुला ते कशाला काढतील?”
” दादा आजकाल धडधाकट माणसांना काम मिळत नाहिये. माझ्यासारख्या अपंग माणसाला कोण कामावर ठेवणार?कुणीही आपला फायदाच बघणार ना?”
त्याचा मुद्दा आणि काळजी योग्यच होती.नवीन मँनेजमेंटला जी आहेत तीच माणसं डोईजड होणार होती.या अपंग माणसांची नोकरी धोक्यात होती हे नक्की.
एकेक अपंग कामगार समोर येत होता.आपलं दुःख आपल्या समस्या समोर मांडत होता.माझी नजर त्यांच्या कुटूंबियांवर फिरत होती.एकजात काळजीने भरलेले,भविष्याच्या भितीने ग्रासलेले ते चेहरे माझ्या काळजाला घरं पाडत होते.
“ठिक आहे .मी बघतो काय करायचं ते.नवीन मँनेजमेंटसोबत मिटिंग होईल तेव्हा त्यांच्यासोबत या विषयावर चर्चा करु”
मी केबिनमध्ये जायला निघालो.तसे समोरचे लोक उठले.एकेक जण माझ्या पाया पडायला लागला.मी नाही नाही म्हणत असतांना त्या अपंग कामगारांचे म्हातारे आईवडील,छोटीछोटी मुलं माझ्या पाया पडायला गर्दी करु लागली.बरोबरच होतं.त्यांचा पोशिंदा मीच होतो.का कुणास ठाऊक त्याच्या त्या वागण्याने मला गलबलून आलं.त्यांना तसंच सोडून मी केबिनमध्ये निघून आलो.

एका पंधरवड्यानंतरची गोष्ट.
मी केबिनमध्ये बसलो असतांना अरोरा काका धाडकन केबिनचा दरवाजा उघडून आत आले.मी उठून उभा राहिलो तसे घाईघाईने पुढे येऊन त्यांनी मला घट्ट मिठी मारली.
“बेटा आखिर तुमने मेरी बात मान ली.कँन्सल कर दिया ना कंपनीका सौदा?”
“हो काका.तुमच्या सगळ्यांचीच इच्छा तशीच होती ना?”
” ये हुई ना मर्दोवाली बात.अरे भाडमे जाये वो भाईबहन और वो रिश्तेदार. इस कंपनीमे जितनेभी लोग है वो तुम्हारे भाईबहन और रिश्तेदारही तो है.इनका सुख कौन देखेगा?”
मी त्यांना खुर्चीत बसवलं.बसताबसता त्यांनी आपले डोळे रुमालाने पुसले.तेवढ्यात कंपनीचे जनरल मँनेजर मला भेटायला आल्याचं सेक्रेटरीने सांगितलं.मी त्यांना आत पाठवायला सांगितलं.ते आत आले तेव्हा एकदम आनंदात होते.
” सर तुमच्या कंपनी न विकण्याच्या निर्णयाने अख्खी कंपनी खुष आहे.त्या आनंदाप्रित्यर्थ आपल्या कंपनीतल्या सर्व कामगार,कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मिळून एक जंगी पार्टी करायचं ठरवलंय.अर्थात यात कंपनीला एक रुपयाचासुध्दा खर्च नसेल.आम्ही सर्व खर्च शेअर करणार आहोत.फक्त तुम्ही तुमच्या फुरसतीचा दिवस आम्हांला सांगा.सर्व स्टाफच्या वतीने आम्ही तुमचा आणि वहिनीसाहेबांचा सत्कार करणार आहोत.तेव्हा तुमचं कुटुंब या कार्यक्रमाला आवश्यक आहेच”
मी हसलो.
“अहो जाधव साहेब. मी फक्त एक निर्णय बदललाय.काही फार मोठं कर्तृत्व नाही दाखवलं की आमचा सत्कार करायला हवा”
“नाही साहेब. तुम्ही तुमच्या सुखाचा विचार सोडून आमच्या सुखाचा विचार केलात आणि एवढा मोठा निर्णय बदललात ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.प्लीज नाही म्हणू नका सर.हे आमचं तुमच्यावरच प्रेम समजा सर”
” बरं ठिक आहे.पुढच्या रवीवारी चालेल?माझी मुलंसुध्दा तेव्हा घरीच आहेत”
“चालेल सर.खुप खुप धन्यवाद सर”
त्यांनी सोबत आणलेला पेढ्यांचा बाँक्स उघडला आणि त्यातला एक पेढा मला आणि एक अरोरा काकांना खाऊ घातला.काकांनी बाँक्समधला एक पेढा उचलून माझ्यासमोर धरला.
“बेटा ये पेढा मेरी तरफसे.वाकई तुमने बहुत अच्छा काम किया है”
जनरल मँनेजर गेल्यावर काका म्हणाले
” पाहिलंस बेटा.दुसऱ्याच्या सुखात किती सुख असतं ते!हा आदर हे प्रेम तुला कंपनी विकल्यावर मिळालं असतं का?खोट्या सुखाच्या मागे लागून तू अनेकांचं सुख हिरावून घ्यायला निघाला होतास.काय?पटलं ना तुला?”
“हो तर!तुम्ही सांगितलं आणि मला ते पटलं नाही असं कधी होईल का?”
ते मोठ्याने हसले.मी उठून त्यांच्या पाया पडायला लागलो.त्यांनी मला उचलून छातीशी धरलं
” जुग जुग जिओ बेटा”
ते बराच वेळ माझ्या पाठीवर थोपटत होते.त्या थोपटण्यात वडिलांची माया भरलेली होती.

© दीपक तांबोळी
9503011250

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}