मनोरंजन

स्पिरीट भाग १ सत्यकथेवर आधारित

स्पिरीट भाग १

सत्यकथेवर आधारित

पहिला जॉब आणि पहिला दिवस! आनंद, उत्सुकता आणि दडपण ह्या तिन्ही भावना मनात कालवाकालव करत होत्या. पहिला दिवस असल्यामुळे मी ऑफिसमध्ये वेळेच्या खूप अगोदर पोहचलो. ऑफिसच दार उघडलेलं होतं पण मधे कुणीच नव्हते. बॉसच्या (सर) केबिनचा दिवा चालू होता. त्यांच्या पारदर्शी काचेच्या केबिनमध्ये सिगारेटचा धूर दिसत होता. तितक्यात सर केबिन मधून बाहेर येत मला केबिनमध्ये येण्यास सांगितले. exhaust फॅनच्या वेगापेक्षा जास्त वेगाने सिगारेटचा धूर कॅबिनमध्ये तयार होत होता. सरांनी माझे स्वागत करून मला खुर्चीत बसायला सांगितले. सरांच्या टेबलासमोरच्या चाके असलेल्या खुर्चीवर बसलो. सरांसोबत कामाबाबत चर्चा चालू होती पण माझे मन अस्वस्थ होते. मला सिगारेटच्या धुरामुळे गुदमरल्यासारखे होत होते.

माझी अडचण सरांच्या लक्षात आली असावी म्हणून त्यांनी मला बाहेर माझ्या डेस्कवर बसण्यास सांगितले. मी बाहेर जाण्यासाठी उठत असताना माझ्या शेजारची चाके असलेली खुर्ची आपोआप अर्धवर्तुळाकारात फिरली आणि थोडीशी मागे सरकली. खुर्चीवर कुणीही बसलेलं नव्हते आणि तिला कुणी धक्का पण दिला नव्हता. हे बघून मी थोडं भांबावलो आणि सरांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले. सर हसले आणि बोलले तुला बहुदा सिगारेटच्या धुरामुळे किक बसली आहे म्हणून तुला खुर्ची सरकलेली दिसली. मी पण बळंच स्मितहास्य करून केबिनच्या बाहेर आलो.

डेस्कवरची नावं वाचत वाचत माझ्या नावाच्या डेस्कवर जाऊन खुर्चीवर बसलो. माझं डोकं भणभणत होतं. डेस्कवर माझ्या नावाचे एक स्वागत करणारे पत्र ठेवलेले होते. पत्र वाचून झाल्यावर मी डेस्कवरच्या बाकीच्या सर्व गोष्टींचा आढावा घेत होतो. एव्हाना ऑफिसमध्ये सहकारी येत होते. मला hi, hello करून त्यांच्या कामाला लागले होते. माझं डोकं दुखणे बंद झाले होते. मला अजूनपर्यंत कोणतीही जबाबदारी दिली नव्हती म्हणून मी रिकामा बसलो होतो आणि मनात विचारांची श्रुंखला उभी राहिली. सरांना कसं काय कळले कि मला खुर्ची सरकतांना दिसली? जर सिगारेटच्या धुरामुळे किक मला बसली आहे तर हलणारी खुर्ची त्यांना पण कशी काय दिसली? खुर्ची आपोआप कशी काय हलु शकते? भुत? आत्मा? थोडी भीती वाटली.

नवखा असल्यामुळे हा किस्सा कुणाला सांगावा हे कळत नव्हते. हा किस्सा कुणी गांभीर्याने घेणार नाही आणि उलट माझी टर उडवण्यासाठी सहकाऱ्यांना एक कारण मिळेल म्हणून मी कुणालाही काहीही सांगायचे नाही असे मनाशी ठरवले.

आमचं ऑफिस हे एका आऊटहाऊसमध्ये आहे. सुमारे २ एकर जागेभोवती एक मोठं भिंतीच कुंपण आहे. मुख्यदाराच्या डाव्या हाताला अजून एक गेट आहे. मोठ्या कुंपणाच्या आत एक अजून छोटस कुंपण आहे. ह्या छोट्या कुंपणात सरांचा टुमदार, जुन्या धाटणीचा बंगला आहे. मुख्यदारातुन आत येत असतांना उजव्या हाताच्या कुंपणाच्या भिंतीला चिटकून एक छोटंसं मंदिर आहे. मंदिरामध्ये कृष्णाची मूर्ती आणि शंकर, पार्वती आणि गणपतीची एकत्र असलेली मूर्ती स्थापन केलेल्या आहे. मंदिराच्या पुढे आऊटहाऊस आहे आणि डावीकडे भरपूर मोकळी जागा असून एक भले मोठे गोडाऊन आहे. आऊटहाऊस म्हणजे 2bhk फ्लॅट आहे. एक मोठा हॉल, एक सरांची केबिन, एक मॅनेजरची केबिन, एक किचन आणि एक वॉशरूम. आऊटहाऊस च्या मागे एक पत्र्याचं शेड आहे. शेड मध्ये एक भला मोठा लोखंडी टेबल असून त्यावर एकाच वेळी १६ जण जेवू शकतात. शेड पूर्णपणे मनीप्लांटने सजवलेली आहे. शेडच्या उजव्या बाजूला एक २ फुट उंचीचा हौद आहे. हौदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहे. कमळ लावलेले आहेत. शेडच्या डाव्या बाजूला अजून एक गेट आहे. ह्या गेटमधून मागच्या प्लॉटमध्ये जाता येते. संपूर्ण परिसर छोट्या मोठ्या झाडांनी भरलेले आहे. झाडांना फळ- फुलं लगडलेली असतात. इथे इतकी झाडे आहेत कि बघणार्याला वाटावे आपण नर्सरीमध्ये अथवा निसर्गरम्य अशा रिसॉर्ट मध्ये आलो आहोत. एकंदरीत सगळं स्वच्छ आणि प्रसन्नदायक वातावरण आहे.

आमची कंपनी खूपच छोटी होती. येण्या जाण्याच्या वेळा ठरलेल्या नाही. काम वेळेत पूर्ण करायचं हि एकच अट आहे. साधारणतः आम्ही १४-१५ जण इथे काम करत आहोत. सहकारी चांगले आहे. सर तर खूपच चांगले आहे. ते कधी कुणावर चिडलेले दिसले नाही. कामात झालेल्या चुका सर प्रेमाने समजावून सांगतात. एकंदरीत सगळं आलबेल आहे. तरीही काही सहकारी ऑफिस सोडून जात होते तर काही नवीन सहकारी येत असतात.

दिवसामागून दिवस जात होते. एव्हाना मी आता ऑफिसच्या कामात गुंतलो होतो. माझं प्रमोशन पण झालं होत. टिमलीडर झालो होतो. मॅनेजरच्या कॅबिनमध्ये माझा स्वतंत्र डेस्क होता. महत्वाचे प्रोजेक्ट्स सांभाळत होतो. एकदा एका मीटिंगच्या तयारीसाठी ऑफिसमध्ये खूप लवकर आलो होतो. लॅपटॉप चालू करत असताना अचानक डेस्कवर ठेवलेली नोंदवही आपोआप हलली आणि मागे सरकत गेली. मी स्थब्ध झालो. काय करावे तेच कळेना.

पटकन पळत बाहेर गेलो आणि मंदिरासमोर जाऊन ऊभा राहिलो. हाथ जोडून हनुमानचालिसा सुरु केली. बाकीचे सहकारी येईपर्यंत बाहेरच बसून राहिलो. ह्या गोष्टीची मी वाच्यता केली नाही. वाच्यता केली असती तर ऑफिसमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले असते.

मध्यंतरी आमचा कामाचा व्याप वाढला होता. माझं परत प्रमोशन झालं. आता मी मॅनेजर बनलो होतो. १४ जणांची टीम आता २० जणांची झाली होती. माझा विरोध असूनही आम्ही दुसरीकडे ऑफिस भाड्याने घेतलं. ६ सहकारी वाढल्यामुळे अजून एक ऑफिस भाड्याने घेणे मला पटत नव्हते. २० जनांसाठी जुनं ऑफिस पुरेसं होत. मग मी आणि सर दोघेचं जुन्या ऑफिसमध्ये बसत असत. बाकीचा सगळा स्टाफ नव्या ऑफिसमध्ये शिफ्ट झाला. टिमलीडर रोज २-३ तास जुन्या ऑफिसमध्ये येत असत.

एकदा संध्याकाळी उशिरापर्यंत मी आणि सर नव्या प्रोजेक्टबद्दल चर्चा करत होतो. दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये क्लायंटबरोबर मीटिंग होती. मी सरांबरोबर बसून प्रेझेंटेशन बनवत होतो. काम पूर्ण झाल्यावर मी वॉशरूमकडे गेलो. दरवाज्याची मूठ फिरवून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा आतून बंद केलेला होता. तितक्यात आतून फ्लश करण्याचा आवाज आला. मला वाटले आतमध्ये कुणी असावं म्हणून मी दरवाजाबाहेर ताटकळत उभा राहिलो. १० मिनिटं झाली तरी कुणीच बाहेर आले नाही. मी २- ३ वेळा दरवाजा वाजवला तरी आतून कसलीच हालचाल नाही. मी पुन्हा एकदा दरवाजा ठोठावला तेव्हा दरवाजा आपोआप उघडला गेला. वॉशरूममध्ये जाऊन बघतो तर कुणीच नव्हते. आता माझी चांगलीच फाटली होती. पॅन्ट ओली व्हायची वेळ आली होती. घाबरत घाबरत विधी उरकून बाहेर आलो. तोपर्यंत सर ऑफिसच्या बाहेर निघून गेले होते. ऑफिसचे शिपाई (मामा) दिवे बंद करत होते. माझा पांढराफटक चेहरा पाहून त्यांनी विचारले, “काय झालं साहेब? तोंड उतरलेलं दिसतंय. तब्बेत बरोबर नाही का? ” काय बोलावं कळलं नाही म्हणून भूक लागली आहे असे सांगून बाहेर गेलो. मामांना घडलेला किस्सा सांगावा असं वाटत होत पण आधीच खूप उशीर झाला होता.

दुसऱ्या दिवशी मी, सर आणि मामा मुंबईला गेलो. जातांना गाडीमध्ये मीटिंगबद्दल चर्चा करत होतो. मिटिंग अपेक्षेपेक्षा जास्त भारी झाली. आमच्या अवाक्यापेक्षा जास्त मोठा प्रोजेक्ट मिळाला होता. मी आणि सर जास्तच खुश होतो. जेव्हा जेव्हा आम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळत असत तेव्हा तेव्हा आम्ही मुंबईमध्ये पार्टी करत. आज पण पार्टी होणार होती. पण मला आज जुहू बीचवर जावसं वाटतं होतं. बिचवर गेल्यावर मन प्रसन्न झाले. आदल्या दिवशी झालेला किस्सा सरांना सांगितला. सरांनी तो किस्सा हसण्यावारी नेला. सर बोलले असं काही नाही ऑफिसमध्ये. घाबरू नको. भास झाला असेल. मग मी निर्धास्त झालो.

जेवणखावन करून रात्री १:३० वाजता आम्ही नाशिकला ऑफिसमध्ये पोहचलो. आम्हा तिघांना खूप झोप येत होती. रात्री थंडीमध्ये अर्धा तास मोटारसायकल चालवत घरी जायला मला कंटाळा आला होता. वाटले आज ऑफिसमध्येच सोफ्यावर झोपू. माझ्या या प्लॅनबद्दल मी मामांना सांगितले आणि ऑफीसची चावी मागितली. माझं बोलणं ऐकून सर आणि मामांचे डोळे चमकले. रात्री इथे खूप डास असतात असं सांगून मामांनी मला घरी जाण्याचे सुचवले. मला झोप कंट्रोल होत नव्हती म्हणून मी ऑफिसमध्येच झोपण्याचा हट्ट करायला लागलो. कधीच न चिडणारे सर माझ्यावर भडकले. “तुला कळत नाही? घरी जा झोपायला.” मामांना मला चावी न देण्याबद्दल सांगून सर घरी गेले. मामा मला बोलले, “साहेब, जा घरी. उद्या आल्यावर बोलू. वाटल्यास मी सोडायला येतो तुम्हाला. पण इथे नका थांबू.” नाईलाजाने मी घरी गेलो. जातांना मनात एकच विचार आला. सरांना एवढं भडकायला काय झालं होतं?

दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला उशिरा गेलो. टिमलीडर माझीच वाट बघत बसले होते. त्यांना नवीन प्रोजेक्ट मिळाल्याचे सांगून मार्गी लावले. मग मी मामांना बोलावले. काल रात्री सर का भडकले याबद्दल विचारलं. मामांनी सांगितले की सर आल्यावर आपण ह्याबद्दल बोलू. मग मी माझ्या कामात मग्न झालो. थोड्या वेळाने सरांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावले. काल ते माझावर चिडले होते म्हणून त्यांना खेद व्यक्त केला. सरांनी मामांना पण माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसायला सांगितले.

क्रमशः

————————————————————————-

स्पिरीट भाग २

सर : “तुला माहित आहे का आपण नवीन ऑफिस का घेतलं? ”

मी : “जागा अपुरी पडत असल्यामुळे.”

सर : “नाही. तुला आठवतंय का तृप्ती एकदा आजारी पडली आणि नंतर तिने राजीनामा पाठवला?”

मी : “हो.”

सर : “तिला इथे असाच तुझ्यासारखा अनुभव आला. ती एकटी काम करत होती. तेव्हा तिचा मोबाईल फोन आपोआप सरकत सरकत मागे गेला. ती खूप घाबरली. फोन घेऊन ती बाहेर पळतच होती कि तिच्या बाजूची एक खुर्ची आपोआप अर्धवर्तुळाकार फिरली. म्हणून ती अजून घाबरली. ती घरी गेली. २ दिवस ऑफिसला आली नाही. तीने काही निरोप पण दिला नाही. म्हणून मी तिची चौकशी करायला लावली. तिने आजारी असल्याचं सांगितलं. पुढच्या ४ दिवसात ती आली नाही म्हणून मी तिला कॉल केला. तिने काय घडलंय ते सांगितलं. आणि जॉब सोडायचं सांगितले. मी तिला जॉब नकॊ सोडू असं सांगितलं पण ती ऐकायलाच तयार नाही. अशामुळे माझा स्टाफ ऑफिस सोडून गेला तर कंपनीच काय होईल ह्या विचाराने मी नवीन ऑफिस भाड्यान घेण्याचं ठरवलं. पण तू आला आडवा. खर्च वाढेल अशा सबब सांगून तू नवीन ऑफिस घ्यायला विरोध करत बसला.”

मी थोडा सुन्न झालो होतो. थोडा वेळ तिघेही शांत बसलेलो.

सरांनी मामांना ईशारा केला आणि मामा घडाघडा बोलायला लागले.

मामा : “साहेब, मी इथं गेल्या १५ वर्षांपासून नोकरी करतोय. साहेबांमुळं मला माझ्या गावात २ एकर जमीन विकत घेता आली. आज मी नाशिकमध्ये एक छोटंसं घर बांधू शकलो. पहिले मी भाड्याच्या घरात राहत होतो. ते घर खूपच छोटं होत. पाहुणे आले तर झोपायला जागा पुरत नसत. तेव्हा मी ऑफिसमध्ये मुक्कामाला येत असत. पहिल्यांदा जेव्हा ऑफिसमध्ये मुक्कामाला आलो तेव्हा मी खूप दमलेलो होतो. तुमच्या कॅबिनमधल्या सोफ्यावर आडवा झाल्या झाल्या मला झोप लागली. ३- ४ तासांनी मी घाबरून उठलो. मला असं वाटलं कि कुणीतरी आपल्या छातीवर दाब देतोय. गळा दाबल्यासारखं वाटले. मी घामानं डबडबून गेलो. पांघरून घेऊन मी बाहेरच्या हॉलमध्ये झोपलो. तेव्हा अस वाटायचं कि कुणीतरी माझ्या शेजारी फिरत आहे. पाय दणदण आपटल्याचा आवाज आले. ती रात्र मी जागून काढली. दुसऱ्या दिवशी साहेबांना सांगितले. ते हसले. भास झाला असेल अस सांगून त्यांनी विषय बदलला.”

सर : “विषय बदलला नसता तर तू घाबरून नोकरी सोडून पळाला असता.”

मामा : “पळून नसतो गेलो साहेब. गेल्या १५ वर्ष्यांमध्ये मी फक्त ३ वेळा ऑफिसमध्ये झोपलो. तिन्हीही वेळा मला सारखाच अनुभव आला. तिसऱ्या वेळेनंतर मी मागच्या शेडमधल्या जेवायच्या टेबलावर झोपायचो. तिथं खूप डास चावायचे. पण ऑफसमध्ये झोपायला मी घाबरायचो. बाहेर मला कधीही भुताचा, आत्म्याचा त्रास झाला नाही. म्हणून तुम्हाला काल रात्री घरी जायला सांगत होतो.”

मी : “म्हणजे परवा माझ्याबरोबर घडलेला किस्सा खरा होता?”

सर : “हो!” मी चमकलोच.

सर : “इथे कोणतीतरी शक्ती आहे. तिला मी स्पिरिट बोलतो. त्याने आजपर्यत कुणालाही त्रास दिला नाही. इथे कोणताही अपघात घडलेला नाही.”

मामा : “मला त्रास झाला होता ना साहेब. झोपताना गळा दाबला होता माझा.”

सर : “खोटं बोलत असेल तू. ” सर चेष्टेच्या सुरात बोलले. “तुला काय काय अनुभव आले प्रणव? ”

मग मला आलेले सारे किस्से सरांना सांगितले. सर हसले.

सर : “असं होतं असतं. घाबरायचं नाही. तुला काय वाटतं कि असे अनुभव येणारा तू एकटाच आहे का? असे अनुभव येणारे खूप जण आहेत. पण ते आज आपल्यात नाहीत.”

आपल्यात नाही हा ऐकून मी जाम घाबरलो. मेले कि काय ते?

“i mean ते आपलं ऑफिस सोडून गेले.” सरांनी अटलजींच्या स्टाईलने पॉज घेत वाक्य पूर्ण केलं.

मी : ” म्हणून इतकं चांगलं ऑफिस असूनही सहकारी ऑफिस सोडून जातायेत!”

सर : “yes. म्हणून हि गोष्ट मी लपवत आलो. नाहीतर पूर्ण स्टाफ ऑफिस सोडून घरी गेला असता.”

मी : “सर कोणत्या बुआ- बाबा दाखवत का नाही? ”

सर : “तुला माझी थेअरी माहित आहे ना? मी देव मानतो पण कर्मकांडाला मानत नाही. फक्त वर्षातून एकदा टिटवाळ्याच्या गणपतीला जातो. कारण मला तिथली शक्ती खेचून नेते. मला आपोआप तिथे जावसं वाटतं. बाकी मी पूजा अर्चा करत नाही. देव माणसात बघतो. गरजूंना मदत करतो. कधीही मंदिरात दान देत नाही. मला इथे पण एक स्पिरिटचं अस्तित्व जाणवते. तुम्ही त्याला भूत, आत्मा म्हणतात. भूत ही नकारात्मक संकल्पना आहे. इथल्या स्पिरिटने कधीही कुणाचंही वाईट केले नाही कि चांगले केले नाही. न्यूट्रल आहे इथले स्पिरिट. म्हणून त्याला इथून घालवायचं पण वाटतं नाही. भूत पळवणारे बाबा-बुबा खोटारडे असतात. माणसाच्या भितीचा वापर करून पैसे उकळतात आणि पसार होतात. भोंदू आहेत सगळे, भोंदू!”

मी : “हम्म, कोणाचं स्पिरिट असेल हे?”

सर : “नाही सांगू शकत. बाई आहे कि माणूस त पण सांगू शकत नाही. इथे खूप अफवा पसरलेल्या होत्या. मी लहान होतो तेव्हा आमच्या इथे कामाला असलेले मजूर लोक सांगत कि अमक्याला बाईच भूत दिसलं, तमक्याला माणसाचं भूत दिसलं. माझे आजोबा पहिले मुंबईला राहायचे. तिथे त्यांच्या आणि त्यांच्या भावांच्या खूप साऱ्या फॅक्टरीज होत्या. त्यांनी नाशिकमध्ये ही जागा विकत घेतली. १९६२ साली बांधकाम केले. तेव्हा माझा जन्म पण झाला नव्हता. बाजूचं गोडावून आहे तिथे आमची फॅक्टरी होती. (आता ती जागा दुसऱ्याला भाड्याने दिली आहे). आमच्या फॅक्टरीचा मॅनेजर आपल्या ह्या ऑफिसमध्ये राहत होता. माझ्या जन्मानंतर काही वर्षांनी काही कारणाने फॅक्टरी बंद पडली. काही जण सांगतात कि इथे बांधकाम करतांना हाडके, कवट्या सापडल्या होत्या. म्हणे जुन्या काळी इथे स्मशानभूमी होती. इथे मुर्दे गाडलेले आहेत. काही जण सांगतात इथे एकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. काही जण सांगतात आमच्या फॅक्टरीच्या मॅनेजरने इथे आत्महत्या केली. फॅक्टरी बंद होण्याच्या वेळेस मी ७- ८ वर्षांचा होतो. मला नाही आठवत कि कुणी इथे आत्महत्या केलं होती. काय खरं काय खोटं हे माहित नाही.”

तेव्हड्यात मामाने २ ग्लास पाणी आणले. घशाला कोरड पडली होती. सर आणि मी दोघांनी एका दमात पाणी पिऊन टाकले. आता थोडं बरं वाटत होत.

मी : “सर, तुम्हाला पण काही अनुभव आले असतीलच ना? ”

सर : “खूप! टेबल, खुर्ची हलणे. प्रिंटर आपोआप चालू व्हायचं. पहिले मला भीती वाटायची. नंतर सवय झाली. पहिले मी फक्त १०-६ ह्या वेळेत ऑफिसमध्ये थांबायचो. नंतर काम वाढत गेलं. स्टाफ कमी पडत होता. मी स्वतः डिझायनिंग करायचो आणि मार्केटिंग पण बघायचो. खूप दमून जात असतं. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मी ऑफिसमध्ये पहाटे येऊ लागलो. पहाटे पण खूप अनुभव यायचे. मग मी डॉलरला (कुत्रा) ऑफिसमध्ये घेऊन यायचो. मला काही अनुभव आले तेव्हा डॉलर खूप भुंकायचा. बहुदा त्याला पण काही दिसत असावं. एकदा सकाळी सकाळी काम करत होतो. ४०- ५० पेजेस प्रिंट केली. तेव्हड्यात केबिन झाडण्यासाठी मावशी आल्या. मी ती पेजेस टेबलावर ठेऊन केबिनबाहेर जात होतो. मावशीने खिडकी खोलली आणि क्षणात टेबलावर ठेवलेले पेजेस हवेमुळे उडाली. मला खूप राग आला पण म्हातारीला काय बोलणार म्हणून तिला सांगितले कि सगळी पेजेस नीट गोळा करून ठेव. मग मी बाहेर गेलो. कॉफी बनवून केबिनबाहेर पीत बसलो. थोड्या वेळाने मावशी केबिन साफ करून निघून गेली. मी कॅबिनमध्ये आलो. बघतो तर सगळे पेजेस सिरीयल नंबरने लावून स्टेपल केलेली होती. अडाणी बाईने पेजेस सिरीयल नंबरने कशी काय लावली असेल? दुसऱ्या दिवशी मी मावशीला विचारले. तर तिने सांगितलं कि तिने फक्त पेजेस गोळा केली आणि पेजेस टेबलावर ठेवून त्यावर पेपरवेट ठेवला होता. स्टेपलर काय असतं हे तिला ठाऊकच नाही. मग वाटले कि स्पिरिटनेच केले असावे.”

सर : “घरी जातांना एक प्रयोग करून जा. बाहेरच्या हॉलमधल्या खुर्च्या एका रांगेत लाऊन जा. दुसऱ्या दिवशी त्या खुर्च्या गोलाकारात मांडलेल्या दिसतील. जणू कुणी ग्रुप डिस्कशन करत बसलेलं होतं . ”

मी थक्क झालो. मामा कॉफी घेऊन आले. कॉफीचा आस्वाद घेता घेता विचारचक्र सुरु होते. नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सगळेजण आप आपल्या कामाला लागलो.

दिवसामागून दिवस गेले. काम वाढत होते. स्पिरीटचे छोटे मोठे अनुभव येत होते. आता भीती वाटत नव्हती. हे किस्से मी घरी, मित्रांमध्ये रंगवून सांगत असत. आईला भीती वाटायची. ब्राह्मणाचा सल्ला घेऊन तिने मला तांब्याचा कडा हातात घालायची सक्ती केली. मला झोप खूप यायची म्हणून मी चांदीच एक कडा हातात घालत होतो. आता तांब्याचं कड चांदीच्या कड्यासोबत घालत होतो. ४ महिने मी तांब्याचं कड वापरलं. मला स्पिरिटचे अनुभव येणे बंद झाले होते. पण माझी झोप वाढली असे घरच्यांना वाटत होते. मी तांब्याचं कड काढून सॅकमधे ठेवू लागलो. झोप कमी झाली आणि स्पिरीटचे अनुभव पण बंद झाले. गेल्या सहा महिन्यात एक पण अनुभव आला नव्हता.

एकदा बागेतला माळी केबिनमध्ये आला. मी हसणार नाही या अटीवर तो एक गोष्ट सांगणार होता. त्याने सांगितले कि पोळ्याच्या पहिल्या दिवशी तो सकाळी ऑफिसमध्ये आला होता. मावशी आली नसल्यामुळे तो स्वतः हॉलमध्ये साफसफाई करत होता. त्याला एका म्हातारीचा माझ्या केबिनमधून आवाज आला. “काय रे, काय करतोय तिकडे?” त्याला वाटले मोठ्या मॅडम (सरांच्या आई) आल्या आहेत. म्हणून तो माझ्या कॅबिनमध्ये आला. बघतो तर आतमध्ये कुणीच नव्हतं. तो तसाच बाहेर गेला. बाहेर बघितले तर कुणीच नव्हतं. जर आतमध्ये अथवा बाहेर कुणीच नव्हतं तर आवाज आला कुठून आणि कुणाचा? मग मी हसलो आणि बोललो तुला भास झाला असेल. तो खात्रीने सांगत होता कि भास नव्हता. कुणीतरी नक्कीच बोलले होते. मग मी विषयांतर करून त्याला बाहेर पिटाळले.

घडलेली हकीकत सरांच्या कानावर घातली. सर हसले. मला वाटलं होते कि सर बोलतील भास झाला असेल. म्हणून त्यांनी बोलायच्या आत मी बोललो, “सर, भास झाला असेल.” सर परत हसले.

सर बोलले, “नाही. भास नसेल. ८- १० दिवसापूर्वी तुझ्या कॅबिनमध्ये मी पण एका म्हाताऱ्या बाईला ४- ५ सेकंदासाठी बघितले. नंतर ती अदृश्य झाली. मी १००% शुवर नव्हतो म्हणून तुला काही सांगितले नाही. पण आता खात्री पटली. डॅड्डीना (सरांचे वडील) पण मी हे सांगितले. पण त्यांना आत्तापर्यंत एक पण अनुभव आला नाही. डॅड्डीना आपली काळजी वाटतेय म्हणून त्यांनी cctv लावायला सांगितले आहे. पूर्ण परिसर cctv न कव्हर कर. cctv स्पिरिटसाठी नाहीये. डॅड्डीच मन ठेवायचं आहे म्हणून लावायचं आहे. त्यासाठी कोटेशन मागव.”

मी : “ओके सर, २- ३ दिवसात cctv लागलेले असतील. पण मला ह्या घटनेवर ब्लॉग (कथा) लिहायचा आहे. आपली परवानगी हवी होती.”

सरांनी परवानगी दिली. फक्त हि जागा कुठली आहे ते सांगण्यास मनाई केली. कारण रिकामटेकडी लोकं इथे येऊन आपल्याशी डोकं लावत बसतील आणि ह्या जागेच व्हॅलूयेशन भूतांमुळे कमी होऊ शकत.

पुढच्या ३ दिवसांत cctv चे काम पूर्ण झाले. आता फावल्या वेळात मी कथा लिहणार होतो.

एकदा रिकामा असतांना लिहायचे काम सुरु केले. शीर्षकाचे नाव टाईप करत असताना माझ्या लॅपटॉपची स्क्रीन बंद पडली. खटाटोप करून मी जुन्या मॉनिटरला लॅपटॉप जोडला. ह्यामध्ये खूप वेळ निघून गेला. वेळेअभावी ब्लॉग लिहता आला नाही.

दुसऱ्या खेपेस कथा टाईप करत असतांना माझं अंग भरून आले. मी २ तास सोफ्यावर झोपून गेलो. उठल्यावर लॅपटॉप बंद करून घरी गेलो.

त्यानंतर ३ दिवस मी आजारी पडलो.

कामावर परत रुजू झाल्यावर काही दिवस खूप व्यस्त होतो. लिहायला सवड मिळत नव्हती.

खूप दिवसांनी सवड मिळाली. कथा लिहत असताना कुणीतरी माझ्याकडे बघताय असे मला जाणवत होते. तेवढ्यात झाडाची फांदी तुटण्याचा आवाज आला. मी जिवाच्या भीतीने बाहेर पळत गेलो. बाजूच्या फॅक्टरी मधले कामगार पण बाहेर पळत आले. मागच्या फॅक्टरीमधल्या एका झाडाची फांदी तुटून आमच्या परिसरातल्या झाडावर अडकली होती. जर ती फांदी अडकली नसती तर निश्चितच आमच्या ऑफिसवर पडली असती. मग काय झाले असते हे सांगू शकत नाही.

मला जाणवतंय कि कुठली तरी अदृश्य शक्ती मला लिहन्यापासून परावृत्त करत आहे. आपण लिहायचंच ह्या हट्टाने आज मी घरी बसून कथा लिहली आहे. हि कथा लिहताना मला तांब्याच्या कड्याची आठवण आली. माझी सॅक धुण्याकरता दिली असतांना तांब्याचे कडे बाहेर काढले होते. ते परत सॅकमध्ये ठेवलं गेले नाही. म्हणूनच बहुदा मला कथा लिहतांना अडचणी आल्या. पण आता मी सुरक्षित आहे. कारण आता माझ्याकडे तांब्याचं कड आहे.

वाचकांनो, ह्या गोष्टीतील घटना घडलेल्या आहेत. बहुदा भास पण असू शकतात. मी १००% खात्री देऊ शकत नाही. पण मी अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाहीये. जसं घडलंय तसं ध् लिहलंय. खरं कि खोटं हे वाचकांनी ठरवावे. आपले काय मत आहे ते नक्की कळवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}