रोमान्स…
रोमान्स…
“रोमान्स” हा शब्दच इतका रोमांचक आहे!
त्याचा उच्चार जरी केला नुसता तरी अंगावर रोमांच उभे राहतात.
पण सहसा याचा उल्लेख प्रियकर प्रेयसी (किंवा हल्लीच्या भाषेत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड) च्या संदर्भात केला जातो.
लग्न झालेल्या किंवा लग्नाला 35 वर्षे उलटून गेलेल्या जोडप्यांना त्याबद्दल कोणी फारसे काही म्हणत नाही.
हा विषय निघायचं कारण म्हणजे, परवा घरी अशी चर्चा सुरू होती की
मी नवऱ्याला म्हणाले,
“काय दिवस आले आहेत आपले?
मुलं बिझी आहेत आणि आपण म्हातारा म्हातारी घरी!”
त्यावर आमची कन्या उत्तरली,
“मम्मा, म्हातारा म्हातारी काय म्हणतेस?
तुम्ही अजिबात म्हातारे नाही.
तुम्ही रोमँटिक डेटला जा दोघे!
कँडल लाईट डिनर करा, मूव्हीला जा. एंजॉय करा!”
मी विचारात पडले.
लग्नाला 35 वर्षे उलटून गेल्यावर असा मुद्दाम ठरवून रोमान्स असतो का?
मग माझ्या मनाने कौल दिला.
लग्नाला इतकी वर्षं झाल्यावर रोमांस ठरवून नाही करावा लागत.
तो एकमेकांच्या सामंजस्यात, विश्वासात, काळजीत असतो.
घरी बायकांचं संक्रांतीचे हळदीकुंकू असतं, तिची कामाची, डिश भरण्याची, हळदीकुंकू देण्याची गडबड चालू असताना जेव्हा नवरा लांबूनच डोळ्यांनी ‘खूप छान दिसतेयस” हे सांगतो ना त्या डोळ्यात रोमान्स असतो.
सगळं आवरल्यावर “दमलीस का” या एका प्रश्नात रोमान्स असतो.
वीकएंडला सकाळी त्याला झोप लागलेली असते तेव्हा उजेडाचा त्रास होऊ नये म्हणून हळूच पडदा सरकवून खोलीत उजेड येऊ न द्यायची ती खबरदारी घेते ना, त्या सरकवलेल्या पडद्यात रोमान्स असतो.
रविवारच्या सकाळी मुले उठायच्या आधीचा खिडकीपाशी बसून घेतलेला वाफाळता चहा असतो ना त्या चहाच्या चवीत, वाफेत, फारसे न बोलतादेखील मारलेल्या त्या गप्पात रोमान्स असतो.
रहदारीच्या रस्त्याने चालताना जेव्हा तो वाहनांच्या बाजूला जाऊन तिचा हात धरून तिला आतल्या बाजूला चालू देतो ना त्या त्याच्या काळजीत रोमान्स असतो.
कधी बारीकसे बरे नसताना जेव्हा तो हातावर औषधांची गोळी आणि पाण्याचा ग्लास ठेवतो ना, त्या गोळीत रोमान्स असतो.
जेव्हा नवरा म्हणतो, “अग माझे ते हे कुठे आहे?” आणि बायको म्हणते,”अहो ते तिथेच आहे” आणि त्याला त्याचे मोजे सापडतात, तेव्हा त्या अगम्य संवादात रोमान्स असतो.
जेव्हा सत्तरीतले आजीआजोबा मॉलमध्ये जातात तेव्हा एस्केलेटर आला, की, न बोलता आजोबा हात पुढे करतात आणि आजी लाजून हात हातात देतात. त्या लाजण्यात रोमान्स असतो.
वयस्कर जोडप्याचा रोमान्स ना, हरभऱ्याच्या पेंडीत लपलेल्या दाण्यांसारखा असतो.
थोडं शोधलं, तर हिरवे दाणे सापडतात. नाहीतर नुसताच पालापाचोळा!