★★योगायोग★★ ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★योगायोग★★
मुक्ता पळतच नागपूर-पुणे ट्रेनमध्ये चढली आणि ट्रेन सुरू झाली. घरून वेळेवर निघाली पण रस्त्यात मोर्चामुळे ट्रॅफीक जॅम झाला होता. मुक्ताने सीट नंबर बघितला. तिच्या खिडकीजवळच्या जागेवर एक वयस्कर गृहस्थ बसले होते. “आजोबा,ही सीट माझी आहे.”
“हो का,ये बाळ बस. माझी तुझ्या बाजूचीच सीट आहे.” ते गृहस्थ सरकायला लागले तसे मुक्ता म्हणाली, “आजोबा,असू दे! तुम्ही उठू नका. मी तुमच्या सीटवर बसते.” मुक्ताने सुटकेस खाली सरकवली आणि ती सीटवर बसली.
“नाव काय ग तुझं?’
“आजोबा, माझं नाव…”
“आप्पा म्हण मला. सगळे आप्पाच हाक मारतात.”
मुक्ताला जरा विचित्रच वाटलं. पहिल्याच भेटीत काहीही ओळख नसताना ह्यांना आप्पा कसं हाक मारायचं?
“मी मुक्ता देसाई.”
“मी दिवाकर घारपुरे म्हणजे आप्पा घारपुरे. राहणार पुणे, सदाशिव पेठ. नाव छान आहे ग तुझं!हल्ली इतकी जुनी नावं ठेवत नाहीत.”
“आमच्या घरात ज्ञानेश्वर माऊली सगळ्यांचं दैवत आहे. माझ्या वडिलांचे नाव सोपान, आणि मोठ्या भावाचे ज्ञानेश्वर!”
“पुण्यात रहायला कुठे?”
“मी सहकार नगर. नागपुरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकतेय.”
“वा, छानच! माझा नातू पण बी जे मेडिकलला शिकतोय! नागपुरला माझी मुलगी असते. तिच्याकडे गेलो होतो.”
मुक्ताने पर्समधून पुस्तक काढलं. आता डोळ्यासमोर मोबाईल किंवा पुस्तक घेतल्याशिवाय हे आजोबा बोलणं काही थांबवणार नाहीत. अकोला स्टेशन गेलं. मुक्ता वरच्या बर्थवर झोपायला जाणार इतक्यात आप्पांनी तिचा हात धरला. “मुक्ता, मला कसंतरी होतंय.”
मुक्ताने आप्पांकडे बघितलं. त्यांना घाम फुटला होता आणि ते थरथरत होते. मुक्ताने ताबडतोब स्टेथोस्कोप आणि बी पी चेक करायचं मशीन काढलं. आप्पांचं बी पी वाढलं होतं. मुक्ताने आप्पांना झोपवलं,त्यांच्या पायाखाली उशी दिली.
“आप्पा,ब्लड प्रेशरच्या गोळ्या कुठल्या घेता?”
“Telmika 40! आज संध्याकाळची गोळी घ्यायला मी विसरलो असेन. हल्ली हे असं विसरायला फार होतं.”
“मोबाईलमध्ये रिमाइंडर लावून ठेवायचा.”
“फोन घेणं,आणि फोन करणं ह्याव्यतिरिक्त मला त्या मोबाईल मधलं काही कळत नाही.” आप्पा हसत म्हणाले.
मुक्ताने अप्पांना ब्लड प्रेशरची गोळी घ्यायला सांगितली आणि अर्धी रेस्टीलची गोळी दिली आणि ती बर्थवर झोपायला गेली.
आप्पांना मुक्ता खूप आवडली. इतकी की त्यांचा डॉक्टर नातू सर्वेशसाठी ते मुक्ताचा विचार करायला लागले. तिची साधी राहणी,बोलण्यातील आदब, सगळंच त्यांना भावलं. मुक्ताने दिलेल्या गोळीची ग्लानी यायला लागली आणि आप्पांनी अंगावर पांघरूण ओढलं.
पुणे स्टेशन आल्यावर मुक्ताने हात धरून आप्पांना ट्रेनमधून खाली उतरवलं.
“मुक्ता, तुझे आभार मानत नाही. सर्वेशसारखीच मला तू! माझा मोबाईल नंबर ,पत्ता ह्या कार्डवर आहे. आमच्या घरी ये. सदाशिव पेठी असलो तरी आदरातिथ्य आहे बरं का आमच्या घरी!”
“असं काही नसतं आप्पा! मी पण पुण्याचीच तर आहे. आठ दिवस सुट्टी आहे म्हणून आले आहे. आठ दिवसांनी परत नागपुरला जाईन. फायनल सेमिस्टरसाठी. जमलं तर नक्की येईन तुमच्या घरी!” मुक्ताने आप्पांना मिस्ड कॉल दिला. “आप्पा,माझा नंबर सेव्ह करून ठेवा. शेवटी 002 आहे. आणि तब्येतीची काळजी घ्या. एकदा शुगर पण चेक करा. ह्या वयात एकट्याने प्रवास करू नका. मी तुम्हाला रिक्षेत बसवून देते.”
“वय काय ग! जेमतेम सत्तरीला आलोय. मी अजून तरुणच आहे.”
मुक्ता हसली.
” माझा मुलगा विशाल घ्यायला येतोय. मेन गेटपर्यंत मला सोड.”
मेन गेटला आप्पांचा मुलगा विशाल त्यांना घ्यायला आला होता.मुक्ताने आप्पांची बॅग विशालच्या हातात दिली.
“प्लिज टेक केअर ऑफ हिम. गाडीत ते जरा अस्वस्थ झाले होते. बी पी थोडं वाढलं होतं. नाऊ ही इज नॉर्मल.”
“थँक्स! आपण?”
“विशाल,ही मुक्ता! माझी खूप काळजी घेतली हिने प्रवासात.” आप्पा कौतुकाने मुक्ताकडे बघत म्हणाले.
“ओह! थँक्स अ लॉट.”
मुक्ताने त्या दोघांना बाय केलं आणि रिक्षाला हात दाखवला.
घरी आल्यावर मुक्ताने आईला आप्पांबद्दल सगळं सांगितलं.मुक्ताला येऊन चार दिवस झाले आणि आप्पांचा फोन आला. त्यांच्या घरी येण्याचं आमंत्रण द्यायला! तिने आप्पांना फोन लावला,”आप्पा, मला लोकेशन पाठवायला सांगा. मी थोड्या वेळासाठी येऊन जाईन.”
मुक्ता आप्पांकडे आली. आप्पांचा नातू सर्वेश आणि मुक्ता, दोघेही एकाच प्रोफेशनमध्ये असल्यामुळे दोघांच्याही गप्पा रंगल्या. आप्पांना मनातून आनंदच झाला होता. मुक्ता आपल्या घरात सून म्हणून यावी,हे त्यांच्या मनात घोळतच होतं.
मुक्ता नागपुरला परतली,पण आप्पांनी सर्वेशजवळ विषय काढलाच. “सर्वेश,तुला मुक्ता कशी वाटली?”
“कशी म्हणजे? छान आहे.”
“ती माझी नातसून व्हावी अशी माझी इच्छा आहे.तू कोणी बघून तर नाही ठेवली न?”
“आप्पा, आय एम सिंगल. पण मुक्ता अँबिशस नाहीय. माझं माझ्या प्रोफेशनवर प्रेम आहेच,पण मला पैसा पण मिळवायचा आहे. तिच्या बोलण्यावरून तिचे प्लॅन्स खूप वेगळे आहेत असं दिसलं. वूई आर पोल्स अपार्ट.”
आत्ताच्या पिढीला विचार स्वातंत्र्य आहे, मुलं परखडपणे आपली मतं मांडतात,हे आप्पांना माहिती होतं. त्यांनी तो विषय तिथेच थांबवला. पण मुक्ताला कधीतरी फोन करून तिच्याशी ते बोलत. नंतर ते कमी कमी होत गेलं…
……..
मुक्ता एअरपोर्टवर आली. चेकिंग केलं आणि आत बसली. एका सेमिनारसाठी बंगलोरला निघाली होती. मोबाईल बघत बसली होती,इतक्यात तिला गलका ऐकू आला. तिने बघितलं तर एका ठिकाणी माणसं जमली होती. मुक्ता गर्दीजवळ आली तर तिला आप्पा दिसले. त्यांना घाम फुटला होता,धाप लागली होती. त्यांच्या बरोबर सर्वेशचे आई-वडील होते. तिने झटकन आप्पांची नाडी बघितली. हार्ट बिट्स नॉर्मल होते. “मुक्ता,तू?” विशाल मुक्ताकडे बघत म्हणाला.
“काका,डोन्ट वरी. शुगर लो झाली असावी.”
“पण त्यांची आजची सगळी औषध मी दिली आहेत.”
“हं,तरी असं होतं कधीतरी. सर्वेशला फोन करून कन्सल्ट करा.”
“आम्ही तिघेही सर्वेशकडेच निघालोय. तो बंगलोरला असतो. त्याला फोन लावतो.”
विशालने सर्वेशला फोन लावला,तोवर आप्पांनी डोळे उघडले.
समोर मुक्ताला बघून त्यांना गहिवरून आलं.”हा कसला योगायोग ग मुक्ता? आज इतक्या वर्षांनी तू भेटते आहेस,पण पहिल्यांदा प्रवासात भेटली होतीस,तशीच आजही! मी पेशंट आणि तू डॉक्टर म्हणून!”
“आप्पा, रिलॅक्स! आपण नंतर बोलू.”
“तुझा नंबर विशालला दे. तुझ्याशी नंतर फोनवर बोलतो.” आप्पा मुक्ताचा हात धरत म्हणाले.
सेमिनार झालं आणि मुक्ता हॉटेलवर परतली. फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये जाणार इतक्यात मोबाईलची रिंग आली.
“हॅलो,डॉक्टर मुक्ता शेवडे हिअर.”
“मुक्ता, आप्पा बोलतोय!”
“आप्पा,कसे आहात? तब्येत ठीक आहे न?”
“हो ग,तुला भेटून तुझ्याशी खूप बोलावसं वाटत होतं, पण आता ते शक्य नाहीय. तू कशी आहेस? कुठे असतेस? लग्न केलं का?”
“आप्पा,किती प्रश्न!” मुक्ता हसत म्हणाली. “मी मजेत आहे. मी बालरोगतज्ज्ञ आहे. माझे मिस्टर एम डी मेडिसिन आहे. आम्ही नागपुरला असतो. पुण्यात काम होतं. तिथून इथे बंगलोरला सेमिनारसाठी यायचं होतं. आम्ही दोघे पंधरा दिवस नागपुरला आणि पंधरा दिवस मेळघाटला असतो. कुपोषित मुलं आणि तिथल्या लोकांसाठी मोफत सेवा देतो. सर्वेश कसा आहे? त्याची बायको आणि तो इथे बंगलोरला असतात का?”
आप्पांना सर्वेशचं बोलणं आठवलं. मुक्ताचे विचार त्याला पटले नव्हते. पैसा कमावण्यासाठी तो डॉक्टर झाला होता. पण….
“सर्वेश ठीक आहे.”
“त्याची स्वप्न पूर्ण झाली नं? तो खूप महत्वाकांक्षी आहे. त्याचे विचार,त्याचे प्लॅन्स त्याने मला सांगितले होते.”
“मोठं हॉस्पिटल बांधायचं स्वप्न पूर्ण झालं. पैसा अमाप मिळतोय पण संसारसुख नाही. महत्वाकांक्षी बायको हवी होती, ती केली. स्त्रीरोगतज्ज्ञ होती. सर्वेशसारखीच. पैशाच्या मागे धावणारी. पण दोघांची मनं जुळली नाही. खटके उडायला लागले. तीन वर्षात दोघेही वेगळे झाले. इथे आम्हाला करमत नाही म्हणून पुण्यात राहतो. अधून मधून इथे येतो. जवळपास दहा वर्षांनी तुला मी पेशंट म्हणून परत भेटावं हा योगायोगच. मी काय ग,पिकलं पान! आता आयुष्यात काही रस वाटत नाही . तू माझी नातसून झाली असती तर चांगला ठणठणीत राहिलो असतो बघ!”
“आप्पा,असं का बोलताय? आत्ता देखील तुम्ही ठणठणीतच आहात. मला केव्हाही फोन करत जा आणि तब्येतीची काळजी घ्या. योग असेल तर परत आपण भेटूच!”
“तो योग आता तूच आण मुक्ता. पुण्यात आलीस की मला भेटत जा.”
“हो आप्पा नक्की!”
मुक्ताने मोबाईल बंद केला. आप्पा परत डोळ्यासमोर आले आणि डोळ्यांच्या कडा ओलावल्या…
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे