दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)

शिक्षा… प्रियदर्शिनी अंबिके.

शिक्षा…..!

प्रियदर्शिनी अंबिके.

आई गेली….

फोनवर हे शब्द कानावर पडले, आणि गौरीच्या हातापायातली ताकदच गेली. कॉलेजच्या staffroom मध्ये आपण उभ्या आहोत याचेही तिला भान राहिले नाही. हातातून फोन गळून पडला आणि ती जमिनीवर कोसळली. हजर असलेल्या इतर प्राध्यापक मंडळींची नुसती पळापळ झाली. तिला पाणी देऊन खुर्चीवर बसवलं सर्वांनी, पण गौरी भानावर नव्हती. “देवाने माझे ऐकले नाही. निदान वर्ष तरी दे मला पापक्षालन करायला. इतकच मागितलं होत ना मी? तेवढही दिलं नाहीस तू देवा…”

गौरी काय बडबडते आहे ते कुणालाच कळत नव्हते. पण तिला जबरदस्त शॉक बसलाय हे मात्र सर्वांच्या लक्षात आले.

८०वर्षांची, मुलींची लग्नं, नातवंडे सुद्धा मोठी झालेली, नवरा दहा वर्षापूर्वीच स्वर्गवासी झालेली गौरीची आई. मातृ विरहाचे दुःख फारच अवघड. पण तरी देखील एरवी इतक्या प्रॅक्टिकल स्वभावाच्या आणि happy go lucky वाटणाऱ्या गौरीने इतका शॉक घेतलेला बघून तिच्या सहकाऱ्यांना पण जरा आश्चर्यच वाटले.

नीता मॅडमनी पटकन फोन करून गौरीच्या नवऱ्याला, गिरीशला बोलावले. तो देखील गौरीला आणायलाच निघाला होता. गिरीश आला आणि तो देखील गौरीची अवस्था बघून चमकला. थोड्याशा नाराजीनेच त्याने गौरीला समजावले. “अग, आईच आता म्हणत नव्हती का, की आता हिंडती फिरती आहे तोवर मला आता मरण येऊ देत. झाला माझा संसार…. तिच्या मनासारखे झालंय ना? मग तू ही समजून घ्यायला हवेस ना?”

रस्त्यात गिरीश बोलत होता. पण गौरीचे लक्षच नव्हते. आयुष्यभर वडिलांचे आजारपण आणि त्यामुळे त्यांचां तिरसट पणा झेलणारी आई, ऐन तारुण्यात असलेला स्वतःचा मुलगा अपघातात गमावलेली आई, संधिवात सारख्या दुखण्यात सर्व कामे करणारी माझी आई, त्या काळी हॉस्टेलवर राहून graduate झालेली, पण तरी नवऱ्याच्या पुरुषी अहंकारामुळे नोकरी न करू शकलेली आई… आणि त्यांच्याच आजारपणामुळे घरातल्या सततच्या आर्थिक तणावात देखील मुलांना सुखाचा घास देणारी आई…… आपल्या मुलांसोबत आपल्या पुतण्यांना पण आईचे प्रेम देऊन वाढवणारी माझी आई, आणि मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आठवणींचे ते शहर सोडून दुसऱ्या गावात येऊन नोकरी करणारी माझी आई…….!

आयुष्यात कधीही कर्मकांडाचा बाऊ न करणारी माझी आई, कधी ही कुणा बद्दल वाईट न बोललेली माझी आई, कुणाशी कधीच भांडणं नसलेली माझी आई, आणि कितीही वाईट परिस्थिती आली, तरी आपला स्वाभिमान जपत कुणाही पुढे कधीच हात न पसरलेली माझी आई…….

मधमाशीच्या पोळ्यावर दगड बसला होता आणि आठवणींच्या माशा मेंदूवर हल्ला करत होत्या. त्यांच्या डंखांच्या वेदना डोळ्यां वाटे पाझरत होत्या.

गौरी आईच्या चाळीशीत तिला झालेली. नऊवारी नेसलेल्या तिच्या आईला अनेकदा अनोळखी लोक तिची आजी समजत आणि मग गौरी आईवर चिडत असे.

“निदान पाचवारी तरी नेसत जा की,” गौरीचा आग्रह.

मग आईने शेवटी पाचवारी नेसणे चालू केले. वडील गेल्यानंतर आईने गौरीच्या गावात बिऱ्हाड केले. गौरीची नोकरी आणि लहान मुले म्हणून आईने कितीदा बोलावले तरी गौरी तिच्याकडे जात नसे. मग आई बरेचदा तिच्याकडे राहायला येत असे. आई तेव्हा सत्तरीच्या पुढे होती. तिची जपमाळ, तिच्या वस्तू ती स्वतःभोवती मांडून बसे. घर लहान आणि हा पसारा. मग गौरीची चिडचिड चालू. “बाहेरच्या खोलीत काय ग पसारा घालतेस ? हवे असेल तेवढेच पिशवीतून काढ ”

७० वर्षांच्या गरजा तिशितल्या गौरीला कळतच नसत. घरातले आणि नोकरीतले तणाव, मुलांच्या अभ्यास व इतर गोष्टीत कमी देता येणारा वेळ, यात आई देखील तितकीच महत्त्वाची आहे, हे लक्षातच घेतले नाही कधी गौरीने. आईला हळुहळू ऐकुही कमी येऊ लागले होते. मग तर तिच्याशी संवादच थांबला होता. अन्न वस्त्र निवारा या पलीकडेही आईला आपल्या साथीची गरज असू शकते हे तिच्या लक्षात येत नव्हते.

तशातच चार महिन्यापूर्वी गौरीच्या कॉलेजची सहल मुरुडला गेली. एका guesthouse मध्ये शिक्षकांची राहायची सोय केलेली होती. सकाळी उठून गौरी आवारात फिरत असताना तिला एका अत्यंत वृद्ध म्हातारीला एक माणूस पाठुंगळी घेऊन गेटमधून आत येताना दिसला. पाठीवरचे गाठोडे मागच्या खोपटात ठेवून तो पळत गौरीकडे आला. Guesthouse चां caretaker होता तो. दामू….

“आई आहे माझी. रोज सकाळी समुद्रावर जायची सवय होती तिला. आता पाय थकले ,डोळे अधू झाले, म्हणून जाता येत नाही. म्हणून पाठीवर घेऊन फिरवून आणतो. खूप आनंद होतो तिला या छोट्याशा गोष्टीने.”

गौरीला आईची आठवण झाली. जणू कुणी खाडकन मुस्काटात मारली होती तिच्या. दिवसभर नकळत तिचे डोळे दामू आणि त्याच्या आईला शोधत होते. सर्व स्टाफ ची अगदी बडदास्त ठेवली होती दामुने. पण तरीही त्याची आईसाठी चालू असलेली कामे पण ती बघत होती. अपराधीपणाच्या लाटा गौरीच्या अंगावर कोसळू लागल्या. एका अशिक्षित गडी जे करतोय,.ते… आपण मारे PhD ची पदवी मिरवणाऱ्या…. आपण करत नाही. काय उपयोग आहे? एका मुलीचे कर्तव्य आपल्याला पार पाडता येत नाही.

गौरी परत आली ती आईला आता प्रथम priority ला ठेवायचे हे ठरवूनच. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजमधून आल्यावर आईला म्हणाली… “आई, चल,पत्ते खेळू या ?” आईचा तो आनंदी चेहरा … गौरीने आईला घट्ट मिठी मारली. आणि ती रडू लागली. “माझे चुकले ग आई. आता मी तुला वेळ देईन नक्की”

खूप आनंदात गेले आठ दिवस. आणि आईचा किरकोळ ताप एकदम सीरियस दुखणे झाला, आणि तिला ICU मध्ये हलवावे लागले. दोन दिवस ICU च्या बाहेर बसून गौरी देवाला विनवणी करत होती….” निदान एक वर्ष दे. मला आईला खूप सुख द्यायचंय” तिसऱ्या दिवशी आई stable असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि गौरीला देवाने आपली प्रार्थना ऐकली असे वाटले. आज खूप आनंदात ती कॉलेजला आली होती. आईसाठी आता काय काय करायचे हे सगळे तिनी ठरवले होते…..

गाडी थांबली तेंव्हा हॉस्पिटल आलेले होते. आईला आत जाऊन पाहायचे धारिष्ट्य गौरीच्या अंगात नव्हते. ती बाहेरच बाकड्यावर बसून राहिली. ICU च्या सिस्टर तिच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या “,

“तुम्हीच गौरी ना… तुमच्या आई सकाळी बोलल्या माझ्याशी. म्हणाल्या की माझी गौरी फार गुणी आहे. तुमच्या आई फार पुण्यवान हो… गेल्या तेव्हा जप करत होत्या.” गौरीला आता तिचा हंबरडा थांबवता येईना…. आता देवाजवळ तिचे एकच मागणे होते. पुढच्या जन्मी तिला याच आईच्या पोटी यायचे होते. तिला खात्री होती. देव न्याय करतो. तिच्या अपराधाची शिक्षा तिला मिळाली होती. आता पुढला जन्म तिला याच आईच्या पोटी मिळणार होता.

प्रियदर्शिनी अंबिके.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}