देश विदेशमंथन (विचार)

आनंद व आवड विभावरी कुलकर्णी,पुणे. मेडिटेशन,हिलींग मास्टर. समुपदेशक.

आनंद व आवड

आनंद हा आपल्या मानसिकतेतून येतो. आतून येतो. आनंद हा कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसतो. जर कोणत्या कृत्रिम गोष्टीमुळे आनंद होत असेल तर तो फारसा टिकत नाही. मग प्रत्येक वेळी आनंदासाठी वेगळी गोष्ट शोधावी लागते. हा खरा आनंद असतो का? आनंद हा मोठ्या गोष्टीवर अवलंबून नसतो. आपण जर छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवायचा ठरवले आणि तसा मिळवायला शिकलो तर आपल्या सारखे आनंदी आपणच.

ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती गोष्ट आवडू लागते. पण तरीही आनंद व आवड यात फरक असतो. आवडीची गोष्ट सतत करायला लागली तर त्यातून मिळणारा आनंद कमी होतो.
उदा. मला पुस्तक वाचायला आवडते. पुस्तक वाचल्यावर त्यातून आनंदही मिळतो. ते वाचून झाल्यावर पुढे काय? दुसरे पुस्तक वाचावे लागते. आणि ते पुस्तक पाठ्य पुस्तक असेल आणि परीक्षेसाठी वाचायचे असेल तर? मिळणारा आनंद कसा असेल? त्यात कुठेतरी ताण येईल. मग वाचनाची आवड कायम तशीच राहील का?
म्हणजे आवडीतून मिळणारा आनंद कायम स्वरुपी राहील का? म्हणजे आनंद आवडीवर अवलंबून आहे का?

मग आनंद कसा मिळवावा?
कुठे शोधावा?
आनंदी मन असेल तर आपल्यावर चांगले परिणाम होतात. आपल्या भोवताली आनंदाची स्पंदने निर्माण होतात. आणि आकर्षणाच्या नियमा प्रमाणे आनंद आपल्याकडे येतो. आनंदी व्यक्ती सर्वांना आवडते. आणि आनंदी असणाऱ्या व्यक्तीला पण छान वाटते. आनंद कुठे कुठे व कशातून मिळतो हे आपण बघू.

▪️ सकाळी झोपेतून जाग आल्यावर डोळे उघडले. ( आजचा दिवस दाखवला,मी जिवंत आहे.याचा आनंद)
▪️ बेड वरून उठून उभे राहिलो. ( माझे सगळे अवयव व्यवस्थित आहेत… आनंद )
▪️ मस्त गरम गरम चहा स्वतःच्या हाताने करून प्याले. ( माझे स्वातंत्र्य. आणि मना सारखा चहा… आनंद)
▪️ झाडाला फुल आलेले दिसले. ( फूल उमलणे व डोळे शाबूत आहेत… आनंद)
▪️ सकाळी सकाळी पोट साफ झाले. ( तब्येत,पचनशक्ती नीट आहे… आनंद)
▪️ अंघोळ केली. ( सिझन प्रमाणे गरम/गार पाणी घेता आले. शरीर प्रफुल्लित झाले… आनंद)
▪️ देवाची पूजा केली. दिवा लावला.सुगंधी धूप लावला. ( आनंद, ज्या दिवशी देवाची वस्त्रे,आसन बदलतो,दागिने बदलतो त्या दिवशी तर आनंदी आनंद)
▪️ स्वयंपाक केला. ( स्वातंत्र्य आणि खाऊ घालण्याचा आनंद )
▪️ पोळी मस्त फुगली.
▪️ गवताचा पायाला स्पर्श झाला.
▪️ शेजारून जाणाऱ्या बाईच्या कडेवरील बाळ आपल्या कडे बघून हसले.
▪️ मस्त वाऱ्याची झुळूक आली.
▪️ रात्री झोप लागली.
▪️ मैत्रिणीचा फोन आला.
▪️ बाहेर जायचे ठरले.
▪️ सगळे बाहेर गेले.एकटीच घरात आहे.
▪️ कपाट आवरले.

असे खूप क्षण असतात जे आपल्याला आनंद देतात. असेच छोटे छोटे आनंद वेचून दिवस आनंदी करु या.

✍️ विभावरी कुलकर्णी,पुणे.
मेडिटेशन,हिलींग मास्टर. समुपदेशक.
१८/१/२०२४.
📱८०८७८१०१९७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}