दुर्गाशक्तीमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

*अंधारात केलेले भोजन * Heartfulness Meditation💌 मराठी अनुवाद टीम, हार्टफुलनेस नाशिक.

आज पर्यंत मी खूप पोस्ट टाकल्या आहेत. पण ही पोस्ट मात्र खरच खूपच वेगळी आहे.
*अंधारात केलेले भोजन *

कृपया ही सत्यकथा, तुम्ही आज डोळे बंद करण्यापूर्वी पूर्णपणे वाचा व उद्या सकाळी डोळे उघडा. कुणाचा तरी विस्मयकारक अनुभव इथे शेअर केला जात आहे.

एकदा मी एका केंद्रात अंध लोकांसाठी निधी उभारण्याच्या कार्यक्रमात भाग घेतला होता.

नेहमीप्रमाणे शुक्रवारची संध्याकाळ असल्याने मी प्रथम कार्यक्रमास उपस्थित न राहण्याचा विचार केला. कार्यक्रमात कंटाळा येऊ शकतो म्हणून, त्याऐवजी दुसरे काहीतरी करून ती संध्याकाळ आरामात घालवण्यासंबंधी विचार करू लागलो.

पण घरात मी एकटा असल्याने, वेळ जाणे कठीण होते म्हणून मी हे आमंत्रण स्वीकारले आणि त्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली.

जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा जवळपास ४० जण त्या ठिकाणी उपस्थित होते. सुरुवातीला आम्हाला अंध लोकांसाठी असलेल्या केंद्राचा व्हिडिओ दाखवण्यात आला. हा १५ मिनिटांचा एक छोटासा व्हिडिओ होता आणि जीवनाच्या विविध क्षेत्रातील लोक निरपेक्ष भावनेने या अंध लोकांना मदत करण्यासाठी आपला वेळ कसा देतात, हे बघणे खूपच प्रेरणादायी होते.

व्हिडिओ संपल्या नंतर, आम्ही सर्व एका हॉलमध्ये जमलो आणि आम्हाला पुढील कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यात आली.

पुढील कार्यक्रमाची रुपरेखा होती “अंधारातील भोजन”.

आणि ही घटना अत्यंत प्रेरणादायी आणि सर्वांना सांगण्याजोगी ठरली…

ह्याचा अर्थ असा होता की
आम्ही ४० जण एका पूर्ण अंधाऱ्या खोलीत, जेवणार होतो!

पुढील दोन तासांचे आयोजन व नियोजन, पूर्णपणे दृष्टिहीन असलेल्या तीन तरुण व्यक्तींनी केले होते.

त्यामधे एक मुलगी होती, जी या कार्यक्रमाचे नेतृत्व करत होती. आणि दोन मुले तिला सहाय्य करत होते – अशा प्रकारे तीन अंध स्वयंसेवकांची एक टीम तयार केली होती.

अंध मुलीने प्रथम आम्हाला खाण्यासंबंधित सूचना दिल्या. (त्या सूचना अशा होत्या, ज्या अंध लोक त्यांचे जीवन सोपे करण्यासाठी, प्रत्यक्षात वापरतात).

1. जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणाच्या टेबलाजवळ बसाल, तेव्हा टेबलावर काही गोष्टी खालीलप्रमाणे मांडल्या जातील :
तुमच्या ताटा मधे,
घड्याळात ज्या ठिकाणी ३ हा आकडा असतो त्या ठिकाणी तुम्हाला एक चमचा मिळेल;
९ आकड्याच्या जागी: काटा;
१२ आकड्याच्या जागी: वाटी;
२ आकड्याच्या जागी: रिकामा पेला;
ताटाच्या मध्यभागी ६ आकड्याच्या जागी, पेपर नैपकिन ठेवलेला असेल.

2. दोन मोठे जग तुम्हाला दिले जातील. सपाट पृष्ठभाग असलेल्या जगमध्ये पाणी असेल आणि खडबडीत पृष्ठभाग असलेल्या जग मध्ये संत्र्याचा रस असेल.

3. जेव्हा तो जग तुमच्याकडे तेव्हां तुमच्या पसंतीचे पेय तुम्हाला ग्लासमध्ये ओतावे लागेल. तुम्हाला तुमची तर्जनी त्यामध्ये बुडवावी लागेल, जेणेकरुन तुमचा ग्लास भरला आहे किंवा नाही हे तुम्हाला तुमच्या बोटाने जाणवेल आणि तुम्ही ग्लास भरणे थांबवू शकाल.

हे सर्वांना समजले का, असे तिने आम्हाला विचारले.

सर्वजण हो म्हणाले परंतु सगळे गोंधळलेले होते व तिने सांगितलेल्या सर्व सूचना लक्षात ठेवण्याचा आणि एकमेकांशी चर्चा करून त्याची पुष्टी करण्याचा प्रयत्न करीत होते.

आमचा पुढचा दीड तास मजेत आणि काहीतरी नवीन शिकण्यात खर्च झाला. एका पूर्ण अंधाऱ्या खोलीत जेथे आम्हाला काहीही दिसत नव्हते, तिथे आम्ही विविध प्रकारच्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद, त्यांना न बघताच घेत होतो!

तर पहिल्यांदा, आम्हा सर्व चाळीस जणांच्या समूहाला एका अंधाऱ्या खोलीत नेण्यात आले. प्रत्येकाला एका अंध व्यक्तीकडून खुर्चीवर बसेपर्यंत मार्गदर्शन केले गेले. आम्हाला ते जरा विचित्र वाटले, कारण प्रत्यक्षात आम्ही अंध लोकांना त्यांचा मार्ग दाखवण्यास मदत करायला हवी होती.

आम्हाला या तीन अंध लोकांच्या टीमने पूर्ण पंचपक्वान्नाचे जेवण दिले… स्वागत पेय, क्षुधावर्धक पदार्थ, सलॅड, मुख्य जेवण आणि शेवटी मिष्टान्न!

आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे ही तीन अंध लोकांची टीम खोलीत वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्या शाकाहारी लोकांना बरोब्बर शाकाहारी पदार्थच वाढत होते!

ऑनलाइन नोंदणी करताना, आम्हाला “शाकाहारी” किंवा “मांसाहारी” यापैकी एक निवडण्यास सांगितले होते. मी शाकाहारी असल्यामुळे, शाकाहारी भोजन निवडले होते. आम्हाला जेवताना इतके व्यवस्थित वाढले जात होते की आम्हाला जेवणा दरम्यान पुढच्या पदार्थासाठी थांबण्याची गरज भासली नाही. आम्ही एक पदार्थ संपवेपर्यंत विलंब न करता पुढचा पदार्थ वाढला जात होता.

सुमारे दीड तास अंधारात जेवल्यानंतर, त्यांच्या टीम प्रमुखाने सर्वांचे जेवण पूर्ण झाले का हे विचारले. खात्री झाल्यावर तिने भोजनगृहातले दिवे लावले व आम्ही आता उठू शकतो असे सांगितले.

थोडा वेळ आमच्यापैकी कोणीही तिथून हलू शकले नाही. आम्ही सगळेजण चौफेर दृष्टीने या खोलीत अचंब्याने बघत होतो. मग आम्ही उठलो आणि सावकाशपणे त्या टीमचे मनापासून आभार मानून निघालो. भोजनगृह सोडताना आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते परंतु आता आमची स्वत:ची, जीवनाबद्दलची दृष्टी पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट झाली होती.

आम्हाला जाणवले, की आम्ही किती भाग्यवान आहोत, कारण हे सुंदर जग पाहण्यासाठी आम्हाला सुंदर डोळ्यांची भेट मिळाली आहेत.

जगातील कोणत्याच गोष्टी त्यांना पाहता येत नसल्यामुळे, अंध लोकांचे (आणि इतर अपंगांचे) जीवन किती कठीण असते याची आम्हाला कल्पना आली.

फक्त दोनच तास, काहीही न दिसल्याने आम्ही किती अस्वस्थ झालो होतो आणि याच अवस्थेत ते आपले संपूर्ण आयुष्य कसे जगत असतील याची आम्हाला जाणीव झाली.

आम्ही किती भाग्यवान आहोत, याची आम्हाला जाणीव झाली आणि तरीसुद्धा, आपल्याकडे असलेल्या साध्या-सुध्या वाटणार्‍या गोष्टींचीसुद्धा आपल्याला किंमत नसते हे ही जाणवले! आपण सारखे रडत असतो (कधी बाह्यता जोराने तर कधी आतल्या आत) आणि आपल्याजवळ नसलेल्या गोष्टींच्या मागे आयुष्यभर धावत असतो… खरे तर आपल्याकडे जे आहे, ते पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आपण वेळच काढत नाही.

आनंदी रहा…

तुमचे डोळे कायमचे बंद होण्याआधी, आजच ते उघडा.

जे आपल्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर खूप प्रेम करा व त्यांच्या समोर आपले मन आजच मोकळे करा.

तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांबद्दलचे, तुमचे गैरसमज लवकर दूर करा.

या पृथ्वीवर जीवन जगण्यास स्वत:ला पात्र बनवा.

आपल्या जीवनाचे ध्येय आपल्या डोळ्यांनी पहात साकार करा.

♾ ️

“आपण ज्या गोष्टींबद्दल नेहमीच तक्रार करत असतो, त्या गोष्टींमुळे आपला आंतरिक स्वभाव बदलतो. आपल्याजवळ जे काही आहे, त्याबद्दल कृतज्ञ असण्याने आपण एक वेगळी ऊंची गाठू शकतो.”
दाजी

Heartfulness Meditation💌

मराठी अनुवाद टीम, हार्टफुलनेस नाशिक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}