देश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

स्वातंत्र्यवीर सावरकर: एक ध्यासपर्व डॉ. अभिजीत देशपांडे.

स्वातंत्र्यवीर सावरकर: एक ध्यासपर्व

✍🏻 डॉ. अभिजीत देशपांडे.

रणदीप हुड्डा अभिनित, लिखित आणि दिग्दर्शित “स्वातंत्र्यवीर सावरकर” हा सिनेमा बघितला आणि लहानपणापासून तपस्वी, ध्येयनिष्ठ, ऋषितुल्य सावरकरांच्या संबंधी वाचलेले साहित्य मनात रुंजी घालू लागले. मा. श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनी उच्चारलेले “सावरकर माने तप, सावरकर माने त्याग, सावरकर माने तर्क, सावरकर माने तेज, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने तिलमिलाहट…” हे अजरामर शब्द चित्ररूप घेऊन समोर फेर धरून नाचू लागले…
स्वा वीर सावरकर यांच्या सिनेमाविषयी बोलण्यापूर्वी त्यांचे चरित्र समजून घेणं आवश्यक आहे. त्यांचे जीवन हे अनेक अचाट, साहसी, नाट्यपूर्ण, वादळी घटनांनी भरलेले आहे. हे वादळ केवळ अडीच – तीन तासांत बंद होणारे नाही. सावरकरांच्या चरित्राला न्याय देण्यासाठी किमान तीन चित्रपटांची मालिका करणे योग्य हे माझं मत आहे. कारण, सावरकरांचा भगूर येथील जन्म, जन्मजात लाभलेली प्रखर बुद्धिमत्ता, साहसी वृत्ती आणि जाज्वल्य देशप्रेम, वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी घेतलेला स्वातंत्र्याचा वसा, मित्रमेळा या संघटनेची स्थापना, आणि त्या वेळेपासून सय्यद अहमद याने मांडलेल्या द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आणि त्याला पर्याय म्हणून सावरकरांनी मांडलेली अखंड भारताची संकल्पना, पुढे बुद्धिमत्ता आणि व्यासंग याच्या जोरावर मिळालेली शिष्यवृत्ती, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील शिक्षण, त्यावेळी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून लौकिक मिळवतानाच केलेलं प्रबोधनाचं, क्रांतिकार्य, “अभिनव भारत” संस्थेची स्थापना, विदेशी कपड्यांची भव्य होळी, लोकमान्य टिळकांच्या परीसस्पर्शाने विचारांत आणखी आलेली दृढता, विद्वत्तेच्या बळावर मिळालेली लंडन येथील शिक्षणाची “शिवाजी शिष्यवृत्ती” आणि लंडन येथे बॅरिस्टरी शिकत असतानाच “इंडिया हाऊस” मध्ये श्री श्यामजी कृष्ण वर्मा आणि मादाम कामा यांच्यासह केलेलं क्रांतिकार्य, अखंड प्रबोधन, इंग्लंड मध्ये शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी अंतर्बाह्य इंग्रज होऊ नयेत, त्यांचे कपडे, अन्न कोणतेही असले तरी विचारांनी ते भारतीयच राहावेत म्हणून केलेले प्रयत्न, क्रांतिकारकांचे नेटवर्क उभं करणे, “1857 चे स्वातंत्र्यसमर” या पुस्तकाचे लेखन, “लंडन वार्तापत्र” नावाने लंडन येथील समाचार भारतात प्रसारित करणे (एक प्रकारे पत्रकारिता करणे), कोणत्याही पाण्याने, अन्नाने, लस घेण्याने धर्म बाटत नसतो हे ठासून सांगणे, हिंदुंवर घातलेल्या सात प्रकारच्या बंदी (सागरबंदी, शुद्धिबंदी इत्यादी) झुगारून हिंदू धर्मात पुनः प्रवेश घडवून आणणे, मुलगा प्रभकरचा मृत्यू आणि त्याच्या आठवणीने कासावीस होणे, बॉम्ब तयार करण्याच्या विधीचे प्रशिक्षण घेणे, आपल्याला बॉम्ब तयार करता येतो म्हणून ब्रिटिश संसद उडवायची का असा सहकाऱ्यांचा आग्रह असताना असा अविचार योग्य नाही म्हणत पुढच्या क्रांतीची दिशा आखणे आणि त्यानुसार ही बॉम्ब बनवण्याची विधी भारतात आपल्या नेटवर्क मार्फत भारतातील क्रांतिकारकांपर्यंत पोचवणे, यादरम्यान त्यांच्या भावाला (बाबाराव सावरकरांना) काळया पाण्याची शिक्षा होणे, मदनलाल धिंग्रा, सेनापती बापट यांच्याशी असलेला स्नेह, त्यांच्या मनात क्रांतीची ज्वाला उत्पन्न करणे, त्यातून प्रेरित होऊन मदनलाल धिंग्रा यांच्याकडून कर्झन वाईली याचा वध करणे, उघडपणे मदनलाल धिंग्रा यांचे समर्थन करणे, त्यांना कोर्टात आपली बाजू मांडण्यासाठी निवेदन लिहून देणे (ज्याची प्रशंसा करताना विन्स्टन चर्चिल यांनी “हा आजचा इंग्लिश साहित्यातील सर्वोत्कृष्ट नमूना आहे” अशी केली होती) आणि त्यामुळे सावरकरांना अटक, त्यांना तेथील कायद्याप्रमाणे तीन वर्षांचीच शिक्षा प्रस्तावित असताना बेकायदेशीरपणे त्यांना भारतात पाठवून तिथे खटला चालवण्याचा निर्णय देणे, त्यातून सुटका करून घेण्यासाठी फ्रान्सच्या मार्सेलीस बंदराजवळ मारलेली अत्यंत धाडसी, जीवावर बेतणारी, आणि त्रिखंडात गाजलेली उडी, भारतात अन्यायपूर्ण पद्धतीने त्यांना काळया पाण्याची दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावणे, अंदमानात झालेले भयंकर, कल्पनातीत अत्याचार, तेथील सकष्ट कारावासाची, यातनांनी भरलेली १३ वर्षे, इतक्या कल्पनातीत यातना (दंडाबेडी, खोडाबेडी, खडीबेडी) भोगत असतानासुद्धा तुरुंगात त्यांनी केलेलं साक्षरतेचे कार्य, तुरुंगात आपलं नेटवर्क उभं करणं, तुरुंगातील सक्तीच्या धर्मांतराला पर्याय म्हणून बाटलेल्या कैद्यांना शुद्ध करून पुन्हा हिंदू करून घेणे, कारागृहात असताना स्फुरलेलं महाकाव्य, ते नखांच्या साह्याने भिंतीवर लिहिणे, ते मिटवल्यानंतरही मुखोद्गत करणे (ज्याप्रमाणे वेद मुखोद्गत करून हस्तांतरित झाले होते त्याचाच हा जिवंत आविष्कार), तुरुंगात असतानाच काव्यरचनेचे स्वतःचे “वैनायक वृत्त” सिद्ध करणे (म्हणजे इतक्या हाल अपेष्टा सहन करताना सुद्धा त्यांच्यातील नवनिर्माणाची, सकारात्मकतेची ऊर्जा अक्षय्य होती), ज्या माफिपत्रांची टिंगल होते, ते माफिपत्र नसून प्रत्येक कैद्याचा अधिकार आहे आणि त्यांनी स्वतःला वगळून शेकडो इतर कैद्यांची सुटका करवली होती हे ही लक्षात घेण्यासारखे आहे, आपण गावस्कर, तेंडुलकरचे दहा हजार धावांचा उत्सव साजरा करतो, पण सावरकर बंधूंनी तब्बल १०००० दिवसांहून अधिक काळ अंदमानातील काळया पाण्यात व्यतीत केला होता आणि हा विश्वविक्रम आजही अबाधित आहे, याबद्दल दुर्दैवाने कोणीही बोलत नाही… सावरकरांनंतर दुसरा क्रमांक ज्या कैद्याचा (त्यानिमित्ताने सांगता येईल की “क्रमांक” हा शब्द आणि यासारख्या असंख्य इंग्रजी शब्दांना चपखल असे मराठी प्रतिशब्द हे सावरकरांनीच मराठी भाषेला बहाल केलेले आहेत) येतो त्याने २००० दिवस येथे काढले आहेत यावरून त्यांची दृढता लक्षात यावी. एकाच अंदमान तुरुंगात त्यांचे ज्येष्ठ बंधू गणेश उपाख्य बाबाराव सावरकर यांनाही ठेवण्यात आलं होतं (दोन सख्ख्या बंधूंना एकाच वेळी काळया पाण्याची शिक्षा होणे ही स्वातंत्र्य इतिहासातील एकमेव घटना… पण याचा दुर्दैवाने किंवा मुद्दाम ठरवून म्हणा, कुठेही उल्लेख सापडत नाही), पण एकाच तुरुंगात असूनही या दोन भावांची प्रत्यक्ष भेट तब्बल नऊ वर्षे होऊ दिली नव्हती.
अंदमानपर्वानंतरचे रत्नागिरीपर्व हे ही तितकेच दैदिप्यमान आहे.
रत्नागिरीतील सशर्त स्थानबद्धतेच्या काळात अनेक बंधने असूनही सावरकरांनी छुप्या पद्धतीने क्रांतिकारकांना मदत पुरवली होती, त्यांच्यासंबंधी रत्नागिरीच्या कलेक्टर ने report दिलेला होता की हा माणूस कधीही सुधारणार नाही… याची शिक्षा वाढवा… आणि मग त्यांची शिक्षा वाढत असे… त्यांना वकिली करण्यास बंदी, रत्नागिरीबाहेर जाण्यास बंदी, नोकरी करण्यास बंदी असल्यामुळे त्यांना चरितार्थासाठी लहान भाऊ डॉ नारायण यांच्यावर अवलंबून राहावे लागत असे. ते डॉ असले तरी त्यांच्यावर इंग्रजांची करडी नजर असल्याने पेशंट येत नसत… त्यांचीही आबाळ होत असे. त्यामुळे सरकारमान्य निर्वाह भत्ता (पेन्शन नाही, निर्वाह भत्ता), जो कैद्याचा अधिकार आहे जो त्यावेळी दरमहा ₹१२०/- होता, त्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केला, पण त्यांना केवळ ₹६०/- मंजूर करण्यात आला… गांधीजी ₹१२०/- भत्ता घेत असत….
याचदरम्यान त्यांनी रत्नागिरीत साक्षरतेचे कार्य केलं, अस्पृश्यता निवारण केलं, दलितांना मंदिर प्रवेश, सहभोजन, पतीत पावन मंदीर निर्मिती, तेथे ब्राम्हणेतर पुजारी नेमेणे (यापूर्वी रामदास स्वामींनी देखील त्यांनी स्थापन केलेल्या मठांत असेच प्रयोग केले होते) अश्या असंख्य सामाजिक सुधारणा त्यांनी केल्या, बाटवून इच्छेविरुद्ध धर्मांतर केलेल्यांची घरवापसी घडवून आणली…
तेथे त्यांना अनेक लोक भेटायला येत, मार्गदर्शन घ्यायला येत… त्यात गांधीजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, हेडगेवार, गोळवलकर गुरुजी इत्यादी अनेक लोक होते…
स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसने त्यांचा इंग्रजांनी केला त्याहून अधिक छळ केला… त्यांना वेळोवेळी खोट्या आरोपांखाली तुरुंगात डांबलं… गांधी हत्येचे आरोप झाले, दंगलीत हजारो ब्राम्हणांसोबत त्यांच्या लहान भावाला जमावाने दगडाने ठेचून ठार मारले… तरीही त्यांनी कधीही सरकार विरोधात ब्र काढला नाही… विधायक मार्गाने ते लढत राहिले… शेवटी त्यांनी प्रयोपवेशन (उपवास) करून शांतचित्ताने आपला देह ठेवला…

ही त्यांची जीवनगाथा झाली… इतका मोठा पट अडीच – तीन तासांत दाखवणे केवळ अशक्य आहे…
मग हा सिनेमा कसा आहे.. ??
सिनेमाची सुरुवातच भयंकर प्लेगच्या साथीने होते… काही क्षण कोरोना काळ आठवला… पण पुढे त्यातील इंग्रजांचे क्रौर्य, देहांची विटंबना बघून अंगावर काटा येतो… पुढे पुढे सावरकरांच्या आयुष्यातील घटना वेगाने पुढे येत राहतात… प्रॉब्लेम हा आहे की वेळ थोडा असल्याने या प्रत्येक घटनेतील नाट्य फुलण्यापूर्वीच दुसरं नाट्य आरंभ झालेलं असतं… तरीही हा सिनेमा सावरकरांचे वादळी व्यक्तिमत्त्व त्यांचे काळाच्या पुढचे विचार, विचारांची स्पष्टता आणि दृढता यांवर प्रकाश टाकण्यात यशस्वी झाला आहे, हिंदुत्व म्हणजे काय, हिंदू म्हणजे काय? मातृभू, पितृभू, पुण्यभू म्हणजे काय? कोणतेही साधन नसताना घरवापासी (मी धर्मांतर म्हणत नाहीये… घरवपासी… पुन्हा आपल्याच धर्मात परतणे हे सांगायचं आहे) कशी करावी? “धर्म बाटणे” याविषयी असणाऱ्या गैरसमजूती आणि त्यावरील सावरकरभाष्य यांवर यात पुरेसा प्रकाश टाकलेला आहे… काही गोष्टी यात निसटल्या आहेत, त्यावर लिहिणे मला क्रमप्राप्त वाटते… विशेषतः सावरकरांची मार्सेलीस बंदरातील विक्रमी उडी… याचे महत्त्व फार फार मोठे आहे… सिनेमात दाखवली तितकी ही खिडकी मोठी नव्हती… आधीच कृश असलेले सावरकर त्यातून बाहेर पडताना त्यांचे संपूर्ण शरीर सोलवटून निघाले होते, रक्तबंबाळ झाले होते… त्यात त्या खाडीत मोठमोठे खडक होते… खडकावर उडी पडली असता कपाळमोक्ष ठरलेला होता, शिवाय शार्क मोठ्या प्रमाणात होते, त्यांचे भक्ष्य बनण्याचा धोका होताच, त्यातही गोळीबार करणारे सैनिक होते… इतकं करून सावरकर फ्रान्स मध्ये पोचले खरे, पण तेथील शिपायांना लाच देऊन इंग्रज सैनिक त्यांना बळजबरी घेऊन गेले (अंग सोलवटून निघाल्याचा, इंग्रजांनी लाच दिल्याचा भाग वगळलेला आहे). पुढे अंदमान बेटांवर पोचताच “येथे एक सागरी तळ उभारला पाहिजे” असा विचार सावरकरांच्या मनात येऊन गेला (त्यांची स्थितप्रज्ञता, देशाशी बांधिलकी पाहा… ) हाही भाग राहिला आहे… जेलमध्ये कैद्यांना समुद्राचे खारे पाणी अंघोळीला दिले जाते त्याने सावरकरांच्या शरीराचा दाह होतो आणि ते विरोध करतात… हा सीन सिनेमांत आहे.. पण मुळात आधी त्यांची त्वचा खरवडून निघाल्याने हा त्रास होतो हे समजण्यास आधी उडी मारताना त्यांचे अंग सोलवटून निघाल्याचा भाग दाखवला नाहीये त्यामुळे थोडी गडबड झाली आहे. त्याशिवाय, अंदमानात सावरकरांनी कैद्यांशी गुप्तपणे साधलेला संवाद, त्यांना साक्षर करणे, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र शिकवणे या गोष्टी पुरेशा दाखवल्या गेल्या नाहीत… त्याचप्रमाणे इंग्लंड मधून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य भारतात कसे पाठवले, त्यांच्या घरातील स्त्रियांचा या सर्व क्रांतीकार्यातील सहभाग याविषयी पुरेसं footage मिळालं नाही. त्याचप्रमाणे सावरकरांनी केलेली अद्वितीय साहित्यसेवा, मराठी वाङ्मयासाठी त्यांचे अतुलनीय योगदान, त्यांनी मराठी भाषेला बहाल केलेले मराठी प्रतिशब्द, त्यांची नाटके, विपुल ग्रंथसंपदा, त्यांच्या कसदार कविता, यातील कशाचाही उल्लेख नाही.. “ने मजसी ने” यातील काही ओळी या गद्य स्वरूपात बोलल्या जातात तितकंच….
मग सिनेमात काय आहे…? तर हा सिनेमा सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय देईल असा भव्य दिव्य आहे… उत्कृष्ट निर्मितीमूल्य, तांत्रिकदृष्ट्या अतिशय उच्च दर्जा, दर्जेदार कॅमेरावर्क, पार्श्वसंगीत, वेशभूषा, नेपथ्य सर्व काही भव्य दिव्य असंच आहे… जोडीला मुख्य कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट असाच आहे. रणदीप हुडा याने घेतलेली मेहनत खरेच कमाल आहे… वेळोवेळी त्याने बदललेली शरीरयष्टी, अंदमानात शिक्षा भोगून आलेल्या सावरकरांची कुपोषित देहयष्टी प्रत्यक्ष दाखवण्यासाठी खरेच फार निष्ठा लागते… तो methodical actor असल्याने त्याने भावाभिनय उत्कृष्ट केला आहे, पण मुद्राभिनय थोडा कच्चा आहे असं मला वाटून गेलं (प्रत्यक्ष सावरकरांच्या क्लिप्स उपलब्ध आहेत, त्यात त्यांची बोलण्याची हातवारे करण्याची, लिहिण्याची लकब दिसते… ती तशी पकडली गेली नाही असं माझं मत आहे… पण ही मिमिक्री वाटू नये म्हणून तशी लिबर्टी रणदीप ने घेतलेली असू शकते…), बाकी सर्व सहकलाकरांचा अभिनय सुद्धा उत्तम असाच आहे…
आता अवश्यंभावीपणे या सिनेमाची तुलना जुन्या (बाबूजी सुधीर फडके निर्मित) “वीर सावरकर” सिनेमाशी होणार हे नक्की… दोन्ही सिनेमांत काही उणीवा निश्चित आहेत, पण दोन्ही सिनेमांमधील प्रेरणा मात्र प्रामाणिक आहे हे मान्य करावे लागेल… जुना सिनेमा तुलनेने अधिक प्रवाही आहे, पण त्यात तपशील कमी आहेत असं माझं मत आहे. या सिनेमात अधिक तपशीलवार मांडणी आहे, पण त्यामुळे हा थोडा रेंगाळतो. असो, यातून माहिती मात्र पुष्कळ घेता येते… असे सिनेमे हे मनोरंजन म्हणून पाहायचे नसतात, प्रेरणा घेण्यासाठी – कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाहायचे असतात… त्यादृष्टीने हा सिनेमा एक “must watch” नक्की झाला आहे, असं मी म्हणेन… आपापल्या घरीतील नवीन पिढीला हा सिनेमा आवर्जून दाखवला पाहिजे यात दुमत नाही…! सावरकर हे ब्रिटिशांनी आपल्यावर लादलेले नेते नव्हते, ते अंतर्बाह्य भारतीयच होते, हे त्यांचं वेगळेपण इथे लक्षात घेतलं पाहिजे… सावरकर वीरच होते आणि राहणार, आणि यासाठी कोणत्याही डाव्या – उजव्या लेखक – इतिहासकारांच्या प्रशस्तीपत्राची यत्किंचितही आवश्यकता नाही असा सार्थ विश्वास या सिनेमाने दिला हे मात्र नक्की…!!!

✍🏻 डॉ. अभिजीत देशपांडे.

Related Articles

2 Comments

  1. I am running my pharmacy since 1996 at sahakar Nagar Pune. Name of my pharmacy is Garware Medicals and General Store.
    YOUR HEALTH IS OUR MOTTO.

  2. खूपच छान लेख आहे डॉ.. वाचताना तात्यारावांच्या स्लाईड शो बघितल्या सायखं वाटलं अगदी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}