मंथन (विचार)मनोरंजन

जाणीव 🌼 © दीपक तांबोळी

जाणीव 🌼

विनायक घरी आला तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजून गेले होते.माधवी त्याची वाटच बघत होती.
“आज बराच उशीर केलात यायला ”
माधवीने विचारलं
“हो.सध्या मंथ एंड आहे ना!त्यामुळे मिटिंगवर मिटिंग
सुरु आहेत ”
“बरं तुम्ही फ्रेश व्हा.तोपर्यंत मी जेवायला वाढते ”
तो फ्रेश होऊन येईपर्यंत माधवीने टेबलवर जेवणाची तयारी घेतली.विनायक खुर्चीवर येऊन बसला.समोर दोनच ताटं पाहून त्याने आश्चर्याने विचारलं
“दोनच ताटं? नयना जेवणार नाहीये का?”
“अहो ती बाहेर गेलीये.तिची ती साक्षी नावाची मैत्रीण बंगलोरहून आलीये आज.तिला भेटायला गेलीये.दोघी बाहेरच पावभाजी वगैरे खाऊन येणार आहेत ”
“साक्षी बंगलोरला असते?जाँब लागलाय की लग्न झाल्यामुळे?”
“लग्न नाही. मागच्या दिड वर्षापासून ती जाँबला तिथंच आहे ”
“किती पँकेज आहे?”
“सध्या सहा लाखाचं आहे.पुढच्या वर्षीपासून नऊ लाख होणार आहे म्हणे ”
विनायकने एक सुस्कारा सोडला
“एकेक करुन नयनाच्या सगळ्या मैत्रीणी जाँबला लागल्या तर?”
माधवीने मान डोलावली
“आणि आपली बया बसलीये पाच वर्षांपासून घरी.किती अपेक्षा होत्या मला तिच्याकडून. कंप्युटर इंजीनियर झाल्याझाल्या तिला चांगल्या कंपनीत नोकरी लागेल,चांगला पगार मिळेल,चारचौघात अभिमानाने सांगता येईल की माझी मुलगी या नावाजलेल्या कंपनीत नोकरी करतेय.तिला एवढं पँकेज आहे.पण नाही, एकही अपेक्षा पोरीने पुर्ण केली नाही “विनायक उद्विग्न होऊन म्हणाला
“जाऊ द्या.अशीही आपल्याला काही तिच्या पैशांची गरज नाहीये”
“पैशाचा इश्यूच नाहीये माधवी.इतकं चांगलं शिक्षण घेऊनही तुम्ही त्या शिक्षणाचा उपयोग करत नाहीये तर त्या शिक्षणाचा फायदाच काय?मग साधं बीए,बीकॉम केलं असतं तरी चाललं असतं.कशाला तिच्या शिक्षणासाठी आपण इतका पैसा खर्च केला असता? “विनायक चिडून म्हणाला
“जाऊ द्या तुम्ही चिडू नका.शांततेने जेवून घ्या.आणि तिलाही काही बोलू नका.उगीच तुमचा बीपी वाढून जाईल”
“वाईट वाटतं गं!लोक विचारतात तेव्हा सांगायलाही लाज वाटते की माझी मुलगी घरीच बसलीये.काहीच काम करत नाहीये ”
“मी परवाच तिला नोकरीबद्दल बोलले तर ती माझ्यावरच खवळली.’ तुम्हांला मी जड झाले असेन तर करुन टाका माझं लग्न ‘असं म्हणायला लागली”
” दुसरा पर्यायच काय ठेवलाय तिने आपल्यासमोर?खरंच यावर्षी करुनच टाकतो तिचं लग्न” विनायक उद्वेगाने म्हणाला
” नाहीतर काय!घरात बसूनही काय करते ती?सांगितल्याशिवाय कोणतंही काम करत नाही. सदोदित तो मोबाईल घेऊन बसलेली असते.काय करते कुणास ठाऊक!बरं तिला म्हणावं की काही छंद तरी जोपास पण तेही करायला तयार होत नाही.आपण काही बोललो तर रुसून बसते.चारचार दिवस बोलत नाही”
“उद्यापासूनच तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात करुया.आताच ती सव्वीस वर्षाची आहे.जास्त उशीर केला तर नंतर लग्न जमणंही कठीण होऊन बसेल.खरंतर आपण अगोदरच तिचं लग्न उरकून टाकायला हवं होतं.उगीच तिला नोकरी लागण्याची
वाट बघत बसलो ”
“तिच तर म्हणत होती की ‘नोकरी लागल्याशिवाय लग्न करणार नाही म्हणून ‘आजकालची मुलं म्हणे नोकरी करणारी मुलगीच पसंत करतात’असं तिचंच म्हणणं होतं ”
“आता तिचं काहिही ऐकायचं नाही. चांगलं स्थळ आलं की उरकून टाकायचं “विनायक ठामपणे म्हणाला

दुसऱ्या दिवसापासून त्याने वेगवेगळ्या शहरातल्या विवाह संस्था, मंडळात नयनाचं नाव नोंदवायला सुरुवात केली.आपल्या नातेवाईक, मित्रांना फोन केले.’मुलीचं यंदा कर्तव्य आहे तेव्हा तुमच्या माहितीतलं चांगलं स्थळ सुचवा “अशी त्यांना विनंती केली.
काही दिवसांनी एक चांगलं स्थळ चालून आलं.मुलगा हैदराबादला एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता.नऊ
लाखाचं पँकेज होतं.फोटोवरुन तरी चांगला दिसत होता.विनायकने त्याची माहिती आणि फोटो नयना आणि माधवीच्या मोबाईलवर पाठवले.पण दोघींकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून दोन दिवसांनी त्यानेच माधवीला विचारलं.
“मी ते स्थळ पाठवलं होतं ते तुम्ही दोघींनी बघितलं नाही का?”
” बघितलं.नयना नाही म्हणतेय ”
” का?सगळं तर चांगलं आहे ”
” तिचं नेहमीचंच कारण.नोकरी लागल्याशिवाय लग्न करायचं नाही म्हणे”
” बोलव तिला “विनायक संतापून म्हणाला
माधवीने नयनाला तीनचार हाका मारल्या पण तिने प्रतिसाद दिला नाही. शेवटी माधवी उठून तिच्या खोलीकडे गेली आणि तीला घेऊन आली.
“काय बाबा?”
“काय करत होतीस?तुझ्या आईने इतक्या हाका मारल्या.ऐकू नाही आल्या?”विनायकने रागाने विचारलं
“काही नाही. गाणी ऐकत होते.कानात ईअर फोन होते म्हणून ऐकू आलं नाही ”
” बरं.मी ते स्थळ पाठवलं होतं,त्याला तू नाही म्हणतेय म्हणे ”
” हो.मी मागेही तुम्हांला सांगितलं होतं की मला नोकरी लागल्याशिवाय लग्नच करायचं नाही म्हणून ”
“मला एक सांग.तू इथे नोकरी करुन काय उपयोग ?मुलगा जर दुसऱ्या शहरात असेल तर तुला लग्न झाल्यानंतर इथली नोकरी सोडावीच लागणार ना?”
” हो बरोबर.पण आजकालच्या मुलांनाच नोकरी करणारी मुलगी हवी असते.नोकरी करणाऱ्या मुली स्मार्ट,हुशार आणि जगासोबत चालणाऱ्या असतात असं त्यांना वाटतं.अशा मुलींना जास्त पँकेजेसची मुलं मिळतात ”
“पण या मुलाची तर मुलगी नोकरी करणारीच हवी अशी काही अट नाहिये ”
” मग त्याला पँकेजही कमीच आहे ”
“नऊ लाखाचं पँकेज कमी आहे?”विनायकने आश्चर्याने विचारलं “तुला माहित नसेल बेटा की मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा मला फक्त तेराशे रुपये पगार होता.हातात फक्त नऊशे-साडेनऊशे रुपये पडायचे.आमचं लग्न झालं तेव्हाही मला फक्त साडेतीन हजार पगार होता.तुझी आई श्रीमंत घरातली होती तरीसुद्धा तिच्या वडिलांनी फक्त माझी सरकारी नोकरी आणि आमचं घराणं पाहून आमचं लग्न लावून दिलं.आणि नंतरही आम्हांला कधी पैशांची चणचण भासली नाही.आज तीस वर्षाच्या नोकरीनंतरही माझं पँकेज सोळाच लाख आहे.त्यामानाने या मुलाचं पँकेज एकदम छान आहे.आणि ते पुढेही वाढू शकतं”
” तुमचा काळ वेगळा होता बाबा.आता महिन्याला एक लाखही पुरत नाहीत ”
“तुम्ही स्वतःवर कंट्रोल नाही ठेवला तर महिन्याला पाच लाखही पुरणार नाहीत.व्यवस्थित मँनेज केलं तर तीसचाळीस हजारातही महिना पार पडतो.तुझ्या दिलीपकाकाचंच उदाहरण घे.फक्त चाळीस हजारात व्यवस्थित घर चालंलय.मुलं महागड्या काँलेजमध्ये शिकताहेत.खाऊनपिऊन सुखी आहेत.कधी पैसा पुरत नसल्याची तक्रार नसते.बरं जाऊ दे तुला जर नोकरीच करायची होती तर तू आतापर्यत काय केलंस?पाच वर्षं झालीत तुला इंजीनियर होऊन.तुझ्या सगळ्या मैत्रिणी नोकरीला लागल्यात म्हणे.मग तुलाच का नोकरी लागत नाहिये?”
नयनाचा चेहरा पडला.हळू आवाजात ती म्हणाली
” करतेय मी प्रयत्न पण कुठे जागाच निघत नाहीयेत.आणि बाबा मी दोनदा केलीये नोकरी.अगदीच काही घरात बसून नव्हते.”
“बरोबर.पण ती किती महिने केलीस?त्या सुप्रीम इंडस्ट्रीज मध्ये तीन महिने आणि सायबर सोल्यूशन्समध्ये दोन महिने.तीही व्यवस्थित नाही. महिन्याला पाचसहा दांड्या असायच्याच तुझ्या.खरं ना?”
” मग काय करणार?तिथं एक तर पगार कमी आणि हँरँसमेंटच इतकी होती की एकेक दिवस काढणं मला मुश्कील झालं होतं ”
” बेटा नोकरी म्हंटलं की तिथं थोडीफार हँरँसमेंट असणारच.माझंच बघ.सरकारी नोकरी असूनही माझी आँफिसमधून यायची वेळ नक्की नसते.बारा बारा तेरातेरा तास ड्युटी होऊन जाते.कधीकधी रविवारी, सुटीच्या दिवशीही आँफिसला जावं लागतं.सततच्या मिटिंग्स्,काँन्फरन्सने जीव वैतागून जातो.वरुन सिनीयर्सच्या शिव्या खाव्या लागतात.सगळ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणात असंच असतं कारण सगळ्यांवरच प्रेशर असतं.मलाही बऱ्याच वेळा वाटतं की सोडून द्यावी नोकरी. मस्त आराम करावा पण मी तसं करु शकत नाही” विनायक तिला समजावत म्हणा

” तुमची गोष्ट वेगळी आहे बाबा.तुम्ही कुटुंब प्रमुख आहात.तुम्हांला नोकरी सोडून कसं चालेल?आणि माझं चालू आहे नोकरी बघणं.नोकरी लागली की बघा मला मोठमोठ्या पँकेजेसच्या मुलांची स्थळ चालून येतील”
” फक्त पँकेजच महत्वाचं असतं का बेटा?मुलाचं घराणं,त्यातली माणसं,मुलावरचे संस्कार हे तुला महत्वाचे वाटत नाही का?आणि फार श्रीमंत घर कधीच नको.तिथे बऱ्याचदा बायकांना बरोबरीने वागवलं जात नाही.त्यांच्या कर्तृत्वाला शुन्य किंमत असतेच पण त्यांच्या मतालाही किंमत दिली जात नाही ”
” असेलही तसं.पण आजकालच्या मुलींना हँडसम आणि श्रीमंत मुलगाच नवरा म्हणून हवा असतो ”
” चुकीचं आहे ते.बरं जाऊ दे.मला तुझ्याशी वाद घालायचा नाहिये.महिनाभर आम्ही थांबतो.तोपर्यंत तुझ्या नोकरीचं जमलं तर ठिक नाहीतर चांगलं स्थळ आलं तर तुला लग्न करावंच लागेल ”
” बाबा एका महिन्यात मला कशी नोकरी लागेल?एक वर्ष तरी थांबा “नयना काकुळतीने म्हणाली
” नाही. तुझ्या नोकरीची वाट बघताबघता पाच वर्षं निघून गेली आहेत.जास्त उशीर केला तर तू थोराड दिसायला लागशील.आणि मग थोराड दिसणाऱ्या मुलाशीच तुला लग्न करावं लागेल ”
” मला कुणी समजूनच घेत नाही ” नयना संतापून रडायला लागली “ती आई तशीच आणि तुम्हीही तसेच
.सारखे मागे लागतात.मनासारखं काही करुच देत नाहीत ”
रागारागाने ती उठली आणि तिच्या रुमकडे निघून गेली
“अशीच करते ही आजकाल.थोडंसं काही बोललं की लगेच रडायला लागते. तिच्याशी कसं वागावं तेच कळेनासं झालंय” माधवी हताश होऊन म्हणाली.
” साहजिकच आहे माधवी.सध्या तिला डिप्रेशन आलंय.तिच्या बहुतेक मैत्रिणी नोकरीला लागल्यात.ज्यांना लागल्या नाहीत त्यांची लग्नं होऊन गेलीत.ही एकटीच अशी घरात रिकामी बसलीये.जिच्याजवळ भावना मोकळ्या करता येऊ शकतील अशी कुणी व्यक्तीच सध्या उरलेली नाहिये.साहजिकच तिला डिप्रेशन येणार.एकट्या मुलांचा हाच प्राँब्लेम असतो.ती लवकर डिप्रेशनमध्ये जातात.याकरिता कमीतकमी दोन मुलं तरी हवीत.ती एकमेकांना भावना तरी शेअर करु शकतात ”
” हो.नाही झालं आपल्याला दुसरं मुल.काय करणार.पण ही ही गोष्ट खरी की तिच्या डिप्रेशनला तीच स्वतः जबाबदार आहे ”
” हो.तेही खरंच.पण ते ती अँक्सेप्ट करत नाहीये.याच्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे तिचं लवकरात लवकर लग्न लावून देणं ”
” ठिक आहे.सुरुवात केलीच आहे आपण स्थळं बघायला”

दोनच दिवसांनी रोजचा पेपर वाचतांना एल.आय.सी.च्या व्हेकंसीजची जाहिरात विनायकच्या पहाण्यात आली.त्याने नयनाला हाक मारुन बोलावलं
” तू आजचा पेपर वाचलास?”त्याने विचारलं
” नाही. मी पेपर वाचत नाही ”
” का?का पेपर वाचत नाहीस?कमीतकमी नोकरीच्या जाहिरातीसाठी तर वाचत जा ”
” अहो बाबा इतके जाँब पोर्टल आहेत.त्याच्यावर हजारोंनी जाहिराती येत असतात.त्याच्यासाठी पेपर वाचायची काय गरज आहे?”
” मग एल.आय.सी.ची जाहिरात वाचलीच असशील तू? ”
“वाचली असेल.शक्यता आहे. पण त्यांनी कंप्युटर इंजीनियर कुठे मागितलेत?”जाहिरात बघत ती म्हणाली
” पण त्यांना कोणतेही ग्रँज्युएटस् चालणार आहेत ”
” बाबा मी कारकून बनून काय करु?मागेही तुम्ही कुठल्यातरी बँकेची जाहिरात दाखवली होती.मला अशा जाँबमध्ये इंटरेस्ट नाहिये बाबा.मला माझ्याच फिल्डमधला जाँब हवाय “ती वैतागून म्हणाली.
” बेटा नोकरीच करायची म्हंटलं तर कुठलीही चालू शकते.फिल्ड वेगळं असलं तरी शिकतो माणूस.आणि सरकारी नोकरी केव्हाही चांगली.पगारही चांगला असतो.जाँब सिक्युरिटी असते आणि लग्न झाल्यावरही तू तिथे बदली करुन जाऊ शकतेस ”
” हो पण जाँब सँटिसफ्ँक्शनच काय?ते मला या सरकारी नोकरीत मिळणार थोडीच आहे.राहू द्या.मी पुण्यातल्या एका कंपनीत अप्लाय केलाय.पुढच्या आठवड्यात इंटरव्ह्यू आहे ”
विनायकला चुप बसण्याव्यतिरिक्त पर्यायच उरला नाही. तो माघार घेत म्हणाला
“ठिक आहे.मात्र या वेळी तरी तुझं सिलेक्शन व्हायला पाहिजे ”
“मी प्रयत्न तर करणारच आहे ” ती म्हणाली आणि रुममध्ये निघून गेली.ती गेल्यावर माधवी विनायकला म्हणाली
“तुम्ही नोकरीसाठी तिच्या इतकं मागे लागता पण नोकरीला लागल्यावर ती कशी वागते ते माहित आहे ना?घरातल्या एकाही कामाला ती हात लावत नाही वरुन तिच्याच तैनातीत मला रहावं लागतं.असा रुबाब दाखवते की जणू घरात कमावणारी ती एकटीच आहे आणि आपण तिच्याच कमाईवर अवलंबून आहोत ”
” माहितेय मला.पण अशी रिकामी बसलेलीही मला सहन होत नाही. पण तू काळजी करु नकोस.तिला नोकरी लागणं कठीणच दिसतंय कारण इंटरव्ह्यूला जातांना ती कधी तयारीच करुन जात नाही ”

दुसऱ्या आठवड्यात नयना पुण्याला जाऊन इंटरव्ह्यू देऊन आली तेव्हा तिचा चेहरा पडला होता.संध्याकाळी विनायकने घरी आल्यावर तिला विचारलं.
“काय झालं?कसा झाला इंटरव्ह्यू?”
” चांगला झाला पण माझं काही सिलेक्शन झालं नाही”
“का?”
” आजकाल वशिला लागतो बाबा सगळ्या ठिकाणी.आणि आपण तिथेच तर कमी पडतो.साक्षी जाँबला लागली ती तिच्या मामाच्या ओळखीमुळे.समीर टिसीएस मध्ये त्याच्या बाबांच्या ओळखीमुळे लागला. नेहा पण तिच्या बाबांच्याच वशिल्यामुळे आयबीएम मध्ये लागलीये”
” याचा अर्थ तू मलाच ब्लेम करतेय.माझ्या जिथे ओळखी आहेत त्या एल.आय.सी.मध्ये आणि बँकेमध्ये तर तू नोकरी करायला तयार झाली नाहीस.सगळ्याच ठिकाणी माझी ओळख कशी असणार?आणि फक्त ओळखीमुळे नोकऱ्या लागत नाहीत.इंटरव्ह्यूमध्ये आपली हुशारीही दाखवावी लागते.मी पाहिलंय की इंटरव्ह्यूला जातांना तू कधीच तयारी करुन जात नाहिस.आज पाच वर्षं झाली तुला इंजीनियरींग सोडून.काय शिकलीस तेसुद्धा तुला आठवत नसेल तर इंटरव्ह्यूमध्ये तू काय बोंब पाडणार आहेस?तू पुण्याला गेलीस खरी पण काय होणार आहे हे आम्हांला अगोदरच माहित होतं ”
“तुमचीच नाट लागली माझ्या इंटरव्ह्यूला “ती रडत रडत म्हणाली
“वा रे वा!तू स्वतः तयारी करुन जायचं नाही.इंटरव्ह्यूत चांगली उत्तरं द्यायची नाही आणि सिलेक्शन झालं नाही तर आईबापालाच दोष द्यायचा.ही कोणती पद्धत?आम्ही काय वैरी आहोत का तुझे?” माधवी चिडून म्हणाली
” जाऊ द्या मला काही बोलायचंच नाही या विषयावर “ती उठली आणि रडतरडत आपल्या रुममध्ये निघून गेली.
तिच्या पाठमोरी आक्रुतीकडे बघत माधवी म्हणाली
“बघा.अशी करते ही.गरीब आणि अशिक्षित आईवडिलांची मुलं काय ओळखीने लागतात का नोकरीला?”
“खरंय माधवी तुझं.गरीब आणि अशिक्षित आईवडिलांच्या मुलांमध्ये परिस्थितीला सामोरं जाण्याची आणि कसंही करुन यश मिळवण्याची जिद्द असते.त्यांना आपल्यालाच प्रयत्न करुन पुढे जायचं आहे याची जाणीव असते.कितीतरी यशस्वी आणि प्रसिद्ध व्यक्तींचे आईवडील अशिक्षित आणि गरीब होते.कोणत्याही सुखसुविधा मुलांना ते देऊ शकले नाहीत तरीही मुलांनी यशाचं शिखर गाठलं.आणि आपली मुलं पहा.आपलंही चुकलंच.आपण नको तितके तिचे लाड केले.ती म्हणेल ते आपण तिला देत आलो.त्यामुळे तिला कधी गरिबीची जाणीवच झाली नाही.आईवडिलांनी आपल्याला शिकवलंय तर आपण स्वतःहून धडपड करुन नोकरी मिळवली पाहिजे,त्यांच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या आपण पुर्ण केल्या पाहिजेत असं तिला कधी वाटलंच नाही ”
“खरंय तुमचं पण आपलंही काही चुकलं असं मला वाटत नाही. आपल्याला ज्या सुखसोयी मिळाल्या नाहीत त्या आपल्या एकूलत्या एक मुलीला मिळाव्या असं आपल्यालाही वाटणं साहजिकच होतं.आता तिलाच या गोष्टींची जाणीव नाही तर आपणही काय करणार?
त्यात एवढंच सुख म्हणावं की तिने प्रेमाबिमाच्या काही भानगडी नाही केल्या.नाहीतर आपल्या डोक्याला अजून ताप झाला असता ”
“खरंच.ही देवाचीच क्रुपा समजायची कारण कितीही चांगले संस्कार केले तरी या मुली कधी भरकटतील सांगता येत नाही. पहातेय ना कसं मुलींना फसवून मग त्यांना तुकडे तुकडे करुन मारुन टाकलं जातंय ते”
माधवीच्या अंगावर शहारे आले.ती म्हणाली
“असं काही घडण्याच्या आतच नयनाचं लग्न उरकून टाकलं पाहिजे ”

एक महिना असाच गेला.त्यात नयना दोन ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊन आली पण दोन्ही ठिकाणी तिची निवड झाली नाही. या दरम्यान बंगलोरचं एक स्थळ चालून आलं.मुलगा एकुलता एक होता,देखणा होता.बारा लाखाचं पँकेज होतं.आणि सहा महिन्यांनी ते सोळा लाख होणार होतं.फक्त लग्न झाल्यावर मुलीने नोकरी करावी अशी मुलाकडच्यांची अट होती.त्यात विनायक आणि माधवीलाही काही गैर वाटलं नाही. मुलामध्ये दोष काढण्याकरीता कोणतेच मुद्दे नसल्याने नयनाही नाही म्हणू शकली नाही.शेवटी तीन महिन्यांनी नयनाचं लग्न थाटामाटात पार पडलं.

एक महिन्याने माधवीने सहजच ख्यालीखुशाली कळण्यासाठी नयनाला फोन केला.
“कशी आहेस बेटा?”
“आई तशी मी मजेत आहे.सासूबाई आणि नवरा दोघंही स्वभावाने चांगले आहेत पण इथे खुप कामं करावी लागतात.सकाळी सहा वाजताच उठावं लागतं ”
” का?”
” अगं माझ्या नवऱ्याला फिटनेसचं वेड आहे म्हणून तो सकाळी पाच वाजताच जिमला जातो.सासूसासरेही सकाळी साडेपाचलाच माँर्निंग वाँकला जातात.सुरुवातीला मी माझ्या सवयीने एकटीच नऊ वाजेपर्यंत झोपलेली असायचे.तसं मला कुणी बोलत नव्हतं पण त्यांच्या चेहऱ्यावरुन माझं असं उशीरापर्यंत झोपणं त्यांना आवडत नाहिये असं माझ्या लक्षात आलं.मग नाईलाजाने मलाही सकाळी सहा वाजता उठावं लागतं.नवरा ,सासूसासरे सकाळी घरी आले की त्यांना लगेच चहा करुन द्यावा लागतो.मग नाश्त्याची तयारी.माझी झोपच होत नाही आजकाल.वरुन घरात सतत लोकांचं येणं जाणं असतं.दिवसभर चहापाणी करुन मी थकून जाते.त्यातून आता नवरा आणि सासू दोघंही माझ्या मागे लागलेत मी नोकरी करावी म्हणून.सासूबाई म्हणतात ‘तू इतकी शिकली आहेस त्याचा उपयोग तुझ्या आईवडिलांना नाहितर आम्हांला तरी होऊ दे ”
“काय चुकीचं म्हणताहेत त्या?मिळत असेल तर कर नोकरी ”
” हो पण नोकरी करुन घरातली कामंही मलाच करावी लागणार ना?सासूसासऱ्यांना थोडीच कामं सांगता येतील!”
माधवीला हसू आलं.माहेरी नोकरी करतांना जो रुबाब ती दाखवायची तो आता सासरी दाखवता येणार नव्हता.
“ठरव मग काय करायचं ते “आपलं हसू दाबत ती म्हणाली.
“तू बोल ना जरा माझ्या सासूबाईंशी.त्यांना म्हणा कमीत कमी लग्नाचं एक वर्ष तरी तिला एंजॉय करु द्या ”
“नाही गं बाई!मी तुझ्या संसारात अजिबात ढवळाढवळ करणार नाही.तू आणि तुझ्या सासरचे काय ठरवायचं ते ठरवा ”
“बरं ”

एक महिन्याने विनायक घरी आला तर माधवी त्याला उत्साहाने म्हणाली
“अहो आनंदाची बातमी आहे.नयनाला नोकरी लागली ”
” अरे वा!कोणत्या कंपनीत आणि किती पँकेज आहे?”
कंपनीचं नाव सांगून माधवी म्हणाली
“सध्या सहालाखाचं पँकेज आहे आणि पुढे वाढेल असं ती म्हणत होती”
” वा छानच!पण आता कशी लागली नोकरी?काही ओळखबिळख होती का?”
” नाही हो.कसली ओळख आणि कसलं काय!इंटरव्ह्यूच्या अगोदर सहासात दिवसापासून ती अभ्यास करत होती.जावईबापूंनी तिच्या मागे लागून तिची छान तयारी करुन घेतली होती म्हणे ”
“आपण हेच तर सांगत होतो तिला की इंटरव्ह्यूला जातांना थोडी तरी तयारी करुन जा.पण आपलं तिने कधी ऐकलं नाही ”
” जाऊ द्या.आता सासरी तिला अभिमानाने रहाता येईल.पैशासाठी कुणाकडे हात पसरायची वेळ येणार नाही ”
“ते ठिक आहे माधवी पण आपण दिलेल्या शिक्षणाचा तिने आपल्याला नाही सासरच्यांना फायदा करुन दिला याची मला खंत वाटते ”
” तेही खरंच पण तिने जी थोडीफार नोकरी केली तेव्हाही आपण तिचा पगार कधी मागितला नाही. आपल्याला कधी तशी गरजच भासली नाही ”
“तिच्या सासरच्यांनाही कुठे तिच्या पैशाची गरज आहे?नवऱ्याला चांगला पगार आहे शिवाय सासूसासऱ्यांना चांगलं पेंशन आहे.जाऊ दे.जे आहे त्यात आपण आनंद मानायचा.ती खुश, तिच्या सासरचे खुश .अजून आपल्याला काय पाहिजे?”

एक महिन्यानंतर एक दिवस अचानक विनायकच्या मोबाईलवर खात्यात वीस हजार जमा झाल्याचा मेसेज आला.मेसेजवर नयनाचा नंबर पाहून विनायक चक्रावला.त्याने लगेच तिला फोन लावला.
“बेटा हे कसले पैसे तू मला पाठवले आहेत?”
“बाबा मी आता मिटिंगला चाललेय.त्यामुळे आता बोलता येणार नाही. पण मी तुम्हांला सविस्तर मेसेज व्हाँटस्अपवर पाठवलाय.तो वाचल्यानंतर कदाचित तुम्हांला बोलायची गरज भासणार नाही. वाचून घ्या.ठेवू मी फोन?” आणि फोन कट झाला.
विनायकने उत्सुकतेने व्हाँटस्अप उघडलं.तिथे खरोखरच नयनाचा भला मोठा मेसेज होता.
“प्रिय आदरणीय बाबा ,
मी तुम्हांला पैसे पाठवलेत त्याचं तुम्हांला आश्चर्य वाटलं असेल.तीनचार दिवसांपूर्वीच माझा पहिला पगार झाला.कापूनकुपून चाळीस हजार हातात पडला. बऱ्याच वर्षांनी इतके स्वकमाईचे पैसे हातात आल्यावर खुप आनंद झाला.बाबा मी इथे नोकरीत लागल्यावर एक अशी घटना घडली की जिच्यामुळे मी आरपार बदलून गेले आहे.त्या घटनेमुळे लग्नापूर्वी मी माहेरी असतांना तुम्हांला खरंच खुप त्रास दिला याची मला जाणीव आणि पश्चाताप होऊ लागलाय.झालं असं की माझी काँलेजची एक पुजा परदेशी नावाची मैत्रीण मला इथे कंपनीत भेटली.हो ही तीच पुजा जिचे वडील सायकलवर भाजी विक्रीचा व्यवसाय करायचे.खुप गरीब मुलगी पण अतिशय हुशार. ती इथे गेल्या वर्षांपासून काम करतेय आणि सध्या तिला अठरा लाखाचं पँकेज आहे.ती मला सांगत होती की माझ्यासोबत इंजीनियरींग सुटल्यावर ती एकही दिवस रिकामी बसली नाही. इंजीनियरींग झाल्यावर तिने लगेच शाळेतल्या मुलांच्या ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली.एका महिन्यातच तिला एका छोट्या एजन्सीजमध्ये जाँब लागला.खरं तर त्या जाँबचा इंजिनिअरिंगशी काहिही संबंध नव्हता.पण घरची परिस्थिती वाईट म्हणून कशाही मार्गाने आलेले पैसे तिला चालणार होते.एक वर्षांने तिला पुण्यातल्या एका कंपनीत जाँब लागला.पँकेज कमीच होतं पण त्या अनुभवावर तिला पुण्यातल्या पुण्यात तीनचार ठिकाणी जाँब बदलता आले.दोन वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं.लग्नाआधी तिने नवऱ्याला अट टाकली की ‘ आईवडिलांनी पोटाला चिमटे घेऊन दिलेल्या शिक्षणाच्या जोरावर मला नोकरी मिळालीये.माझ्या पगारावर खरा हक्क त्यांचा आहे.आज ते दोघंही थकलेत.त्यांच्याकडून आता भाजीविक्रीचा व्यवसाय पुर्वीसारखा होत नाही. माझ्या भावाचं शिक्षण सुरु आहे.तर जोपर्यंत माझा भाऊ शिकून कमवायला लागत नाही तोपर्यंत मी माझ्या पगारातला अर्धा पगार माझ्या आईवडिलांना पाठवणार ‘तिचा नवरा आणि सासूसासरेही समजदार निघाले.त्यांनी कोणतीही आडकाठी घेतली नाही. मागच्याच वर्षी तिला इथे आमच्या कंपनीत जाँब मिळाला.आणि अजूनही ती आईवडिलांना अर्धा पगार पाठवते.तिची कहाणी ऐकून मी खुप भारावून गेले.तीच नाही तर इथे आंध्रातल्या आदिवासी क्षेत्रातून आलेल्या दोनतीन मुली आहेत.त्यांच्या घरचं दारिद्र्य आणि त्यांनी किती वाईट अवस्थेत शिक्षण घेतलं ते किस्से ऐकून तर मला अक्षरशः रडू आलं.ते ऐकून मी किती सुखात होते याची जाणीव मला झाली.माझ्या वागण्याची मला लाज वाटू लागली.तुम्ही म्हणायचा की ‘अगं बेटा आम्हांला तुझ्या पैशांची गरज नाहिये.पण तू कुठेतरी,कशाततरी गुंतलेली आहे याचंच आम्हांला समाधान हवंय ‘तुमचंही बरोबरच होतं,तुमच्या सगळ्या मित्रांची माझ्या बरोबरची मुलं नोकरीला लागली होती किंवा काही व्यवसाय करत होती.मीच एकटी रिकामी बसले होते.मित्र,नातेवाईक तुम्हांला माझ्याबद्दल विचारत असतील तेव्हा तुमची परिस्थिती किती आँकवर्ड होत असेल या कल्पनेने आज मला कसंतरीच होतंय.आपल्या सर्व गरजा,इच्छा आईवडिलांनी पुर्ण कराव्यात अशी मुलांची अपेक्षा असते तशीच मुलांनी शिकून कामधंद्याला लागावं अशी आईवडिलांचीही अपेक्षा असते ती मी पुर्ण करु शकले नाही याची रुखरुख मला वाटू लागलीये.मी खरंच बाबा तुम्हां दोघांना खुप त्रास दिला. आयुष्यातली बहुमोल अशी पाच वर्षं मी अक्षरशः आळसात वाया घालवली.आता गेलेल्या काळाची भरपाई तर मी करु शकणार नाही पण तुम्ही माझ्या शिक्षणासाठी जो खर्च केला त्याची भरपाई तर नक्कीच करु शकते.मी ठरवलंय की कमीतकमी पाच वर्ष तरी अर्धा पगार तुम्हांला पाठवायचा.मला कल्पना आहे की तुम्हांला ते आवडणार नाही.”तुला शिकवणं माझं कर्तव्यच होतं “असं तुम्ही म्हणाल.तुमचं कर्तव्य तुम्ही व्यवस्थित पार पाडलं बाबा.आता माझं कर्तव्य मला पार पाडू द्या.प्लीज नाही म्हणू नका आणि मी पाठवलेला अर्धा पगार मला परत पाठवू नका.मला ही सुद्धा कल्पना आहे की माझ्या पैशांची तुम्हांला काहिच गरज नाहीये आणि मुलीकडून पैसे घेणं तुम्हांला आवडणारही नाही.पण असं समजा की मी माझ्यावरचं कर्ज फेडतेय.या पैशांचा उपयोग सहलींसाठी करा,समाजसेवेसाठी करा किंवा कशासाठीही करा मी तुम्हांला एका शब्दानेही विचारणार नाही. पण प्लीज नाही म्हणू नका.तुम्ही नाही म्हंटलात तर मी असं समजेन की तुमचं माझ्यावर प्रेमच नाहिये ”
तो मेसेज वाचून विनायकला गहिवरून आलं.उशीरा का होईना आपल्या मुलीला जाणीव झाली याचं त्याला समाधान वाटलं.
घरी येऊन त्याने नयनाचा मेसेज माधवीला वाचून दाखवला.तो वाचून माधवी म्हणाली
” हो.आज सकाळीच मला तिचा फोन आला होता.खुप इमोशनल झाली होती.मला म्हणत होती की बाबांना सांग पाठवलेले पैसे परत नका करु म्हणून ”
“पण तिच्या नवऱ्याला आणि सासूसासऱ्यांना आवडेल का असा तिने अर्धा पगार पाठवला तर ?”
” हो तिचा नवरा आणि सासू दोघंही माझ्याशी बोलले.त्यांना उलट तिचा हा निर्णय खुप आवडलाय ”
” वा मग तर काही प्राँब्लेमच नाही.माझ्या डोक्यात एक कल्पना आलीये.अशीही आपल्याला तिच्या पैशांची गरज नाहीये.तर आपण आता असं करु तिने पाठवलेल्या पैशात आपले थोडे पैसे टाकून गरीब,पैशाअभावी शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुलींसाठी नयनाच्याच नावाची एक स्काँलरशिप सुरु करुया.म्हणजे तिचा पैसा योग्य कारणासाठी वापरला जाईल ”
“.वा खुपच छान आयडिया आहे.तिला कळवून टाका तसं.तिलाही खुप आनंद होईल ”
” नको.तिला जरी आनंद झाला तरी तिच्या सासरच्यांना ते आवडेल की नाही ते सांगता येत नाही.आता नवीनच तिचं लग्न झालंय.आतापासून तिच्या संसारात गैरसमज नकोत.योग्य वेळ आली की आपण ते उघड करु ”
“चालेल ”
विनायकने मोबाईल उचलला आणि तो नयनासाठी मेसेज टाईप करु लागला.
“बेटा उशीरा का होईना तुला जाणीव झाली.याचा आम्हां दोघांनाही खुप आनंद होतोय.
तुझा निर्णय आवडला.विशेष म्हणजे तुझ्या निर्णयाला सासूसासरे आणि जावईबापूंचा पाठींबा आहे याचा जास्तच आनंद होतोय.माणसं चांगली आहेत.पुढेही त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही निर्णय घेऊ नकोस.तुझ्या आग्रहास्तव तू पाठवलेले पैसे ठेवून घेत आहोत.ते पैसे चांगल्या कारणासाठीच वापरले जातील हा माझा शब्द आहे.तू आमच्या भावना जाणून घेतल्यास त्याबद्दल आम्हांला तुझा अभिमान वाटतो.आईवडिलांना दुसरं तरी काय हवं असतं?त्यांना मुलांचा पैसा नको असतो मात्र मुलांनी काहितरी अभिमानास्पद कार्य करावं,चारचौघात मुलांविषयी बोलतांना मान ताठ व्हावी असं मुलांचं कर्तृत्व असावं एवढीच त्यांची अपेक्षा असते.आज ती अपेक्षा पुर्ण केलीस याचा आनंद होतोय ”
थोड्या वेळाने तिचा मेसेज आला
“खरंय बाबा.तुम्ही म्हणता ते उशीरा का होईना पटतंय मला.आणि हो,आय लव्ह यू बाबा ”
तो मेसेज पाहून विनायकचे डोळे अश्रूंनी केव्हा भरुन आले हे त्यालाही कळलं नाही.
© दीपक तांबोळी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}