देश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

तिसरी चौथीचं इतिहासाचे पुस्तक वाचतांना शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांनी आपल्यापुढे ठेवलेला आदर्श,स्वराज्याची त्यांची तळमळ वाचून मन अभिमानाने भरुन येतं. सौ.कल्याणी केळकर बापट 9604947256 बडनेरा, अमरावती

साधारणतः विद्यार्थी स्वतःच्या आवडीने दुसरी,तिसरीत वाचायला लागतो.त्यावेळी वाचनाच्या सुरवातीलाच आवडलेलं पुस्तक म्हणजे इतिहास, आपल्या महाराज्यांच्या शौर्याचा,कर्तबगारी चा इतिहास. तिसरी चौथीचं इतिहासाचे पुस्तक वाचतांना शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांनी आपल्यापुढे ठेवलेला आदर्श,स्वराज्याची त्यांची तळमळ वाचून मन अभिमानाने भरुन येतं.
…. आज शिवजयंती. शिवाजी महारांजाचे नाव,पराक्रम,कर्तबगारी जाणत नसलेला माणूस अख्ख्या भारतात मिळणार नाही. आपल्या सगळ्या तमाम जनतेचे शिवाजी महाराज म्हणजे आराध्य दैवतच जणू. मागे वळून बघतांना लक्षात आलं शिवराय माझ्या मनावर ठसले,बिंबले ते माझ्या वयाच्या नवव्या,दहाव्या वर्षीच. प्रायमरी शाळेत अभ्यासक्रमात इतिहास विषयात सगळे शिवाजीमहारांजांची माहिती असलेले पाठ होतेच. त्यानंतर संपूर्ण मनावर शिवरायांनी साम्राज्य केले ते माझ्या तरूणाईच्या काळात जेव्हा श्री. रणजीत देसाई ह्यांच्या “श्रीमानयोगी” पुस्तकातील ओळ नं ओळं झपाटल्यागत वाचून काढली तेव्हा. अक्षरशः श्रीमानयोगी संपूर्ण वाचून होईपर्यंत डोक्यात दुसरा कुठलाही विचार नव्हता. पुढलं वाचल्याशिवाय काही दुसरं सुचतही नव्हतं.आजच्या दिवशी आपण ह्या आपल्या सगळ्यांचे परमदैवत असलेल्या शिवाजीमहारांजांची जयंती धुमधडाक्यात साजरी करतो.
शिवरायांच्या स्वप्नात, मनात स्वराज्याची संकल्पना रुजविणं, त्याला मूर्त स्वरूप आणण्याचा निश्चय मनाशी बाळगणं, आणि त्या दिशेने योग्य ती वाटचाल करायला लावणं हा अतिशय अवघड प्रवास माँसाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनाशिवाय शक्यच नव्हता.
आपल्या मनात हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणा-या राजमाता जिजाऊ ह्यांची तर थोरवी कितीही गायली तरी कमीच.
..शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.अवघ्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
शिवाजीमहाराज म्हणजे निश्चयाचा महामेरू . . . बहुतजनांसी आधारु…..अखंड स्थितीचा निर्धारु…. श्रीमंतयोगी. शिवराय म्हणजे सदगुणांची खाण,पराक्रमाचा कळस.
आपल्या प्रजेची लेकरासमान काळजी घेणारा पोशिंदा त्यांच्यामध्ये रयतेला दिसत होता. ते एक मुत्सद्दी राजकारणी पण होते.कुशाग्र बुद्दीमत्तेची संपत्ती त्यांना जन्मजातच होती. त्यांनी अनेक युद्धे ही गनिमीकाव्याने जिंकली आहेत. त्याचबरोबर ते स्वतः एक कुशल योद्धा होते. एकजुटीने कार्य करण्यावर महाराजांचा भर होता. त्यांनी अनेक जाती धर्मातील लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. महाराज एक उत्तम प्रशासक तर होतेच पण त्याचबरोबर स्त्रियांचा सन्मान आणि रक्षा ह्याकडे कटाक्षाने लक्ष पुरविणारे, द्रष्टे नेते होते.
शिवजयंतीच्या निमीत्त्याने गावागावांमध्ये दरवर्षी मिरवणूका निघतात.हा दिवस आपल्यासाठी खूप प्रेरणादायी दिवस असतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवराय आपल्या साठी आदर्श आहेत.शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप.
स्वराज्य स्थापनेचं ध्येय महाराजांच्या नसांनसांत भिनलं होतं .मिरवणुकीतील ते कट्आउट्स,त्यांच्या पराक्रमाची ओळख दर्शविणा-या चित्रफीती बघून मन अभिमानाने भरुन येतं.
अगदी प्रायमरी इयत्तेपासून शिकलेल्या इतिहासाची पाने,चित्रे,त्यांच्या पराक्रमाची गाथा
सगळी आज परत एकदा डोळ्यासमोर आली. आम्हाला शाळेत एक निबंधलेखनाचा प्रकार होता.आत्मवृत्त नावाचा. ह्या प्रकारात एखादी वस्तू वा व्यक्ती कल्पनेत आपल्याशी संवाद साधायची,मनोगत सांगायची. ती मिरवणूक नजरेसमोर उभी राहल्यावर असं वाटलं आत्ता शिवरायांचं आत्मवृत्त लिहायला आल्यावर आपण ते कसं लिहू? खरचं काय बरं बोलतील माझ्याशी ?
शिवाजी महाराज मला म्हणाले, माझ्या स्वराज्य प्रेमाचे पोवाडे तर तुम्ही गातायं पण खरचं किती प्रेम आहे तुम्हाला स्वराज्याविषयी?
किती सहभाग आहे तुमचा स्वराज्याला सुराज्य बनविण्यात?
माझ्या राज्यात स्त्रियांकडे वक्रदृष्टीने बघण्याची कुणाची मजाल नव्हती आणि चुकून ही आगळीक झालेल्याचे काय हाल व्हायचे हा इतिहास सांगतोच.आणि तुमच्या तर नजरेसमोर धडाल ही आगळीक घडूनही तुम्ही दाखवता तटस्थपणा.
आईवडीलांचा शब्द माझ्यासाठी प्रमाण होता आणि गुरुजनांनी शिकविलेल्या वाटेवर मी चालत राहिलो. तुम्ही किती ऐकता गुरू आणि पालकांचे ? महाराजांच्या ह्या प्रश्नाने मी निरुत्तर झाले.
नुसते नारेबाजी, मिरवणूका,पुतळे उभारणी करु नका.माझ्यातील गुणांचा ,माझ्या
वर्तनाचा अंगिकार करा.हाच माझ्यासाठी मोठा सोहळा असेल.
असं बोलून महाराज तर अंतर्धान पावले पण मला मोठ्या विचारांच्या आवर्तनांच्या लाटात सोडून गेले.
पाच सात वर्षांपूर्वी एकदा पुण्याला जातांना व्हाया सिंदखेडराजा जाण्याचा योग आला होता. तेव्हा सिंदखेडराजा,राजमाता जिजाऊ, त्यांनी घडविलेले शिवबा ,हा सगळा इतिहास आठवून त्यांना मनोमन शतशः प्रणाम करुन मनात आदर दाटून आला. आज शिवजयंतीच्या निमीत्ताने ह्या आठवणींना उजाळा मिळाला.

सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
…… 19/02/2024

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}