जलसंजीवनी देणारा देवदूत विश्वास देशपांडे, चाळीसगाव १७/०२/२०२४ प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
उगवतीचे रंग
जलसंजीवनी देणारा देवदूत
१९७१ चे वर्ष. पाकिस्तानी सैनिक पूर्व पाकिस्तानातील नागरिकांवर भयंकर अत्याचार करीत होते. लाखो लोकांची सामुहिक हत्या करण्यात आली होती. लाखो स्त्रियांवर बलात्कार झाले होते. लोकांमध्ये प्रचंड भीती होती. त्यातूनच जवळपास कोट्यवधी लोक भारताच्या आश्रयाला आले होते. भारताने सीमावर्ती भागात या लोकांना आश्रय देण्यासाठी छावण्या उभारल्या होत्या. कडाक्याची थंडी पडलेली. काही लोक तंबूत तर काही उघड्यावर राहत होते. आपला प्रदेश, घरदार सोडून आलेल्या या लोकांची मानसिक अवस्था फार बिकट होती. भारतावरही प्रचंड आर्थिक ताण पडत होता पण मानवतेच्या भावनेतून या सर्व लोकांना भारताने आश्रय दिला होता. पण तरीसुद्धा एवढ्या लाखो लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतेच्या सुविधा देणे शक्य नव्हते. त्यातून त्या काळात जगातील अनेक देशात कॉलरा, अतिसाराच्या साथीने थैमान घातले होते. अशा वेळी व्हायचे तेच झाले. हजारो लोकांना कॉलरा आणि अतिसाराची लागण झाली. एवढ्या लोकांना वैद्यकीय उपचार किंवा सुविधा पुरवणे आवाक्याबाहेरची गोष्ट होती. त्यातच ढाक्यातील कॉलरा संशोधन केंद्र निधीअभावी आणि सुरक्षिततेच्या कारणामुळे काही वर्षांपासून बंद होते.
अतिसारामुळे हैराण होऊन लोक मृत्यूला जवळ करत होते. अशा वेळी एक तरुण भारतीय डॉक्टर या रुग्णांची सेवा करण्यासाठी जीवाचे रान करीत होता. हाताशी पुरेशी वैद्यकीय साधने नव्हती. प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी नव्हते. सलाईनची कमतरता होती. बेडअभावी अनेक रुग्णांना जमिनीवरच उपचार द्यावे लागत होते. जमिनीवर रुग्णांनी केलेल्या उलट्या आणि विष्ठेची घाण होती. वातावरणात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. अशा परिस्थितीत हा तरुण डॉक्टर रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्राणांची बाजी लावत होता. या तरुण डॉक्टरचे नाव होते दिलीप महालनोबीस.
डॉ दिलीप महालनोबीस खरं तर बालरोग तज्ज्ञ . त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३४ रोजी प. बंगालमधील किशोरगंज जिल्ह्यात झाला. कोलकाता येथे आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यानं एखाद्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करावं आणि आपल्या घरातील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हातभार लावावा असं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं होतं. पण वैद्यकीय शिक्षणाची केवळ पदवी हाती असलेल्या डॉ दिलीप यांना पुढील शिक्षण घ्यायची इच्छा होती. त्यासाठी ते इंग्लंडला गेले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपलं पुढील शिक्षण पूर्ण करून भारतात परतले. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल सेंटर फॉर मेडिकल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेत त्यांनी संशोधन करायला सुरुवात केली. तिथेच त्यांनी ओरल रेहायड्रेशन सोल्युशन वर संशोधन करणे सुरु केले होते. हा काळ होता १९६६ चा. ( उगवतीचे रंग- विश्वास देशपांडे )
जेव्हा बांगलादेशात पाकिस्तानने अत्याचार सुरु केले, तेव्हा अक्षरशः लाखो निर्वासितांनी भारताच्या सीमावर्ती भागात आश्रय घेतला. अशाच वेळी अतिसाराची साथ सुरु झाली. जॉन हॉपकिन्स सेंटरच्या वतीने बोनगाव येथे डॉ दिलीप महालनोबीस यांना पाठवण्यात आले. त्यांच्यासोबत केवळ दोनच प्रशिक्षित कर्मचारी होते. पुरेशा प्रमाणात सलाईन्स आणि त्यासाठी लागणारी साधने उपलब्ध नव्हती. हजारो लोक डोळ्यासमोर तडफडून मृत्यू पावताना पाहावे लागत होते. आपण रोगाविरुद्धचे हे युद्ध हरतो की काय अशी भीती त्यांना वाटत होती. अशा वेळी या तरुण डॉक्टरने निर्णय घेतला तो म्हणजे जलसंजीवनी देऊन रुग्णांचे प्राण वाचवण्याचा. साखर आणि मिठाचा उपाय लाखो जीव वाचवू शकतो हे त्यांना माहिती होते. नंतर त्यांनी आणि त्यांच्या टीमने पाण्यातील मीठ आणि ग्लुकोजचे मिश्रण तयार केले. मोठमोठया ड्रम्समध्ये त्यांची साठवण केली आणि तासातासाच्या अंतराने रुग्णांना ते पाणी प्यायला दिले. त्यावेळी अशा प्रकारचे उपचार देण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची मान्यता नव्हती. अशा वेळी स्वतःच्या जोखमीवर डॉ दिलीप यांनी हे उपचार द्यायला सुरुवात केली. त्यावेळी रुग्णांसाठी इतर कॅम्पमध्ये काम करणारे सिनियर डॉक्टर या उपचाराविरोधात होते. पण डॉ दिलीप यांचा आपल्या उपचारांवर विश्वास होता. अतिसारामुळे डिहायड्रेशन होऊन रुग्णांच्या शरीरातील पाण्याची कमतरता या साध्या सोप्या द्रावणामुळे भरून निघत होती. रुग्णांच्या परिस्थितीत आश्चर्यकारकपणे सुधारणा होत होती. तीस ते चाळीस टक्के असणारे मृत्यूचे प्रमाण आता केवळ तीन टक्क्यांवर आले होते. ही गोष्ट जेव्हा उपचार करणाऱ्या इतर ज्येष्ठ डॉक्टरांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनीही आपल्या रुग्णांना हे जादुई पाणी म्हणजेच ओआर एस द्यायला सुरुवात केली. या जलसंजीवनीची किंमत अत्यंत अल्प होती. एक लिटर पाणी केवळ अकरा पैशांना पडत होते. कॉलरा किंवा अतिसाराच्या साथीने जगातील अनेक देश त्रस्त झाले होते. परिणामकारक असा उपाय हाती लागत नव्हता. अशा वेळी डॉ दिलीप महालनोबीस या देवदूताने तयार केलेल्या या जलसंजीवनीने जगभरातील पाच कोटी लोकांचे प्राण वाचवले.
ओआर एस ( ORS ) ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. द लॅन्सेट या जर्नलने याचा गुणगौरव करताना म्हटले की २० व्या शतकातील हा जगातील सर्वात महत्वाचा शोध आहे. आतापर्यंत या उपचारांना मान्यता न देणाऱ्या WHO ने या उपचारांना अधिकृतपणे मान्यता दिली. खरे तर ओआर एस चा सर्वप्रथम वापर केला तो भारतीय शास्त्रज्ञ डॉ. हेमेंद्रनाथ चॅटर्जी यांनी. पण त्यावरील अधिक संशोधन आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर रुग्णांसाठी वापर केला तो डॉ दिलीप महालनोबीस यांनी.
पुढे १९७५ ते १९७९ दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेसोबत ( WHO ) डॉ दिलीप यांनी अफगाणिस्तान, इजिप्त आणि येमेनमध्ये कॉलरा नियंत्रणासाठी काम केले. पुढे १९८० च्या दशकात त्यांनी जिवाणूजन्य रोगांच्या होणाऱ्या प्रादुर्भावावर संशोधन केले. मानवतेसाठी झिजणाऱ्या या संशोधकाने आपले सगळे आयुष्य रुग्णांच्या उपचारात आणि संशोधनात घालवून जगावर अनंत उपकार केले.
१९९४ मध्ये डॉ दिलीप महालनोबीस हे रॉयल स्वीडिश अकॅडमीचे परदेशी सदस्य म्हणून निवडून आले. २००२ मध्ये त्यांना कोलंबिया विद्यापीठाच्या वतीने डॉ नॅथनियल पियर्स यांच्यासह पॉलीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालरोगशास्त्रातील नोबेल पुरस्काराच्या बरोबरीचा हा सन्मान मानला जातो. २००६ मध्ये डॉ महालनोबीस, डॉ रिचर्ड कॅश आणि डॉ डेव्हिड नलीन याना प्रिन्स महिडोल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या संशोधन आणि पुरस्कारातून मिळालेली एक कोटी रुपयांची रक्कम डॉ दिलीप यांनी आपल्या मृत्यूपूर्वी कोलकात्यातील मुलांच्या रुग्णालयासाठी दान केली. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी या महामानवाने जगाचा निरोप घेतला.ज्या २९ जुलै २००२ मध्ये त्यांना पॉलीन पुरस्कार प्रदान करण्यात आला, तो २९ जुलै हा दिवस ओआर एस डे म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी २०२३ या दिवशी भारताच्या राष्ट्रपतींतर्फे त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतरत्न पुरस्कारानंतरचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो.
त्यांनी विकसित केलेली ही जलसंजीवनी आज आकर्षक स्वरूपात आणि वेगवेगळ्या चवीत औषधी दुकानांमध्ये विकली जाते. जगभरातील कोट्यवधी लोक त्याचा वापर करतात. आजही अत्यंत दुर्गम भागात जेथे डॉक्टर आणि वैद्यकीय उपचारांची वानवा असते, तेथे ही जलसंजीवनी हजारो लोकांचे प्राण वाचवते.
Ⓒ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१७/०२/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )